इतिहासाने दखल घेतलेली दिवाण मंडळी.
लेखन ::प्रकाश लोणकर
देवाजीपंतांची ओळख करून घेण्याआधी थोड्क्यात त्यांच्या धन्याची म्हणजे जानोजी भोसले ह्यांच्या घराण्याचा परिचय करून घेऊ या.मुधोजी भोसले हे नागपूरकर भोसले घराण्याचे मूळपुरुष मानले जातात.काही ठिकाणी परसोजी यांचा पण मूळ पुरुष म्हणून वंशावळी उल्लेख आढळतो.मुधोजी आणि त्यांचे बंधू रुपाजी यांच्याकडे पुणे जिल्ह्यातील हिंगणी जवळील बेरडी गावाची पाटीलकी होती.त्यामुळे त्यांचे घराणे हिंगणीकर भोसले म्हणून ओळखले जाऊ लागले.मुधोजी आणि रुपाजी दोघे शहाजी राजांचे समकालीन होते.मराठा साम्राज्याचा भारताच्या अतिदूर पूर्व भागात ज्यांनी विस्तार केला ते रघुजी भोसले मुधोजींचे पणतू होय.(मुधोजी-बापुजी-लिंबाजी-रघुजी) शिंदे,होळकर,पवार,गायकवाड,पेशवे,मुरारराव घोरपडे आदिनी जसा मराठी सत्तेचा उत्तर,दक्षिण,पश्चिम भारतात विस्तार केला तद्वतच रघुजी भोसलेंनी मराठी सत्ता पूर्व भारतात पसरवली.प्रारंभी १७३० साली त्यांना वऱ्हाड आणि गोंडवनाची सनद छत्रपती थोरल्या शाहू महाराजांकडून मिळाली होती.१७३५ मध्ये नागपूर प्रांत त्यांच्या अमलाखाली आला.तीन वर्षांनी म्हणजे १७३८ मध्ये छ.शाहू महाराजांनी रघुजींची धडाडी,पराक्रम पाहून त्यांना लखनौ,मुर्शिदाबाद,बंगाल(सध्याचा बांगलादेश त्यावेळच्या अखंड बंगालचा हिस्सा होता.) ओरिसा,बुंदेलखंड ,अलाहाबाद यासारख्या पूर्व भारतातील प्रदेशांची सनद दिली.रघुजीनी,रघुजी कारंडे,भास्करपंत कोल्हटकर, तुळजोराम,शिवाजी टाळकुटे यांसारख्या शूर सरदारांच्या साह्याने पूर्व भारतात मराठ्यांची सत्ता,दबदबा आणि बंगाली लोक म्हणतात तशी दहशत निर्माण केली.
रघुजी भोसले तीन वर्षे पोटदुखीने हैराण होऊन १४ फेब्रुवारी १७५५ रोजी मृत्यू पावले.ज्येष्ठ पुत्र जानोजीस सेनासाहेब सुभा हे पद व नागपूर दौलतीचा कारभार आणि साबाजी,मुधोजी,बिम्बाजी ह्या अन्य पुत्रांना कमी जास्त प्रमाणात मुलुख द्यावेत अशी व्यवस्था त्यांनी मृत्युपुर्वीच करून ठेवली होती.पण हि व्यवस्था मुधोजी यांस मान्य नव्हती.वाद तत्कालीन पेशवे नानासाहेबांकडे आला आणि इथपासून नागपूरकर भोसल्यांच्या कारभारात देवाजीपंत उर्फ दिवाकरपंत पुरुषोत्तम चोरघडे ह्या मराठेशाहीतील साडेतीन शहाण्यांपैकी दुसऱ्या पूर्ण शहाण्याचा प्रवेश झाला! यांचे पूर्ण नांव दिवाकर पुरुषोत्तम उर्फ देवाजीपंत चोरघडे असून त्यांचा जन्म इ.स.१७०१ च्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर ह्या गावी झाला.प्रारंभी ते चिमूर येथील कल्याणजी नाईक सावकारांकडे शागीर्द होते.तसेच तेथील बालाजी मंदिरात पूजा अर्चा,भजन,गायन करीत असत.पुढे ते रघुजींच्या कोन्हेरराम उमरेडकर कोल्हटकर ह्या सरदारांकडे कारकुनी काम करू लागले.काही जणांच्या म्हणण्यानुसार ते त्र्यंबकजी भोसले यांच्याकडे कारकून होते.फारशी भाषेवरील प्रभुत्व तसेच लेखी,वाचिक मराठीवर चांगली हुकुमत असल्याने अल्पावधीतच देवाजी पंतानी सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे आकर्षून घेतले.कोन्हेरराम कोल्हटकर हे त्यावेळी रघुजींचे दिवाण होते.देवाजीपंतांची हुशारी आणि कल्पकता कोल्हटकरांच्या ध्यानात आल्यावर त्यांनी रघुजीना देवाजीपंतांस दरबारच्या सेवेत रुजू करून घेण्याची विनंती केली.रघुजी आणि कोल्हटकर या दोन्ही घराण्यांचे पूर्वापार जवळिकीचे संबंध असल्याने रघुजीनी देवाजीपंताना नागपूर दरबारच्या सेवेत रुजू करून घेतले.
