विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 31 July 2023

महाराजा सयाजीराव आणि परिचारिका सेवा क्षेत्र

 




महाराजा सयाजीराव आणि परिचारिका सेवा क्षेत्र
- शिवानी घोंगडे, वारणानगर
(८०१०४४७७४०)
​आरोग्य क्षेत्रात रुग्णांवरील उपचार आणि त्यांची सुश्रुषा करण्यात परिचारिकांची भूमिका महत्वपूर्ण असते. लंडनमधील फ्लॉरेन्स नाईटिंगल या परिचारिकेने संपूर्ण जगाला रुग्णसेवेची ओळख करून दिली. रुग्णांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा मिळावी या हेतूने तिने लंडनमधील सेंट थॉमस हॉस्पिटलमध्ये मॉडर्न नर्सिंग स्कूलची स्थापना केली. प्रशिक्षण काळात परिचारिकांना शिष्यवृत्ती देण्याची पद्धत यु.के. मध्ये सर्वप्रथम सुरू करण्याचे श्रेय फ्लॉरेन्स नाईटिंगल या परिचारिकेस जाते. फ्लॉरेन्सने १८५४ मध्ये झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना शोधून त्यांच्यावर उपचार करून अनेकांचे प्राण वाचवले. तिच्या या साहसी रुग्णसेवेमुळेच तिचा १२ मे हा तिचा जन्मदिवस संपूर्ण जगात ‘परिचारिका दिन’ म्हणून साजरा केला जातो. या परिचारिका दिनाच्या निमित्ताने सयाजीरावांनी त्यांच्या बडोदा संस्थानात राबविलेल्या आरोग्यविषयक धोरणात परिचारिकांना दिलेले महत्व जाणून घेणे औचित्यपूर्ण ठरेल.
​‘महिलांचे आरोग्य हा पुरुषांच्या आरोग्याइतकाच देशाच्या विकासातील महत्त्वाचा घटक आहे’ असे सयाजीराव महाराजांचे मत होते. अप्रशिक्षित सुईणींनी घरातच केलेल्या प्रसूतीमुळे आई व बाळाच्या जीवाला उद्भवणारा धोका व त्यातून निर्माण होणारे विविध आजारातून माता व बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी स्त्रियांना परिचारिका प्रशिक्षण द्यावे अशी सयाजीरावांची इच्छा होती. सर्वच ठिकाणी प्रशिक्षित परिचारिका उपलब्ध असण्याची गरज व्यक्त करताना सयाजीराव महाराज म्हणतात, “राज्यात मोठमोठ्यांच शहरातून फक्त आधुनिक साधनांनी सज्ज अशा वैद्यकीय संस्था असाव्यात असे नाही, तर प्रत्येक तालुक्याच्या मुख्य ठिकाणी अनुकूलतेप्रमाणे लहान दवाखाने व प्रसूतिगृहे असावीत व प्रत्येक मोठ्या गावी औषधालये आणि शिकलेल्या सुईणी असाव्यात अशी माझी इच्छा आहे.” आजच्या कोरोना प्रादुर्भावाच्या काळात सयाजीरावांच्या या चिंतनाचे ‘खरे’ मोल आपल्याला कळते.
​प्रशिक्षित परिचारिकांचे महत्व अधोरेखित करताना पुढे सयाजीराव म्हणतात, “आपल्या बाळबाळंतिणींना आजच्या अज्ञानी सुइणी, विचारशून्य आप्त आणि चुकीच्या चालीरीती या तिघांच्या हवाली करून भयंकर संकटात लोटण्यापेक्षा जुन्या काळाच्या रानटी माणसाप्रमाणे तथा पशुपक्ष्यांप्रमाणे त्यांना प्रसूतीसमयी आपापली सोय आपणच लावून घेण्यास सांगितलेले पुष्कळ बरे.... प्रसूतीच्या वेळी जी परीक्षा म्हणा, मदत म्हणा करावयाची ती वैद्यकीय शुद्धता सांभाळूनच केली पाहिजे, नाहीतर रोगाचे जंतू शरीरात भिनण्याची या वेळी फार भीती असते. ही शुद्धता तुमच्या निर्बुद्ध, अशिक्षित सुईणीच्या अंगी कोठून असणार?” सयाजीराव महाराजांनी मांडलेला हा वैज्ञानिक दृष्टीकोण आजही आपल्यासाठी मार्गदर्शक आहे.
​सयाजीरावांचा बडोद्यात परिचारिका प्रशिक्षण विद्यालय सुरू करण्याचा विचार होता. परंतु जागेच्या कमतरतेमुळे असे विद्यालय बांधणे शक्य नसल्याने सयाजीरावांचा हा विचार मागे पडला. यांसंदर्भात ३० जानेवारी १८८७ ला लेडीरे यांना लिहिलेल्या पत्रात सयाजीराव म्हणतात, “तुम्हाला दिलेले आश्वासन पूर्ण करण्याबाबत मला हे पत्र लिहावे लागत आहे. येथील जागेचा तुटवडा लक्षात घेता असा विचार झाला की, परिचारिका प्रशिक्षण विद्यालय येथे सुरू करणे हे अनावश्यक आहे. त्याऐवजी येथील गरजा पूर्ण करण्यासाठी मुंबईत प्रशिक्षित केलेल्या सहा तरुण मुली जर येथे आल्या तर येथे प्रशिक्षण विद्यालय सुरू करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या आर्थिक तरतुदीच्या तुलनेत कमी खर्चात मोठे काम होऊ शकते. या महत्त्वपूर्ण कामासाठी काही मुलींना पाठवण्याचे आदेश मी आधीच दिलेले आहेत.” महाराजांनी पुढील वर्षी म्हणजे १८८८ मध्ये दोन महिला विद्यार्थिनींना परिचारिका व सुईनीचे शिक्षण घेण्यासाठी कॅमा हॉस्पिटलला पाठविले.
​सयाजीरावांच्या सिल्व्हर ज्युबिलीच्या निमित्ताने १९०७ मध्ये न्यू स्टेट जनरल हॉस्पिटलची पायाभरणी करण्यात आली. जनतेच्या आरोग्यविषयक सोयीसुविधांच्या गरजा लक्षात घेऊन या हॉस्पिटलची रचना करण्यात आली होती. १९१७ मध्ये या हॉस्पिटलचे बांधकाम पूर्ण झाले. २७ फेब्रुवारी १९१७ ला मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड विलिंग्डन यांच्या हस्ते या हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले. या हॉस्पिटलचे वैशिष्ट्य म्हणजे तेथे परिचारिका प्रशिक्षण केंद्र देखील सुरू करण्यात आले होते. या प्रशिक्षण केंद्रामधून बाहेर पडलेल्या प्रशिक्षित परिचारिका स्त्रियांच्या आर्थिक सक्षमीकरणाची साक्ष देणार्या होत्या. या प्रशिक्षण केंद्रामुळे संपूर्ण संस्थानात प्रशिक्षित परिचारिका उपलब्ध होऊन, स्त्रियांना तातडीने आरोग्यविषयक मदत मिळणे शक्य झाले.
​बाळाच्या जन्मावेळी दाई हजर असण्याचे महत्व लोकांना पटवून देणे आणि दाईप्रती असणारा निष्काळजीपणा व केले जाणारे दुर्लक्ष यावर मात करण्यासाठी १६ ऑक्टोबर १९१९ रोजी बडोद्यात ‘दाई कायदा’ लागू करण्यात आला. या कायद्यानुसार परिचारिका प्रशिक्षण घेतल्याशिवाय कोणत्याही महिलेला सुइणीचे काम करण्याची परवानगी नाकारण्यात आली. परिचारिका प्रशिक्षण पूर्ण करून एखाद्या रुग्णालयात कामाचा अनुभव घेतल्यानंतरच त्या स्त्रीला परिचारिकेचा परवाना दिला जात होता. रितसर परिचारिकेचा परवाना घेतल्यानंतरच स्त्रिया परिचारिका म्हणून आपली सेवा बजावण्यास पात्र ठरत असत. या कायद्यामुळे अप्रशिक्षित सुईणीकडून स्वच्छतेची आणि आरोग्याची कोणतीही काळजी न घेता केल्या जाणाऱ्या बाळंतपणावर आळा बसला.
​‘दाई ॲक्ट’ लागू केल्यानंतर बडोदा संस्थानात परिचारिका व्यवसायाचे प्रशिक्षण घेणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढली. हा कायदा करण्यामागे महाराजांचे दोन महत्त्वाचे हेतू होते. एक म्हणजे महिलांना प्रशिक्षित परिचारिकांच्या हस्ते आरोग्याशी संबंधित उपचार केले जावेत आणि दुसरा म्हणजे स्त्रियांनी परिचारिका प्रशिक्षण घेऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनावे. एखादी स्त्री विनापरवाना परिचारिकेचे कार्य करताना आढळल्यास तिला १०० रु. दंडाची तरतूद या कायद्यात होती. त्या वेळची ही १०० रुपये दंडाची रक्कम आजच्या रूपयाच्या मुल्यात २ लाख ६० हजार रुपयांहुन अधिक भरते. ही दंड स्वरुपातील रक्कम सयाजीरावांनी केलेल्या या कायद्याचे गांभीर्य लक्षात आणून देते.
​सयाजीरावांनी बडोदा संस्थानात १९१९ ला दाई कायदा केला. परंतु या कायद्याची पूर्वतयारी ४ वर्षे अगोदर समाज प्रबोधनातून सयाजीरावांनी केली असल्याचे दिसते. २० जानेवारी १९१५ रोजी पाटण येथील प्रसूतिगृहाची कोनशिला बसविण्याच्या समारंभावेळी केलेल्या भाषणात सयाजीराव म्हणतात, “तिकडे (युरोपातील देशांत) सरकार, स्थानिक संस्था व बऱ्याचशा खासगी संस्थादेखील या कामात लक्ष घालून फक्त प्रसूतीच्या वेळी नव्हे तर प्रसूतीच्या आधीपासूनही गर्भिणी बायांची व गर्भस्थ मुलांची व्यवस्थितपणे काळजी घेतात. तिकडे प्रसूतीचे काम करावयाचे ते शिकलेली सुईण किंवा डॉक्टरच फक्त करतात आणि त्यांनीसुद्धा जर आपल्या कामात कुठे हयगय किंवा चूक केली तर ते शिक्षेला पात्र होतात किंबहुना मनुष्यहत्येचा आरोपही त्यांच्यावर ठेवता येतो. सुइणीचे शिक्षण तिकडे फार लांबलचक असते, नंतर परीक्षा देऊन त्यांना प्रशस्तिपत्र मिळवावे लागते आणि कामाच्या वेळी अनेक कडक नियम त्यांना पाळावे लागतात.”
​महिला आपल्या आरोग्यविषयक समस्या महिला डॉक्टरांशी जास्त मोकळेपणाने बोलू शकतील याची महाराजांना पूर्ण कल्पना होती. परंतु त्या काळात महिला डॉक्टरांची असणारी कमतरता सयाजीरावांच्या या कल्पनेतील सर्वात मोठा अडथळा ठरत होती. यावर उपाय म्हणून महाराजांनी दवाखान्यातून ‘लेडी सुपरीडेंट’ हे पद निर्माण केले. स्टेट जनरल हॉस्पिटलमधील ‘लेडी सुपरीडेंट’ या पदासाठी महिना ३०० रुपये विद्यावेतन व वार्षिक १५ रुपयांची वाढ निश्चित करण्यात आली होती. त्याचबरोबर परिचारिकांच्या नेमणुकादेखील करण्यात आल्या होत्या. या परिचारिकांना मासिक १६० रुपये वेतन दिले जात होते. तर दोन वर्षातून एकदा २० रुपये पगारवाढ केली जात असे.
​केवळ आपल्याच संस्थानातील नव्हे तर कोणत्याही ठिकाणच्या परिचारिकांनी केलेल्या उत्कृष्ट कामाचे कौतुक सयाजीरावांनी केले. ५ एप्रिल १९११ रोजी मुंबई येथील बॉम्बे सॅनिटरी असोसिएशन अधिवेशनाच्या अध्यक्षीय भाषणात सयाजीराव म्हणतात, “मुंबई म्यूनिसिपालिटीने नोकरीस ठेवलेल्या सुइणी जी कामगिरी करीत आहेत तिची प्रशंसा करावी तेवढी थोडीच आहे. ऐन बाळंतपणाच्या वेळेचे अर्ध्या-पाव तासाचे काम तेवढे या सुइणी करतात असे नाही, त्या आजाराची शुश्रूषा करतात, जन्ममृत्यूची खबर देतात, संसर्गजन्य रोगाने पिडलेल्या माणसांची माहिती पुरवितात आणि दया, दुःखनिवारण व ज्ञानदान ही पवित्र कार्ये वीरांगनांच्या उत्साहाने त्या करीत असतात.”
​ज्या काळात स्त्रियांना घराच्या बाहेर पडण्याचाही अधिकार नव्हता त्यावेळी सयाजीरावांनी स्त्रियांना परिचारिका प्रशिक्षण देण्याचा आग्रह धरला. ही बाब जशी स्त्रियांना गुलामगिरीतून मुक्त करून स्वावलंबी बनवण्याचा मार्ग तयार करण्यास महत्वपूर्ण होती तशीच सयाजीरावांच्या स्त्री सक्षमीकरणाच्या प्रयत्नांचा दाखला देणारीही होती. महाराजांनी स्त्रियांच्या विकासासाठी केलेल्या वेगवेगळ्या सुधारणांना समाजातून प्रचंड विरोध झाला. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत महाराजांनी आपले स्त्री सुधारणेचे कार्य सुरूच ठेवले. त्याचाच परिणाम म्हणून इतर संस्थानांच्या तुलनेत बडोदा संस्थानातील स्त्रिया शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षणातसुद्धा पुढे असल्याचे दिसून येते.
​कोरोना प्रादुर्भावाच्या काळात रुग्णांना वाचवण्यासाठी संपूर्ण भारतातील आरोग्य व्यवस्थेने केलेली ‘धावपळ’ आपण अनुभवली आहे. आरोग्यविषयक सुविधांची कमतरता आणि योग्य नियोजनाचा अभाव या प्रमुख दोन कारणांमुळे असंख्य व्यक्तींचा जीव धोक्यात आला. या आपत्तीतून ‘सहीसलामत’ सुटायचे असेल तर सयाजीराव महाराजांनी दाखवलेल्या मार्गावरुन ‘वाटचाल’ करण्याशिवाय भारताला तरणोपाय नाही.

