महाराजा
सयाजीराव यांनी १८८१ ला राज्यकारभार हाती घेतल्यापासून पुढे ५८ वर्षांच्या
कारकिर्दीत जे अफाट काम उभे केले त्याला आधुनिक भारताच्या इतिहासात तोड
नाही. धर्मसुधारणेपासून ते स्वातंत्र्य चळवळीपर्यंत ब्रिटीश भारतातील
सार्वजनिक जीवनातील असे एकही क्षेत्र नव्हते जिथे महाराजांचा वावर नव्हता.
महत्वाचे म्हणजे हा वावर अत्यंत रचनात्मक आणि प्रागतिकसुद्धा होता.
अविश्वसनीय स्वरूपाचे हे यश महाराजांनी स्वत: आंतरराष्ट्रीय विद्याव्यासंग,
विश्व पर्यटन, वैयक्तिक आणि राजकीय जीवनात ज्ञानाला सर्वाधिक प्रतिष्ठा
देण्याची भूमिका, आपल्या राज्यालाच नव्हे तर राष्ट्राला जगातील प्रगत
देशांच्या रांगेत वरच्या स्थानावर प्रस्थापित करण्याचा ध्यास याचा परिपाक
होता.
महाराजांच्या
५८ वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल २८ वर्षे महाराज परदेशात राहून
राज्यकारभार करत होते. हे वास्तव विचारात घेतले तर शिवरायांनी गुणी आणि
ज्ञानी लोकांची एक फौज उभा करून स्वराज्याचे स्वप्न सुराज्यासह साकारले.
शिवरायांप्रमाणे सयाजीरावांनी आपल्या प्रशासनाच्या सर्वच विभागात
प्रामाणिक, ज्ञानी, प्रचंड कष्टाळू आणि प्राणाची आहुती देण्याची तयारी
असणारे खासेराव जाधव यांच्यासारखे अधिकारी निर्माण केले. प्रसंगी
भारताबरोबर जगभरातून विविध क्षेत्रातील अव्वल लोक बडोदा प्रशासनात आणले,
त्यांना पूर्ण अधिकार दिले, त्यांचे न आवडणारे सल्ले ऐकले आणि अंमलात आणले.
त्यामुळेच महाराज परदेशात राहूनसुद्धा या अव्वल दर्जाच्या
प्रशासनयंत्रणेच्या जोरावर उत्तम राज्यकारभार करू शकले.
सत्यशोधक
धामणस्कर, खासेराव जाधव, वासुदेव लिंगोजी बिर्जे, दामोदर सावळाराम यंदे,
नानासाहेब शिंदे, आर. एस. माने-पाटील, योगी अरविंद, एफ.ए.एच. इलियट,
रोमेशचंद्र दत्त, मणिभाई देसाई, लक्ष्मण वैद्य, काझी शहाबुद्दीन, जयसिंगराव
आंग्रे, पेस्तनजी दोराबजी, आप्पासाहेब मोहिते, टेकचंद, मि. सेडन, सत्यव्रत
मुखर्जी, अमेरिकन अर्थतज्ञ व्हाईटनेक, अमेरिकन ग्रंथालय तज्ञ बॉर्डन,
कलाभवन उभे करणारे टी. के. गज्जर, केम्ब्रिज स्कॉलर व तुलनाकार ए.जे.
विजेरी, जागतिक कीर्तीचे बौद्ध पंडित बिनोयतोष भट्टाचार्य ही काही उदाहरणे
यासंदर्भात सांगता येतील. रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई हेसुद्धा वरील
प्रभावळीतील एक महत्वाचे नाव आहे.
गोविंद सखाराम सरदेसाई ते रियासतकार सरदेसाई
सयाजीरावांनी
आपल्या कारकिर्दीत मराठी भाषा आणि साहित्य याला दिलेले योगदान त्यांच्या
इतर कामाप्रमाणेच अतुलनीय होते. महाराजांनी १८०० हून अधिक मराठी ग्रंथांचे
प्रकाशन केले. या कामासाठी सयाजीरावांनी केलेला खर्च कोटीत भरेल.
महाराजांच्या या कामातून मराठी साहित्याला २०० हून अधिक लेखक मिळाले.
त्यातील अनेकजण महाराजांच्या प्रयत्नाने किंवा प्रेरणेने लेखक झाले होते.
कृष्णराव अर्जुन केळूसकर गुरुजींना उपनिषदांच्या भाषांतराचे काम देवून
महाराजांनी त्यांनाही लिहिते केले. उपनिषदांच्या मूळ संस्कृत ग्रंथांआधारे
मराठीत अनुवाद करणारे केळूसकर हे पहिले ब्राह्मणेतर होते. गोविंद सखाराम
सरदेसाई ते रियासतकार सरदेसाई हा सरदेसाईंचा प्रवास १८८९ ते १९२५ या
सरदेसाईंच्या सयाजीरावांच्या ३७ वर्षाच्या सेवेचा परिपाक आहे. हा कालखंड
महाराजांच्या वैयक्तिक जीवनाबरोबर बडोद्याच्या सामाजिक जीवनातील
क्रांतिकारक कालखंड होता. कारण या कालखंडात आदर्श राज्याचे सयाजीरावांचे
स्वप्न संपूर्ण सत्यात उतरले होते. महाराजांचे कौटुंबिक जीवन, विद्या
व्यासंग, धर्म सुधारणांसह वेदोक्त प्रकरण, महाराजांच्या सर्व मुलांचे
शिक्षण, महाराजांच्या निर्णयाविरुद्ध जाऊन त्यांची कन्या इंदिराराजे यांनी
केलेला मराठा-आदिवासी हा क्रांतिकारक विवाह यासारख्या ऐतिहासिक घटनांमध्ये
सरदेसाईंची भूमिका अत्यंत महत्वाची होती.
सरदेसाईंच्या
बडोद्यातील नोकरीची सुरुवात महाराजांचे रीडर म्हणून झाली. महाराजांचे
रोजचे टपाल व वर्तमानपत्र पाहून ती त्यांच्या सवडीप्रमाणे वाचून दाखवणे,
खाजगी पत्रांची उत्तरे देणे, महाराज पुस्तके वाचीत त्यातील कठीण शब्द काढून
टिपणे करणे यासाठी दिवसातील दोन-तीन तास सरदेसाईंना महाराजांकडे काम असे.