आणि देवाजीपंतानी बुद्धी आणि कष्टाच्या जोरावर यथावकाश नागपूरकर भोसल्यानच्या कारभारात मानाचे,महत्वाचे स्थान मिळविले.इ.स.१७५७ मध्ये सेनासाहेब सुभा जानोजी भोसले होते.मुख्य दिवाण कोन्हेरराम कोल्हटकर आजारी पडल्याने ते भूषवित असलेले मुख्य दिवाण पद जानोजीनी देवाजी पंतांस दिले.
देवाजी पंतानी आपल्या धन्याच्या उत्कर्षासाठी त्या काळात कार्यरत असलेल्या मराठा राज्यसंघ मंडळाच्या(मराम) (Maratha Confederacy)विरुद्ध कारस्थाने रचण्या,करण्यातच धन्यता मानली.सदोदित मराम विरोधी कारवाया करत राहिल्याने त्यांचा बहुतेक काळ तेव्हाचे मराम प्रमुख थोरले माधवराव पेशवे यांच्या बरोबर संघर्ष करण्यात गेला.हि देवाजी पंतांची उणे बाजू म्हणावी लागेल.देवाजी पंतांचा क्रियाशील (active)सहभाग असलेल्या त्या काळातील काही प्रमुख राजकीय घडामोडी खालीलप्रमाणे होत्या.
१-रघुजीनी आपल्या पश्चात आपल्या राज्याच्या कारभारासंबंधातील केलेली व्यवस्था मुधोजीना मान्य नव्हती.आपण वयाने जरी जानोजीन्पेक्षा लहान असलो तरी रघुजींच्या थोरल्या राणीचे पुत्र असल्याने आपणच रघुजींचे वारस आहोत असे मुधोजींचे म्हणणे होते.हा तिढा सोडविण्यासाठी नागपूर दरबारातील प्रभावशाली मंडळीनी पेशव्यांकडे बाबुराव कोन्हेर,त्रिंबकजी राजे भोसले,देवाजीपंत यांसारख्या वरिष्ठ मुत्सद्यांचे शिष्टमंडळ पाठविले होते.नानासाहेब पेशव्यांनी रघुजीनी निश्चित केलेली योजनाच कायम ठेवण्याचा निर्णय दिला. तरीही वाद कायम राहिल्याने इ.स.१७५७ मध्ये पेशव्यांनी दोघा भावात दौलतीची विभागणी करून दिली. देवाजी पंत जानोजींचे दिवाण राहिले.विभागणीने वाद मिटले नाहीत.इ.स.१७६१ पर्यंत देवाजी पंतानी भोसले दरबारात आपली पकड मजबूत केली.पुढे त्यांनी पुणे दरबार बरोबर संघर्ष करण्यास सुरुवात केली.बंगाल सुभ्यातून वसूल होत असलेली चौथाई,सरदेशमुखीची रक्कम पुणे दरबारला पाठविणे त्यांनी काही काळ बंद केले,नंतर त्यात मुद्दाम विलंब लावण्यास सुरुवात केली.नानासाहेब पेशव्यांच्या मृत्यू नंतर थोरले माधवराव पेशवे झाले.( २०-०७-१७६१)पेशवेपदावरून पेशव्यांच्या घरातच वाद सुरु झाले.निजाम आणि जानोजी भोसले आपापल्या दिवाणानच्या सल्ल्या प्रमाणे माधवरावांच्या विरुद्ध आणि राघोबा दादांच्या बाजूने एक झाले.