महाराजा सयाजीराव आणि रियासतकार सरदेसाई

 




महाराजा सयाजीराव आणि रियासतकार सरदेसाई
- दिनेश पाटील, वारणानगर
(९६२३८५८१०४)
महाराजा सयाजीराव यांनी १८८१ ला राज्यकारभार हाती घेतल्यापासून पुढे ५८ वर्षांच्या कारकिर्दीत जे अफाट काम उभे केले त्याला आधुनिक भारताच्या इतिहासात तोड नाही. धर्मसुधारणेपासून ते स्वातंत्र्य चळवळीपर्यंत ब्रिटीश भारतातील सार्वजनिक जीवनातील असे एकही क्षेत्र नव्हते जिथे महाराजांचा वावर नव्हता. महत्वाचे म्हणजे हा वावर अत्यंत रचनात्मक आणि प्रागतिकसुद्धा होता. अविश्वसनीय स्वरूपाचे हे यश महाराजांनी स्वत: आंतरराष्ट्रीय विद्याव्यासंग, विश्व पर्यटन, वैयक्तिक आणि राजकीय जीवनात ज्ञानाला सर्वाधिक प्रतिष्ठा देण्याची भूमिका, आपल्या राज्यालाच नव्हे तर राष्ट्राला जगातील प्रगत देशांच्या रांगेत वरच्या स्थानावर प्रस्थापित करण्याचा ध्यास याचा परिपाक होता.
महाराजांच्या ५८ वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल २८ वर्षे महाराज परदेशात राहून राज्यकारभार करत होते. हे वास्तव विचारात घेतले तर शिवरायांनी गुणी आणि ज्ञानी लोकांची एक फौज उभा करून स्वराज्याचे स्वप्न सुराज्यासह साकारले. शिवरायांप्रमाणे सयाजीरावांनी आपल्या प्रशासनाच्या सर्वच विभागात प्रामाणिक, ज्ञानी, प्रचंड कष्टाळू आणि प्राणाची आहुती देण्याची तयारी असणारे खासेराव जाधव यांच्यासारखे अधिकारी निर्माण केले. प्रसंगी भारताबरोबर जगभरातून विविध क्षेत्रातील अव्वल लोक बडोदा प्रशासनात आणले, त्यांना पूर्ण अधिकार दिले, त्यांचे न आवडणारे सल्ले ऐकले आणि अंमलात आणले. त्यामुळेच महाराज परदेशात राहूनसुद्धा या अव्वल दर्जाच्या प्रशासनयंत्रणेच्या जोरावर उत्तम राज्यकारभार करू शकले.
सत्यशोधक धामणस्कर, खासेराव जाधव, वासुदेव लिंगोजी बिर्जे, दामोदर सावळाराम यंदे, नानासाहेब शिंदे, आर. एस. माने-पाटील, योगी अरविंद, एफ.ए.एच. इलियट, रोमेशचंद्र दत्त, मणिभाई देसाई, लक्ष्मण वैद्य, काझी शहाबुद्दीन, जयसिंगराव आंग्रे, पेस्तनजी दोराबजी, आप्पासाहेब मोहिते, टेकचंद, मि. सेडन, सत्यव्रत मुखर्जी, अमेरिकन अर्थतज्ञ व्हाईटनेक, अमेरिकन ग्रंथालय तज्ञ बॉर्डन, कलाभवन उभे करणारे टी. के. गज्जर, केम्ब्रिज स्कॉलर व तुलनाकार ए.जे. विजेरी, जागतिक कीर्तीचे बौद्ध पंडित बिनोयतोष भट्टाचार्य ही काही उदाहरणे यासंदर्भात सांगता येतील. रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई हेसुद्धा वरील प्रभावळीतील एक महत्वाचे नाव आहे.
गोविंद सखाराम सरदेसाई ते रियासतकार सरदेसाई
सयाजीरावांनी आपल्या कारकिर्दीत मराठी भाषा आणि साहित्य याला दिलेले योगदान त्यांच्या इतर कामाप्रमाणेच अतुलनीय होते. महाराजांनी १८०० हून अधिक मराठी ग्रंथांचे प्रकाशन केले. या कामासाठी सयाजीरावांनी केलेला खर्च कोटीत भरेल. महाराजांच्या या कामातून मराठी साहित्याला २०० हून अधिक लेखक मिळाले. त्यातील अनेकजण महाराजांच्या प्रयत्नाने किंवा प्रेरणेने लेखक झाले होते. कृष्णराव अर्जुन केळूसकर गुरुजींना उपनिषदांच्या भाषांतराचे काम देवून महाराजांनी त्यांनाही लिहिते केले. उपनिषदांच्या मूळ संस्कृत ग्रंथांआधारे मराठीत अनुवाद करणारे केळूसकर हे पहिले ब्राह्मणेतर होते. गोविंद सखाराम सरदेसाई ते रियासतकार सरदेसाई हा सरदेसाईंचा प्रवास १८८९ ते १९२५ या सरदेसाईंच्या सयाजीरावांच्या ३७ वर्षाच्या सेवेचा परिपाक आहे. हा कालखंड महाराजांच्या वैयक्तिक जीवनाबरोबर बडोद्याच्या सामाजिक जीवनातील क्रांतिकारक कालखंड होता. कारण या कालखंडात आदर्श राज्याचे सयाजीरावांचे स्वप्न संपूर्ण सत्यात उतरले होते. महाराजांचे कौटुंबिक जीवन, विद्या व्यासंग, धर्म सुधारणांसह वेदोक्त प्रकरण, महाराजांच्या सर्व मुलांचे शिक्षण, महाराजांच्या निर्णयाविरुद्ध जाऊन त्यांची कन्या इंदिराराजे यांनी केलेला मराठा-आदिवासी हा क्रांतिकारक विवाह यासारख्या ऐतिहासिक घटनांमध्ये सरदेसाईंची भूमिका अत्यंत महत्वाची होती.
सरदेसाईंच्या बडोद्यातील नोकरीची सुरुवात महाराजांचे रीडर म्हणून झाली. महाराजांचे रोजचे टपाल व वर्तमानपत्र पाहून ती त्यांच्या सवडीप्रमाणे वाचून दाखवणे, खाजगी पत्रांची उत्तरे देणे, महाराज पुस्तके वाचीत त्यातील कठीण शब्द काढून टिपणे करणे यासाठी दिवसातील दोन-तीन तास सरदेसाईंना महाराजांकडे काम असे. महाराजांचे धोरण असे होते की राजवाड्यातील किंवा संस्थानच्या प्रशासनातील प्रत्येकाने भरपूर काम केले पाहिजे. त्यातूनच सरदेसाईंच्या रिकाम्या वेळेचा सदुपयोग करण्याचा मार्ग सयाजीरावांनी कसा शोधून काढला हे सरदेसाईंच्या शब्दात सांगायचे झाल्यास,“...बाकीचा माझा वेळ रिकामा जातो हें तत्काळ महाराजांच्या नजरेस आलें. मॅकिआव्हेलीचें ‘प्रिन्स’ व सीलीचें ‘एक्स्पान्शन ऑफ् इंग्लंड’ हीं पुस्तकें त्यांनीं वाचलीं मराठीत त्या वेळीं ह्या नवीन पाश्चात्य विचारांचीं पुस्तकें नव्हतीं हें जाणून त्यांनीं मला त्या पुस्तकांचे मराठी भाषांतर करण्याचें काम दिलें.”(सरदेसाई, माझी संसारयात्रा, १९५६, ९५) सरदेसाईंनी हे काम केले तेव्हा ते या क्षेत्रात पुर्णपणे नवखे होते.
परंतु महाराजांनी दिलेले काम म्हणजे करावेच लागेल अशी परिस्थिती असल्याने पहिल्या वर्षी ‘प्रिन्स’ चे भाषांतर ‘राजधर्म’, पुढील दोन वर्षात सीलीच्या ‘एक्स्पॅन्शन ऑफ् इंग्लंड’चे ‘इंग्लंड देशाचा विस्तार’ अशी दोन पुस्तके महाराजांच्या खर्चाने प्रकाशित झाली आणि ‘इतिहासकार’ सरदेसाईंचा उदय झाला. पुढे महाराजांबरोबर अमेरिकेत गेले असता सीली या मुळ लेखकाला भेटण्याची संधी त्यांना मिळाली. त्यासंदर्भात सरदेसाई म्हणतात, “सीलीचें पुस्तक मी त्या प्रोफेसरांस केंब्रिज येथें स्वत: भेटून नजर केलें. ह्याला मी नशीब म्हणतो.” (सरदेसाई, माझी संसारयात्रा, १९५६, ९६) सरदेसाईंच्या जीवनातील सयाजीराव नावाचा ‘टर्निंग पॉइंट’ किती महत्वाचा होता हे या घटनेवरून लक्षात येते. याच कालखंडात सरदेसाईंचे वास्तव्य राजवाड्यात असल्यामुळे महाराजांचे प्रचंड मोठे खासगी ग्रंथालय सरदेसाईंच्या ताब्यात असल्यासारखे होते. महाराजा सयाजीराव हे ग्रंथप्रेमी राज्यकर्ते होते. त्यांचे खासगी ग्रंथालय सर्व प्रमुख ज्ञानशाखांच्या जागतिक दर्जाच्या ग्रंथांनी समृद्ध होते. धर्म, इतिहास, तत्वज्ञान, साहित्य आणि संस्कृती यासंदर्भातील सर्वोत्तम ग्रंथ या संग्रहात होते. विविध विषयावरील ६५ शब्दकोश, १५ विश्वकोश, जागतिक लौकिक असणाऱ्या २६ ग्रंथमालांतील ग्रंथ यांचा यामध्ये समावेश होतो. जवळजवळ ५० अभ्यास विषयांशी संबंधित ग्रंथ येथे होते. १९१० मध्ये हे सर्व ग्रंथ प्रजेला मोफत वाचता यावेत म्हणून बडोद्याच्या मध्यवर्ती ग्रंथालयाची निर्मिती करण्यात आली. हे सर्व ग्रंथ आजही तेथे उपलब्ध आहेत.
लोकशाहीची सर्वात उच्च पातळी म्हणजे ज्ञानाची लोकशाही होय. सयाजीरावांनी हे सर्व ग्रंथ प्रजेला भेट देवून त्यांच्यातील लोकशाहीवादी राजाचे दर्शन घडविले. १९१० मध्ये सयाजीरावांच्या खासगी ग्रंथालयातील ग्रंथसंख्या २० हजार इतकी होती. त्या काळात भारतात एवढा वैयक्तिक ग्रंथसंग्रह अपवादात्मक असेल. तुलनेसाठी डॉ. रा. गो. भांडारकर यांचे उदाहरण पुरेसे बोलके आहे. १९१६ ला त्यांच्या नावाने पुण्यात स्थापन झालेल्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेला त्यांनी स्वतःचा ३ हजार ग्रंथांचा संग्रह भेट दिला होता. भांडारकरांसारख्या जागतिक कीर्तीच्या संशोधकाच्या ग्रंथसंग्रहाशी जेव्हा आपण सयाजीरावांसारख्या राजाच्या ग्रंथसंग्रहाची तुलना करतो त्यावेळी सरदेसाईंच्या पुढील विधानाची महती पटते. यासंदर्भात सरदेसाई म्हणतात, “हिंदुस्थानच्या इतिहासावरील बहुधा कोणतेही महत्वाचे हे पुस्तक माझ्या वाचनातून सुटले नाही.” (सरदेसाई, माझी संसारयात्रा, १९५६, ६६) सरदेसाईंचा विद्याव्यासंग सयाजीरावांच्या सहवासातच कसा विकसित झाला हे यातून स्पष्ट व्हावे.
वैचारिक परिवर्तन
सयाजीरावांच्या सेवेत येण्याअगोदरचे सरदेसाई धार्मिक अंधश्रद्धा बाळगणारे होते. परंतु महाराजांच्या या ग्रंथालयातील ग्रंथांच्या वाचनाने त्यांच्यातील विज्ञानवादी अभ्यासक घडला. यासंदर्भात सरदेसाई लिहितात, “अशीं चिकित्सक व बौद्धिक विचारांची पुस्तकें वाचल्यावर माझी पूर्वीची धार्मिक अंधश्रद्धा नाहींशी होऊन मी एक प्रकारचा निरीश्वरवादी, विचारास पटेल तें आचरणांत आणणारा स्वतंत्र विचारी बनलों. उपास तापास, भजन पूजन, सोवळें ओवळें हीं सोंगें सर्व टाकून मी स्वतंत्र विचारानें शास्त्रीय शोधांचें ग्रहण करीत आलों आहें. घरांतही हे सर्व प्रकार मीं मुद्दाम चालू केले. पुष्कळ वेळ प्रवासांत आगबोट-आगगाडीत मला काढावा लागल्यामुळें आगाऊ वाचनाची तयारी मी बरोबर ठेवीत असें. आगबोटीवर तर लेखनवाचन हाच मुख्य व्यवसाय. वर आकाश व खालीं पाणी, भोजन फराळाची चंगळ, अशा त्या बोटीवरच्या प्रवासांत एकान्त तंद्रीच्या भावनेंत इतिहासविषयक पुष्कळसें लेखन मी केलेलें आठवतें.” (सरदेसाई, माझी संसारयात्रा, १९५६, ६८)
धर्मसुधारणेतील सहभाग
महाराजांच्या सहवासात सरदेसाईंमधील इतिहास लेखक नकळत घडत गेला. त्यासाठी विविध घटना कारणीभूत होत्या. १८९५ च्या दरम्यान वेदोक्त प्रकरणाच्या निमित्ताने धर्मशास्त्रातील सत्य शोधण्याची मोहीम सयाजीरावांनी हाती घेतली होती. सरदेसाईंना याकामी महाराजांनी जबाबदारी दिली ती सुद्धा त्यांच्यातील लेखक घडवण्यास उपयुक्त ठरली. यासंदर्भात सरदेसाईं म्हणतात, “महाराजांनी आपल्या धर्मकृत्यांत क्षत्रियांचे विधि वेदोक्त मंत्रांनीं करण्याचा परिपाठ घातला; पूर्वींच्या उपाध्ये मंडळींना नोकरींतून कमी करून वेदमंत्रांनी कर्में करणारे नवीन उपाध्ये नेमिले. ह्या कामीं महाराजांचे हुकूम बरोबर पाळले जातात कीं नाहीं, पुजा, श्रावणी इत्यादि प्रसंगांत जे मंत्र म्हटले जातात ते वेदांतले कीं बाहेरचे हें तपासण्याचें काम त्यांनीं मला सांगितलें. त्यासाठीं सर्व सोळा संस्कारांच्या विधींचें मराठी भाषांतर करून छापण्याचें काम मीं केलें.” (सरदेसाई, माझी संसारयात्रा, १९५६, ९९-१००) याच काळात २-३ वर्षे सयाजीरावांना संस्कृत शिकविण्याचे कामसुद्धा सरदेसाईंनी केले.
१८९२ च्या युरोप प्रवासात महाराजांनी तार करून सरदेसाईंना युरोपला बोलावले. विशेष म्हणजे या तारेत महाराजांनी सरदेसाईंना स्पष्ट बजावले होते की या परदेश प्रवासानंतरच्या प्रायश्चित्ताचा खर्च संस्थानाकडून मिळणार नाही. पहिल्या दोन परदेश प्रवासानंतर महाराजांना प्रायश्चित्तावर बराच खर्च करावा लागला होता. त्याची या सूचनेला पार्श्वभूमी होती. पुढे महाराजांनी आदेश काढून प्रायश्चित्ताची ही पद्धत बंद केली.
क्रांतिकारक विवाहातील यशस्वी मध्यस्थी
राजर्षी शाहूंनी आपल्या बहिणीचा आंतरजातीय विवाह इंदोरच्या होळकरांशी घडवून आणला. त्याचबरोबर आंतरजातीय विवाहाची चळवळ उभारण्याचा संकल्प केला. शाहू महाराजांचे हे काम पुरोगामी महाराष्ट्राच्या इतिहासातील एक दैदिप्यान्मान पान म्हणून आज ओळखले जाते. परंतु या विवाहाची प्रेरणा बडोद्यातील सयाजीरावांच्या कन्येने केलेला मराठा-आदिवासी विवाह होता हे महाराष्ट्राला माहित नाही. हा विवाह इंदिराराजेंनी आपला ठरलेला विवाह मोडून स्वतः ठरवून केला होता. हा विवाह शाहू महाराजांना राजघराण्यातील आंतरजातीय विवाहासाठी ‘आत्मबळ’ देणारा होता. या विवाहात सरदेसाईंची भूमिका अत्यंत निर्णायक होती. इंदिराराजेंनी हा विवाह १९१३ मध्ये केला होता. हा भारतातील पहिला मराठा-आदिवासी विवाह होता. इंदिराराजेंचे आई-वडील ठरल्याप्रमाणे इंदिराराजेंनी ग्वाल्हेरच्या माधवराव शिंदेंशी विवाह करावा यासाठी कमालीचे आग्रही होते. तर केवळ पुत्रप्राप्तीसाठी दुसरे लग्न करणाऱ्या माधवरावांशी विवाह करण्यास इंदिराराजे इच्छुक नव्हत्या. उलट कूचबिहार या आदिवासी संस्थानच्या महाराजांचे बंधू जितेंद्र नारायण यांच्याशी विवाह करण्याचे इंदिराराजेंनी ठरवले होते. अशा परिस्थितीत सरदेसाईंनी इंदिराराजेंच्या वतीने सयाजीराव महाराज आणि महाराणी चिमणाबाई यांच्याजवळ यशस्वी मध्यस्थी केली होती. ‘विवाह ठरला असल्यामुळे इंदिराराजेंनी माधवरावांशीच लग्न केले पाहिजे’ असे महाराणींचे मत होते. त्यावेळी मुले आता मोठी झाली असून थोडे त्यांच्या कलाने घेणे आवश्यक असल्याचे रियासतकारांनी चिमणाबाईंना समजाविले. इंदिराराजेंवर जास्त जबरदस्ती केल्यास त्या जीवाचे बरे जास्त करून घेण्याची भीती सरदेसाईंनी व्यक्त केली. याचा महाराणींवर अपेक्षित सकारात्मक परिणाम घडून आला.