महाराजांचे धोरण असे होते की राजवाड्यातील किंवा संस्थानच्या प्रशासनातील
प्रत्येकाने भरपूर काम केले पाहिजे. त्यातूनच सरदेसाईंच्या रिकाम्या वेळेचा
सदुपयोग करण्याचा मार्ग सयाजीरावांनी कसा शोधून काढला हे सरदेसाईंच्या
शब्दात सांगायचे झाल्यास,“...बाकीचा माझा वेळ रिकामा जातो हें तत्काळ
महाराजांच्या नजरेस आलें. मॅकिआव्हेलीचें ‘प्रिन्स’ व सीलीचें ‘एक्स्पान्शन
ऑफ् इंग्लंड’ हीं पुस्तकें त्यांनीं वाचलीं मराठीत त्या वेळीं ह्या नवीन
पाश्चात्य विचारांचीं पुस्तकें नव्हतीं हें जाणून त्यांनीं मला त्या
पुस्तकांचे मराठी भाषांतर करण्याचें काम दिलें.”(सरदेसाई, माझी
संसारयात्रा, १९५६, ९५) सरदेसाईंनी हे काम केले तेव्हा ते या क्षेत्रात
पुर्णपणे नवखे होते.
परंतु
महाराजांनी दिलेले काम म्हणजे करावेच लागेल अशी परिस्थिती असल्याने
पहिल्या वर्षी ‘प्रिन्स’ चे भाषांतर ‘राजधर्म’, पुढील दोन वर्षात सीलीच्या
‘एक्स्पॅन्शन ऑफ् इंग्लंड’चे ‘इंग्लंड देशाचा विस्तार’ अशी दोन पुस्तके
महाराजांच्या खर्चाने प्रकाशित झाली आणि ‘इतिहासकार’ सरदेसाईंचा उदय झाला.
पुढे महाराजांबरोबर अमेरिकेत गेले असता सीली या मुळ लेखकाला भेटण्याची संधी
त्यांना मिळाली. त्यासंदर्भात सरदेसाई म्हणतात, “सीलीचें पुस्तक मी त्या
प्रोफेसरांस केंब्रिज येथें स्वत: भेटून नजर केलें. ह्याला मी नशीब
म्हणतो.” (सरदेसाई, माझी संसारयात्रा, १९५६, ९६) सरदेसाईंच्या जीवनातील
सयाजीराव नावाचा ‘टर्निंग पॉइंट’ किती महत्वाचा होता हे या घटनेवरून लक्षात
येते. याच कालखंडात सरदेसाईंचे वास्तव्य राजवाड्यात असल्यामुळे महाराजांचे
प्रचंड मोठे खासगी ग्रंथालय सरदेसाईंच्या ताब्यात असल्यासारखे होते.
महाराजा सयाजीराव हे ग्रंथप्रेमी राज्यकर्ते होते. त्यांचे खासगी ग्रंथालय
सर्व प्रमुख ज्ञानशाखांच्या जागतिक दर्जाच्या ग्रंथांनी समृद्ध होते. धर्म,
इतिहास, तत्वज्ञान, साहित्य आणि संस्कृती यासंदर्भातील सर्वोत्तम ग्रंथ या
संग्रहात होते. विविध विषयावरील ६५ शब्दकोश, १५ विश्वकोश, जागतिक लौकिक
असणाऱ्या २६ ग्रंथमालांतील ग्रंथ यांचा यामध्ये समावेश होतो. जवळजवळ ५०
अभ्यास विषयांशी संबंधित ग्रंथ येथे होते. १९१० मध्ये हे सर्व ग्रंथ
प्रजेला मोफत वाचता यावेत म्हणून बडोद्याच्या मध्यवर्ती ग्रंथालयाची
निर्मिती करण्यात आली. हे सर्व ग्रंथ आजही तेथे उपलब्ध आहेत.
लोकशाहीची
सर्वात उच्च पातळी म्हणजे ज्ञानाची लोकशाही होय. सयाजीरावांनी हे सर्व
ग्रंथ प्रजेला भेट देवून त्यांच्यातील लोकशाहीवादी राजाचे दर्शन घडविले.
१९१० मध्ये सयाजीरावांच्या खासगी ग्रंथालयातील ग्रंथसंख्या २० हजार इतकी
होती. त्या काळात भारतात एवढा वैयक्तिक ग्रंथसंग्रह अपवादात्मक असेल.
तुलनेसाठी डॉ. रा. गो. भांडारकर यांचे उदाहरण पुरेसे बोलके आहे. १९१६ ला
त्यांच्या नावाने पुण्यात स्थापन झालेल्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेला
त्यांनी स्वतःचा ३ हजार ग्रंथांचा संग्रह भेट दिला होता.
भांडारकरांसारख्या जागतिक कीर्तीच्या संशोधकाच्या ग्रंथसंग्रहाशी जेव्हा
आपण सयाजीरावांसारख्या राजाच्या ग्रंथसंग्रहाची तुलना करतो त्यावेळी
सरदेसाईंच्या पुढील विधानाची महती पटते. यासंदर्भात सरदेसाई म्हणतात,
“हिंदुस्थानच्या इतिहासावरील बहुधा कोणतेही महत्वाचे हे पुस्तक माझ्या
वाचनातून सुटले नाही.” (सरदेसाई, माझी संसारयात्रा, १९५६, ६६) सरदेसाईंचा
विद्याव्यासंग सयाजीरावांच्या सहवासातच कसा विकसित झाला हे यातून स्पष्ट
व्हावे.
वैचारिक परिवर्तन
सयाजीरावांच्या
सेवेत येण्याअगोदरचे सरदेसाई धार्मिक अंधश्रद्धा बाळगणारे होते. परंतु
महाराजांच्या या ग्रंथालयातील ग्रंथांच्या वाचनाने त्यांच्यातील
विज्ञानवादी अभ्यासक घडला. यासंदर्भात सरदेसाई लिहितात, “अशीं चिकित्सक व
बौद्धिक विचारांची पुस्तकें वाचल्यावर माझी पूर्वीची धार्मिक अंधश्रद्धा
नाहींशी होऊन मी एक प्रकारचा निरीश्वरवादी, विचारास पटेल तें आचरणांत
आणणारा स्वतंत्र विचारी बनलों. उपास तापास, भजन पूजन, सोवळें ओवळें हीं
सोंगें सर्व टाकून मी स्वतंत्र विचारानें शास्त्रीय शोधांचें ग्रहण करीत
आलों आहें. घरांतही हे सर्व प्रकार मीं मुद्दाम चालू केले. पुष्कळ वेळ
प्रवासांत आगबोट-आगगाडीत मला काढावा लागल्यामुळें आगाऊ वाचनाची तयारी मी
बरोबर ठेवीत असें. आगबोटीवर तर लेखनवाचन हाच मुख्य व्यवसाय. वर आकाश व
खालीं पाणी, भोजन फराळाची चंगळ, अशा त्या बोटीवरच्या प्रवासांत एकान्त
तंद्रीच्या भावनेंत इतिहासविषयक पुष्कळसें लेखन मी केलेलें आठवतें.” (सरदेसाई, माझी संसारयात्रा, १९५६, ६८)
धर्मसुधारणेतील सहभाग
महाराजांच्या
सहवासात सरदेसाईंमधील इतिहास लेखक नकळत घडत गेला. त्यासाठी विविध घटना
कारणीभूत होत्या. १८९५ च्या दरम्यान वेदोक्त प्रकरणाच्या निमित्ताने
धर्मशास्त्रातील सत्य शोधण्याची मोहीम सयाजीरावांनी हाती घेतली होती.