२- माधवराव पेशवे आणि छत्रपती रामराजे यांना पदभ्रष्ट करण्यासाठी निजामाशी हातमिळवणी: निजाम आणि जानोजी भोसले यांनी आपल्या दिवाणांच्या मसलतीनुसार सातारकर छत्रपती रामराजांच्या जागी जानोजी भोसले आणि माधवराव पेशव्यांच्या जागी राघोबा दादांना पेशवा म्हणून नियुक्त करून मराठेशाहीच्या कारभारावर हुकुमत मिळवायची असा डाव रचला होता.पण थोरल्या माधवरावांनी राक्षसभुवन इथे निजामाचा सणसणीत पराभव केल्याने हे कारस्थान तडीस गेले नाही.माधवराव हयात असेपर्यंत तरी निजाम पुन्हा कधी मराठ्यांच्या वाटेस गेला नाही उलट जानोजीच निजामाची साथ सोडून काही काळ पुन्हा मराठ्यांच्या बाजूला आले. ३माधवराव पेशव्यान बरोबर संघर्ष: राक्षसभुवनच्या युद्धापर्यंत देवाजी पंतांची पुणे दरबार बरोबर संघर्ष करत राहण्याची वृत्ती (nuisance value) थोरल्या माधवरावांच्या चांगलीच ध्यानात आली होती.त्यांच्या शिकवणुकीने नागपूरकर भोसले मराठा मंडळात फितुरीचे बीज पेरत असल्याचे तसेच निजाम,हैदर,होळकर,शिंदे,जयपूरकर माधवसिंग यांची पेश्व्यान्विरुद्ध आघाडी बनवीत असल्याचे देखील माधवरावांच्या निदर्शनास आले होते.ते जानोजी भोसले आणि त्यांचा सल्लागार देवाजीपंत ह्या दोघांना धडा शिकविण्याची योग्य वेळ पहात होते.कर्नाटक स्वारीहून जून १७६५ मध्ये पुण्याला परतल्यावर माधवरावांनी जानोजीरावना हजार पाचशे स्वारानिशी पुण्यास भेटीस बोलाविले. प्रारंभी जानोजी पुण्याला जाऊन माधवरावांना भेटण्यास अनुकूल होते पण देवाजीपंतांच्या सल्ल्यामुळे ( पेशवे भेटीच्या वेळी दगा करतील..)ते अर्ध्या वाटेवरून माघारी फिरले आणि माधवरावांशी दोन हात करण्याच्या तयारीला लागले.राघोबादादा जानोजीस मिळू नये म्हणून त्यांना माधवरावांनी उत्तरेकडे पाठविले.निजामाचा मुलुख जानोजीनी लुटल्यामुळे निजाम आणि जानोजी यांचा संघर्ष सुरु झाला होताच.औरंगाबादच्या(राक्षसभुवन) तहास अनुसरून निजामाने पेशव्यांना आपल्या मदतीस बोलाविले.१३ ऑक्टोबर १७६५-दसऱ्याच्या मुहूर्तावर माधवराव पुणे सोडून नागपूरकडे स्वारीस निघाले.जानोजींचा देवाजीपंतांवर इतका विश्वास कि देवाजी त्यांचे जणू काही गुरूच झाले होते.देवाजीपंत जानोजीस पेशवा-निजाम संयुक्त सेनेबरोबर लढण्यास उद्युक्त करत होते.पण पेशव्यांच्या लष्करी ताकदीची वास्तविकता(ground reality)लक्षात आल्यावर त्यांनी माधवरावांकडे दया याचना केली.१८ जानेवारी १७६६ रोजी जानोजी एकटे(सडे)दर्यापूर मुक्कामी माधवरावांस भेटले.देवाजीपंतानी राघोबादादांच्या आडून आपल्या धन्याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे माधवरावांनी जानोजीविरुद्ध कठोर भूमिका न घेता अमरावती जवळील खोलापूर इथे तह करून लढा मिटवला.जानोजीनी पेशव्यांना २४ लाखांचा मुलुख देण्याचे तसेच जेव्हा जेव्हा पेशवे फर्मावतील तेव्हा आपल्या सर्व फौजेनिशी पेशव्यांच्या स्वारीत हजर राहतील असे मान्य केले.
