महाराष्ट्रातील प्राचीन अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले एक स्थळ. हे औरंगाबाद जिल्ह्यातील तालुक्याचे एक ठिकाण आहे. स्थानिक दंतकथा या नगराला कृष्णशत्रू भौमासुराची राजधानी मानते. दंतकथेनुसार याचे नाव भोगवर्धन किंवा भगदनाथ या राजाच्या नावाचा अपभ्रंश होऊन झाले असावे. लोकसंख्या ९,६८० (१९८१). ते खेळणा नदीकाठी सिल्लोड-जाफराबाद रस्त्यावर सिल्लोडच्या पूर्वेस सु. २० किमी.वर वसले आहे. हे ठिकाण उज्जयिनी (उज्जैन) ते पैठण या व्यापारी मार्गावर दण्डक अरण्यात वसले होते, असा प्राचीन वाङ्मयात तसेच मार्कण्डेयादी पुराणांत व अनेक उत्कीर्ण लेखांत याचा उल्लेख आढळतो. प्राचीन काळी हे जनपद होते आणि नंतर त्याला विषयाचा (प्रांताचा) दर्जा प्राप्त झाला. येथील रहिवाशांनी सांची व भारहूत येथील स्तूपांच्या बांधणीस दान दिल्याचे उल्लेख तेथील अभिलेखांत आढळतात. माहिष्मतीचा कलचुरी राजा शंकरगण याने भोगवर्धन विषयातील एका गावातील जमीन ब्राह्मणाला दान दिल्याचा उल्लेख ५९७ च्या लेखात आहे. इसवी सनाच्या आठव्या–नवव्या शतकांच्या सुमारास खेळणा नदीच्या काठांवर कोरलेल्या सात खोल्या आणि सभागृहयुक्त एक शैव लेणे इथे आहे; तथापि त्यानंतरचा या गावाचा इतिहास ज्ञात नाही. उत्तर पेशावाईत हे गाव हैदराबादच्या निजामाच्या अखत्यारीत आले. भोकरदनच्या सभोवती प्राचीन तटबंदीचे अवशेष असून जुन्या किल्ल्यात तहसील कार्यालय आहे. गावात जुनी आठ लहान मंदिरे असून त्यांपैकी खंडोबाचे मंदिर मोठे आहे. तेथे प्रतिवर्षी यात्रा भरते. याशिवाय नदीकाठी एक महानुभव पंथाचे प्राचीन मंदिर आहे. दर शनिवारी येथे बाजार भरतो. भोकरदन कांबळी व खंडसरी साखरेसाठी मराठवाड्यात प्रसिद्ध आहे.
शां. भा. देव आणि र. शं. गुप्ते यांच्या मार्गदर्शनाखाली येथे १९७३-७४ साली उत्खनन करण्यात आले. त्यांत पूर्वंसातवाहन, उत्तरसातवाहन आणि सातवाहनोत्तरकालीन भिन्न वस्त्यांचे बहुविध अवशेष आढळले. उत्तरसातवाहन काळातील भारताचा रोमन संस्कृतीशी असलेल्या व्यापारामुळे भोकरदनची भरभराट झाली. या समृद्धीमुळे कलाकौशल्याचे हे केंद्र बनले. उत्खननात कारागिरांची अनेक घरे आढळली असून ती गुळगुळीत जमिनीची व कबेलूंनी शाकारलेल्या छतांची आहेत. पाटा-वरवंटा, जाते, पळ्या, थाळ्या, डाव, झाकण्या, मडकी इ. हरतऱ्हेच्या नित्योपयोगी वस्तू येथील घरांत मिळाल्या, या घरांतील सांडपाणी वाहून जाण्याचीही सोय चांगली होती. उत्खननांत घरांच्या अवशेषांशिवाय काही नाणी, मृण्मूर्ती आणि दागिने सापडले. नाण्यांचे प्रकार आणि आकार भिन्न असून नाण्यांमध्ये काही आहत नाणी तसेच सातवाहन-क्षत्रप-कार्दमक आणि गुप्त राजे यांची तांब्याची, मिश्रधातूंची आणि सोन्याचा मुलामा दिलेली नाणी आढळली. येथे मिळालेल्या अनेक प्रकारच्या व आकारांच्या मण्यांत अफीक, प्रवाळ, रक्ताश्म, इंद्रनील, स्फटिक इ. मूल्यवान खडे आहेत. उत्खननात उपलब्ध झालेल्या बांगड्या हस्तिदंती, शंखाच्या आणि विशेषत्वे तांब्याच्या आहेत.
येथील अवशेषांत सु. सातशे पक्वमृदा वस्तू मिळाल्या. त्यांपैकी मानवप्राणी व पशू यांची शिल्पे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. इतर वस्तूंत कर्णभूषणे, पूजेची अर्चनाकुंडे व घरगुती वापरातील हस्तिदंती कंगवे, कज्जलशलाका (काजळाच्या डब्या), सोंगट्या, थाळ्या इत्यादींचा समावेश होतो. कर्णभूषणे डाळिंबीच्या फुलांसारखी कलाकुसर केलेली असून भारतात अन्यत्र उपलब्ध न झालेले किन्नरी-पात्र, शिवाय एका झाकणावरील तीन स्त्रियांच्या उर्ध्वांगाची मूठ इ. अवशेष लक्षणीय आहेत.
येथील मानवी शिल्पांतील दोन स्त्री-प्रतिमांपैकी एक इटलीमधील पाँपेई या ठिकाणी १९३०-३१ साली झालेल्या उत्खननात मिळालेल्या स्त्री-प्रतिमेसदृश आहे. दोन दासींच्या मधोमध उभी असलेली ही स्त्री सडपातळ व बांधेसूद आहे. हिचा काळ इ. स. पू. पहिले ते इसवी सनाचे पहिले शतक असावा. सातवाहन काळात भोकरदन हे हस्तिदंती कलावस्तूंचे केंद्र असावे आणि येथील वस्तूंची व्यापारानिमित्त देवाण-घेवाण होत असावी, असे अनुमान केले जाते. त्यामुळे पाँपेई येथे उपलब्ध झालेली स्त्री-प्रतिमा मूळची याच भागातली असावी, असेही म्हणता येईल. यांशिवाय येथील उत्खननात मातृकादेवींच्या दोन शिलामूर्ती मिळाल्या. त्या दोन्ही मूर्ती विशीर्ष असून योनिस्तनयुक्त उत्तानपाद मूर्ती आहेत. त्यांपैकी एका मूर्तीच्या दोन्ही बाजूंस कमळे कोरलेली आहेत. तज्ञांच्या मते त्या इ. स. पाचव्या-सहाव्या शतकांत खोदल्या असाव्यात.
सातवाहन सत्तेच्या अवनतीनंतर पैठणप्रमाणेच या गावाचा रोमशी व्यापार मंदावला असावा आणि हळूहळू त्याचे ऐश्वर्य आणि महत्त्व कमी झाले असावे. पुढे मध्ययुगात या नगरीला थोडे महत्त्व लाभले होते.
मराठी विश्वकोश
No comments:
Post a Comment