सरदेसाईंना याकामी महाराजांनी जबाबदारी दिली ती सुद्धा त्यांच्यातील लेखक
घडवण्यास उपयुक्त ठरली. यासंदर्भात सरदेसाईं म्हणतात, “महाराजांनी आपल्या
धर्मकृत्यांत क्षत्रियांचे विधि वेदोक्त मंत्रांनीं करण्याचा परिपाठ घातला;
पूर्वींच्या उपाध्ये मंडळींना नोकरींतून कमी करून वेदमंत्रांनी कर्में
करणारे नवीन उपाध्ये नेमिले. ह्या कामीं महाराजांचे हुकूम बरोबर पाळले
जातात कीं नाहीं, पुजा, श्रावणी इत्यादि प्रसंगांत जे मंत्र म्हटले जातात
ते वेदांतले कीं बाहेरचे हें तपासण्याचें काम त्यांनीं मला सांगितलें.
त्यासाठीं सर्व सोळा संस्कारांच्या विधींचें मराठी भाषांतर करून छापण्याचें
काम मीं केलें.” (सरदेसाई, माझी संसारयात्रा, १९५६, ९९-१००) याच काळात २-३
वर्षे सयाजीरावांना संस्कृत शिकविण्याचे कामसुद्धा सरदेसाईंनी केले.
१८९२
च्या युरोप प्रवासात महाराजांनी तार करून सरदेसाईंना युरोपला बोलावले.
विशेष म्हणजे या तारेत महाराजांनी सरदेसाईंना स्पष्ट बजावले होते की या
परदेश प्रवासानंतरच्या प्रायश्चित्ताचा खर्च संस्थानाकडून मिळणार नाही.
पहिल्या दोन परदेश प्रवासानंतर महाराजांना प्रायश्चित्तावर बराच खर्च करावा
लागला होता. त्याची या सूचनेला पार्श्वभूमी होती. पुढे महाराजांनी आदेश
काढून प्रायश्चित्ताची ही पद्धत बंद केली.
क्रांतिकारक विवाहातील यशस्वी मध्यस्थी
राजर्षी
शाहूंनी आपल्या बहिणीचा आंतरजातीय विवाह इंदोरच्या होळकरांशी घडवून आणला.
त्याचबरोबर आंतरजातीय विवाहाची चळवळ उभारण्याचा संकल्प केला. शाहू
महाराजांचे हे काम पुरोगामी महाराष्ट्राच्या इतिहासातील एक दैदिप्यान्मान
पान म्हणून आज ओळखले जाते. परंतु या विवाहाची प्रेरणा बडोद्यातील
सयाजीरावांच्या कन्येने केलेला मराठा-आदिवासी विवाह होता हे महाराष्ट्राला
माहित नाही. हा विवाह इंदिराराजेंनी आपला ठरलेला विवाह मोडून स्वतः ठरवून
केला होता. हा विवाह शाहू महाराजांना राजघराण्यातील आंतरजातीय विवाहासाठी
‘आत्मबळ’ देणारा होता. या विवाहात सरदेसाईंची भूमिका अत्यंत निर्णायक होती.
इंदिराराजेंनी हा विवाह १९१३ मध्ये केला होता. हा भारतातील पहिला
मराठा-आदिवासी विवाह होता. इंदिराराजेंचे आई-वडील ठरल्याप्रमाणे
इंदिराराजेंनी ग्वाल्हेरच्या माधवराव शिंदेंशी विवाह करावा यासाठी कमालीचे
आग्रही होते. तर केवळ पुत्रप्राप्तीसाठी दुसरे लग्न करणाऱ्या माधवरावांशी
विवाह करण्यास इंदिराराजे इच्छुक नव्हत्या. उलट कूचबिहार या आदिवासी
संस्थानच्या महाराजांचे बंधू जितेंद्र नारायण यांच्याशी विवाह करण्याचे
इंदिराराजेंनी ठरवले होते. अशा परिस्थितीत सरदेसाईंनी इंदिराराजेंच्या
वतीने सयाजीराव महाराज आणि महाराणी चिमणाबाई यांच्याजवळ यशस्वी मध्यस्थी
केली होती. ‘विवाह ठरला असल्यामुळे इंदिराराजेंनी माधवरावांशीच लग्न केले
पाहिजे’ असे महाराणींचे मत होते. त्यावेळी मुले आता मोठी झाली असून थोडे
त्यांच्या कलाने घेणे आवश्यक असल्याचे रियासतकारांनी चिमणाबाईंना समजाविले.
इंदिराराजेंवर जास्त जबरदस्ती केल्यास त्या जीवाचे बरे जास्त करून
घेण्याची भीती सरदेसाईंनी व्यक्त केली. याचा महाराणींवर अपेक्षित सकारात्मक
परिणाम घडून आला.
तर
कोणालाही सयाजीरावांना भेटावयाचे असल्यास आधी सूचना देण्याचा नियम
महाराजांनी केला होता. प्रशासकीय सोयीसाठी हा नियम योग्य असला तरी
कुटुंबियांसाठी अतिशय अडचणीचा होता. इंदिराराजेंना स्वतःच्या विवाहाविषयी
वडिलांशी चर्चा करण्यात या नियमाचा अडथळा येत होता. अशा परिस्थितीत
स्वतःच्या भावना मांडणारे सविस्तर पत्र वडिलांना लिहिण्याचा सल्ला
सरदेसाईंनी इंदिराराजेंना दिला. तसेच इंदिराराजेंनी लिहिलेले पत्र
सयाजीरावांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था त्यांनी केली. यामुळे
इंदिराराजेंच्या विवाहविषयक भावना सयाजीरावांपर्यंत पोहोचणे शक्य झाले. या
पत्रानंतरच सयाजीरावांनी इंदिराराजेंच्या इच्छेप्रमाणे त्यांचा विवाह करून
देण्याची ग्वाही आपल्या मुलीला दिली. रियासतकारांनी काढलेल्या पत्ररूपी
तोडग्याचा हा परिणाम होता.
रियासतींचा जन्म
सयाजीरावांना
इतिहास ग्रंथातील मजकूर वाचून दाखविणे आणि राजपुत्रांना शिकवणे या
त्यांच्या मुख्य कामासाठी ते लेखी टिपणे काढीत. याच टिपणांनी पुढे
रियासतींना जन्म दिला. त्यातील पहिला खंड ‘मुस्लिम रियासत’ या नावाने १८९८
मध्ये बडोद्यातून प्रकाशित झाला. यानंतर इतिहास हे त्यांचे जीवनध्येय झाले.