४-देवाजीपंतास अटक: खोलापूर इथे माधवरावांशी तह करून जानोजीनी आपल्यावरचे संकट दूर केले म्हणण्यापेक्षा लांबविले असेच म्हणावे लागेल.कारण त्या तहाची जानोजीनी अनदेखी केली.रघुजी कारंडे म्ह्णून भोसल्यांकडे सरदार होते.त्यांचा पुतण्या राणोजी पेशव्यांना मिळाला म्हणून जानोजीनी त्यास अटकेत ठेवले.धोडप किल्ल्यावरील राघोबा दादा आणि माधवराव यांच्यात झालेल्या लढाईत जानोजीनी दादांस साह्य केले.तसेच पेशव्यांविरुद्ध कटकारस्थाने करणे चालूच ठेवले.जानोजींची सर्व मदार देवाजी पंतांवर असायची.मराठा मंडळाचे सर्व घटक मध्यवर्ती सत्तेशी कटिबद्ध असले पाहिजेत अशी माधवरावांची भूमिका होती.त्यामुळे माधवरावांनी पुन्हा इ.स.१७६८ च्या अखेरीस नागपूरवर स्वारी करण्याचे ठरविले.इंग्रज जानोजींच्या मदतीस येऊ नये म्हणून प्रथम उत्तरेत जाऊन त्यांचा बंदोबस्त करून नागपूरकडे जाण्याचा माधवरावांचा विचार होता.जानोजीनी पेशव्यांच्या मुलुखात धामधूम चालविली होती.जानोजी-देवाजीपंत ह्या दुकलीचे सर्व कारनामे माधवरावांपर्यंत पोहचत होते.त्यांनी राघोबा दादांस नजरकैदेत ठेवल्या नंतर जानोजींस आपल्या भेटीस बोलाविले पण जानोजी मागील खेपे प्रमाणे ह्यावेळी पण पेशवा आपल्याला दगाफटका करील ह्या भीतीने पुण्याला न जाता युद्धाच्या तयारीस लागले.माधवरावांनी देवाजीपंतास पण पुण्याला बोलावले.(सप्टेंबर १७६८)जानोजीनी देवाजीपंतास न पाठविता चिमणाजी रुक्मांगद यांस माधवरावांच्या भेटीस पाठविले.परंतु माधवरावांनी दिवाकर पुरुशोत्तम उर्फ देवाजीपंतासच पुण्याला हजर राहून पेशव्यांची संशय निवृत्ती करावी असे जानोजीना कळविले.तरी पण देवाजीपंत पुण्याला गेले नाही.पुन्हा एक महिन्याने माधवरावांनी जानोजी आणि देवाजीपंत ह्या दोघांस पुण्यास येण्याबद्दल स्मरणपत्र पाठविले.यावेळी पण जानोजी-देवाजीपंतांनी माधवरावांच्या पत्राकडे दुर्लक्ष केले.उलट राघोबा दादा आणि इंग्रजांना पेशव्यांविरुद्ध मदतीस येण्यासाठी हाकारे घालण्यास सुरुवात केली.याची खबर लागताच माधवरावांनी बोलाचालीत अधिक वेळ न दवडता एकदम जानोजींवर स्वारी केली.माधवराव नागपूरकडे जात असताना वाटेत वाशीम इथे देवाजीपंत पेशव्यांचे भेटीस आले.तेथील एकंदरीत वातावरण बघून त्यांनी गुप्तपणे जानोजींस हा प्रसंग युद्धाचाच आहे,तयारीत रहा,असे कळविले.हि बातमी पेशव्यांना कळल्यावर ताबडतोब त्यांनी देवाजीपंतास अटक करून आपल्या बरोबर नागपूरकडे नेले. विठ्ठल सुंदर आणि देवाजी पंतानी निजामाला पुण्यावर हल्ला करण्यास प्रवृत्त केले होते.ह्या दोघांच्या चिथावणीने निजामाने पुणे शहराची मोठी लुट,जाळपोळ केली होती.माधवरावांनी नागपूर शहर आणि भोसल्यांच्या इतर प्रांतात भरपूर लुट,जाळपोळ करून पुणे लुटीचा बदला घेतला.देवाजीपंत पेशव्यांच्या अटकेत असून सुद्धा जानोजी भोसल्यांस पेशव्यांच्या माहित असलेल्या व्यवस्थेची माहिती अंतस्थ रित्या कळवून नाना युक्त्या सुचवायचे.पेशव्यांच्या गोटात काही तरी अफवा पसरवायचे.