महाप्रतापी राजा कर्ण...
कर्णाकडून हार पत्करलेला मालव नृपती जयसिंह हा त्याचा वैरी असणाऱ्या चालुक्य राजाकडे आश्रयासाठी गेला. एकमेकांचे हाडवैरी असले तरी कर्णाच्या विरुद्ध या दोघांनी एकत्र येऊन मोहीम उघडली. त्यात शेवटी दक्षिणेची सरशी झाली आणि माळवा पुन्हा एकदा जयसिंह कडे आला.
चालुक्यराजा सोमेश्वर आणि परमार राजा जयसिंह या दोघांनी एकत्र येऊन मालव प्रांत कर्णाच्या ताब्यातून जिंकून घेतला असला तरी तो परत जिंकून घेण्यासाठी कर्णाने पुन्हा एकदा मालव प्रांतावर स्वारी केली. यावेळी मात्र चालुक्यांनी कर्णाला मदत केली आणि त्याच्या जोरावर कर्णाने माळव्यावर प्रचंड मोठे सैन्य घेऊन हल्ला चढवला. या हल्ल्यात परमार राजा जयसिंह मारला गेला आणि संपूर्ण माळवा पुन्हा एकदा कर्णाच्या ताब्यात आला मात्र काही काळासाठीच. नंतर हा संपूर्ण प्रदेश राजा भोज याचा बंधू असणाऱ्या उदयादित्य याने जिंकून घेतला.
चंदेलांचा प्रदेश ही लवकरच कर्णाच्या ताब्यातून मुक्त झाला. महोबा येथील शिलालेखात म्हटले आहे की ज्याप्रमाणे भगवान श्रीविष्णून्नी क्षिरसमुद्राचे मंथन करून लक्ष्मी मिळवली त्याच प्रमाणे चंदेल राजा किर्तीवर्म्याने लक्ष्मीकर्णाचा पराभव करून राज्यलक्ष्मी हस्तगत केली.
अश्या रीतीने उत्तर भारतात आपले एकछत्री साम्राज्य निर्माण करण्याचे कर्णाचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरले. शेवटी निराश होऊन त्याने आपला पुत्र यश:कर्ण यास स्वतःच राज्याभिषेक केला.
असे असले तरी त्याची योग्यता कमी होत नाही. त्याने परमभट्टारक, महाराजाधिराज, परमेश्वर या सम्राट निदर्शक पदव्या धारण केल्या होत्या. या सोबतच तो स्वतःस त्रिकलिंगाधिपती आणि 'अश्र्वपतीगजपतीनरपति -
राजत्रयाधिपती ' असेही म्हणवून घेत असे. पहिली पदवी त्याने कलिंग जिंकून घेतला तेव्हा धारण केली होती आणि दुसरी कनोजच्या प्रतीहारांना अश्वपती म्हणत कारण त्यांची घोडदळाबद्दल ख्याती होती तर कलिंग देशाचे राजे स्वतःस गजपती म्हणून प्रसिध्द होते. चालुक्यांना नरपति अशी संज्ञा होती, आणि म्हणूनच त्याने ही अशी पदवी धारण केली, जी सर्व बाबतीत सार्थ होती. मात्र नंतरच्या निर्बल राजांनीही ती चालू ठेवली त्यात काही अर्थ नव्हता.
कोरीव लेखात वर्णन आहे की कर्णाच्या दरबारी एकशे छत्तीस राजे उपस्थित असत. त्याचा पराक्रम पाहून मुरल, कुंग, वंग, कलिंग आणि किर या देशांचे राजे चळाचळा कापत, तर चोल, हूण, गुर्जर हे त्याची सेवा करण्यासाठी राजदरबारात हजर असत. त्याच्या तुफानी स्वाऱ्यांमुळे आणि पराभूत शत्रूशी कठोरपणे वागण्याच्या त्याच्या नितीमुळे त्याला प्रलयाची वा कालाग्नीची उपमा दिलेली आहे.
तो जसा युद्धात प्रवीण होता तसाच शांततेच्या काळात देखील अग्रेसर होता. त्याने विद्या आणि कलांना उदार आश्रय दिला होता. त्याने बनारस येथे कर्णमेरू नावाचे बारा मजल्यांचे उत्तुंग शिवालय बांधले होते. त्याचे अवशेष आजही राजघाटावर
दिसतात. यासोबतच त्याने प्रयागला कर्णतीर्थ नावाचा घाट देखील बांधला. या सोबतच काशी जवळ कर्णावती नावाचा अग्रहार त्याने वसवला होता. कर्ण स्वतः जरी वैदिकधर्मानुयायी होता तरी त्याने इतर धर्मांचा ही आदर केलेला दिसतो. कारण त्याच्या काळात सारनाथ येथे बौद्ध संघ अत्यंत भरभराटीला आल्याचे उल्लेख आहेत.
या सोबतच कर्णाने अनेक विद्वानांना उदार आश्रय दिला होता. सुप्रसिद्ध कवी बिल्हण हा देखील काही काळासाठी कर्णाच्या दरबारी होता. या सोबतच अनेक वेगवेगळ्या कवींची कर्णाच्या स्तुतीची सुभाषिते आहेत.
तर अश्या या महाप्रतापी कर्णाने सन १०४१ ते जवळ जवळ १०७३ पर्यंत सुमारे ३२ वर्षे राज्य केले.
एवढा पराक्रमी राजा आपल्याला मात्र आजही अज्ञातच आहे.
- प्राजक्ता देगांवकर
संदर्भ
१)कलचुरी नृपती आणि त्यांचा काळ - वा. वी. मिराशी
No comments:
Post a Comment