राजा हरिषेण
विंध्यसेनानंतर त्याचा पुत्र द्वितीय प्रवरसेन हा गादीवर आला. याच्या कारकिर्दीची फारशी माहिती मिळत नाही. अजिंठ्याच्या लेखात म्हटले आहे की हा आपल्या उत्कृष्ट व उदार राज्यशासनाने किर्तीमान झाला. त्याने सुमारे ४०० ते ४१५ पर्यंत, १५ वर्षे राज्य केले. हा निधन पावला तेव्हा याचा मुलगा केवळ आठ वर्षांचा होता. या बालराजाचे नाव अजिंठ्याच्या लेण्यातील लेखात नष्ट झाले आहे. मात्र त्याने उत्तम रीतीने राज्यकारभार केला असा उल्लेख पुढे आलेला आहे.
याच्या माघारी पुत्र देवसेन हा सन ४५० च्या आसपास गादीवर आला. याचा एकच अपूर्ण ताम्रपट विदर्भात सापडलेला आहे आणि तो आज लंडनच्या ब्रिटिश म्यूझीयम मध्ये आहे. देवसेनाचा हस्तीभोज नामक अत्यंत दक्ष, विनीत आणि गुणी असा सचिव होता. देवसेनाने त्याच्यावर कारभार सोपवून स्वतः ऐशोआरामात काळ घालविला. अजिंठा आणि घटोत्कच या दोन्ही लेण्यातील लेखांमध्ये या हस्तिभोजाचे उल्लेख आलेले आहेत. तो प्रजेला अत्यंत प्रिय होता. त्याच्याकडे जाण्यास सर्वांना मुक्तद्वार असे, असे वर्णन अजिंठ्याच्या लेखात आले आहे.
सन ४५० च्या सुमारास देवसेनानंतर त्याचा पुत्र हरिषेण हा गादीवर आला. हा या शाखेचा अंतिम ज्ञात राजा होय. हा शुर व महत्वकांक्षी असून त्याने आपल्या राज्याच्या सर्व दिशांस विजय प्राप्त केले. त्याच्या विजयाचे वर्णन अजिंठ्याच्या लेखात १४-१५ ओळीत आले आहे मात्र दुर्दैवाने त्याचा बराचसा भाग नष्ट झाला आहे. उरलेल्या भागात विदर्भाच्या चारही दिशांस असलेल्या भागांचे उल्लेख येतात. ते पूढील प्रमाणे, उत्तरेस अवंती (माळवा); पूर्वेस कोसला ( छत्तीसगड), कलिंग ( ओरिसा ) व आंध्र; पश्चिमेस लाट ( मध्य व दक्षिण गुजरात ) व त्रिकुट ( नाशिक ); दक्षिणेस कुंतल ( दक्षिण महाराष्ट्र ). यावरून उत्तरेतील माळवा ते दक्षिणेस कुंतल तर पश्चिमेस अरबी समुद्रापासून ते पूर्वेस बंगालच्या उपसागरापर्यंत हरिषेणाची सत्ता अबाधितपणे चालत होती. हा विस्तृत प्रदेश त्याच्या अंमलाखाली होता असे दिसत नाही, परंपरे अनुसार त्या राज्यांना जिंकून त्यांना वार्षिक कारभार देण्याच्या अटीवर हरिषेणाने त्यांची राज्ये परत केली असावी. ज्येष्ठ शाखेचा प्रदेश देखील त्याने आपल्या राज्यास जोडून घेतला होता.
हरिषेणाचा वराहदेव नामक सचिव होता जो हस्तिभोजाचा पुत्र होता. तोही आपल्या वडीलांप्रमाणे अत्यंत धार्मिक, उदार आणि दक्ष होता. त्यानेच अजिंठ्यातील सोळा क्रमांकाचे लेणे खोदवून घेतले. त्यात त्याने कोरलेल्या लेखात वत्सगुल्म शाखेची बरीचशी माहिती मिळते.
हरिषेण हा या शाखेचा अंतिम ज्ञात राजा होय. त्याच्या नंतर एक-दोन राजे झाले मात्र त्यांची नावेही आपल्याला माहीत नाहीत. हरिषेणानंतर लवकरच त्याच्या विस्तृत साम्राज्याचा विनाश झाला, मात्र तो कसा झाला याचे उल्लेख इतिहासांत मिळत नाहीत.
वाकाटकांच्या अस्तानंतर शंभर वर्षांनी दंण्डी याने लिहिलेल्या ‘दशकुमारचरीता’त एका विदर्भाच्या नृपतीची कथा आलेली आहे तीत वर्णिलेली राजकीय परिस्थिती ही वाकाटकांच्या अंतिम काळातील दिसते. मात्र ज्या भागात ही गोष्ट आलेली आहे तो उच्छवास अपूर्ण असल्याने सुद्धा संपूर्ण माहिती मिळत नाही. मात्र काही गोष्टी स्पष्ट होतात, जसे उत्तरेस नर्मदे पासून दक्षिणेस तुंगभद्रेपर्यंत पसरलेले विशाल वाकाटक साम्राज्य हरिषेणाच्या पुत्राच्या नादानीमुळे आणि मांडलीकांच्या फितुरीमुळे कोलमडून पडले.
अखेर सन ५५० च्या सुमारास माहिष्मतीच्या कलचुरी घराण्यातील राजा कृष्णराज याने विदर्भ व उत्तर महाराष्ट्र जिंकून घेतला, पूर्वेकडील कोसल, कलिंग व आंध्र यांनीही आपले स्वातंत्र्य घोषित केले तर दक्षिणेत कुंतलाधिपती राष्ट्रकूट ही हळू हळू प्रबळ होऊ लागले. अशा रीतीने सुमारे तीनशे वर्षांच्या उज्ज्वल शासनानंतर सन ५५० च्या सुमारास वाकाटकांचा वंश नामशेष झाला
- प्राजक्ता देगांवकर
संदर्भ
१)वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ - वा. वी. मिराशी
२) प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती - डॉ. गो. बं. देगलूरकर
३) महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास मुसलमान पूर्व महाराष्ट्र - वा. कृ. भावे
No comments:
Post a Comment