उपलब्धी व स्थळ :-
हा शिलालेख अहमदनगर जिल्ह्यातीलश्रीगोंदा तालुक्यातील मौजे म्हातारपिंपरी गावात भैरवनाथ मंदिराच्या शेजारी असलेल्या उंच छोट्या टेकडीवर असलेल्या समाधी मंदिरावर कोरलेला आहे .समाधी मंदिर बांधकाम सुस्थितीत असून आतमध्ये दोन मुखवटे स्थापित आहेत.शिलालेखाची शिळा दगड वेगळा असून खूप जिंर्ण झाली आहे .शिलालेख कोरीव स्वरूपाचा असून ६ ओळीचा शुद्ध मराठी भाषेत आहे . रंगरंगोटी तसेच वातावरणाचा खूप परिणाम होवून काळाच्या ओघात शिलालेखाची अक्षरे झिजलेली असून पुसट झालेली असून त्यांचा खोलगट पणा मुजून गेला आहे तर शिलालेखाची चोहोबाजूची अक्षरेपूर्ण तुटून गहाळ आहेत तरी छाप घेवून थोड्या प्रयत्नाने शिलालेख वाचन करता येत आहे .
गावाचे नाव : मु.पो म्हातार पिंपरी ता.श्रीगोंदा , जि.अहमदनगर
शिलालेखाचे वाचन :
१. श्री बहिरव नाथ चरणी
२.तत्पर ज दौलतराव वा .पा. ,मुकुटराव व
३.मानाजि राव यांनी जानराव वा
४.बळे .मौजे म्हातारं पिंपरी याचा घु
५.मठ बांधले असे. सके १६९५ विजयी
६.नाम सवतसरे अश्विन वद्य ९
जी.पी.एस. : १८.६१;६५७५९, ७४.६९,५८७११२
शिलालेखाचे स्थान : समाधी मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या वर मध्यभागी कोरलेला आहे
अक्षरपद्धती :-कोरीव स्वरूपाचा लेख आहे
भाषा : शुद्ध मराठी देवनागरी
प्रयोजन : पुर्वांजाची समाधी मंदिर बांधल्याची / बांधकामाची स्मृती जपणे.
मिती / वर्ष : सतरावे शतक - शके १६९५ अश्विन वद्य नवमी विजयी संवत्सर
काळ वर्ष : अठरावे शतक = १० ऑक्टोंबर १७७३ रविवार
कारकीर्द :- नारायण राव पेशवे
व्यक्तिनाम:- दौलतराव वाबळे पाटील ,मुकुटराव वाबळे ,मानाजिराव वाबळे,जानराव वाबळे.
ग्रामनाम :- मौजे म्हातार पिंपरी
शिलालेखाचे वाचक : श्री. अनिल किसन दुधाणे
प्रकाशक :
अर्थ :- शालिवाहन शकाच्या १६९५ व्या वर्षी विजयी नाम संवत्सरात श्री बहिरव नाथ चरणी तत्परज असलेले दौलतराव वाबळे पाटील ,मुकुटराव पाटील व मानाजिराव पाटील यांनी आपले वडील जानराव वाबळे पाटील यांचा अश्विन वद्य ९ म्हणजेच १० ऑक्टोंबर १७७३ रविवार च्या दिवशी मौजे म्हातार पिंपरी येथे घुमठ (समाधी ) मंदिर बांधले.