पुढे मराठी रियासत, ब्रिटिश रियासत यांच्या आवृत्या १९३५ पर्यंत निघाल्या.
१९२७ मध्ये त्यांनी शिवाजी महाराजांच्या त्रिशत सांवत्सरिक उत्सवाच्या
निमित्ताने ‘Shivaji Souvenir’ हा ग्रंथ संपादित केला. परमानंदच्या अनुपुराणाचे संपादन सरदेसाईंनी केले. ते ‘गायकवाड ओरिएंटल सिरिज’ मध्ये प्रकाशित झाले.
थोडक्यात
रियासतींचे पहिले ८ खंड हे सरदेसाईंचे प्रमुख काम म्हणून सांगता येईल.
ज्यावेळी मराठी इतिहासामध्ये वस्तुनिष्ठ ग्रंथ निर्माण झाले नव्हते अशा
काळात मराठीत आपला इतिहास लिहिण्याचे काम महाराजांच्या सहवासामुळे आणि
महाराजांनी दिलेल्या जबाबदारीमुळे नकळतपणे सरदेसाईंकडून झाले. यासंदर्भात
सरदेसाई म्हणतात, “स. १९०० सालीं मराठ्यांचा इतिहास किती तुटपुंजा होता आणि
आज त्याला भरीव रूप कसें आलें आहे हा विचार माझ्या निरनिराळ्या
आवृत्त्यांतून नजरेस आला म्हणजे ह्या महनीय कामांत माझाही थोडा बहुत हातभार
लागला ह्याबद्दल मला कृतकृत्यता वाटते.” (सरदेसाई, माझी संसारयात्रा,
१९५६, १३९)
महाराजा
सयाजीराव हे कागदपत्रांच्या दस्ताऐवजीकरणाबाबत अत्यंत दक्ष असत. प्रत्येक
बाबीची नोंद ठेवणे आणि त्या नोंदींचे कागद पद्धतशीरपणे जपून ठेवणे हे ते
अगदी सुरुवातीपासून करत आले. भारतातील इतर कोणत्याही संस्थानिकाच्या
कामकाजाचे दस्ताऐवजीकरण सयाजीरावांएवढे काटेकोरपणे नसेल. उदाहरण द्यायचे
झाले तर १८८६ ला महाराजांनी त्यांच्या राजवाड्यातील खासगी मंदिरातील
वार्षिक धार्मिक विधींची माहिती देणारा ‘ऐनेराजेमहल’ हा ग्रंथ छापून घेतला.
१८९२ मध्ये राजवाड्यातील धार्मिक विधींच्या खर्चाचे १००० पानांचे तपशीलवार
बजेट महाराजांनी छापून घेतले होते. या पार्श्वभूमीवर महाराजांनी आपल्या
कारकिर्दीतील आपला पत्रव्यवहार, भाषणे इ. सुद्धा छापून घेतले होते.
सयाजीरावांच्या चरित्रासाठीच्या साधनांचे संकलन
महाराजांनी
नेमलेल्या शेकडो समित्यांचे अहवाल, स्वतःच्या २६ परदेश प्रवासांचे अहवाल,
शिष्यवृत्तीवर परदेशी गेलेल्या विद्यार्थ्यांचे अहवाल इ. दस्ताऐवज म्हणजे
इतिहासाची प्राथमिक साधनेच आहेत. याच पद्धतीने त्यांच्या कारकिर्दीची
परिपूर्ण माहिती देणारे चरित्र त्यांच्या साक्षीनेच प्रकाशित व्हावे ही
महाराजांची स्वाभाविक इच्छा होती. यासाठी सरदेसाईंएवढा उत्तम लेखक दुसरा
कोण असू शकतो? कारण एकतर सरदेसाईंनी इतिहासलेखनाच्या क्षेत्रात केलेले काम
महाराजांसमोर होते. दुसरे महत्वाचे कारण म्हणजे अगदी महाराजांच्या
कारकीर्दीच्या सुरुवातीपासून सरदेसाई दीर्घकाळ सयाजीरावांच्या सानिध्यात
होते. महाराजांच्या कारकिर्दीतील महत्वाच्या घटनांचे सरदेसाई साक्षीदार
होते.
या
संदर्भात सरदेसाई लिहितात, “महाराजांना आपलें चरित्र संपूर्ण आपल्या देखत
प्रसिद्ध व्हावें अशी मोठी हाव होती. मीं लेखक व त्यांचा निकटवर्ती सेवक
तेव्हां मला त्यांनी तशी सूचना पुष्कळदां केली. मीं सांगितलें माणसाची खरी
योग्यता त्याच्या पश्चात् अजमावली जाते. मी त्यांचा पगारी नोकर, तोंडावर
त्यांचे गुणावगुण कसे लिहूं शकणार! तथापि चरित्राचीं सर्व साधनें पत्रे,
हुकूम, फोटोग्राफ, भाषणें, प्रासंगिक घडामोडी, बनाव हें सर्व साहित्य जमवून
एकत्र ठेवणें अवश्य होतें. मुलांचे व्यवहार, प्रवास, विवाहादि समारंभ
ह्यांचे बनलेले कागद ठिकठिकाणीं अव्यवस्थित होते ते सर्व एकत्र करून नकोत
ते फाडून बाकीचे सांभाळून विल्हेवारीनें निगेंत ठेवणें हें काम महत्त्वाचें
होतें, तें मी सुचविलें, त्यांना पटलें आणि लगेच चरित्रसंग्रह नांवाची
स्वतंत्र शाखा काढून माझी त्यांनीं त्याकरितां विशेष नेमणूक केली. हाताखाली
दोन कारकून नेमले. स. १९१६ च्या डिसेंबरपासून तीन वर्षे मी ह्या स्वतंत्र
कामावर राबलों. (१) महाराजांनीं लिहिलेलीं समस्त खासगी पत्रें जुन्या
बारनिशा वगैरेंतून काढून त्यांच्या वीस प्रती छापल्या. (२) महाराजांनीं
सर्व भाषणें जमवून तीं प्रसिद्ध केलीं. (३) समस्त राजपुत्रांचे कागद,
पत्रें, हिशेब, नेमणुका इत्यादि सर्व जमवून प्रत्येकाचे स्वतंत्र संच
व्यवस्थित लावून ठेविले. (४) कौटुंबिक व इतर फोटोग्राफ्स सर्व एकत्र जमवून
कालक्रमानें व्यवस्थित केले. दरसालच्या वाढदिवसास असे महाराजांचे व
कुटुंब-दरबारांचे फोटोग्राफ्स घेत ते त्यांच्या चरित्राचें एक मोठें साधन
बनलें. (५) खासगी खात्याचे व राज्याच्या व्यवहारांचे महाराजांनी वेळोवेळी
दिलेले हुजूर हुकूम सर्व एकत्र संच जमवून निराळे ठेविले.
