उर्वरित कलचुरी राजे
महाप्रतापी राजा कर्णांनंतर त्याचा पुत्र यश:कर्ण हा राजा झाला. याने आपल्या राजकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात आंध्र देशावर आक्रमण करून द्राक्षाराम येथे त्याने वेंगीचा चालुक्य नृपती सातवा विजयादित्य याचा पराभव केला. मात्र नंतरच्या काळात यश:कर्णाच्या ताब्यातून कानोज आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर गाहडवालांनी जिंकून घेतला. नंतरच्या काळात तर गाहडवालांनी बनारस ही जिंकून घेतले. त्यामुळे यश:कर्णाने आपली राजधानी परत त्रिपुरीस हलवली. तिथेही त्याचा तीनदा पराभव झाला. आपल्या आजोबा आणि पित्या सारखे शौर्य आणि राजनीतीकुशलता त्याच्या अंगी नव्हती यामुळेच त्याच्या कारकीर्दीत कलचुरिंची सर्वत्र पिछेहाट होऊन त्यांचे छोटेसे राज्य बघेलखंडापुरते मर्यादित राहिले. कलचुरींच्याया मुख्य शाखेचे कमी होत जाणारे तेज बघून रत्नपुर या कलचुरी राजघराण्याने त्यांचे स्वामित्व धुडकावून लावले. इथून पुढचे त्रिपुरी शाखेचे सर्वच राजे हे शक्तिहीन झालेले दिसतात.
यश:कर्णांनातर त्याचा पुत्र गयाकर्ण हा गादीवर आला. त्याच्या नंतर त्याचे पुत्र नरसिंह आणि जयसिंह हे राजे होऊन गेले. त्रिपुरी शाखेचा शेवटचा ज्ञात राजा हा या जयसिंहाचा मुलगा विजयसिंह हा होय. या शेवटच्या काळात बघेलखंडाचा उत्तर भाग ही चंदेल राजांकडे गेलेला दिसतो. सोबतच मुसलमानी सत्तेचा सुद्धा शिरकाव बघेलखंडात झाला. आणि शेवटी चौदाव्या शतकाच्या सुरुवातीस हा संपूर्ण प्रदेश मुसलमानांच्या ताब्यात गेला.
त्रिपुरी शाखेच्या अस्तानंतर सुद्धा अजून एक कलचुरी राजवट भारतामध्ये अस्तित्वात होती ती म्हणजे रत्नपुरचे कलचुरी.
रत्नपुरच्या कलचुरी शाखेमध्ये सुद्धा काही महत्त्वाचे राजे झाले मात्र नंतर आलेल्या मुसलमान आणि यादव राजांच्या सततच्या हल्ल्यांमुळे त्यांना आजच्या छत्तीसगढ मध्ये आपली राजधानी हलवावी लागली. तिथून त्यांनी कसाबसा अठराव्या शतकापर्यंत राज्यकारभार केला. मात्र अठराव्या शतकाच्या मध्यात मराठ्यांनी छत्तीसगढवर आक्रमण केले. तेव्हा कलचुरींच्या सर्व मंडलिक राजांनी मराठ्यांचे मांडलिकत्व स्वीकारले आणि अश्या रीतीने जवळपास बारा शतके भारताच्या कोणत्या ना कोणत्या भागावर राज्य करणारे कलचुरी राजघराणे अस्तास गेले.
वाकाटक राजघराण्यानंतर कलचुरींनी काही काळासाठी महाराष्ट्रात राज्य केले मात्र नंतर त्यांचा महाराष्ट्रावरील ताबा कमी झालेला दिसतो, याचे मुख्य कारण म्हणजे बदामीच्या चालुक्यांचे महाराष्ट्रात वाढणारे वर्चस्व हे होय. आणि म्हणूनच पुढील भागात बदमीच्या चालुक्यांविषयी माहिती घेऊ.
- प्राजक्ता देगांवकर
संदर्भ
१)कलचुरी नृपती आणि त्यांचा काळ - वा. वी. मिराशी
No comments:
Post a Comment