शिलालेखाचा महत्व :-म्हातार पिंपरी हे गाव कर्डे परगणाच्या जहागीरीतील एक गाव आहे. येथील मोकदम पाटील येमाजी पाटील यांच्या कडे म्हातार पिंपरी गावची पाटीलकी आहे . हे वाबळे मोकदम पाटील भैरवनाथ चरणी तत्पर आहेत .यावरून त्यांचे कुळदैवत हे भैरवनाथ असावे जानराव वाबळे याचा गुमठ (समाधी ) बांधला .म्हणजेच जानराव यांचे तीन पुत्र:- दौलतराव वाबळे पाटील ,मुकुटराव वाबळे ,मानाजिराव वाबळे यांनी आपल्या वडिलांच्या पराक्रमा चा वारसा जपण्याकरिता समाधी बांधली आहे एखाद्या शिलालेखात स्वतच्या घराण्याची वंशावळ देवून आजोबा, वडील, आणि नातू यांचे एकत्र नाव येणे हेच. या शिलालेखाचे महत्व आहे
संक्षेप :- बहिरवनाथ-भैरवनाथ ,वा –वाबळे ,पा –पाटील
राजेश्री जानराव वाबळे यांचे इतिहासातले योगदान आणि उल्लेख -----
. 'जानराव' हे शिंद्यांच्या घोडदळात एक महत्त्वाचे लष्करी अधिकारी म्हणून प्रसिद्धीस आले. पानिपतच्या महासंग्रामात त्यांनी केलेली कामगिरी ही मराठ्यांच्या इतिहासात प्रकर्षाने नोंदविली जाते.
बुराडी घाटावर दत्ताजीराव लढत होते. यशवंतराव जगदाळे पडल्यावर त्यांचे प्रेत काढण्यासाठी दत्ताजी सरसावले आणि त्यांच्या उजव्या बरगडीस गोळी लागली. नजीबने त्यांच्या स्थूल, ठेंगू बांधा आणि कृष्णवर्ण यावरून त्यांना ओळखले. नजीबखान आणि कुतुबशहा यांनी शिर कापले. त्या वेळचे त्यांचे 'बचेंगे तो और भी लढेंगे' हे उद्गार मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले. जानराव बावळ्यांच्या पानिपतावरील कामगिरीमुळे त्यांचे नावही अमर झाले. जानराव यांची समाधी १७७३ ची आहे. हे जानराव नेमके कशामुळे व केव्हा निधन पावले त्याची माहितिची नोंद मात्र इतिहासात मिळत नाही .
१) १० जानेवारी १७६० या दिवशी नजीबखानाचे लोक लहान टप्प्याच्या बंदुका घेऊन निघाले. दुराणी त्यांना मिळाले. हत्तीवर सोडण्याचे लहान जंबुरे त्यांच्याकडे होते. मराठ्यांजवळ भाले व तलवारीच होत्या. बंदुकांचा मारा चुकवत मराठे चिवटपणे लढत होते. जानराव वाबळे ४००० सैन्यानिशी यमुनेच्या पश्चिम तीरावर प्रचंड थंडीच्या कडाक्यात बुराडी घाटाचं रक्षण करीत होते. झाडाझुडपात दडलेले रोहिले अचानक मराठ्यांच्यावर बंदुकांच्या फैरी झाडू लागले. जंबुचाच्या आगीत माणसे भस्मसात होऊ लागली. दत्ताजी आणि जनकोजी, सावाजी, बयाजी शिंदे दीडत सुटले. जनकोजींची पाच हजारांची सेना जरीपटका घेऊन घाटाच्या पूर्वेकडे सरसावली. दत्ताजी वज्रहनुमानासारखे आपल्या 'लालमणी' या घोड्यावरून रणभूमीकडे झेपावले. तोफांचा मारा आणि बंदुकांच्या फैरीपुढे निभाव लागत नव्हता. तलवारी, भाले त्यापुढे हतबल झाले. भरपूर पडझड झाली. प्रेतांचा खच झाला. अशातच जनकोजी जरीपटक्यांचं रक्षण करीत आपली तलवार चालवीत असताना त्यांच्या दंडात गोळी घुसली आणि ते खाली कोसळले. येसाजी भोईटे आणि जानराव वाबळे यांनी ताबडतोब जनकोजींना बाहेर ओढले व घोड्यावर घातले. सगळे सैन्य वाट फुटेल तिकडे पळत सुटले. जनकोजीस शंभर मैलांवरील कोठपुतळी येथे जयपूरच्या हद्दीत आणले.( संदर्भ १७ जाने १७६० )