तर कोणालाही सयाजीरावांना भेटावयाचे असल्यास आधी सूचना देण्याचा नियम महाराजांनी केला होता. प्रशासकीय सोयीसाठी हा नियम योग्य असला तरी कुटुंबियांसाठी अतिशय अडचणीचा होता. इंदिराराजेंना स्वतःच्या विवाहाविषयी वडिलांशी चर्चा करण्यात या नियमाचा अडथळा येत होता. अशा परिस्थितीत स्वतःच्या भावना मांडणारे सविस्तर पत्र वडिलांना लिहिण्याचा सल्ला सरदेसाईंनी इंदिराराजेंना दिला. तसेच इंदिराराजेंनी लिहिलेले पत्र सयाजीरावांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था त्यांनी केली. यामुळे इंदिराराजेंच्या विवाहविषयक भावना सयाजीरावांपर्यंत पोहोचणे शक्य झाले. या पत्रानंतरच सयाजीरावांनी इंदिराराजेंच्या इच्छेप्रमाणे त्यांचा विवाह करून देण्याची ग्वाही आपल्या मुलीला दिली. रियासतकारांनी काढलेल्या पत्ररूपी तोडग्याचा हा परिणाम होता.
रियासतींचा जन्म
सयाजीरावांना इतिहास ग्रंथातील मजकूर वाचून दाखविणे आणि राजपुत्रांना शिकवणे या त्यांच्या मुख्य कामासाठी ते लेखी टिपणे काढीत. याच टिपणांनी पुढे रियासतींना जन्म दिला. त्यातील पहिला खंड ‘मुस्लिम रियासत’ या नावाने १८९८ मध्ये बडोद्यातून प्रकाशित झाला. यानंतर इतिहास हे त्यांचे जीवनध्येय झाले. पुढे मराठी रियासत, ब्रिटिश रियासत यांच्या आवृत्या १९३५ पर्यंत निघाल्या. १९२७ मध्ये त्यांनी शिवाजी महाराजांच्या त्रिशत सांवत्सरिक उत्सवाच्या निमित्ताने ‘Shivaji Souvenir’ हा ग्रंथ संपादित केला. परमानंदच्या अनुपुराणाचे संपादन सरदेसाईंनी केले. ते ‘गायकवाड ओरिएंटल सिरिज’ मध्ये प्रकाशित झाले.
थोडक्यात रियासतींचे पहिले ८ खंड हे सरदेसाईंचे प्रमुख काम म्हणून सांगता येईल. ज्यावेळी मराठी इतिहासामध्ये वस्तुनिष्ठ ग्रंथ निर्माण झाले नव्हते अशा काळात मराठीत आपला इतिहास लिहिण्याचे काम महाराजांच्या सहवासामुळे आणि महाराजांनी दिलेल्या जबाबदारीमुळे नकळतपणे सरदेसाईंकडून झाले. यासंदर्भात सरदेसाई म्हणतात, “स. १९०० सालीं मराठ्यांचा इतिहास किती तुटपुंजा होता आणि आज त्याला भरीव रूप कसें आलें आहे हा विचार माझ्या निरनिराळ्या आवृत्त्यांतून नजरेस आला म्हणजे ह्या महनीय कामांत माझाही थोडा बहुत हातभार लागला ह्याबद्दल मला कृतकृत्यता वाटते.” (सरदेसाई, माझी संसारयात्रा, १९५६, १३९)
महाराजा सयाजीराव हे कागदपत्रांच्या दस्ताऐवजीकरणाबाबत अत्यंत दक्ष असत. प्रत्येक बाबीची नोंद ठेवणे आणि त्या नोंदींचे कागद पद्धतशीरपणे जपून ठेवणे हे ते अगदी सुरुवातीपासून करत आले. भारतातील इतर कोणत्याही संस्थानिकाच्या कामकाजाचे दस्ताऐवजीकरण सयाजीरावांएवढे काटेकोरपणे नसेल. उदाहरण द्यायचे झाले तर १८८६ ला महाराजांनी त्यांच्या राजवाड्यातील खासगी मंदिरातील वार्षिक धार्मिक विधींची माहिती देणारा ‘ऐनेराजेमहल’ हा ग्रंथ छापून घेतला. १८९२ मध्ये राजवाड्यातील धार्मिक विधींच्या खर्चाचे १००० पानांचे तपशीलवार बजेट महाराजांनी छापून घेतले होते. या पार्श्वभूमीवर महाराजांनी आपल्या कारकिर्दीतील आपला पत्रव्यवहार, भाषणे इ. सुद्धा छापून घेतले होते.
सयाजीरावांच्या चरित्रासाठीच्या साधनांचे संकलन
महाराजांनी नेमलेल्या शेकडो समित्यांचे अहवाल, स्वतःच्या २६ परदेश प्रवासांचे अहवाल, शिष्यवृत्तीवर परदेशी गेलेल्या विद्यार्थ्यांचे अहवाल इ. दस्ताऐवज म्हणजे इतिहासाची प्राथमिक साधनेच आहेत. याच पद्धतीने त्यांच्या कारकिर्दीची परिपूर्ण माहिती देणारे चरित्र त्यांच्या साक्षीनेच प्रकाशित व्हावे ही महाराजांची स्वाभाविक इच्छा होती. यासाठी सरदेसाईंएवढा उत्तम लेखक दुसरा कोण असू शकतो? कारण एकतर सरदेसाईंनी इतिहासलेखनाच्या क्षेत्रात केलेले काम महाराजांसमोर होते. दुसरे महत्वाचे कारण म्हणजे अगदी महाराजांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीपासून सरदेसाई दीर्घकाळ सयाजीरावांच्या सानिध्यात होते. महाराजांच्या कारकिर्दीतील महत्वाच्या घटनांचे सरदेसाई साक्षीदार होते.
या संदर्भात सरदेसाई लिहितात, “महाराजांना आपलें चरित्र संपूर्ण आपल्या देखत प्रसिद्ध व्हावें अशी मोठी हाव होती. मीं लेखक व त्यांचा निकटवर्ती सेवक तेव्हां मला त्यांनी तशी सूचना पुष्कळदां केली. मीं सांगितलें माणसाची खरी योग्यता त्याच्या पश्चात् अजमावली जाते. मी त्यांचा पगारी नोकर, तोंडावर त्यांचे गुणावगुण कसे लिहूं शकणार! तथापि चरित्राचीं सर्व साधनें पत्रे, हुकूम, फोटोग्राफ, भाषणें, प्रासंगिक घडामोडी, बनाव हें सर्व साहित्य जमवून एकत्र ठेवणें अवश्य होतें. मुलांचे व्यवहार, प्रवास, विवाहादि समारंभ ह्यांचे बनलेले कागद ठिकठिकाणीं अव्यवस्थित होते ते सर्व एकत्र करून नकोत ते फाडून बाकीचे सांभाळून विल्हेवारीनें निगेंत ठेवणें हें काम महत्त्वाचें होतें, तें मी सुचविलें, त्यांना पटलें आणि लगेच चरित्रसंग्रह नांवाची स्वतंत्र शाखा काढून माझी त्यांनीं त्याकरितां विशेष नेमणूक केली. हाताखाली दोन कारकून नेमले. स. १९१६ च्या डिसेंबरपासून तीन वर्षे मी ह्या स्वतंत्र कामावर राबलों. (१) महाराजांनीं लिहिलेलीं समस्त खासगी पत्रें जुन्या बारनिशा वगैरेंतून काढून त्यांच्या वीस प्रती छापल्या. (२) महाराजांनीं सर्व भाषणें जमवून तीं प्रसिद्ध केलीं. (३) समस्त राजपुत्रांचे कागद, पत्रें, हिशेब, नेमणुका इत्यादि सर्व जमवून प्रत्येकाचे स्वतंत्र संच व्यवस्थित लावून ठेविले. (४) कौटुंबिक व इतर फोटोग्राफ्स सर्व एकत्र जमवून कालक्रमानें व्यवस्थित केले. दरसालच्या वाढदिवसास असे महाराजांचे व कुटुंब-दरबारांचे फोटोग्राफ्स घेत ते त्यांच्या चरित्राचें एक मोठें साधन बनलें. (५) खासगी खात्याचे व राज्याच्या व्यवहारांचे महाराजांनी वेळोवेळी दिलेले हुजूर हुकूम सर्व एकत्र संच जमवून निराळे ठेविले.
ह्याशिवाय महाराजांच्या कारभारांतील मुख्य घडामोडी, त्यांच्या स्वाऱ्या, त्यांचे प्रवास, त्यांनीं केलेल्या मुख्य सुधारणा, त्यांचे दरबार व समारंभ, मुलांचे जन्मोत्सव व विवाहादि प्रसंग, खुद्द महाराजांचें दत्तविधान व शिक्षण, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांनीं बांधलेल्या इमारती अशा अनेक विषयांचें वर्णन करणारे लहान मोठे लेख मीं मराठींत तयार करून त्यांच्याही वीस प्रती छापून ठेवल्या. वीस प्रतीच छापण्याचें कारण ह्या लेखांचा उपयोग पुढील चरित्र-लेखकास व्हावा इतकाच होता. त्यांची पत्रेंदेखील सर्वच एकदम प्रसिद्ध करण्याजोगीं नव्हतीं. फक्त जुन्या बारनिशा फाटत चालल्या, त्यांतून हीं पत्रें वाचून मी एका संग्रहांत आणलीं. सारांश, शिवाजीसारख्या राष्ट्रपुरुषाचें चरित्र लिहिण्यांत ज्या अडचणी आज इतिहासकारास भासतात, तशा सयाजीरावांसंबंधानें पुढें भासूं नयेत अशी सर्व सिद्धता मीं परिपूर्ण करून ठेविली. हें सर्व काम मीं चोख केलें तें त्यांसही पसंत पडलें. त्यावरून त्यांची कल्पना तीव्र बनली कीं मींच त्यांचे समग्र चरित्र लिहावें. मीं स्पष्ट कळविलें, मीं पगारखाऊ सेवक, चरित्रनायकाचे गुणदोष स्पष्ट सांगण्यास असमर्थ; व्यक्तीच्या पश्चात् चरित्र लिहिलें जावें हा शहाण्यांचा रिवाज आहे.” (सरदेसाई, माझी संसारयात्रा, १९५६, १०७-०८)
महाराजांची नाराजी
१९२५ मध्ये सरदेसाईंनी बडोदा संस्थानची नोकरी सोडून पुण्याला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. याला वरील चरित्रलेखनाची पार्श्वभूमीसुद्धा आहे. कारण सरदेसाईंनी चरित्र लेखनास नकार दिल्यामुळे महाराज त्यांच्यावर नाराज झाले होते. बडोद्यात ३७ वर्षे राहिल्यानंतर सरदेसाईंना नोकरीतून मुक्त व्हावे असे वाटत होते. त्यात या नाराजीने भर घातली. महाराजांना मात्र सरदेसाई हवे होते. कारण महाराजांच्या नातवंडांच्या शिक्षणाची जबाबदारी सरदेसाईंकडे देण्याचा महाराजांचा विचार होता. महाराजांच्या मनाविरुद्ध सरदेसाई नोकरी सोडून जात असल्यामुळे महाराजांनी त्यांच्या पेन्शनमध्ये ६० टक्के कपात केली. महाराजांचे एकूण धोरण बघता हा अपवाद म्हणावा लागेल. परंतु नातवांच्या भविष्याबाबतच्या काळजीपोटी महाराजांकडून हे अपवादात्मक कृत्य घडले असावे.
पुढे सयाजीरावांचे उत्तराधिकारी आणि नातू प्रतापसिंह महाराज यांच्या राज्यारोहण सोहळ्याला सरदेसाईंना सन्मानाने बडोद्यात बोलावण्यात आले. सरदेसाई प्रतापसिंहांचे शिक्षक होते. प्रतापसिहांनी सरदेसाईंची सयाजीरावांनी ६० टक्के कपात केलेली पेन्शन पूर्ण स्वरुपात सुरु केली. २ मार्च १९४७ रोजी बडोद्यामध्ये सरदेसाईंच्या इतिहासविषयक कार्याचा गौरव म्हणून त्यांना मानपत्र आणि साडेतीन हजार रु.ची थैली देण्याचा कार्यक्रम झाला. परंतु हे पैसे स्वतः न घेता सरदेसाईंनी त्यांचे पुण्याचे चितळे नावाचे मित्र ऐतिहासिक घराण्यांच्या वंशावळी छापत होते त्या कामाला त्यातील दीड हजार रु. देण्याची विनंती सत्कार समितीला केली.
पेशवे दप्तराच्या कामाला सयाजीरावांची मदत
सरदेसाई पुण्यात गेल्यानंतर पुढे कामशेत येथे राहू लागले. १९३३ मध्ये त्यांनी मुंबई सरकारच्या आर्थिक सहकार्याने पेशवे दफ्तर संपादनाचे काम ४ वर्षे केले. परंतु शेवटच्या वर्षी मुंबई सरकारने आर्थिक मदत थांबवली. अशा वेळी जदुनाथ सरकारनी त्यांना सयाजीरावांकडे मदत मागण्याची सूचना केली. महाराजा नाराज असल्यामुळे ते मदत करतील का अशी शंका सरदेसाईंना होती. परंतु जदुनाथ सरकारनी आग्रह केल्याने सरदेसाईंनी महाराजांना युरोपात पत्र लिहून ३ हजार रु.ची मदत मागितली. महाराजांनी तात्काळ बडोद्यात दिवाणांना तार करून सरदेसाईंना पेशवे दफ्तराच्या कामासाठी ३ हजार रुपये पाठविण्याचा आदेश दिला. यात सयाजीरावांच्या स्वभावातील उमदेपणा स्पष्ट होतो. सयाजीरावांनी कधीही कुणाचा द्वेष आणि तिरस्कार केला नाही.
या घटनेचा तपशील रियासतकार आपल्या ‘श्री. सयाजीराव गायकवाड यांच्या सहवासांत’ या ग्रंथात लिहितात, “१९३३ सालची माझी एक बाबत सांगण्यासारखी आहे. १९२५ पासून मजवर त्यांची इतराजीच होती. मी कामशेतला राहूं लागलों आणि तीन-चार वर्षे पुण्यास पेशवे दप्तरचें काम केलें. तें करतांना शेवटच्या वर्षी मुंबई सरकारने आपला खर्च थांबविला त्यायोगें काम अर्धेच अपुरे पडून राहणार हें विघ्न उपस्थित झालें. जदुनाथ सरकार व मी कमिशनरांना भेटलों. ते म्हणाले, सरकार आता कांहीं करूं शकत नाहीं. तुम्ही संस्थानिकांकडून वर्गण्या जमवून पैसा आणला तरच काम पुरे होईल. संस्थानांत तरी ऐपतंवान म्हटले तर शिंदे, होळकर, गायकवाड हे तिथे प्रमुख. त्यांतहि सयाजीरावच जाणते असल्यामुळे त्यांनी पहिला पुढाकार घ्यावा अशी सूचना आली. तपास करता कळलें कीं, तूर्त ते युरोपांत आहेत. मजवर तर त्यांची गैरमर्जी, तेव्हां त्यांजपुढे काम पोंचावें कसें? जदुनाथ म्हणाले कीं, लिहा तर खरें त्यांना युरोपांत पत्र; काय जबाब येतो कीं येत नाहीं पाहूं. लगेच मी महाराजांना इंग्रजी पत्र लिहून राष्ट्रीय इतिहासाच्या या पवित्र कार्यासाठी तीन हजारांची रक्कम मागितली. आपण तीन हजार दिले तर बाकीचे नऊ हजार मी इतर संस्थानांकडून मिळवितों, पण पहिली रक्कम आपली पाहिजे. तारेनें जबाब मागितला.
मला फारशी आशा नव्हतीच, पण पत्र वेळेवर त्यांस पोंचून त्यांनी लगेच दिवाणांस तारेनें बडोद्यास कळविलें, “सरदेसाई पुण्यास इतिहासाचे कागद छापतात, त्यांस खरीच खर्चाची अडचण असल्यास तीन हजार त्यांचे हवाली करावे.” दिवाणांनी मला मुंबईस भेटीस बोलावले आणि त्यांची खात्री पटतांच माझे हातांत तीन हजारांचा चेक दिला. त्याबरोबर इंदूर, ग्वाल्हेर, धार, सांगली इत्यादि अनेक सत्ताधीशांकडून नऊ हजार पैदा करून बारा हजारांची रक्कम मुंबई सरकारांत भरली तेव्हां आणखी वर्षभर काम चालून पेशवे दप्तराचा व्याप एकदांचा समाप्त झाला. हें काम सिद्धीस जाण्या में मुख्य श्रेय सयाजीरावांस आहे. माझ्यावर व्यक्तिशः त्यांचा राग असला तरी त्यांची सदसद्विवेकबुद्धि सदैव जागृत असल्यामुळे माझ्या कामाची त्यांना पारख होती. म्हणूनच एक पत्र गेल्याबरोबर त्यांनी ताबडतोब तीन हजार रुपये मंजूर केले हा त्यांचा उपकार मी कधी विसरू शकणार नाही.” (सरदेसाई, श्री. सयाजीराव गायकवाड यांच्या सहवासांत, १९५६, ६७-६८)