ह्याशिवाय
महाराजांच्या कारभारांतील मुख्य घडामोडी, त्यांच्या स्वाऱ्या, त्यांचे
प्रवास, त्यांनीं केलेल्या मुख्य सुधारणा, त्यांचे दरबार व समारंभ, मुलांचे
जन्मोत्सव व विवाहादि प्रसंग, खुद्द महाराजांचें दत्तविधान व शिक्षण,
त्यांच्या आवडीनिवडी, त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांनीं बांधलेल्या
इमारती अशा अनेक विषयांचें वर्णन करणारे लहान मोठे लेख मीं मराठींत तयार
करून त्यांच्याही वीस प्रती छापून ठेवल्या. वीस प्रतीच छापण्याचें कारण
ह्या लेखांचा उपयोग पुढील चरित्र-लेखकास व्हावा इतकाच होता. त्यांची
पत्रेंदेखील सर्वच एकदम प्रसिद्ध करण्याजोगीं नव्हतीं. फक्त जुन्या बारनिशा
फाटत चालल्या, त्यांतून हीं पत्रें वाचून मी एका संग्रहांत आणलीं. सारांश,
शिवाजीसारख्या राष्ट्रपुरुषाचें चरित्र लिहिण्यांत ज्या अडचणी आज
इतिहासकारास भासतात, तशा सयाजीरावांसंबंधानें पुढें भासूं नयेत अशी सर्व
सिद्धता मीं परिपूर्ण करून ठेविली. हें सर्व काम मीं चोख केलें तें
त्यांसही पसंत पडलें. त्यावरून त्यांची कल्पना तीव्र बनली कीं मींच त्यांचे
समग्र चरित्र लिहावें. मीं स्पष्ट कळविलें, मीं पगारखाऊ सेवक,
चरित्रनायकाचे गुणदोष स्पष्ट सांगण्यास असमर्थ; व्यक्तीच्या पश्चात् चरित्र
लिहिलें जावें हा शहाण्यांचा रिवाज आहे.” (सरदेसाई, माझी संसारयात्रा,
१९५६, १०७-०८)
महाराजांची नाराजी
१९२५
मध्ये सरदेसाईंनी बडोदा संस्थानची नोकरी सोडून पुण्याला स्थायिक होण्याचा
निर्णय घेतला. याला वरील चरित्रलेखनाची पार्श्वभूमीसुद्धा आहे. कारण
सरदेसाईंनी चरित्र लेखनास नकार दिल्यामुळे महाराज त्यांच्यावर नाराज झाले
होते. बडोद्यात ३७ वर्षे राहिल्यानंतर सरदेसाईंना नोकरीतून मुक्त व्हावे
असे वाटत होते. त्यात या नाराजीने भर घातली. महाराजांना मात्र सरदेसाई हवे
होते. कारण महाराजांच्या नातवंडांच्या शिक्षणाची जबाबदारी सरदेसाईंकडे
देण्याचा महाराजांचा विचार होता. महाराजांच्या मनाविरुद्ध सरदेसाई नोकरी
सोडून जात असल्यामुळे महाराजांनी त्यांच्या पेन्शनमध्ये ६० टक्के कपात
केली. महाराजांचे एकूण धोरण बघता हा अपवाद म्हणावा लागेल. परंतु नातवांच्या
भविष्याबाबतच्या काळजीपोटी महाराजांकडून हे अपवादात्मक कृत्य घडले असावे.
पुढे
सयाजीरावांचे उत्तराधिकारी आणि नातू प्रतापसिंह महाराज यांच्या राज्यारोहण
सोहळ्याला सरदेसाईंना सन्मानाने बडोद्यात बोलावण्यात आले. सरदेसाई
प्रतापसिंहांचे शिक्षक होते. प्रतापसिहांनी सरदेसाईंची सयाजीरावांनी ६०
टक्के कपात केलेली पेन्शन पूर्ण स्वरुपात सुरु केली. २ मार्च १९४७ रोजी
बडोद्यामध्ये सरदेसाईंच्या इतिहासविषयक कार्याचा गौरव म्हणून त्यांना
मानपत्र आणि साडेतीन हजार रु.ची थैली देण्याचा कार्यक्रम झाला. परंतु हे
पैसे स्वतः न घेता सरदेसाईंनी त्यांचे पुण्याचे चितळे नावाचे मित्र
ऐतिहासिक घराण्यांच्या वंशावळी छापत होते त्या कामाला त्यातील दीड हजार रु.
देण्याची विनंती सत्कार समितीला केली.
पेशवे दप्तराच्या कामाला सयाजीरावांची मदत
सरदेसाई
पुण्यात गेल्यानंतर पुढे कामशेत येथे राहू लागले. १९३३ मध्ये त्यांनी
मुंबई सरकारच्या आर्थिक सहकार्याने पेशवे दफ्तर संपादनाचे काम ४ वर्षे
केले. परंतु शेवटच्या वर्षी मुंबई सरकारने आर्थिक मदत थांबवली. अशा वेळी
जदुनाथ सरकारनी त्यांना सयाजीरावांकडे मदत मागण्याची सूचना केली. महाराजा
नाराज असल्यामुळे ते मदत करतील का अशी शंका सरदेसाईंना होती. परंतु जदुनाथ
सरकारनी आग्रह केल्याने सरदेसाईंनी महाराजांना युरोपात पत्र लिहून ३ हजार
रु.ची मदत मागितली. महाराजांनी तात्काळ बडोद्यात दिवाणांना तार करून
सरदेसाईंना पेशवे दफ्तराच्या कामासाठी ३ हजार रुपये पाठविण्याचा आदेश दिला.
यात सयाजीरावांच्या स्वभावातील उमदेपणा स्पष्ट होतो. सयाजीरावांनी कधीही
कुणाचा द्वेष आणि तिरस्कार केला नाही.