२)१७ नोव्हेंबर पत्र---- जानराव वाबळे गांगोबा तात्यास लिहतो .पाटील बाबांनी (महादजी शिंदे )नजीब खानास वेढा घातला आहे .खळ्या व गंगा पाठीशी घालून तो बसला आहे ,मागे एकदोनदा बाहेर निघाला त्यास शिकस्त करून गोटात घातला ,तमाम गावे जाळली त्यामुळे नाजीबाचा धीर सुटला.या पत्रावरून जानराव हा किती मोठा व्यक्ती होता हे लक्षात येते . (दत्ताजीचा वध -–पान ३३८ )
३)१३/२/१७६९ नाना स्वामीचे पत्र ---यानुसार राजश्री नरहर बल्लाळ व करांडे यांचा पुत्र मिळून पाच हजार फौज घेवून जळगावी आले तेथे १२००० रुपये खंडणी वसूल करून पुढे मलकापुरी आले . महादाजी शिंदे यांच्याशी एकनिष्ठ असलेले सरदार जानराव वाबळे यांच्याकडील ३०० स्वार जात होते त्यास सामील करून घेवून दरमहा रुपये ४५०० करार केला होता .
४)फेब्रुवारी १७६१ ताकीदपत्र :- साबाजी सिंदे व खानाजी जाधव व जानराव वाबळे याचे नावाची की सरकारचे खजिनियाचा व महालोमाहालचा पैसा खर्च कराल बिगरआज्ञा, तरी तुम्हापासून खुद निसपत भरून घेऊ. दुसरे सरकार पागा व सिंद्याच्या घरू पागा ज्या, वाचले घोडे व हस्ती वगैरे जिनस असेल तो सारा येकत्र करून मारनिले पंताबराबर घेऊन हजुर येणे.
५)२१मे १७६१ पत्र :- राजेश्री जनकोजी सिंदे यांचा शोध सुरजमल जाठ व मल्हारजी होलकर व चिंती- पंत फडणीस दिमत सिंदे याणी फार शोध केला परंतु त्यांचा ठिकाणा कोठे लागला नाही. पूर्वी माहाराज अवंतिके प्रांती होतेत ते समई वर्तमान उडविले होते कीं जनकोजी सिंदे आहेत म्हणून. त्यासी आपण त्यांचे खजिनियाचे शोबास लागले होतेस यास्तव वर्तमान उडविले होते परंतु तें वर्तमान सारे लटकें. सांप्रत साबाजी सिंदे व खानाजी जाधव व जानराव वाबळे यैसे च्यार हजार फऊज पागा सिलेदार दिमत सिंदे हे होलकर याजबराबर आहे. त्यास मल्हारजीबाबानी आश्वासन दिले आहे कि तुमची दोन वर्षाची समाज विशी अवन्तीकेस गेल्यावर देवू .
६)जानराव वाबळे पानिपतावर भाऊसाहेब पेशवे यांच्या संनिध अगदी शेवट पर्यत होता .
वरील सर्व बाबीवरून जानराव वाबळे यांचे पानिपत इतिहासातील महत्व योगदान अधोरेखीत करते .
संदर्भ :-१.महाराष्ट्रातील वाडे व गढी –डॉ .सदाशिव शिवदे
२) मराठी रियासत खंड -४ –सरदेसाई गो स ,
३)भाऊसाहेब बखर ,
© अनिल दुधाणे...
टीप :-सदर कार्यात समाधी कोषकार श्री प्रवीण भोसले सर ,प्रसाद शिंदे ,तसेच श्री राजेश इंगळे सर ,वागस्कर सर यांची मदत व सहकार्य झाले .
धन्यवाद..पत्रकार सोमेश शिंदे ..श्रीगोंदा
No comments:
Post a Comment