सरदेसाईंनी इतिहासाला दिलेले योगदान विचारात घेता त्यांचे मुख्य योगदान मराठ्यांच्या इतिहासाला आहे. आज त्यांच्या लेखनात काही त्रुटी दिसतील परंतु मराठ्यांचा इतिहास अभ्यासताना त्यांची ‘मराठा रियासत’ वगळून पुढे जाता येत नाही. यासंदर्भात श्री. रा. टिकेकर म्हणतात, “सरदेसायांचे इतिहासकार्य म्हणजे त्यांच्या रियासती. त्यांचा विस्तार व्यापक, म्हणजे सुमारे हजार वर्षांचा इतिहास आहे. त्याची विभागणी मुसलमानी, मराठी व ब्रिटिश अशा तीन प्रमुख रियासतीत झाली असली तरी सरदेसायांचे मुख्य कार्य मराठी रियासतीचे आहे. मुसलमानी व ब्रिटिश या दोन्हींसाठी प्रत्येकी दोन दोन खंड लागले. पण मराठा रियासतींसाठी एकंदर आठ खंड लागले.” (टिकेकर, जदुनाथ सरकार आणि रियासतकार सरदेसाई, १९६१, ८४) टिकेकरांच्या या मतावरून मराठ्यांच्या इतिहासलेखनाला सरदेसाईंच्या रूपाने बडोद्याचे असणारे योगदान किती मोठे होते याचा पुरावा मिळतो.
सरदेसाईंनी रियासत मालेचा पाया १८९८ मध्ये घातला. परंतु रियासतकारांच्या मराठा रियासतीत कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याची शाखा राहिली होती याबाबत रियासतकार सरदेसाईंना खंत होती. रियासतकारांचे हे अपूर्ण राहिलेले काम स.मा.गर्गे यांनी पूर्ण करून मराठा इतिहास लेखनाचा सरदेसाईंनी सुरू केलेला प्रवास पूर्ण केला. थोडक्यात इतर सर्व क्षेत्रांप्रमाणे मराठ्यांच्या इतिहास लेखनातील पायाभूत काम इतिहास प्रेमी सयाजीरावांच्या प्रेरणेने सुरू झाले. यासंदर्भात सरदेसाईंनी दिलेली प्रांजळ कबुली सयाजीरावांच्या आश्रयाचे महत्व विशद करते. सरदेसाई म्हणतात, “...पण पाण्यांत पडल्याशिवाय पोहतां येत नाहीं या न्यायानें माझा धीर चेपून आतां तर मी रियासतकार म्हणून मिरवितों त्याचें श्रेय मुख्यत: त्या महाराजांस आहे.” (सरदेसाई, श्री. सयाजीराव गायकवाड यांच्या सहवासांत, १९५६, ८-९) या कामाचा समारोप कोल्हापुरात झाला हा एक सुखद योगायोग आहे.
सयाजीरावांच्या बदलत्या मानसिकतेचे साक्षीदार
सरदेसाईंनी महाराजांच्या सहवासात आपल्या आयुष्यातला सर्वाधिक काळ घालवला असल्यामुळे महाराजांच्या उमेदीच्या काळापासून ते महाराजांच्या मृत्यूपर्यंतच्या कालखंडातील महाराजांच्या सर्व मनोवस्था त्यांनी जवळून अनुभवल्या होत्या. पहिली पत्नी, दोन मुली आणि चार तरुण मुलांचा झालेला अकाली मृत्यू यासारखे भावनिक आघात, नातेवाईकांचा असणारा नियमित त्रास, केलेले अफाट काम, ब्रिटीश सत्तेशी २५ वर्षांचा जीवघेणा संघर्ष या सगळ्याचा परिणाम म्हणून बिघडलेले शारीरिक आरोग्य यामुळे त्यांच्या व्यक्तीमत्वात झालेले टोकाचे बदल सरदेसाईंनी अनुभवले होते.
त्या संदर्भात ‘सयाजीराव गायकवाड यांच्या सहवासात’ या पुस्तकात सरदेसाई महाराजांचे मनोविश्व कसे बदलत गेले याचे अतिशय बारकाव्याने निरीक्षण नोंदवताना म्हणतात, “तीस-चाळीस वर्षें सयाजीरावांच्या निकट सहवासांत वागलेले माझ्यासारखे माणूस फार थोडे होते. पहिली त्यांची वृत्ति अत्यंत आनंदी, खेळाडू, आरडाओरडा करून सर्वांशीं समरस होण्याची होती. आट्यापाट्या खेळतांना मीं त्यांचा गोंगाट पाहिला आहे. हंसायला लागले कीं दूरपर्यंत सर्वांना आश्चर्य वाटे कीं, काय प्रकार आहे. १९०८ सालीं वडील चिरंजीव फत्तेसिंहराव वारले. पुढें दिल्लीचें प्रकरण गाजलें. तेव्हांपासून महाराजांचें हंसणें-खिदळणें सर्व बंद पडून उत्तरोत्तर ते एकलकोंडे बनत गेले. एकदां दिवाळींत टोपल्या भरून लाडू आणले. त्यांनींच चेंडूसारखी मारामार पांचपन्नास लोकांशी चाललेली मीं पाहिली आहे. उसाचे गाडे आले, त्यांजवर महाराजांनी गर्दी करून तोंडानेंच ऊस खाण्याचा सपाटा इतरांबरोबर चालविला. असें मनमुराद इतरांशी मिसळलेले मीं त्यांना पाहिलें आहे. याचे उलट पुढें पुढें ते सर्वथा एकटे एकटे असे राहूं लागले कीं, जेवतांना वाढणारा सुद्धां जवळ नसावा. एका टेबलावर भोजन ठेवून नोकरानें घंटा वाजवावी व आपण बाजूला जावें. घंटा वाजली तरच आंत यावें. इतका त्यांना माणसाचा संसर्ग नकोसा झाला. पाऊणशें ऐशीं वर्षांच्या त्यांच्या हयातीचीं शेवटचीं पंचवीस-तीस वर्षे ते असे एकटे वागूं लागले. काम, वाचन, उद्योग सर्व चालत, पण जवळ दुसरा माणूस नको. मी बडोद्यास असतां रात्रीं दोन वाजतां माझे दारात मोटार आली कीं महाराज बोलावतात. शहराबाहेर पांच मैल मकरपुरा येथें ते राहत होते. मी गेलों. दाराशीं ए. डी. सी. बसले होते. ते म्हणाले, “वर जा, महाराज तुम्हांस बोलावतात. मला तुमचेबरोबर जाण्याचा हुकुम नाहीं.” मी त्यांचा माग काढीत जवळ गेलों. पहातांच मला म्हणाले, ‘झोप येईना म्हणून कांहीं गप्पा मारण्यासाठी तुम्हांस बोलावलें.’ तास दीड तास कांहीं तरी वाचून बोलून झाल्यावर त्यांनीं मला रजा दिली. पहिली तीस व शेवटचीं तीस इतक्या वर्षांतला त्यांच्या वृत्तींतील एवढा पालट सहसा इतरत्र आढळत नाहीं.” (सरदेसाई, सयाजीरावांच्या सहवासात, १९५६, ६६-६७)
सयाजीरावांचे द्रष्टे मूल्यमापन
सयाजीराव आणि सरदेसाई यांचा ऋणानुबंध विचारात घेता सयाजीरावांच्या भारतीय इतिहासातील स्थानाविषयी सरदेसाईंसारख्या इतिहासकाराचे मत महत्वाचे ठरते. सरदेसाई भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि प्रबोधन चळवळ या दोन्ही चळवळींचे पितामह सयाजीराव कसे आहेत हे स्पष्ट करताना म्हणतात, “सयाजीराव महाराज एक अलौकिक व्यक्ति भारतभूमीला भूषण आणणारी निर्माण झाली हें लौकिकांत आतां फार थोड्यांना माहीत आहे. इंग्रजी अमदानीच्या शंभर वर्षांत उत्कर्षाची पहिली स्फूर्ति राष्ट्राला दाखविणारी ही विभूति असून त्यांच्याशीं मी जीवनाचे पहिले धडे शिकूं शकलों हें मी आपलें मोठें भाग्य समजतों. त्यांचीं कित्येक चरित्रें प्रसिद्ध झालीं; पण तीं अनेक कारणांनीं आज तरी लुप्त बनलीं आहेत. काँग्रेस व महात्मा गांधी यांच्या उद्योगानें भारतभूमीचें विमोचन परचक्रांतून झालें असें आपण समजतों. पण प्रत्यक्ष राज्यांत सुधारणा करून उन्नतीचे खरे मार्ग प्रथम कृतींत आणून इंग्रज राजकर्त्यांनाहि सयाजीरावांनीं दभवून सोडलें. इंग्रजांचा रोष झालेल्या अनेक राष्ट्रसेवकांचा त्यांनीं धैर्यानें बचाव केला. सक्तीनें शिक्षण व ग्रंथालयाची योजना हिंदुस्थानांत प्रथम सयाजीरावांनीं निर्माण केली. त १९३९ मध्यें निवर्तले आणि पुढें थोड्याच अवधीनंतर इंग्रजसत्ता संपून आमचीं देशी संस्थानें इतकीं विलीन झाली कीं, आज दोनशें वर्षें इंग्रजांप्रमाणेंच या आपल्या स्वदेशी राजांचा अंमल भारतभूमीवर होता हा इतिहासहि आतां लुप्त झाला आहे.
माझें तर मुख्य आयुष्य सयाजीरावांच्या निकट परिचयांत गेल्यामुळें माझ्या आठवणी अद्यापि ताज्या आहेत. आणि त्या गोड व स्मरणीयहि आहेत. त्या निमित्तानेंच मीं हें माझें पहिलें आख्यान आज मुद्दाम येथें सांगितलें आहे कीं, त्यावरून वाचकांस पुढील विषयाची कल्पना यावी. भलेपण मिळवायला प्राप्त परिस्थितींत प्रत्येक व्यक्तीला राष्ट्रांत भरपूर अवकाश आहे. म्हणूनच सयाजीराव बारा वर्षांचे असतां अकल्पित कारणांनीं बडोदानरेश बनले. खेडवळ जीवनांतून नियतीनें त्यांना उचलून एकदम भाग्याच्या परमोच्च शिखरावर आणून बसविलें. आणि पुढील साठ वर्षांचे दीर्घ कारभारांत त्यांनी आपले सर्वांगीण कर्तृत्व प्रकट करून जागतिक कीर्ति मिळविली. शिवाजीचा अवतार निराळ्या प्रकारचा झाला. तशाच प्रकारचा भिन्न मार्ग हुडकण्याचें भाग्य सयाजीरावांस लाभलें.” (सरदेसाई, सयाजीरावांच्या सहवासात, १९५६, ९-१०) रियासतकारांसारख्या मराठ्यांच्या ‘आद्य’ इतिहासकाराने सयाजीरावांची तुलना थेट शिवरायांशी करणे ही बाब सयाजीराव हे शिवरायांचे ‘खरे’ वैचारिक वारसदार असल्याची साक्ष देणारी आहे.
सयाजीरावांनी भारताला गुलाम करणाऱ्या महाबलाढ्य ब्रिटीश सत्तेला थेट आव्हान देण्याचे धैर्य दाखवले. सयाजीरावांच्या सामाजिक सुधारणा ब्रिटीश राज्यकर्त्यांना सहन होत नव्हत्या. स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख नेत्यांना सयाजीराव पाठबळ देत असतानाही सयाजीरावांना राजद्रोही ठरवण्याइतपत पुरावे ते मागे ठेवत नसल्यामुळे जगावर राज्य करणाऱ्या महाशक्तीचा अहंकार दुखवत होता. परिणामी ज्याप्रमाणे मोगल सैनिकांच्या घोड्यांना संताजी-धनाजी पाण्यात दिसत होते त्याप्रमाण ब्रिटीश साम्राज्यरुपी घोड्याला सयाजीराव छळत होते.
या संदर्भात सरदेसाईंनी नोंदवलेले निरीक्षण पुरेसे बोलके आहे. सरदेसाई म्हणतात, “ ब्रिटिशांशी लढणाऱ्या क्रांतिकारकांना मदत करून त्यांचा सयाजीरावांनी धैर्यानं बचाव केला, ही हिंदुस्थानातील अनोखी गोष्ट आहे. ... सयाजीराव महाराजांनी त्यांच्या शाहत्तर वर्षांच्या आपल्या हयातीत एवढे पराक्रम करून दाखविले की, इंग्रजी सत्तेच्या एका शतकात असे दुसरे राजे झाले नाही. ... बलिष्ठ सार्वभौम सत्तेशी सदैव झगडून आपले कायदेशीर हक्क शिकस्तीने सयाजीरावांनी सांभाळले. समस्त भारतात राजद्रोहाची व खून जाळपोळीची स्फोटक लाट उसळली, तीत अनेकांचा बचाव महाराजांनी धैर्यानं केला की जेणकरून हिंदुस्थानास नवीन स्फूर्ती मिळाली.”
सयाजीरावांबद्दल सरदेसाईंनी व्यक्त केलेल्या या भावना पुरेशा बोलक्या आहेत. सयाजीरावांसंदर्भात उपलब्ध सर्व मराठी साहित्य विचारात घेता सरदेसाईंच्या भूमिकेशी सुसंगत अशा अनेक तपशिलांचे संदर्भ यामध्ये उपलब्ध आहेत. परंतु दुर्दैवाने आधुनिक महाराष्ट्रावरील इतिहासलेखनात महाराष्ट्राच्या आधुनिकीकरणाचा पाया घालण्याबरोबरच त्याचा ‘पुरोगामी’ कळससुद्धा ज्या सयाजीरावांनी बसवला त्यांचा उल्लेखसुद्धा न होणे गंभीर आहे. एकूणच आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासलेखनावर त्यातून असंख्य प्रश्न उपस्थित होतात.
‘ब्राह्मणांनी आमचा इतिहास टाळला’ असे म्हणत इतिहास लेखन करणाऱ्यांना तर तोंड दाखवायलाही जागा राहणार नाही असा हा इतिहास आता पुढे येत आहे. दुर्दैवाने बहुजनांच्या बाजूने इतिहास लेखन करणाऱ्या संशोधक-लेखकांची विश्वासार्हता यामध्ये संपणार आहे. हे आपल्या परंपरेला कमीपणा आणणारे आहे. परंतु परंपरा ज्यांच्या खांद्यावर आहे त्यांची दृष्टी जर कोती, आत्मकेंद्री आणि ढोंगी असेल तर असेच होणार. आता मात्र इतिहास लिहित-सांगत असताना जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे सांगण्याचा बोध यातून घ्यायला हवा.
संदर्भ
१) सरदेसाई, गोविंद, सखाराम, “श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाड यांचा खाजगी व कौटुंबिक वृत्तान्त” बडोदा, १९२५.
२) सरदेसाई, गोविंद, सखाराम, “माझी संसारयात्रा”, मुंबई, के. भि. ढवळे, १९५६.
३) सरदेसाई, गोविंद, सखाराम, “श्री. सयाजीराव गायकवाड यांच्या सहवासांत”, पुणे, एस. जगन्नाथ आणि कंपनी, १९५६.
४) भांड, बाबा, ‘‘लोकपाळ राजा सयाजीराव’’ औरंगाबाद, साकेत प्रकाशन, २०१३.
५) टिकेकर, श्रीपाद, “जदुनाथ सरकार आणि रियासतकार सरदेसाई”, मुंबई, पॉप्युलर प्रकाशन, १९६१.
६) कीर, धनंजय संपा., “गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळूसकर आत्मचरित्र व चरित्र, औरंगाबाद, साकेत प्रकाशन, २०१४ (साकेत आवृत्ती).
७) इतिवृत्त, “मराठी साहित्य संमेलन, बडोदें, अधिवेशन १९वें”, बडोदे, सहविचारी सभा, १९३५.
८) आपटे, दाजी, नागेश, ‘‘श्री महाराजा सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांचे चरित्र, खंड-१ ते ३’’, बडोदे, प्रकाशक लेखक खुद्द, १९३६.
९) पाटील, दिनेश “महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या सुधारणा भाग ७ – धर्म आणि सामाजिक”, मुंबई, उच्च शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, २०२०.
(लेखक महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन व प्रशिक्षण संस्था, औरंगाबादचे विश्वस्थ आणि महाराष्ट्र शासनाच्या महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य आहेत. यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय वारणानगर येथे समाजशास्त्र विभागप्रमुख म्हणून कार्यरत.)