या
घटनेचा तपशील रियासतकार आपल्या ‘श्री. सयाजीराव गायकवाड यांच्या सहवासांत’
या ग्रंथात लिहितात, “१९३३ सालची माझी एक बाबत सांगण्यासारखी आहे. १९२५
पासून मजवर त्यांची इतराजीच होती. मी कामशेतला राहूं लागलों आणि तीन-चार
वर्षे पुण्यास पेशवे दप्तरचें काम केलें. तें करतांना शेवटच्या वर्षी मुंबई
सरकारने आपला खर्च थांबविला त्यायोगें काम अर्धेच अपुरे पडून राहणार हें
विघ्न उपस्थित झालें. जदुनाथ सरकार व मी कमिशनरांना भेटलों. ते म्हणाले,
सरकार आता कांहीं करूं शकत नाहीं. तुम्ही संस्थानिकांकडून वर्गण्या जमवून
पैसा आणला तरच काम पुरे होईल. संस्थानांत तरी ऐपतंवान म्हटले तर शिंदे,
होळकर, गायकवाड हे तिथे प्रमुख. त्यांतहि सयाजीरावच जाणते असल्यामुळे
त्यांनी पहिला पुढाकार घ्यावा अशी सूचना आली. तपास करता कळलें कीं, तूर्त
ते युरोपांत आहेत. मजवर तर त्यांची गैरमर्जी, तेव्हां त्यांजपुढे काम
पोंचावें कसें? जदुनाथ म्हणाले कीं, लिहा तर खरें त्यांना युरोपांत पत्र;
काय जबाब येतो कीं येत नाहीं पाहूं. लगेच मी महाराजांना इंग्रजी पत्र लिहून
राष्ट्रीय इतिहासाच्या या पवित्र कार्यासाठी तीन हजारांची रक्कम मागितली.
आपण तीन हजार दिले तर बाकीचे नऊ हजार मी इतर संस्थानांकडून मिळवितों, पण
पहिली रक्कम आपली पाहिजे. तारेनें जबाब मागितला.
मला
फारशी आशा नव्हतीच, पण पत्र वेळेवर त्यांस पोंचून त्यांनी लगेच दिवाणांस
तारेनें बडोद्यास कळविलें, “सरदेसाई पुण्यास इतिहासाचे कागद छापतात, त्यांस
खरीच खर्चाची अडचण असल्यास तीन हजार त्यांचे हवाली करावे.” दिवाणांनी मला
मुंबईस भेटीस बोलावले आणि त्यांची खात्री पटतांच माझे हातांत तीन हजारांचा
चेक दिला. त्याबरोबर इंदूर, ग्वाल्हेर, धार, सांगली इत्यादि अनेक
सत्ताधीशांकडून नऊ हजार पैदा करून बारा हजारांची रक्कम मुंबई सरकारांत भरली
तेव्हां आणखी वर्षभर काम चालून पेशवे दप्तराचा व्याप एकदांचा समाप्त झाला.
हें काम सिद्धीस जाण्या में मुख्य श्रेय सयाजीरावांस आहे. माझ्यावर
व्यक्तिशः त्यांचा राग असला तरी त्यांची सदसद्विवेकबुद्धि सदैव जागृत
असल्यामुळे माझ्या कामाची त्यांना पारख होती. म्हणूनच एक पत्र गेल्याबरोबर
त्यांनी ताबडतोब तीन हजार रुपये मंजूर केले हा त्यांचा उपकार मी कधी विसरू
शकणार नाही.” (सरदेसाई, श्री. सयाजीराव गायकवाड यांच्या सहवासांत, १९५६,
६७-६८)
सरदेसाईंनी
इतिहासाला दिलेले योगदान विचारात घेता त्यांचे मुख्य योगदान मराठ्यांच्या
इतिहासाला आहे. आज त्यांच्या लेखनात काही त्रुटी दिसतील परंतु मराठ्यांचा
इतिहास अभ्यासताना त्यांची ‘मराठा रियासत’ वगळून पुढे जाता येत नाही.
यासंदर्भात श्री. रा. टिकेकर म्हणतात, “सरदेसायांचे इतिहासकार्य म्हणजे
त्यांच्या रियासती. त्यांचा विस्तार व्यापक, म्हणजे सुमारे हजार वर्षांचा
इतिहास आहे. त्याची विभागणी मुसलमानी, मराठी व ब्रिटिश अशा तीन प्रमुख
रियासतीत झाली असली तरी सरदेसायांचे मुख्य कार्य मराठी रियासतीचे आहे.
मुसलमानी व ब्रिटिश या दोन्हींसाठी प्रत्येकी दोन दोन खंड लागले. पण मराठा
रियासतींसाठी एकंदर आठ खंड लागले.” (टिकेकर, जदुनाथ सरकार आणि रियासतकार
सरदेसाई, १९६१, ८४) टिकेकरांच्या या मतावरून मराठ्यांच्या इतिहासलेखनाला
सरदेसाईंच्या रूपाने बडोद्याचे असणारे योगदान किती मोठे होते याचा पुरावा
मिळतो.
सरदेसाईंनी
रियासत मालेचा पाया १८९८ मध्ये घातला. परंतु रियासतकारांच्या मराठा
रियासतीत कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याची शाखा राहिली होती याबाबत
रियासतकार सरदेसाईंना खंत होती. रियासतकारांचे हे अपूर्ण राहिलेले काम
स.मा.गर्गे यांनी पूर्ण करून मराठा इतिहास लेखनाचा सरदेसाईंनी सुरू केलेला
प्रवास पूर्ण केला. थोडक्यात इतर सर्व क्षेत्रांप्रमाणे मराठ्यांच्या
इतिहास लेखनातील पायाभूत काम इतिहास प्रेमी सयाजीरावांच्या प्रेरणेने सुरू
झाले. यासंदर्भात सरदेसाईंनी दिलेली प्रांजळ कबुली सयाजीरावांच्या आश्रयाचे
महत्व विशद करते. सरदेसाई म्हणतात, “...पण पाण्यांत पडल्याशिवाय पोहतां
येत नाहीं या न्यायानें माझा धीर चेपून आतां तर मी रियासतकार म्हणून
मिरवितों त्याचें श्रेय मुख्यत: त्या महाराजांस आहे.” (सरदेसाई, श्री.
सयाजीराव गायकवाड यांच्या सहवासांत, १९५६, ८-९) या कामाचा समारोप
कोल्हापुरात झाला हा एक सुखद योगायोग आहे.
सयाजीरावांच्या बदलत्या मानसिकतेचे साक्षीदार
सरदेसाईंनी
महाराजांच्या सहवासात आपल्या आयुष्यातला सर्वाधिक काळ घालवला असल्यामुळे
महाराजांच्या उमेदीच्या काळापासून ते महाराजांच्या मृत्यूपर्यंतच्या
कालखंडातील महाराजांच्या सर्व मनोवस्था त्यांनी जवळून अनुभवल्या होत्या.
पहिली पत्नी, दोन मुली आणि चार तरुण मुलांचा झालेला अकाली मृत्यू यासारखे
भावनिक आघात, नातेवाईकांचा असणारा नियमित त्रास, केलेले अफाट काम, ब्रिटीश
सत्तेशी २५ वर्षांचा जीवघेणा संघर्ष या सगळ्याचा परिणाम म्हणून बिघडलेले
शारीरिक आरोग्य यामुळे त्यांच्या व्यक्तीमत्वात झालेले टोकाचे बदल
सरदेसाईंनी अनुभवले होते.
