विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 27 July 2023

बांदल नाईक घराण्याचा ऐतिहासिक प्रथम नवीन शिलालेख

 







बांदल नाईक घराण्याचा ऐतिहासिक प्रथम नवीन शिलालेख
(बांदल शौर्य दिन 12 जुलै 1660)
फिरंगाई माता मंदिर शिलालेख –घारगाव ,श्रीगोंदा
हा शिलालेख अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील मौजे घारगाव या गावी गावापासून २ किमी अंतरावर असलेल्या गावाचे ग्रामदैवत श्री फिरंगाई माता मंदिराच्या गाभाऱ्या वरील मुख्य प्रवेशद्वाराच्या मंडपावर दर्शनी भागावर उजव्या बाजूला गणेश पट्टीच्या वर कोरलेला आहे. शिलालेख उठाव स्वरूपाचा असून ४ ओळीचा शुद्ध देवनागरी लिपीत मराठी भाषेत आहे .शिलालेखाची अक्षरे ठळक असून दोन्ही बाजूला उभे दंड चरणरेघा कोरलेल्या आहेत .सुशोभिकरणाच्या नावाखाली शिलालेख वरती पूर्ण पणे सिमेंट लावून फरशी खाली झाकला गेला होता. त्यामुळे अक्षरे तुटून त्यांची खूप झीज झाली आहे .त्यामुळे अक्षरे सुस्पष्ट पणे सहज वाचता येत नाहीत.
.गावाचे नाव : मु पो घारगाव ,ता. श्रीगोंदा , जि. अहमदनगर
शिलालेखाचे वाचन :
१.॥ श्री ॥
२.॥ रा. गोविंदराव बांदल पा. घा ॥
३. ॥ रगाव शके १६९२ विकृती ना ॥
४. ॥ म संवत्सरे अश्वींन शुद्ध ७ ॥
जी.पी.एस. :-१८ .७४ ”१६ ’१४ ,७४ .६१’’५९.’ ६१
शिलालेखाचे स्थान :- मंदिराच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस वरती कोरलेला आहे.
अक्षरपद्धती : उठाव स्वरूपाचा लेख आहे.
भाषा : शुद्ध मराठी देवनागरी
प्रयोजन : मंदिर बांधल्याची / बांधकामाची स्मृती जपणे.
मिती / वर्ष : - शके १६९२ विकृती संवत्सर अश्विन वद्य७,
काळ वर्ष : अठरावे शतक = २६ सप्टेंबर १७७० बुधवार
कारकीर्द :-थोरले माधवराव पेशवे
व्यक्तिनाम:-राजेश्री गोविंदराव बांदल पाटील
ग्रामनाम :- घारगाव
शिलालेखाचे संशोधन /वाचक : ,श्री अनिल किसन दुधाने,
प्रकाशक :
संक्षेप :- रा –राजेश्री पा .पाटील.
संदर्भ:- IE VI- ३४३
अर्थ :- श्री फिरंगाई माता मंदिराचे बांधकाम शालिवाहन शकाच्या १६९२ व्या वर्षी मौजे घारगाव येथील मोकदम पाटील राजेश्री गोविंदराव बांदल पाटील यांनी विकृतीनाम संवत्सरातील अश्विन शुद्ध ७ म्हणजेच घट स्थापनेच्या सातव्या माळेला म्हणजेच बुधवार २७ सप्टेंबर १७७० या दिवशी मंदिर संपूर्ण बांधून पूर्ण झाले .किवा त्याचा जिर्णोधार पूर्ण झाला .
शिलालेखाचे महत्व :- उत्तर मराठेशाहीच्या कारकिर्दीत येथे राजेश्री मल्हारराव सुत गोविंदराव बांदल यांना परगणा कर्डे मौजे घारगाव येथे काही जमीन दिल्याचे सन १७६४ चे एक पत्र उपलब्द आहे .मौजे घारगाव येथे राजेश्री गोविंदराव बांदल यांनी १७७० मध्ये आपले ग्रामदैवत फिरंगाई माता मंदिर बांधले .एखादया ठिकाणी मंदिर बांधणे हे सामाजिक ,आर्थिक व धार्मिक दृष्ट्या अतिशय मोठे कार्य असते .या वरून बांदल घराणे धार्मिक व सामाजिक वृत्तीचे होते .हे सिद्ध होते .शिलालेखात आलेली अश्विन शुद्ध ७ म्हणजेच घट स्थापनेची सातवी माळ होय या दिवशी त्या माळेला बरोबर फिरंगाई देवीची यात्रा असते . आपल्या ग्राम देवतेची स्थापना करून तेथे मंदिर बांधून ते कार्य शिलालेख स्वरुपात कोरून कायमस्वरूपी जनतेसमोर ठेवणे हेच या शिलालेखाचे महत्व आहे.