बडोद्यातील शिवाजी महाराजांचा पुतळा

 



बडोद्यातील शिवाजी महाराजांचा पुतळा
- सुरक्षा घोंगडे, वारणानगर
(७५०७३९९०७२)
आदर्शवत समाज निर्माण व्हावा यासाठी योग्य प्रेरणा व मार्गदर्शन मिळणे आवश्यक असते. एखाद्या महान व्यक्तीचे स्मारक अथवा पुतळा समाजाचे प्रेरणास्थान असू शकते. महान व्यक्तीच्या जीवन चरित्रातून मिळणारा आदर्श, शिकवण व प्रेरणा ही सतत प्रवाहित रहावी या उद्देशाने पुतळ्यांची निर्मिती केली जाते. महापुरुष हा कोणत्याच जातीचा, धर्माचा, पंथाचा नसतो तर तो जात, धर्म, पंथ, वंश या सर्वांच्या पलीकडे जाऊन ‘मानवता’ हा एकच ‘धर्म’ मानून आपले कार्य उत्तम रीतीने पुढे नेत असतो, त्याचबरोबर आपले सर्वसमावेशक विचार समाजामध्ये ‘रुजवत’ असतो म्हणून तो महापुरुष होतो हे आपण जाणतोच.
आपल्या पूर्वजांचा दैदिप्यमान इतिहास पुढील पिढीला ज्ञात व्हावा, त्यांची ध्येयधोरणे, सर्वसमावेशकता, धर्मनिरपेक्षता ही सर्व मुल्ये आणि त्यांचा आदर्श पुढच्या पिढीत रुजवण्याच्या उद्देशाने महापुरुषांच्या पुतळ्यांचे अनावरण करण्यात येते. हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे शिवाजी महाराज त्यांच्या कार्य आणि कर्तृत्वामुळे आजही जनमानसांत जिवंत आहेत. त्यामुळेच महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर त्यांचे अनेक पुतळे आपल्या दृष्टीस पडतात. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी ८ मार्च १९३४ रोजी बडोद्यात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते. या निमित्ताने या पुतळ्यामागील इतिहास व सयाजीरावांची भूमिका जाणून घेणे हे सयाजीरावांमधील संवेदनशील माणूस आणि चिकित्सक विचारक समजून घेण्याची सुसंधी ठरेल.
सयाजीराव व्यक्तीपुजक नव्हते. तर महापुरुषांच्या कालबाह्य विचारांशी फारकत घेवून त्यांच्या कालसुसंगत विचारांचे पाईक होते. महत्वाचे म्हणजे महापुरुष जेथे येवून थांबले होते तेथून पुढे त्या महापुरुषांच्या विचाराला विकसित करण्याची दृष्टी बाळगणारेही होते. जगातील सर्वसमावेशक आणि समतावादी व्यक्ती, विचार, धोरण यांचा ‘कालसुसंगत’ समन्वय साधणारे महान ‘तत्वचिंतक प्रशासक’ होते. महाराजांनी त्यांच्या ५८ वर्षाच्या कारकिर्दीत दोनच महापुरुषांचे पुतळे बडोद्यात बसवले. त्यापैकी पहिले गौतम बुद्ध, ज्यांचा पुतळा १९१० मध्ये महाराजांनी ज्युबिली बागेत बौद्ध वचनांसह बसवला. त्यानंतर १९३४ चा शिवाजी महाराजांचा पुतळा हा दुसरा अपवाद आहे.
या दोन महापुरुषांच्या कालातीत विचारधारांचा संस्कार आपल्या प्रजेवर व्हावा हाच उदात्त हेतू या पुतळ्यामागे होता. मूर्तीपूजा आणि कर्मकांडे यापासून सतत अलिप्त असणारे महाराज आपल्या अभ्यासाच्या टेबलवर बुद्धाचा पुतळा जेव्हा ठेवतात तेव्हा बुद्धाच्या वैज्ञानिक विचारधारेप्रतीचा तो आदर असतो. भारतातील तत्कालीन आणि त्यानंतरच्या कर्तबगार राज्यकर्त्यांशी आपण जेव्हा सयाजीरावांची तुलना करतो तेव्हा बुद्ध आणि शिवाजी महाराज या दोघांच्याही विचाराला कृतीशील करण्याची क्षमता बाळगणारे म्हणून सयाजीराव जेवढे परिपूर्ण ठरतात तेवढा इतर कोणताही राज्यकर्ता अगर नेता परिपूर्ण ठरत नाही. यातच महापुरुषांच्या बौद्धिक स्वीकाराची सयाजीरावांची क्षमता आपल्या लक्षात येते.
सयाजीरावांनी ८ मार्च १९३४ ला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बडोद्याच्या मध्यभागी सार्वजनिक बागेत बसविला. बडोद्यातील या भव्य पुतळ्याचा इतिहास रंजक आहे. स्मारक प्रभारी समितीच्या मागणीनुसार पुणे येथील शिवाजी मेमोरियल पार्कमध्ये बसवण्यासाठी मुंबईचे शिल्पकार म्हात्रे यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा तयार केला. परंतु पुतळा तयार झाल्यानंतर मात्र पुतळ्यासंदर्भात शिल्पकार आणि पुण्यातील स्मारक प्रभारी समिती यांच्यात मतभेद निर्माण झाले. त्यातून या समितीने म्हात्रे यांनी बनविलेला शिवाजी महाराजांचा हा पुतळा नाकारून अन्य शिल्पकाराला शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तयार करण्याची जबाबदारी दिली.
समितीने नाकारलेल्या म्हात्रेंच्या अश्वारूढ पुतळ्याला अचानकपणे नवा खरेदीदार मिळणे केवळ अशक्य होते. म्हात्रे यांनी हा पुतळा तयार करण्यासाठी दोन वर्षे मेहनतीबरोबरच बराच खर्च केला होता. परंतु ऐनवेळी पुण्याच्या स्मारक समितीने आपली भूमिका बदलल्यामुळे म्हात्रेंना आर्थिक नुकसान सहन करावे लागणार होते. भारतातील आद्य शिल्पकारांपैकी एक असणाऱ्या म्हात्रेंच्या या कठीण स्थितीची माहिती मिळताच पुण्याच्या समितीने ठरवलेल्या रकमेइतकीच रक्कम देवून हा पुतळा खरेदी करण्याची तयारी सयाजीराव महाराजांनी दर्शवली. महाराजांच्या या निर्णयाला दोन बाजू आहेत. पहिली बाजू म्हणजे कलाकारांना संकटकाळी मदत करणे आणि दुसरी बाजू म्हणजे महापुरुषांचा वैचारिक वारसा चिरंतन जपण्याचा प्रयत्न करणे.
बडोदा येथे शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा अनावरण समारंभात केलेल्या भाषणात महापुरुषांचा ‘भक्तीमुक्त’ विचार कसा करावा याचे उदाहरण महाराजांनी घालून दिले आहे. या भाषणात सयाजीराव म्हणतात, “वादविवादाच्या दंगलीच्या धुरळयातही उग्रस्वरूप शिवरायाची मूर्ती उभी असलेली स्पष्ट दिसत आहे. आज आम्ही त्यांचा निःशंकपणे सन्मान करतो. तो करताना त्यांना प्रत्यक्ष देव-शंकराचा प्रति अवतार समजण्याच्या अंधभक्तीने आम्ही विवेकशून्य झालो नाहीत किंवा त्यांना ‘डोंगरातला उंदीर’, ‘राजद्रोही’ असे म्हणणाऱ्या दूषित पूर्वग्रहानेही आम्ही अंध नाहीत.” सयाजीराव महापुरुषांचे दैवतीकरण न करता त्यांचे खरे अनुयायी होणे पसंत करतात. आजच्या भारतातील महापुरुष भक्तीच्या ‘महासागरात’ सयाजीरावांचे विचार ‘दीपस्तंभा’ची भूमिका बजावतील. याचे अनुकरण करण्यासाठीच ‘सयाजी विचाराचा जागर’ ही आपली मुलभूत गरज झाली आहे.
पुढे याच भाषणात शिवचरित्र आपल्याला काय शिकवते हे सांगताना सयाजीराव म्हणतात, “जन्माच्या किंवा दर्जाच्या दृष्टीने शिवाजी महाराजांना मोठीशी अनुकूलता नव्हती. एका सामान्य मराठ्याने एका संबंध राष्ट्राचा भाग्यविधाता व्हावे व तिला प्रबळ सत्ताधीशांचा विरोध असताना आपल्या विस्कळीत व दुर्बळ लोकांना सुसंघटित राष्ट्राच्या पदवीला पोचवावे, ही कामगिरी काय सामान्य आहे? केवळ पोटार्थी वाटणारे लोक चाकरीस ठेवावे व त्या सर्वांना देशभक्तीने प्रेरित करून सोडावे, हीच शिवचरित्राची शिकवण आपल्याला अखंड स्फूर्तिदायक ठरणारी आहे.” शिवाजी महाराजांचा विचार सरंजामी आणि मराठा श्रेष्ठत्वाच्या भावनेतून करण्याचा प्रयत्न ‘पुरोगामी’ इतिहास संशोधकांकडून झाला. अठरापगड जातींचे नेतृत्व शिवाजी महाराजांनी केले असे भाषणात सांगायचे आणि उरात मात्र ‘मराठ्यांचा राजा’ हा अभिमान बाळगायचा हे धोरण शिवाजी महाराजांच्या प्रतिगामी मांडणीला उत्तर म्हणून राबविल्याचा परिणाम असा झाला की, शिवाजी महाराजांचे रुपांतर आपण एका ‘देवा’त केले आणि त्यांचे क्रांतिकारक धोरण भाषणात बंदिस्त करून कृतिशीलतेला तिलांजली दिली. परिणामी शिवाजी महाराजांच्या धोरणातील समाजाभिमुखता जनमानसांत रुजवण्यामध्ये आपण अपयशी ठरलो. म्हणूनच महाराजांची ही मांडणी आजही तितकीच ‘समकालीन’ वाटते.
शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारणीच्या कार्यात सर्व जातीधर्मियांना सामावून घेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. शिवाजी महाराजांचे सैन्य कुणबी, सुतार, वाणी व हीन जातीयांनी बनले होते. विविध जातींच्या लोकांचा समावेश करून शिवाजी महाराजांनी प्रशासकीय पातळीवर जातीय समानतेचा अनोखा आदर्श प्रस्थापित केला. हाच आदर्श घेऊन सयाजीरावांनी ५८ वर्षे आपला राज्यकारभार सुरळीतपणे चालविला. सयाजीरावांच्या कोणत्याही धोरणाचा विचार केला तर त्या धोरणामध्ये शिवाजी महाराजांच्या सुराज्याचे प्रतिबिंब सापडते हा योगायोग नाही. या दृष्टीने संशोधन झाले तर सयाजीरावांमधील समाजक्रांतिकारक अधिक ठोसपणे पुढे येईल. म्हणूनच चक्रवर्ती राजगोपालचारी म्हणतात, “हिंदुस्थानात आतापर्यंत दोनच खरे राजे झाले आहेत, ते आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि सयाजीराव महाराज.”
हबशी गुलामांद्वारे भारतात आलेल्या गनिमी काव्याच्या परंपरेचा विकास हबशी गुलाम असणाऱ्या मलिक अंबरने केला. हा गनिमी कावा त्याच्याकडून शहाजीराजांमार्फत शिवाजी महाराजांकडे आला आणि शिवाजी महाराजांनी तो क्रांतिकारक पद्धतीने वापरला. या मलिक अंबरचे पहिले चरित्र मराठी भाषेत १९४१ साली बडोद्यातील सयाजी ग्रंथमालेत प्रकाशित झाले. शिवाजी महाराजांचा गनिमी कावा कालानुरूप यशस्वीपणे वापरण्याचे श्रेय केवळ सयाजीरावांना जाते. कारण ५८ वर्षे ब्रिटीश गुप्तहेर पाठीवर घेवून भारताच्या स्वातंत्र्यचळवळीला भक्कम मदत करणाऱ्या सयाजीरावांना ‘राजद्रोही’ ठरवणे ब्रिटीश सरकारला शेवटपर्यंत शक्य झाले नाही. बाबा भांड यांचे ‘स्वातंत्र्यलढ्याचे पाठीराखे महाराजा सयाजीराव’ या पुस्तकात हा इतिहास अंशतः पुढे आला आहे. लंडनच्या इंडिया हाऊसमधील सयाजीरावांसंदर्भांतील गुप्त फायली जेव्हा प्रकाशात येतील तेव्हा या गनिमी काव्याचे क्रांतीकारकत्व जगाला कळेल. ज्या लॉर्ड कर्झनशी सयाजीरावांचा सर्वाधिक संघर्ष झाला होता तो लॉर्ड कर्झन शाहू महाराजांना म्हणाला होता, ‘सयाजीराव हे एक वाफेचे इंजिन आहे... सयाजीरावांचा आदर्श इतर संस्थानिकांनी घ्यावा.’
शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकावेळी प्रशासकीय सोयीसाठी ‘राज्यव्यवहारकोश’ तयार करुन घेतला होता. शिवाजी महाराजांच्या पुढे एक पाऊल टाकत सयाजीरावांनी इंग्रजी, मराठी, गुजराती, संस्कृत, उर्दू, पारशी, हिंदी आणि बंगाली या ८ भाषांतील ‘श्रीसयाजीशासनशब्दकल्पतरू’ हा राज्यव्यवहार कोश तयार करून घेतला. १९३३ मध्ये पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात ७२ संस्थांतर्फे सयाजीराव महाराजांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगीच्या भाषणात सयाजीरावांच्या राज्यव्यवहार कोशाबद्दल बोलताना न.चिं. केळकर म्हणतात, “नुकताच अनेक प्रांतीय भाषांचा उपयोग करून, थोरल्या शिवछत्रपतींचे अनुकरण करून सयाजीराव महाराजांनी एक प्रकारचा नवा राज्यव्यवहार कोशच निर्माण केला आहे. त्यावरून त्यांचे भाषांविषयीचे निःपक्षपातीत्व दिसून येते.” केळकरांचे सयाजीरावांच्या राज्यव्यवहार कोशाबद्दलचे भाष्य महत्वाचे आहे. कारण शिवाजी महाराजांनंतर असे काम करणारे सयाजीराव हे एकमेव प्रशासक आहेत.
सयाजीराव हे शिवाजी महाराजांचे कृतीशील वारसदार होते याचा पुरावा म्हणजे सयाजीरावांनी शिवाजी महाराजांसंदर्भातील साहित्य प्रकाशित करण्यासाठी केलेली मदत होय. फक्त शिवाजी महाराजांसंदर्भातील साहित्यच नव्हे तर मराठ्यांचा संपूर्ण इतिहासच सयाजीरावांच्या पाठबळामुळेच प्रकाशित होऊ शकला. शिवाजी महाराजांचे मराठीतील पहिले आणि अधिकृत चरित्र केळुसकर गुरुजींनी लिहिले. या चरित्राच्या २०० प्रती सयाजीरावांनी विकत घेऊन केळुसकरांना सहाय्य केले. प्रा. ताकाखान यांनी १९२१ मध्ये या चरित्राचा इंग्रजीत अनुवाद केला. या अनुवादाच्या छपाईसाठी निधी संकलनामध्ये बडोद्याच्या खासेराव जाधव यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. हा इतिहास देखील आजपर्यंत अज्ञात राहिला. १९१९ मध्ये सीताराम पेंडसे यांचा ‘शिवाजी महाराज’ हा ग्रंथ सयाजीरावांच्या आश्रयाने प्रकाशित झाला. १९२० साली रावलीन्सनकृत ‘Shivaji the Maratha’ या इंग्रजी ग्रंथाचे मुकुंदराव मेहता यांनी गुजराती भाषेत भाषांतर केले. बडोदा लष्करातील जनरल नानासाहेब शिंदे यांनी लिहिलेला ‘मराठ्यांच्या प्रसिद्ध लढाया’ हा ग्रंथ १९२२ मध्ये सयाजी साहित्य मालेत प्रकाशित करण्यात आला.
आजही मराठ्यांच्या इतिहासाबाबत सरदेसाईंच्या रियासती टाळून पुढे जाता येत नाही. या रियासती सयाजीरावांमुळे तयार झाल्या. रियासतकार सरदेसाई हे ३७ वर्षे सयाजीरावांकडे नोकरीस होते. ‘सरदेसाई ते रियासतकार’ या त्यांच्या वाटचालीत सयाजीराव महाराजांची भूमिका स्पष्ट करताना रियासतकार सरदेसाई लिहितात, “आज मी रियासतकार म्हणून मिरवतो त्याचे श्रेय मुख्यतः सयाजीराव महाराजांचे आहे.” रियासतकार सरदेसाईकृत ‘मराठा रियासत मध्य विभाग भाग पहिला (इ.स. १७०७ – १७४०)’ या मराठी ग्रंथाचा गुजराती अनुवाद भरतराम मेहता यांनी १९२८ मध्ये केला. १९३३ मध्ये विनायक सदाशिव यांचा ‘तंजावरचे मराठी राज्य’ हा ग्रंथ प्रकाशित झाला. ‘शिवकालीन पत्रसंग्रह भाग १ व २’(१९२९), ‘शिवाजी निबंधावली भाग १ व २’ (१९२९), ‘इंग्लिश रेकॉर्डस ऑन शिवाजी’ (१९३१), ‘बाल शिवाजी’ (१९४२) इ. अनेक शिवाजी महाराज व मराठ्यांच्या इतिहासासंदर्भातील पुस्तके बडोद्यातून प्रकाशित झाली.
​ सयाजीरावांनी मराठ्यांच्या इतिहासविषयक पुस्तकांच्या प्रकाशनाबरोबरच शिवाजी महाराजांसंदर्भातील वेगवेगळ्या कार्यांसाठीही मदत केली. १८९५ मध्ये रायगडावरील शिवसमाधी जीर्णोद्धारासाठी सर्वाधिक १००० रु. चा निधी सयाजीरावांनी दिला. १९२७ साली रायगड किल्यावरील धर्मशाळेसाठी ५००० रु. ची देणगी दिली. १९०४ मध्ये पुण्यातील शिवजयंती महोत्सवासाठी सयाजीरावांनी १००० रु.ची मदत केली. १९३० मध्ये सर एफ. ई. वाच्छा यांना श्री. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकरिता ३०,००० रुपये सयाजीरावांनी दिले.
कोल्हापुरात इतिहास संशोधनाचा पाया घालणारे मराठ्यांचे इतिहासकार आणि शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. अपासाहेब पवार यांना मराठ्यांच्या इतिहासावर लंडन येथे संशोधन करण्यासाठी सयाजीरावांनी १९३२ साली २००० रुपये शिष्यवृत्ती दिली. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम ३८ लाख ९६ हजार रु. हून अधिक भरते. ही शिष्यवृत्तीसुद्धा महाराष्ट्रासाठी फलदायी ठरली. कारण पुढे अप्पासाहेब पवारांनी करवीरच्या महाराणी ताराबाई यांच्या कारकीर्दीतील कागदपत्रांचे तीन खंड १९६९ ते १९७२ मध्ये संपादित करून शिवाजी विद्यापीठातर्फे प्रकाशित केले. अप्पासाहेब पवारांमुळे कोल्हापूर हे इतिहास संशोधनाचे एक महत्वाचे केंद्र म्हणून विकसित झाले आहे. याबाबत आपण सदैव कृतज्ञ राहिले पाहिजे. शिवाजी महाराजांसंबंधी कार्यासाठी सयाजीरावांनी दिलेली ही आर्थिक मदत एकूण ३९,००० रु. इतकी होती. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम सुमारे ९ कोटी ६९ लाख रु. हून अधिक भरते. एकूणच शिवाजी महाराजांचा विचार आणि आदर्श पुढे नेण्यासाठी सयाजीरावांमधील आंतरिक तळमळ आणि आदरभाव यातून स्पष्टपणे अधोरेखित होतो.
१४ एप्रिल १९३३ रोजी सातारा म्युनिसिपालिटीच्या मानपत्रास उत्तर देताना सयाजीरावांनी केलेले भाषण महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात अब्राहम लिंकनच्या पत्रासारखे लावायला हवे असे आहे. या भाषणात सयाजीराव म्हणतात, “सातारचा व आमचा संबंध नवा नाही, तो जुनाच आहे. राजकीय संबंधाप्रमाणेच आमचे शारिरीक संबंध झाले आहेत, असे इतिहासावरून तुम्हांस आढळुन येईल. या इतिहासाचा पोकळ अभिमान धरण्यात हशील नाही. त्याचे निःपक्षपातीबुद्धीने निरीक्षण करून त्यापासून जरूर तो बोध आपण घेतला पाहिजे. शिवाजीमहाराजांचा सन १६६० ते ६५ च्या सुमारास राज्याभिषेक सोहळा झाला. तारखेत कदाचित चूक असेल, कारण मी अंदाजाने बोलत आहे, व सन १८१८ त पेशवाईबरोबर मराठ्यांचे राज्य बुडाले, म्हणजे मराठी राष्ट्र अवघे १५०-२०० वर्षच टिकले. हा काळ इतिहासांत किती अल्प आहे? मनुष्याप्रमाणे राष्ट्रालाही कार्य करण्यांस इतिहासात ‘काल आणि स्थल’ (Time and Space) यांची जरूरी असते. या दोन्ही गोष्टी दुर्दैवेकरून मराठी राज्यास मिळाल्या नाहीत. ज्या राष्ट्राला आपले सामर्थ्य व सत्ता १५०-२०० वर्षेही नीट टिकविता आली नाही, त्यास जगाच्या इतिहासांत राष्ट्र म्हणून कोणते स्थान मिळेल? मराठी सत्तेचे स्मारक म्हणून आज एकतरी चांगली इमारत किंवा राज्यपद्धतीचे एखादे वैशिष्ट्य आपणांस दाखविता येण्यासारखे आहे काय? तेव्हा असल्या अल्पजीवी राष्ट्राबद्दल पोकळ अभिमान धरण्यापेक्षा ते इतक्या लवकर व थोड्या काळांत का नाहीसे झाले याचा तुम्हांस उपयोग होईल.”
शिवाजी महाराजांचे साम्राज्य अल्पजीवी का ठरले या प्रश्नाची ८८ वर्षापूर्वी सयाजीरावांनी केलेली चर्चा मराठ्यांच्या एकाही इतिहासकाराने आजवर केलेली नाही. सयाजीरावांच्या या चिंतनात राज्य कसे करायचे आणि राज्य कसे करायचे नाही या दोन्हीही प्रश्नांची उत्तरे लपलेली आहेत. शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील सुराज्य सयाजीरावांनी बडोद्यात प्रस्थापित केले. त्यामुळे सयाजीराव हे शिवाजी महाराजांच्या स्वराज्य धोरणाचे खऱ्या अर्थाने पहिले निर्माते होते. त्यामुळेच पंडित मदन मोहन मालवीय यांचे ‘महाराजा सयाजीराव हे हिंदुस्थानातील शिवाजीनंतरचे शेवटचे आदर्श राजे होते.’ हे विधान सयाजीरावांचे सर्वात योग्य मूल्यमापन ठरते.
अलीकडे महापुरुषांचे दैवतीकरण हा एक मोठा उद्योगच झाला आहे. यातून समाजाचे कधीही न भरून येणारे नुकसान होत आहे. कारण महापुरुषांच्या दैवतीकरणातून जात, धर्म, प्रदेश, भाषा असे अनेक संघर्ष टोकदार होवून समाजातील द्वेषाची मात्रा कमालीची वाढली आहे. ज्या महापुरुषांनी आयुष्यभर व्यापक भूमिकेतून ‘समाजसंवाद’ निर्माण केला त्यांचे नाव घेत ‘विसंवादा’कडे होणारा आपला प्रवास हा कोरोनाच्या प्रादुर्भावापेक्षाही महाभयंकर आहे. म्हणूनच ‘सयाजीचिंतन’ आवश्यक आहे.
३१ ऑक्टोबर २०१८ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेलांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण केले. महाराष्ट्रात शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे प्रस्तावित आहेत. महापुरुषांचे असे पुतळे उत्सव आणि अभिमानापुरते मर्यादित राहू नयेत याची काळजी आपण घेतली पाहिजे.
महाराष्ट्रातील आजचे सर्वात मोठे आणि राष्ट्रीय मान्यता असणारे महत्वाचे नेते शरद पवार यांचे ‘सयाजीचिंतन’ नव्या राजकारण्यांनी स्विकारण्यासारखे आहे. शरद पवार म्हणतात, “या देशात अनेक राजे निर्माण झाले, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला राज्यकारभार चालविताना सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवला म्हणून ते अजरामर झाले. त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांचा वारसा श्रीमंत सयाजीराव महाराजांनी चालविला.” शरद पवारांकडे सयाजीरावांचा हा वारसा त्यांचे गुरु यशवंतराव चव्हाण यांच्यामार्फत आला होता हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला हवे.