त्या
संदर्भात ‘सयाजीराव गायकवाड यांच्या सहवासात’ या पुस्तकात सरदेसाई
महाराजांचे मनोविश्व कसे बदलत गेले याचे अतिशय बारकाव्याने निरीक्षण
नोंदवताना म्हणतात, “तीस-चाळीस वर्षें सयाजीरावांच्या निकट सहवासांत
वागलेले माझ्यासारखे माणूस फार थोडे होते. पहिली त्यांची वृत्ति अत्यंत
आनंदी, खेळाडू, आरडाओरडा करून सर्वांशीं समरस होण्याची होती. आट्यापाट्या
खेळतांना मीं त्यांचा गोंगाट पाहिला आहे. हंसायला लागले कीं दूरपर्यंत
सर्वांना आश्चर्य वाटे कीं, काय प्रकार आहे. १९०८ सालीं वडील चिरंजीव
फत्तेसिंहराव वारले. पुढें दिल्लीचें प्रकरण गाजलें. तेव्हांपासून
महाराजांचें हंसणें-खिदळणें सर्व बंद पडून उत्तरोत्तर ते एकलकोंडे बनत
गेले. एकदां दिवाळींत टोपल्या भरून लाडू आणले. त्यांनींच चेंडूसारखी
मारामार पांचपन्नास लोकांशी चाललेली मीं पाहिली आहे. उसाचे गाडे आले,
त्यांजवर महाराजांनी गर्दी करून तोंडानेंच ऊस खाण्याचा सपाटा इतरांबरोबर
चालविला. असें मनमुराद इतरांशी मिसळलेले मीं त्यांना पाहिलें आहे. याचे उलट
पुढें पुढें ते सर्वथा एकटे एकटे असे राहूं लागले कीं, जेवतांना वाढणारा
सुद्धां जवळ नसावा. एका टेबलावर भोजन ठेवून नोकरानें घंटा वाजवावी व आपण
बाजूला जावें. घंटा वाजली तरच आंत यावें. इतका त्यांना माणसाचा संसर्ग
नकोसा झाला. पाऊणशें ऐशीं वर्षांच्या त्यांच्या हयातीचीं शेवटचीं
पंचवीस-तीस वर्षे ते असे एकटे वागूं लागले. काम, वाचन, उद्योग सर्व चालत,
पण जवळ दुसरा माणूस नको. मी बडोद्यास असतां रात्रीं दोन वाजतां माझे दारात
मोटार आली कीं महाराज बोलावतात. शहराबाहेर पांच मैल मकरपुरा येथें ते राहत
होते. मी गेलों. दाराशीं ए. डी. सी. बसले होते. ते म्हणाले, “वर जा, महाराज
तुम्हांस बोलावतात. मला तुमचेबरोबर जाण्याचा हुकुम नाहीं.” मी त्यांचा माग
काढीत जवळ गेलों. पहातांच मला म्हणाले, ‘झोप येईना म्हणून कांहीं गप्पा
मारण्यासाठी तुम्हांस बोलावलें.’ तास दीड तास कांहीं तरी वाचून बोलून
झाल्यावर त्यांनीं मला रजा दिली. पहिली तीस व शेवटचीं तीस इतक्या वर्षांतला
त्यांच्या वृत्तींतील एवढा पालट सहसा इतरत्र आढळत नाहीं.” (सरदेसाई,
सयाजीरावांच्या सहवासात, १९५६, ६६-६७)
सयाजीरावांचे द्रष्टे मूल्यमापन
सयाजीराव
आणि सरदेसाई यांचा ऋणानुबंध विचारात घेता सयाजीरावांच्या भारतीय
इतिहासातील स्थानाविषयी सरदेसाईंसारख्या इतिहासकाराचे मत महत्वाचे ठरते.
सरदेसाई भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि प्रबोधन चळवळ या दोन्ही चळवळींचे
पितामह सयाजीराव कसे आहेत हे स्पष्ट करताना म्हणतात, “सयाजीराव महाराज एक
अलौकिक व्यक्ति भारतभूमीला भूषण आणणारी निर्माण झाली हें लौकिकांत आतां फार
थोड्यांना माहीत आहे. इंग्रजी अमदानीच्या शंभर वर्षांत उत्कर्षाची पहिली
स्फूर्ति राष्ट्राला दाखविणारी ही विभूति असून त्यांच्याशीं मी जीवनाचे
पहिले धडे शिकूं शकलों हें मी आपलें मोठें भाग्य समजतों. त्यांचीं कित्येक
चरित्रें प्रसिद्ध झालीं; पण तीं अनेक कारणांनीं आज तरी लुप्त बनलीं आहेत.
काँग्रेस व महात्मा गांधी यांच्या उद्योगानें भारतभूमीचें विमोचन
परचक्रांतून झालें असें आपण समजतों. पण प्रत्यक्ष राज्यांत सुधारणा करून
उन्नतीचे खरे मार्ग प्रथम कृतींत आणून इंग्रज राजकर्त्यांनाहि
सयाजीरावांनीं दभवून सोडलें. इंग्रजांचा रोष झालेल्या अनेक राष्ट्रसेवकांचा
त्यांनीं धैर्यानें बचाव केला. सक्तीनें शिक्षण व ग्रंथालयाची योजना
हिंदुस्थानांत प्रथम सयाजीरावांनीं निर्माण केली. त १९३९ मध्यें निवर्तले
आणि पुढें थोड्याच अवधीनंतर इंग्रजसत्ता संपून आमचीं देशी संस्थानें इतकीं
विलीन झाली कीं, आज दोनशें वर्षें इंग्रजांप्रमाणेंच या आपल्या स्वदेशी
राजांचा अंमल भारतभूमीवर होता हा इतिहासहि आतां लुप्त झाला आहे.
माझें
तर मुख्य आयुष्य सयाजीरावांच्या निकट परिचयांत गेल्यामुळें माझ्या आठवणी
अद्यापि ताज्या आहेत. आणि त्या गोड व स्मरणीयहि आहेत. त्या निमित्तानेंच
मीं हें माझें पहिलें आख्यान आज मुद्दाम येथें सांगितलें आहे कीं, त्यावरून
वाचकांस पुढील विषयाची कल्पना यावी. भलेपण मिळवायला प्राप्त परिस्थितींत
प्रत्येक व्यक्तीला राष्ट्रांत भरपूर अवकाश आहे. म्हणूनच सयाजीराव बारा
वर्षांचे असतां अकल्पित कारणांनीं बडोदानरेश बनले. खेडवळ जीवनांतून
नियतीनें त्यांना उचलून एकदम भाग्याच्या परमोच्च शिखरावर आणून बसविलें. आणि
पुढील साठ वर्षांचे दीर्घ कारभारांत त्यांनी आपले सर्वांगीण कर्तृत्व
प्रकट करून जागतिक कीर्ति मिळविली. शिवाजीचा अवतार निराळ्या प्रकारचा झाला.