बांदल घराणे :
भूपा हिर्दसो भ्धुतः प्रभुत भिजन प्रियाः !
मज्जैत्र यत्राः कुवर्णा: प्रोल्लो सन्ति पदे पदे !!
अर्थ - हिरडस मावळचे अतिशय लोक प्रिय राजे बांदल माझी विजय यात्रा यशस्वी करत , पावलो पावली सैन्याचा आणि माझा जोम वाढवीत आहेत
असे वर्णन खुद्द छत्रपती संभाजी महाराजांनी केले त्या बांदल घराण्यातील रण मर्दांच्या नेत्रदीपक बहादुरी वर खुश होऊन केली आहे .
राजश्री कृष्णाजीराजे नाईक बांदल -
कृष्णाजी बांदल यांच्या कडे पिडीजात ५३ गाव कुलवतन हिरडस मावळ (आळंद ते उंबर्डे ) ची जहागिरी होती .बांदल हे मुळचे बुंदेलखंडातील राजपूत घराणे महाराष्ट्रात येउन त्यांनी बाणांचे दल काढले म्हणून आडनाव बांदल झाले अशी आख्यायिका प्रचलित आहे . तरीसुद्धा तलवारीच्या बळावर त्यांनी १२ मावळात सर्व वतनदारांवर वचक ठेवला होता . ते आदिलशाहीला निजामशाहीला मुळीच जुमानत नव्हते .सन १६२५ मध्ये त्यांनी मलिक अंबर ला हरवले आणि केंजळ गड जिंकून घेतला निजामशाही वर चालून गेलेला शिवपूर्व काळातील एकमेव जहागीरदार असे वर्णन कानंद मावळ मधील बांदल घराण्याने केली आहे .
बांदालांच्या नेत्रदीपक कामगिरीचा दिवस म्हणजे १३ जुले १६६० ची गजापुरच्या खिंडीतील ६ प्रहर बांदलाच्या या ३०० रणबहाद्धारणी खिंडीत गनीम थोपवले . तब्बल ४००० फौजे विरुद्ध बाजी बांदल यांनी ३०० शिबंदी सह खिंडीत आणि वर जसवन्तरावाचा वेढा फोडायला आणि त्या च्या विरुद्ध झुंजायला रायाजी बांदल ,तसेच शिवरायांना गडावर सुखरूप पोहोचवायची कामगिरी बांदलाच्या पिता पुत्रांच्या खांद्यावार आणि तमाम हिरडस मावळच्या शिबंदी वर होती.यात प्रामुख्याने बाजी प्रभू ,फुलजी प्रभू ,शंभू सिंह जाधवराव ,रायाजी बांदल आणि तमाम बांदल सेना कामी आली .त्याचा प्रत्यय म्हणजे या त्यागाच्या पराक्रमावर बांद्लाना दरबाराच्या पाहिला पात्याचा मान मिळाला होता .
राजेश्री गोविंदराव बांदल पाटील यांची ऐतिहासिक माहिती .
ताकीदपत्र : थोरले माधवराव पेशवे यांचे कुलकर्णी व रयत मौजे घारगाव यास : "रा. संताजी राजेभोसले यांना बांदलानी जमीन संदर्भात लिहून दिलेल्या करारनाम्याप्रमाणे वर्तावे." या अर्थी. इ. सन. १७६४. चे पत्र
मौजे घारगाव परगणा कर्डे सरकार या ठिकाणची मोकादमी रायाजी यमाजी विपदास याची होती त्यातली त्यांनी निम्मी मोकादमी ही जिंतीकर राजेश्री राजे भोसले यांच्या वडिलांना दिली आणि राहिलेली निमी मोकादमी त्यांनी राजेश्री मल्हारजी बिन गोविंदराव बांदल यास दिली .त्यातली काही निमीतिल निम्मी पाटीलकी विपदास यांच्याकडे राहिली .कि जी आज पर्यत त्यांच्याकडे चालत राहिली .त्या मोकदामिचे साडे दहा रुपये व सवा पाच रुपये या प्रमाणे २० बिघे जमीन (म्हणजेच १० एकर जमीन )करार करून भोसले व बांद्लाना दिली .आणि त्या जमिनीत विहीर पाडून निम्मे निम्मे पाणी एकमेकांना द्यावे .असा करार केला .
