भाग १
पोस्तसांभार :https://misalpav.com/node/47423
गाभा:
जावळी म्हणजेच जयवल्ली, 'येता जावळी जाता गोवली' म्हणून मिरवली गेलेली. चंद्रराव उपाधी धारण करणाऱ्या मोर्यांची राजधानी. शिवरायांनी ज्यांचा बिमोड केला, जावळी जिंकून स्वराज्य विस्तार केला, अफझलखानाचा कोथळा काढला, आदिलशाही फौजेचा डंका वजावला अशी ती जावळी. .एकबाजूला घनदाट झाडी, महाबळेश्वर , भोरप्या(आता प्रतापगड) रायगड सारखे अभेद्य जंगल आणि किल्ले कपारी आणि तिथूनच कोकणात उतरला तर थेट अरबी समुद्र अशी ही जावळी खोऱ्याची रचना आहे.सातारा जिल्ह्यात प्रतापगड सोडल्यावर महाबळेश्वरकडे जाताना साधारण ३-४ किमी डावीकडे जावळीच्या मोरे घराण्याचे कुळ आहे. हे जावळीचं बेलाग खोरं इतकं अवघड आणि अभेद्य की, १४ व्या शतकात ५००० मुसलमानी फौजा जावळीत गेल्या , त्या परतल्याच नाहीत आणि त्याचं काय झालं याचा ठाव ठिकाण देखील लागला नाही.अशी हि जावळी प्रत्यक्ष ताब्यात घ्यावी अशी कोणाची हिम्मत नव्हती.चंद्रराव हे विजापुरकरांचे (आदिलशहा) पिढीजात जहागीरदार होत.
जावळीच्या संस्थानची स्थापना करण्याऱ्या मूळ व्यक्तीचे नाव 'चंद्रराव' असे होते. या चंद्ररावला ६ मुले होती. त्यापैकी थोरल्या मुलाला त्याने स्वत:जवळ ठेवले आणि इतरांना जावळीतील निरनिराळ्या जागा नेमून दिल्या. थोरल्या शाखेत चंद्रारावापासून पुढील ८ पिढ्या झाल्या. चंद्रराव - चयाजी - भिकाजी - शोदाजी - येसाजी - गोंदाजी - बाळाजी - दौलतराव. जावळीचा हा प्रत्येक शाखापुरुष किताब म्हणून चंद्रराव हे नाव धारण करू लागला. चंद्रराव मोर्यांनी आठ पिढ्या खपून त्यांनी आपले वैभव एखाद्या सार्वभौम राजासारखे वाढविले होते . मोऱ्यांजवळ १०-१२ हजार फौज होती. महाडपासून महाबळेश्वर पर्यंतचा डोंगरी भाग व बव्हंश सातारा जिल्हा त्यांनी काबीज केला होता. या बाजूने कोकणात उतरणाऱ्या हातलोट व पार घाटातील माल वाहतुकीची जकात मोरे वसूल करीत. त्यांच्या अमलाखाली महाबळेश्वर, जावळी(कोयनेचे खोरे), वरंधघाट, पारघाट, शिवथर, रायगड इतका प्रांत होता.
बहामनी राज्याच्या उदयानंतर मराठे, पादशहाकडे नोकरी करून मनसबदारी मिळवुन राहू लागले. अश्या मराठ्यामध्ये चंद्रराव मोरे हा विजापुरी चाकरी करत होता. इथून पुढे बखरीत चंद्रराव मोरे यांची हकीकत सुरु होते.
No comments:
Post a Comment