तशाच प्रकारचा भिन्न मार्ग हुडकण्याचें भाग्य सयाजीरावांस लाभलें.”
(सरदेसाई, सयाजीरावांच्या सहवासात, १९५६, ९-१०) रियासतकारांसारख्या
मराठ्यांच्या ‘आद्य’ इतिहासकाराने सयाजीरावांची तुलना थेट शिवरायांशी करणे
ही बाब सयाजीराव हे शिवरायांचे ‘खरे’ वैचारिक वारसदार असल्याची साक्ष
देणारी आहे.
सयाजीरावांनी
भारताला गुलाम करणाऱ्या महाबलाढ्य ब्रिटीश सत्तेला थेट आव्हान देण्याचे
धैर्य दाखवले. सयाजीरावांच्या सामाजिक सुधारणा ब्रिटीश राज्यकर्त्यांना सहन
होत नव्हत्या. स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख नेत्यांना सयाजीराव पाठबळ देत
असतानाही सयाजीरावांना राजद्रोही ठरवण्याइतपत पुरावे ते मागे ठेवत
नसल्यामुळे जगावर राज्य करणाऱ्या महाशक्तीचा अहंकार दुखवत होता. परिणामी
ज्याप्रमाणे मोगल सैनिकांच्या घोड्यांना संताजी-धनाजी पाण्यात दिसत होते
त्याप्रमाण ब्रिटीश साम्राज्यरुपी घोड्याला सयाजीराव छळत होते.
या
संदर्भात सरदेसाईंनी नोंदवलेले निरीक्षण पुरेसे बोलके आहे. सरदेसाई
म्हणतात, “ ब्रिटिशांशी लढणाऱ्या क्रांतिकारकांना मदत करून त्यांचा
सयाजीरावांनी धैर्यानं बचाव केला, ही हिंदुस्थानातील अनोखी गोष्ट आहे. ...
सयाजीराव महाराजांनी त्यांच्या शाहत्तर वर्षांच्या आपल्या हयातीत एवढे
पराक्रम करून दाखविले की, इंग्रजी सत्तेच्या एका शतकात असे दुसरे राजे झाले
नाही. ... बलिष्ठ सार्वभौम सत्तेशी सदैव झगडून आपले कायदेशीर हक्क
शिकस्तीने सयाजीरावांनी सांभाळले. समस्त भारतात राजद्रोहाची व खून
जाळपोळीची स्फोटक लाट उसळली, तीत अनेकांचा बचाव महाराजांनी धैर्यानं केला
की जेणकरून हिंदुस्थानास नवीन स्फूर्ती मिळाली.”
सयाजीरावांबद्दल
सरदेसाईंनी व्यक्त केलेल्या या भावना पुरेशा बोलक्या आहेत.
सयाजीरावांसंदर्भात उपलब्ध सर्व मराठी साहित्य विचारात घेता सरदेसाईंच्या
भूमिकेशी सुसंगत अशा अनेक तपशिलांचे संदर्भ यामध्ये उपलब्ध आहेत. परंतु
दुर्दैवाने आधुनिक महाराष्ट्रावरील इतिहासलेखनात महाराष्ट्राच्या
आधुनिकीकरणाचा पाया घालण्याबरोबरच त्याचा ‘पुरोगामी’ कळससुद्धा ज्या
सयाजीरावांनी बसवला त्यांचा उल्लेखसुद्धा न होणे गंभीर आहे. एकूणच आधुनिक
महाराष्ट्राच्या इतिहासलेखनावर त्यातून असंख्य प्रश्न उपस्थित होतात.
‘ब्राह्मणांनी
आमचा इतिहास टाळला’ असे म्हणत इतिहास लेखन करणाऱ्यांना तर तोंड दाखवायलाही
जागा राहणार नाही असा हा इतिहास आता पुढे येत आहे. दुर्दैवाने बहुजनांच्या
बाजूने इतिहास लेखन करणाऱ्या संशोधक-लेखकांची विश्वासार्हता यामध्ये
संपणार आहे. हे आपल्या परंपरेला कमीपणा आणणारे आहे. परंतु परंपरा ज्यांच्या
खांद्यावर आहे त्यांची दृष्टी जर कोती, आत्मकेंद्री आणि ढोंगी असेल तर
असेच होणार. आता मात्र इतिहास लिहित-सांगत असताना जबाबदारीने आणि
प्रामाणिकपणे सांगण्याचा बोध यातून घ्यायला हवा.
संदर्भ
१) सरदेसाई, गोविंद, सखाराम, “श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाड यांचा खाजगी व कौटुंबिक वृत्तान्त” बडोदा, १९२५.
२) सरदेसाई, गोविंद, सखाराम, “माझी संसारयात्रा”, मुंबई, के. भि. ढवळे, १९५६.
३) सरदेसाई, गोविंद, सखाराम, “श्री. सयाजीराव गायकवाड यांच्या सहवासांत”, पुणे, एस. जगन्नाथ आणि कंपनी, १९५६.
४) भांड, बाबा, ‘‘लोकपाळ राजा सयाजीराव’’ औरंगाबाद, साकेत प्रकाशन, २०१३.
५) टिकेकर, श्रीपाद, “जदुनाथ सरकार आणि रियासतकार सरदेसाई”, मुंबई, पॉप्युलर प्रकाशन, १९६१.
६) कीर, धनंजय संपा., “गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळूसकर आत्मचरित्र व चरित्र, औरंगाबाद, साकेत प्रकाशन, २०१४ (साकेत आवृत्ती).
७) इतिवृत्त, “मराठी साहित्य संमेलन, बडोदें, अधिवेशन १९वें”, बडोदे, सहविचारी सभा, १९३५.
८) आपटे, दाजी, नागेश, ‘‘श्री महाराजा सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांचे चरित्र, खंड-१ ते ३’’, बडोदे, प्रकाशक लेखक खुद्द, १९३६.
९)
पाटील, दिनेश “महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या सुधारणा भाग ७ – धर्म आणि
सामाजिक”, मुंबई, उच्च शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, २०२०.
(लेखक
महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन व प्रशिक्षण संस्था, औरंगाबादचे विश्वस्थ
आणि महाराष्ट्र शासनाच्या महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन
समितीचे सदस्य आहेत. यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय वारणानगर येथे
समाजशास्त्र विभागप्रमुख म्हणून कार्यरत.)
No comments:
Post a Comment