महाराजा सयाजीराव आणि अंधश्रद्धा निर्मुलन

 





महाराजा सयाजीराव आणि अंधश्रद्धा निर्मुलन
- निलोफर मुजावर, वारणानगर
(८९५६५८१६०९)
१८८१ मध्ये राज्याधिकार प्राप्त झाल्यानंतर महाराजा सयाजीराव यांच्या सामाजिक आणि धार्मिक सुधारणांच्या कार्यक्रमास खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. सयाजीरावांनी धार्मिक सुधारणांची सुरुवात राजवाड्यातील देवघरापासून केली. राजघराण्यातील धर्मभोळ्या व्यक्तींचा फायदा घेत काही बाबी साध्य करण्यासाठी ब्राह्मणांकडून राजघराण्यातील व्यक्तींना विविध प्रकारची अनुष्ठाने करण्याचा आग्रह धरण्यात येई. बऱ्याचदा या धार्मिक विधींचे स्वरूप हास्यास्पद असे. मि. पेस्तनजी यांच्या हुकुमाने विनायकराव बहुलकर नावाचे गृहस्थ पुण्यातील विविध मंदिरांमध्ये बडोदा राजघराण्यातील व्यक्तींच्या नावे अनुष्ठाने करत असत. यावरून बडोदा राजघराण्यात अनुष्ठानांचे माजलेले स्तोम आपल्या लक्षात येईल. याचप्रमाणे विविध ग्रहांच्या स्थितीचा राजघराण्यातील व्यक्तींच्या आयुष्यावर पडणारा वाईट परिणाम दूर करण्यासाठी केल्या जाणाऱ्या ग्रहांच्या शांतीचा विधीदेखील मोठ्या प्रमाणावर केला जात असे.
​राजघराण्यातील व्यक्तींची दृष्ट काढण्याची पद्धत हा तर या तथाकथित कर्मकांडांचा कळस मानता येईल. राजघराण्यातील व्यक्तींचा इतर सर्वसामान्य जनतेशी संपर्क आल्यानंतर अथवा एखाद्या विशेष प्रसंगानंतर दृष्ट लागून त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी दृष्ट काढली जात असे. परंतु अशी दृष्ट कोणत्या प्रसंगी, किती वेळा, कोणत्या व्यक्तीने काढावी या संदर्भात कोणतेही नियम अथवा निकष निश्चित केलेले नव्हते. त्यामुळे बडोद्यातील ब्राह्मण व्यक्तींकडून याचा गैरफायदा घेतला जाई. दक्षिणेच्या हव्यासापायी राजघराण्यातील व्यक्तींची विनाकारण दृष्ट काढण्याचे प्रसंग वारंवार घडवून आणले जात. मुंग्यास साखर घालणे हा देखील अशाच प्रकारचा एक विधी होता.
सुरुवातीच्या काळात राजघराण्यातील व्यक्तींचा या विधींना असणारा पाठींबा आणि प्रशासकीय अनागोंदी यामुळे सयाजीरावांना हे सर्व प्रकार निमुटपणे पाहावे लागत होते. या विधींसाठी होणारा खर्च आगाऊ मंजूर करून न घेता ऐनवेळी महाराजांसमोर जाऊन खर्चास मान्यता मिळवण्याची सवय प्रशासनाच्या अंगवळणी पडली होती. विधी कार्य अडून राहिलेले असल्यामुळे महाराजांना कोणतीही चौकशी न करता या खर्चाला मान्यता देणे भाग पडे. या परिस्थितीचा फायदा स्वार्थी पुजाऱ्यांकडून घेतला जात होता. प्रत्यक्ष विधिवेळी म्हटल्या जाणाऱ्या मंत्रांचा अर्थ सयाजीरावांनी एखाद्या पुजाऱ्याला विचारल्यास त्याला तो सांगता येत नसे. अशा वेळी देवघरातील पुरोहित वर्ग आणि राजघराण्यातील स्त्रियांकडून महाराजांचे विचार इंग्रजी शिक्षणामुळे बिघडले असून ते अधर्मी झाले आहेत व त्यांच्या अशा प्रश्नांमुळे ग्रहांचा, ब्रह्मवृंदाचा व देवतांचा कोप होऊन राजघराण्यावर संकट कोसळेल असा गवगवा करण्यात येई. परंतु एकदम अधिकाराच्या जोरावर कोणताही बदल न करता हळूहळू लोकांचे मत परिवर्तन करण्यावर भर देणाऱ्या सयाजीरावांनी याबाबतसुद्धा तेच धोरण अवलंबले.
या सर्व बाबींना आळा घालणे आवश्यक होते. परंतु वर्षानुवर्षे अलिखित मान्यताप्राप्त विधी एका रात्रीत बदलणे शक्य नव्हते. १८७७ मध्ये सयाजीरावांनी अहमदाबाद येथे सहभोजन करून अस्पृश्यता निवारणास सुरुवात केली. १८८३ मध्ये स्वत:च्या राजवाड्यातील खंडोबाचे खाजगी मंदिर अस्पृश्यांसाठी खुले केले. हे पाऊल उचलणारे सयाजीराव आधुनिक भारतातील पहिले प्रशासक ठरतात. १८८६ मध्ये राजवाड्यातील अस्पृश्यांसाठी वेगळ्या जेवणाच्या पंगतीची पद्धत स्वतः त्या पंक्तीला बसून महाराजांनी मोडीस काढली.
राजवाड्यात होणाऱ्या धार्मिक विधींचे अर्थ सर्वांना समजण्यासाठी या विधींचे मंत्र अर्थासह प्रकाशित करण्याचा विचार सयाजीरावांच्या मनात आला. त्यानुसार २३ नोव्हेंबर १८८६ रोजी हु.हु.नं. ५० अन्वये सयाजीरावांनी राजवाड्यात होणारी सर्व धार्मिक कृत्ये शास्त्रार्थासह तपशीलवार लिहून काढण्याचा आदेश दिला. रा.रा. शंकर मोरो रानडे, कृष्णदेव महादेव समर्थ आणि भाऊ मास्तर यांनी ही जबाबदारी समर्थपणे पार पाडत धर्मविधींचा तपशीलवार शास्त्रार्थ विशद करणारा ‘ऐनेराजमेहेल’ नावाचा ग्रंथ तयार केला. या ग्रंथाविषयीची सयाजीरावांच्या मनातील आपुलकी आणि आदर विशद करताना सरदेसाई लिहितात, “हें पुस्तक म्हणजे महाराजांच्या नवीन प्रवृत्तीचा केवळ पाया होय. ऐनेराजमेहेलच्या अनेक आवृत्ती आजपर्यंत झाल्या आहेत आणि त्यांतील प्रकरणें पुन:पुन: चर्चा व विचार करून संपूर्ण करण्याकडे महाराजांनी इतके परिश्रम केले आहेत कीं बहुधा दुसऱ्या कोणत्याही विषयावर तें केलें नसतील.” धर्मविषयक ज्ञानाच्या सर्वसामान्य जनतेतील प्रसारासाठीची सयाजीरावांची अगदी सुरुवातीच्या काळापासूनची धडपड यातून अधोरेखित होते.
​धर्मविषयक ज्ञान सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्याबरोबरच राजवाड्यातील धार्मिक खर्चाला शिस्त लावण्याचा यशस्वी प्रयत्न सयाजीरावांनी केला. १८९२ मध्ये राजवाड्याच्या देवघरातील धार्मिक विधींच्या खर्चाचे १,००० पानांचे तपशीलवार बजेट सयाजीरावांनी छापून पुस्तकरुपाने प्रसिद्ध केले. स्वत:च्या राजवाड्यातील खासगी धार्मिक विधींचा आर्थिक लेखाजोखा जनतेसमोर पुस्तकरूपाने मांडणारे सयाजीराव कदाचित एकमेव प्रशासक ठरावेत. या पुस्तकामुळे राजवाड्यातील धर्मविधी आणि त्यावर होणाऱ्या खर्चाची अचूक स्थिती सयाजीरावांच्या लक्षात येऊन पुढील धर्मविषयक सुधारणा त्यांना शक्य झाल्याचे निरीक्षण सरदेसाईलिखित सयाजीरावांच्या खासगी वृत्तांतात आले आहे. या संदर्भात सरदेसाईलिखित सयाजीरावांच्या खासगी वृत्तांतात वर्णन केलेली १८९७ मधील घटना उल्लेखनीय आहे. बडोद्याच्या महाराजांचे कापलेले केस नर्मदा नदीच्या प्रवाहात नेऊन टाकण्याचा रिवाज पूर्वापार चालत होता. त्यानुसार सयाजीरावांचे कापलेले केस नर्मदा नदीत टाकण्यासाठीचा खर्च म्हणून १ जून १८९७ रोजी खानगी कारभाऱ्यांनी त्यांच्या अधिकारात ८८ रु. १२ आणे मंजूर केले. परंतु या संदर्भात मागण्यात आलेला इतर खर्च त्यांनी मंजूर केला नाही. सयाजीरावांनी धार्मिक खर्चाला लावलेल्या शिस्तीचा हा परिणाम होता.
​धर्मविधींना आर्थिक शिस्त लावल्यानंतर सयाजीरावांनी राजवाड्यात होणाऱ्या अनावश्यक धर्मविधींचे प्रमाण शक्यतो कोणाच्याही धार्मिक भावना न दुखावता कमी करण्याकडे लक्ष पुरवले. राजघराण्यातील व्यक्तींची दृष्ट काढण्याचा विधी बंद करण्यासंदर्भातील आदेश सयाजीरावांनी १९०१ मध्ये आजच्याच दिवशी (२९ मे १९०१) दिला होता. या हु. हु. नं. १८७ मध्ये, “दृष्टी काढण्याचा रिवाज बंद करावा; परंतु देवभोळ्या समजुतीमुळें ही खास प्रसंगी कोणास दृष्ट काढल्यानें सुख वाटत असल्यास तसी त्याच्या समजुतीस्तव काढण्यास हरकत नाही; मात्र होतकरुं मुलांना देवभोळ्या समजुतीचा कित्ता होतां होईतोंपर्यंत देऊ नये.” असे नमूद करण्यात आले होते. धर्मविधी बंद करत असताना समाजाची मानसिकता लक्षात घेण्याची सयाजीरावांची सर्वसमावेशकता या हुकुमातून अधोरेखित होते. लहान मुलांच्या मनावर धर्मविधींचा पगडा बसू नये यासाठी काळजी घेण्याची केलेली ताकीद सामान्य जनतेचा धार्मिक दृष्टीकोन निकोप होण्यासाठीची सयाजीरावांची धडपड दर्शवते. त्याचबरोबर एवढ्या छोट्या गोष्टीबद्दल आदेश काढण्याची कृती सयाजीरावांच्या जागरूक दृष्टीचे प्रतीक आहे.
सयाजीरावांना शिक्षणकाळातच त्यांच्या शिक्षकांकडून याबाबतच्या सूचना मिळाल्या होत्या. राज्याभिषेकाआधी सयाजीरावांना सर टी. माधवराव यांनी इतर शिक्षकांच्या सहाय्याने विविध विषयासंदर्भातील व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. २० जुलै १८८१ रोजी शिक्षण विषयावर देण्यात आलेल्या व्याख्यानात सयाजीरावांना पुढील सूचना करण्यात आली होती. “धर्मविषयक शिक्षण हे केवळ मानसिक पातळीवरील असावे. विद्यार्थ्यांना शिक्षण देत असताना कोणत्याही प्रकारच्या विशेष धार्मिक सूचना दिल्या जाऊ नयेत.” दृष्ट काढण्यासंदर्भातील सयाजीरावांचा आदेश हा या सूचनेचे प्रात्यक्षिकच आहे.
​ग्रहणाच्या दिवशी सरकारी कचेरीत घेण्यात येणारी सुट्टी हादेखील सरकारी पातळीवर पाळण्यात येणाऱ्या अंधश्रद्धेचा उत्तम नमुना होता. प्रशासकीय व आर्थिक लाभ मिळविण्यासाठी ग्रहणाच्या दिवशी सरकारी कचेरी बंद ठेऊन धार्मिक विधी करण्याकडे कर्मचाऱ्यांचा कल असे. सयाजीरावांनी हुकूम काढून ग्रहणाची ही सुट्टी बंद केली. परंतु हा आदेश काढत असतानाच त्यांनी पाळलेली धार्मिक सहिष्णुता गोत्रीलिखित सयाजी चरित्रामध्ये अधोरेखित झाली आहे. गोत्री म्हणतात, “पृथ्वीची छाया चंद्रावर पडते त्यास ‘ग्रहण’ म्हणतात, हे सर्व सुशिक्षित लोकांना ठाऊक आहेत; परंतु भोळे व भाविक लोक या दिवशी राहू किंवा केतू हे पापग्रह चंद्रास किंवा सूर्यास पीडा करतात, अशा समुतीने तो दिवस धार्मिक कृत्यात किंवा बहुतेक निरुद्योगत घालवितात. ही त्यांची अज्ञान समजूत दूर व्हावी व त्यांना उद्योगाचे महत्व कळावे म्हणून बडोदे राज्यातील सरकारी कचेऱ्यात ग्रहणाच्या दिवशी रजा पाळीत असत, ती बंद करण्यात आली आहे व फक्त धार्मिक कारणानेच कोणास रजा पाहिजे असेल, तर त्याने रिपोर्ट करून रजा घ्यावी, असे ठरविले आहे. यात लोकांच्या धार्मिक समजुतीसही महत्व दिल्याचे दिसून येते.” या पार्श्वभूमीवर सयाजीरावांना त्यांच्या शिक्षकांकडून मिळालेले या संदर्भांतील मार्गदर्शन अभ्यासल्यास त्यांची भूमिका समजून घेणे सोपे जाते.
२७ जुलै १८८१ रोजी राजवाडा विभाग या विषयावर देण्यात आलेल्या व्याख्यानात सर टी. माधवराव सांगतात, “धार्मिक कार्ये आणि दानधर्मावर होणारा खर्च जास्त आहे. त्यामुळे या खर्चात वाढ होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेण्यात यावी. आवश्यक आणि शक्य असेल तेव्हा या खर्चाचे पुनर्समायोजन करण्यात यावे.” या शिकवणीनुसार धनदांडग्या व्यक्तींऐवजी गरजू व्यक्तींनाच खिचडी व ग्यारमीचा लाभ मिळावा यासाठी १८९३ मध्ये सयाजीरावांनी या प्रथेत बदल केला. त्यानुसार जातीचा निकष न लावता सर्व जातीतील निराश्रित, अपंग, अंध, विधवा स्त्रिया, लहान मुले व गरजू व्यक्तींची समितीच्या माध्यमातून निवड करून त्यांना पास देण्यात यावेत आणि पासधारक व्यक्तीलाच खिचडी-ग्यारमीचा लाभ असा हुकूम सयाजीरावांनी १६ जून १८९३ रोजी काढला. त्यामुळे ब्राह्मण आणि मुसलमान व्यक्तींबरोबरच इतर जातीतील गरजूंना देखील याचा लाभ मिळू लागला. १९०५-०६ मध्ये १०४१ हिंदू व ८०८ मुसलमान व्यक्तींना हे पास देण्यात आले.
पहिल्या परदेश दौऱ्यानंतर प्रायश्चित्त घेतल्यानंतरही काही व्यक्तींना त्यांच्या जातीबांधवांकडून स्वीकारण्यात आले नाही. परंतु पुढील काही दौऱ्यांमध्ये सोबत येणाऱ्या व्यक्तींना प्रायश्चित्तासाठी सरकारकडून देण्यात येणारी मदत सयाजीरावांनी कालौघात कमी केली. १८९१-९२ च्या दरम्यान सरदेसाईंना तारेद्वारे युरोपात बोलवत असताना ‘प्रायश्चित्ताचा खर्च सरकारांतून मिळणार नाही’ हा सयाजीरावांनी दिलेला इशारा याचा पुरावा आहे. नंतरच्या काळात सयाजीरावांनी प्रायश्चित्त घेण्यास कायद्याने बंदी घातली. महाराजांनी भिकाचार्य ऐनापुरे यांच्याकडून १९०३ च्या हुकूमाद्वारे ‘प्रायश्चित्तमयूख’ हा संस्कृत ग्रंथ व त्याचे मराठी भाषांतर या स्वरुपात तयार करून प्रकाशित केला होता. १८८८ च्या प्रायश्चित्तानंतर प्रायश्चित्ताबाबत धर्मशास्त्र काय म्हणते हे लोकांना कळावे आणि त्यातून लोकांची धर्माबाबत साक्षरता वाढावी म्हणून प्रकाशित केलेला हा ग्रंथ म्हणजे महाराजांच्या धर्मसाक्षरता अभियानाचा उत्तम नमूना आहे. सयाजीरावांनी धर्म साक्षरतेचे प्रयोग हे सर्व स्तरावर केले होते. त्यासाठी सक्षम व्यक्तीची नेमणूक, हुकूम, समजूत घालणे, लोकमत तयार होण्यासाठी वेळ देणे असे रचनात्मक अभियान महाराजांनी राबविले. या अभियानाचा सर्वोच्च बिंदू म्हणजे धर्मविषयक ग्रंथांचे प्रकाशन होय. महाराजांनी प्रकाशित केलेल्या मराठी, गुजराती, हिंदी आणि इंग्रजी ग्रंथांच्या यादीवर नुसती नजर टाकली तरी धर्म साक्षरतेचे सयाजीरावांचे अभियान हे किती मुलभूत होते हे लक्षात येईल.
प्रत्येक धर्मामध्ये धार्मिक विधी करणाऱ्या पुरोहितांची एकाधिकारशाही वाढलेली आज आपल्याला पहावयास मिळते. बडोद्यातील धार्मिक क्षेत्रातील अंधाधुंदीचा कारभार थांबवण्यासाठी महाराजांनी केलेले प्रयत्न हे आजच्या काळातही तितकेच महत्वपूर्ण असल्याचे जाणवते. श्रावणमास दक्षिणेच्या माध्यमातून धर्मसुधारणा करत असताना परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांनाच दक्षिणा देण्याचा नियम सयाजीरावांनी केला. यातून श्रावणमास दक्षिणेवरील खर्चात बचत झाली. या बचतीतून बडोद्यात श्रावणमास दक्षिणा फंडातून दरसाल १०,००० रुपये धर्मशास्त्रावरील पुस्तकांचे भाषांतर करण्यासाठी खर्च करण्यात येत होते.
सयाजीरावांनी १९१५ मध्ये केलेल्या हिंदू पुरोहित कायद्यानुसार हिंदू पुरोहित परीक्षा, याज्ञीक विषयातील किंवा श्रावणमास दक्षिणा परीक्षा यापैकी कोणत्याही परीक्षेत पास झाल्यास किंवा संस्थानाकडून विशेष बाब म्हणून मान्यता दिलेल्या व्यक्तीस संस्थानाकडून परवाना मिळाल्यावरच पौरोहित्याचा अधिकार प्राप्त होत होता. १४ सप्टेंबर १९३४ ला हा कायदा संपूर्ण बडोदा संस्थानात लागू करण्यात आला. या निकषात न बसणारा पुरोहित धार्मिक विधी करत असल्यास त्याला २५ रु. पर्यंत दंडाची तरतूद होती. पण पुरोहित उपलब्ध नसल्यास सवलत दिली जात होती. ही परीक्षा पास होणाऱ्या सर्व हिंदुंना मग त्यांची जात कोणतीही असो त्याला ही परीक्षा पास झाल्यावर पौरोहित्य करता येत होते. ही बाब २,००० वर्षांच्या हिंदू धर्म-संस्कृतीच्या इतिहासातील एक मोठी क्रांती होती.
खानगी खात्याकडून करण्यात आलेल्या खर्चाचा हिशेब ठेवण्याचे काम खानगी खात्यांतर्गत येणाऱ्या हिशेबी कचेरीकडून केले जात असे. परंतु ज्याने खर्च करायचा त्यानेच त्या खर्चाची तपासणी करावी ही परिस्थिती कामकाजातील पारदर्शकतेबाबत शंका उपस्थित करणारी बाब होती. त्यामुळे सयाजीरावांनी १ मार्च १८९२ रोजीच्या हुकुमाने हिशेबी कचेरी खानगी खात्याकडून काढून अकाउंटट जनरलकडे वर्ग केले. गोविंदराव नारायण दळवी यांनी बराच काळ या कचेरीचे काम केले. अशी समज असे की संस्थानाच्या राजाचा खाजगी कारभार म्हणजे अस्ताव्यस्त, मनमानी आणि अंधाधुंद कारभार होय. परंतु सयाजीरावांनी अत्यंत प्रयत्नपूर्वक स्वत:च्या संस्थानात या दृष्टीने अनेक बदल घडवत राज्याचे उत्पन्न म्हणजे राजाची खाजगी मालमत्ता नसून त्यावर प्रजेचा सर्वाधिकार आहे हे शिवाजी महाराजांनी राबवलेले धोरण आपल्या कारभाराचे मुख्य सूत्र बनवले.
हिंदू धर्मासोबतच इतर धर्मियांसाठीही तत्कालीन शिफारशीनुसार अनेक महत्वपूर्ण कायदे महाराजांनी केले. यातीलच एक कायदा म्हणजे जैनधर्मातील संन्यास दीक्षा कायदा होय. अल्पवयीन मुलामुलींना जबरदस्तीने किंवा फसवून संन्यास दीक्षा देण्यात येते व त्यामुळे त्यांना पुढील आयुष्यात व्यावहारिक दृष्ट्या मृतवत केले जाते. म्हणून जैन धर्मियांच्या तक्रारीवरून बडोदा सरकारने एका विशेष कमिटीची नेमणूक करून तिच्यामार्फत जैन धर्मशास्त्रात संन्यास प्रथेस समर्पक आधार नसल्याची खात्री करून घेतली आणि १९३३ ला हा कायदा लागू केला. या कायद्यानुसार अज्ञान बालकांना दिलेली संन्यास दीक्षा निरर्थक ठरवून ती दिल्याने मिळकतीवरच्या त्याच्या हक्काला कोणताही धक्का बसणार नाही असे ठरविण्यात आले. अल्पवयीन मुलामुलींना संन्यास दीक्षा देणे हा फौजदारी गुन्हा समजला जाऊन तो गुन्हा करणाऱ्या व्यक्तीस १ वर्षापर्यंत कारावास व ५०० रु. पर्यंत दंड अशा शिक्षेची तरतूद केली.
बडोदा संस्थानातील मुस्लिम धर्मियांची लोकसंख्या १९०१ मध्ये ९ टक्के होती. हिंदू व इतर अनेक धर्मीय समुदायांच्या उन्नतीसाठी महाराजांनी कायद्याने उपाययोजना करत असताना आपल्या मुस्लिम प्रजेकडेही दुर्लक्ष केले नाही. मुस्लिम धर्मीयांमध्ये दानधर्मासाठी दिलेल्या देणगीला ‘वक्फ’ असे म्हणतात. अशा देणगीची व्यवस्था करण्यासाठी नेमलेल्या व्यवस्थापकाला ‘मुतवल्ली’ (विश्वस्त) असे म्हणतात. या मुतवल्लींनी अशा धर्मादाय मिळकतीची व्यवस्था मूळ उद्देशाला धरून केली पाहिजे व जमा खर्चाचे हिशेब बरोबर ठेवले पाहिजेत अशी त्यांच्यावर जबाबदारी होती. परंतु बहुदा ही मुतवल्ली म्हणून काम करणार्या व्यक्ती ती धर्मादाय मिळकत आपल्या मालकीचीच आहे असे समजून तिचा वैयक्तिक फायद्यासाठी उपयोग करत होते. १९२७ चा मुस्लिम धर्मियांसाठीचा ‘वक्फ कायदा’ हा धर्माच्या नावाखाली होणार्या चुकीच्या आचरणाला शिस्त लावण्याच्या उद्देशाने केला होता.
कर्मठ समाजाला कर्मकांडांच्या डबक्यातून बाहेर काढण्यासाठी हजारो वर्षाच्या धर्म संस्कृतीच्या प्रवाहात उत्पन्न झालेली ही कर्मकांडे अभ्यासणे, त्यातील फोलपणा लोकांच्या लक्षात आणून देणे, लोकांना कालबाह्य गोष्टींचा त्याग करण्याची सहज प्रेरणा मिळावी यासाठी प्रयत्न करणे आणि लोकांना योग्य पर्यायदेखील उपलब्ध करून देणे अशा विशाल आणि विज्ञानवादी न्यायाने महाराजांनी स्वतःच्या राजवाड्यातील खानगी कारभारात बदल घडवत धर्मसुधारणेचा राबवलेला हा कार्यक्रम आजही आपणास दिशादर्शक ठरतो.