परंतु बांदलानी आपल्या जमिनीत विहीर पाडायचे व निम्मे पाणी द्यायचे कारण काय म्हणून विरोध केला .सदरील मोकादमिचा तिघांचा हा भांडणाचा वाद मल्हारराव भिकाजी रास्ते यांच्याकडे पुण्यास गेला .करारानुसार विहीर पाडण्यासाठी २० बिघे जमीन आनंदाने दिली .आणि त्या जीमिनीत विहीर पाडून निम्मे पाणी द्यावे लागेल असा करार केला असता तुम्ही त्या कराराप्रमाणे वागत नाहीत .म्हणून त्यांना ताकीद करावी
तसे नवीन हुकुम करावा .असा उल्लेख पत्रात केला आहे .
मूळ पत्र :-आशय
ताकीदपत्र : थोरले माधवराव पेशवे यांचे कुलकर्णी व रयत मौजे घारगाव यास : "रा. संताजी राजेभोसले यांना बांदलानी जमीन संदर्भात लिहून दिलेल्या करारनाम्याप्रमाणे वर्तावे." या अर्थी. इ. सन. १७६४. चे पत्र
शिक्क्का –श्री राजाराम नरपती हर्ष निधान माधवराव बल्लाळ मुख्य प्रधान
आज्ञापत्र राजश्री पंतप्रधान ता कुलकर्णी व रयान मौजे घारगाव पो. कर्डे सरकार +++ सु समानीन मया अलफ राजश्री संताजी भोसलेराजे याणी हजूर विदीत केले की मौजे मजकूरची मोकदमी रायाजी यमाजी विपदास याची दरोबस्त त्यापौ निमे त्याणी आपले वडीलास दिल्ही, बाकी निमे राहिली त्या- पो निमे मल्हारजी बिा गोविंदराव बांदल यास दिल्ही. निमेषौ निमे विपदास याजकडे राहिली. ती त्याजकडे चालत आहे. त्यास मोकदमीचे थल साडेदाहा रुके पो सवा पांच रुके विप्रदासानी बांदलास दिल्हे आणि करार केला की; थलात विहीर तुम्ही पाडून निमे पाणी आपल्यास देणे. त्याजवरून बांदलानी विहीर पाहून जमीन अनभऊ लागला, तेव्हा आपल्या बापा जिवाजी या त्यासी केला की; आमच्या थलात विहीर पाडावयास गरज काये, तेव्हा तिघे जण भांडत मल्हारराव भिकाजी रास्ते याजकडे पुण्यास आले. म्हणोन त्रिवगांचे
वर्तमान मनास आणिता चौधाचे विद्यमाने थल आमचे ठरले. त्यास बांदलानी विहीर पाडली यास्तव आपले बापानी आत्मसंतोषे बांदलास वीस बिघे जमीन दिल्ही. त्याणी निये पाणी आपल्यास दयावे या प्रा करार होऊन करारनामा लेहून दिल्हा आसता त्याप्रमाणे वर्तणूक करीत नाही. तरी त्याच ताकीद जाली पाहिजे म्हणून त्याजवरून हे आज्ञापत्र सादर केले आसे. तरी बांदलानी करारनामा लेहून दिल्हा आहे त्यानो त्यास ताकीद करून वर्तचे. नवीन दिकत करुन देणे. जाणिजे, छ २९ जमादिलावल, आज्ञा प्रमाण. लेखन सीमा
@माहिती व संकलन –अनिल दुधाने
सदर कार्यात ..श्री प्रवीण भोसले सर .श्री राजेश इंगळे सर ,श्री चंद्रशेखर कळमकर,सुरेश बांदल श्री सचिन भोसले ,श्री करणसिंह नाईक बांदल यांचे सहकार्य लाभले .
धन्यवाद..पत्रकार सोमेश शिंदे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...