सयाजीराव महाराजांच्या नजरेतून छत्रपती शिवराय

 


सयाजीराव महाराजांच्या नजरेतून छत्रपती शिवराय
- बाबा भांड
(मो- 9881740604)
महाराष्ट्रातील मराठा शेतकरी कुटुंबातून बडोद्याचा राजा झालेल्या सयाजीरावांनी आयुष्यभर मातृभूमीसाठी कष्ट घेतले. महाराष्ट्रातील सर्व समाजातील लोकांना, त्याबरोबर आपण ज्या समाजात जन्मलो, त्या समाजाची उन्नती होण्यासाठी आयुष्यभर मदत केली.
बडोदा संस्थानातून देशात तसेच परदेशात शिष्यवृत्ती देऊन मराठा समाजातील व इतर अनेकांना शिक्षणासाठी पाठवले. त्या शिष्यवृत्तीसाठी त्यांनी मोठ्या रकमेचा मराठा फंड उभारला. त्यामध्ये प्रांताचा विचार न करता मदत केली. महाराजांच्या या मदतीमुळे अनेक व्यक्ती उच्चविद्याविभूषित झाल्या.
बडोदा संस्थानात तसेच परदेशात शिक्षण घेतलेल्या या व्यक्तींनी महाराजांच्या सल्ल्यानुसार समाजबांधवांसाठी महाराष्ट्रात आणि इतर भागात जेथे मराठा समाज आहे तेथे शिक्षण संस्था काढल्या. यातून लाखो मराठा विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले. आणि आपली उन्नती साधली.
महाराजा सयाजीरावांनी देशभरातील अनेक युगपुरुषांना, संस्थांना, विद्यार्थ्यांना आयुष्यभर सढळ हाताने कोट्यावधींची मदत केली. सुप्रशासनातून जनकल्याणाचा ध्यास देत असताना छत्रपती शिवरायांच्या कार्याचा इतिहास त्यांचा आदर्श होता. त्यांचे प्रशासन, जनकल्याणाची कामे, छत्रपतींचा आदर्श समोर ठेवूनच केलेली उभारणी होती. याची कबूली सयाजीरावांनी स्वत:च्या लेखनातून, लिहिलेल्या पत्रातून आणि वेळोवेळी केलेल्या भाषणांतून दिसून येते. छत्रपती शिवरायांच्या घराण्याबद्दल त्यांना अत्यंत आदर होता. त्यातून या राजघराण्याशी नाते संबंध पुढे आणखी घट्ट झाला. छत्रपती शाहू महाराजांचे राजपुत्र राजाराम महाराज यांचा सयाजीराव यांच्या नातीशी विवाह झाल्याने ही दोन राजघराणी जोडली गेली.
चौसष्ठ वर्षे एक सार्वभौम राजा आणि शिक्षण, प्रशासन, शेती-उद्योग, न्याय, सामाजिक सुधारणा, दातृत्त्व, राष्ट्रप्रेम या माध्यमातून आपला वेगळा ठसा निर्माण करणारे सयाजीराव गायकवाड एक दूरद्रष्टी राजा होते. हिंदवी स्वराज्याचे तोरण उभारलेल्या छत्रपती शिवरायाबद्दल त्यांना खूप आदर होता. त्यांचे ते आदर्शस्थानच होते. सयाजीराव यांनी शिवरायासंबंधी वेगवेगळ्या प्रसंगी व्यक्त केलेले विचार आज आपण बघणार आहोत. ते म्हणाले,
- शिवाजी महाराजांच्या इतिहासावरून पुष्कळ बोध घेण्यासारखा आहे. त्यांच्या जन्मापूर्वी इथली स्थिती कशी होती, त्यांनी अल्पवयात शिक्षण, आकलनातून समाजहितासाठी सगळ्यांना बरोबर घेऊन काम केले.
- परमेश्वराचे म्हणा किंवा निसर्गाचे म्हणा कायदे हे नित्य व भेदातीत आहे. आपण ते नियम मोडले तर शिक्षा ठरलेलीच. आजचा दुष्काळ त्याचाच भाग आहे.
- निसर्गाचे ज्ञान हे पराक्रमावर साध्य आहे, जे शिवरायांनी ओळखले होते.
- खूप पूर्वी अकबराने शीख, हिंदू आणि मुसलमानांच्या एकीतून देशहीत साधले होते.
- तोच संदेश संत तुकाराम, नरसिंह मेहता, कबीर, तुळशीराम, मीराबाई, यांनी समता-बंधूत्वाचा दिला होता.
- शिवाजी महाराजांनी हिंदू धर्माच्या बाजूने लढा देताना सगळ्यांना बरोबर घेण्याचा समभावतच दाखविला होता.
- शिवाजी महाराजांचे हे धोरण आपल्या राष्ट्रीयत्वाच्या जाणिवेचे द्योतक आहे.
- म्हणून मी शिवकाळास आपल्या राष्ट्रीयतेचा शुभप्रभात काळ समजतो.
- हिंदू या नावाची काही राष्ट्रासारखी चीज आहे, हे शिवकाळातच प्रथम समजले.
- शिवरायांचा आदर्श पुढे चालू ठेवायचा असेल तर,
- आपल्या दोषाबद्दलही थोडे बोलावेच लागेल.
- आपापल्या क्षेत्रातील कर्तव्य पालन आणि स्वार्थ त्याग या उच्च ध्येयाची सांगड घातली पाहिजे.
- अज्ञान आणि पूर्वग्रहांच्या बेड्या तोडून टाकण्याचा प्रयत्न करा.
- अज्ञानासोबत खुळ्या समजूतींना हाकलून लावा.
शिवाजी महाराजांच्या काळातली वाङ्मय निर्मिती
- जेव्हा राष्ट्रीय भावना व एक राष्ट्रीयत्वाची जाणीव जागृत असते, तेव्हाच सर्व कला प्रमाणेच वाङ्मयाचीही भरभराट होते.
- शिवाजी महाराजांच्या अमदानीचा काळ हा महाराष्ट्रीय लोकांचा परमोत्कर्षाचा काळ होता.
- युद्धशास्त्राच्या दृष्टीने अपूर्व अशी करामत मराठ्यांनी दाखवली. राजसत्ता सुसंघटित केली.
- मराठी राजकारणाचा हाच उज्ज्वल काळ होता.
- याच काळात मराठी वाङ्मयाच्या बाह्य किंवा बोध स्वरूपात मोठी प्रगती झाली.
- जातीधर्मांची तटबंदी पाडण्याचे काम संत साहित्याने याच काळात केले.
- ‘श्री छत्रपती शिवरायांचे विचार आकुंचित नव्हते.’
- ‘त्यांनी सर्व जाती धर्मांच्या लोकांच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले. त्याप्रमाणे आपण सर्व देश बांधवांच्या कल्याणाकरिता प्रयत्न करावयास हवे. ते सर्व आपलेच बंधू आहेत.’
- ‘सर्व मनुष्यमात्र एकच आहेत. सर्वांवर दया करावी. दुसर्या विषयी विसर पडता कामा नये.’
- ‘निरनिराळ्या जाती या देशाच्या शरिराचे अवयवच आहेत.’
- ‘देशाची स्थिती सुधारायची असल्यास येथील सर्व लोकांची स्थिती सुधारली पाहिजे.’
- शिवाजी महाराजांच्या वेळेस एकाच जातीने, परिस्थिती घडवून आणली नव्हती.
- शिवरायांनी मराठे, ब्राह्मण, शिंपी, दर्जी, न्हावी, महार, चांभार वगैरे सर्व जातींच्या मदतीने स्वराज्याची पायाभरणी केली.
- सर्व जातींच्या मदतीने समाजाचा उत्कर्ष साधता येतो.
बडोदे येथे श्री छत्रपती शिवरायांचा पुतळा अनावरण प्रसंगी महाराजांचे विचार
- शिवाजी महाराज हे एक महाराष्ट्रीय देशभक्त होते.
- ते खडकाळ कंगाल देशात जन्मले. कणखर वृत्ती आणि डामडोल न दाखविणार्या मराठ्यांचे वंशज, झाडांच्या मुळांचा आणि मराठ्यांचा जन्मभूमीशी दृढसंबंध असतो.
- मराठ्यांना शिवप्रभूसारखा देशभक्त व कुशल सेनानायक पुढारी लाभला.
- त्यांनी प्रतिकूल परिस्थितीशी टक्कर देवून मराठ्यांचे संघटित राष्ट्र निर्माण केले.
- सर्वधर्म जातींच्या खंबीर मावळ्यांच्या मदतीने हिंदवी स्वराज्याचा झेंडा रोविला.
- राजा खाजगी आयुष्यात धुतल्या तांदळा सारखा शुद्ध राहतो. हे शिवरायांनी केले.
- शिवराय जाज्ज्वल धर्म निष्ठ असूनही तितकेच परधर्म सहिष्णू आणि प्रजावत्सल होते.
- लढाय्यातून थोडी फुरसत मिळाली की प्रजाहीत आणि राज्य व्यवस्था सुयंत्रीत करायचे.
- समकालिन सत्ताधिकारी व अनुयायी वर्गापेक्षा शिवाजी महाराज कितीतरी पटीने श्रेष्ठ होते.
- इतके असूनही दीर्घकाळ टिकेल असे स्वराज्य मंदिर ते बांधू शकले नाहीत.
- मराठी सम्राज्याचा पाया त्यांनी भक्कम घातला; पण त्यांच्या पहिल्या शाहू महाराजांनी (1707-1749) यांनी राज्य इमारत उभारली.
- पण हे साम्राज्य दोनशे वर्षे टिकू शकले नाही, हाही इतिहास आहेच.
- साम्राज्य न टिकण्याचे कारण, आपसातील भांडणं, दुही, शत्रू पक्षास मदत करणे
- तरीही शिवाजी महाराज तत्कालिन नवयुगाचे व लोकप्रवृत्तीचे प्रतिनिधी होते.
- हिंदूस्थानातील त्या काळातील एक युगप्रवर्तक राजा होते, हा इतिहास आहे.
- पुणे येथील रा. गंगाराम भाऊ म्हस्के यांच्या सूचनेवरून मी मराठे लोकांकरिता पुण्यात शिष्यवृत्या (1885 ते 1939 ) दिल्या.
- त्यावेळी प्रथम आम्हास उच्चशिक्षण घेण्यासाठी मराठा विद्यार्थी मिळेनात. त्यामुळे खालच्या प्रतीच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्या देवू लागले.
- पुढे उच्च शिक्षण घेण्यासाठी थोडे विद्यार्थी मिळू लागले.
- आपल्यातील मुले या करिता पुढे आले पाहिजे.
- कोणतीही नवीन गोष्टीची सुरुवात केली की लोक प्रथम टीका करतात. पण परिणाम चांगला झाला असे नजरेत आले की न्यायी माणसे चांगले म्हणू लागतात.
- आपला समाज संपत्तीने व बुद्धीने हीन झालेला आहे. समाजास शिक्षण घेण्यासाठी पैसा पाहिजे. मी मदत करेनच; आपणही गावातल्या मंडळींनी प्राथमिक शाळा काढाव्यात.
- मी सव्वा लाख रुपये देवून मराठा फंडाची सुरुवात करीत आहे. यातून शिष्यवृत्या सुरू करता येतील.
- हिंदुस्थानास जर उर्जितकाळ यावयाचा असेल तर तो शिक्षणामुळेच होऊ शकेल. त्याकरिता मी बडोदे राज्यात सक्तीचे मोफत शिक्षण सुरू केले आहे.
- प्रत्येक क्षेत्रात अडचणी येतातच. त्यातूनच मार्ग काढला पाहिजे.
- आपण शारिरीक व मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे.
- सुशिक्षित लोकांची शारीरिक शक्ती बरीच कमी असते.
- एका सामान्य मराठ्याने एका संबंध राष्ट्राचा भाग्यविधाता व्हावे. तत्कालिन सत्ताधिशांचा विरोध असताना आपल्या दुर्बळ, असंघटित लोकांना सुसंघटित राष्ट्राच्या पंगतीला बसविण्याचे, असामान्य कार्य छत्रपती शिवरायांनी केले.
- आज शिवचरित्राची शिकवण काय घ्यायची?
- दुर्बळांना एकत्र करा. समविचारींना सोबत घ्या. केवळ पोटार्थी लोकांना चाकरीस ठेवावे. त्या सर्वांना देशभक्ती आणि देशप्रेमाने प्रेरित करावे. आपल्या शक्तिचा उपयोग आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी करावा.
- आजही आपापल्या क्षेत्रात पराक्रम करायला खूप संधी आहे.
शिवरायांचा गमिनीकावा महाराजा सयाजीरावांनी अंगिकारला
- राज गोपालचारी, स्वतंत्र भारताचे गर्व्हनर जनरल म्हणाले, हिंदुस्थानात दोन खरे राजे झाले. ते आहेत छत्रपती शिवराय आणि सयाजीराव गायकवाड.
- शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचे तोरण उभारले, तर सयाजीराव आधुनिक भारताचे शिल्पकार ठरले.
- एक शेतकर्याचा मुलगा ते आयुष्यभर जनकल्याणातच आपला मोक्ष शोधणारा हा राजा. त्याने हिमतीने आणि शिवरायांच्या गमिनीकाव्याने ब्रिटिश सत्तेशी संघर्ष केला. ब्रिटिश सत्तेने या राजाला अडचणीत आणण्यासाठी जंगजंग पछाडले; शिवरायाचा गमिनीकावा त्यांच्या अंगी असल्याने, ब्रिटिश सत्ता हतबल झाली.
*****

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...