माधवरावानी जानोजींच्या सरदारांची वतने जप्त करणे,कुटुंबियांस कैद करणे आदी उपायांनी जानोजींची सगळीकडून कोंडी केली.उन्हाळा सुरु होऊन माणसे,जनावरांच्या खाद्याचे वांदे होऊ लागले.चार महिन्यांच्या संघर्षामुळे दोन्ही बाजू लवकरात लवकर मोहीम संपवू इच्छित होत्या.वाटाघाटींची किल्ली पूर्वी प्रमाणेच देवाजी पंतांजवळ होती.त्यांना माधवरावांनी लष्करात बोलाविले.देवाजी पंतानी गोपाळराव पटवर्धनांमार्फत विनंती केली कि ..आता काही जीव राहिला नाही.मुलुक गारद जाला,लुटला,जाळला,गुरेढोरे मेली.फौजेची तलब( पगार) चढली.आता पोटासी धरून कृपा करावी.अपराध क्षमा करावे.चाकरी सांगाल ती करू... यानंतर दस्तुरखुद्द माधवराव आणि जानोजी भोसले २४ एप्रिल १७६८ रोजी मेहेकर जवळ एकमेकांस भेटले.दोघात सलोखा झाला.(कनकापुरचा तह).भोसले आणि पेशवे यांच्यातील कलहास देवाजी पंतच कारणीभूत असल्याने त्यांस दिवाणपदावरून जानोजीनी काढून टाकावे अशी मागणी माधवरावांनी केली जी जानोजीनी मान्य करून देवाजी पंतास दिवाण पदावरून काढून टाकले.माधवरावांनी ह्या भेटीत जानोजीना देवाजी पंत तुमचे आमचे जाबसालात(जबाब सवाल)नसावा,(बोलण्यांचा)नाश करील,सबब आम्ही त्यास समागमे(बरोबर)नेऊन पारिपत्य करतो असे पण सांगितले.तेव्हा जानोजीरावानी आमचा ताबेदार बरा अथवा वाईट,त्यास आम्हीच शासन करू असे सांगून देवाजी पंतांस सोडवून आणले.पेशव्यांच्या कैदेतून सुटका झाल्याच्या आनंदात देवाजीनी इ.स.१७७०-७१ मध्ये चिमूर इथे भोसले सरकारांमार्फत दोन लक्ष रुपये खर्चून बाळाजी मंदिर बांधून घेतले,बालाजीच्या मूर्तीला एक लक्ष रुपयांचे दागिने अर्पण करून प्रतिवर्ष १६१२ नागपुरी शिक्के मंदिराला दान करण्याची सनद मिळविली.इतकं होऊनही देवाजी पंतांचे पुन्हा येरे माझ्या मागल्या सुरु झाले.नारायणराव पेशव्यांचा खुनी महमद इसाफ गारदी याला त्याच्या २००० गारदी साथीदारांसाहित एप्रिल १७७४ मध्ये त्यांनी मुधोजी भोसल्यांकडे आश्रय दिला.
४—अखेर-- देवाजीपंत मुधोजीस(जानोजींचा सावत्र भाऊ)मिळाल्याच्या संशयावरून जानोजींचा त्यांच्यावरील विश्वास डळमळीत होऊन त्यांनी देवाजीपन्तांचे घरदार लुटून सारी संपत्ती सरकारजमा केली.देवाजी पंतांच्या नारायणराव पेशव्यांचा खुनी महमद इसाफ गारदी यास मुधोजींकडे आश्रय देण्याच्या कृत्यामुळे त्यांनी राज्यातील सर्वांचा विश्वास गमावला.अगदी मुधोजी भोसलेंचा पण! मुधोजीनी पण देवाजी पंतांची सर्व मालमत्ता जप्त करून त्यांच्या कोकाबापू ह्या लेकावळ्याला निष्कांचन अवस्थेत सोडले.याला घेऊन काशीयात्रा करण्याचे त्यांच्या मनात होते,पण पोटदुखीच्या आजाराने ते १५-०७-१७८१ रोजी ते मरण पावले. देवाजी पंतांची जमेची बाजू म्हणजे त्यांनी वारन हेस्टीन्ग ह्या इंग्रज governor general ने छ.रामराजांच्या जागी मुधोजीना स्थापित करण्याचा प्रस्ताव नाकारण्यास मुधोजींचे मन वळविले.इंग्रजांच्या मदतीने छत्रपती झालात तर सगळे मराठा मंडळ भोसल्यांच्या विरोधात जाईल असा त्यांनी इशारा दिला होता.देवाजीपंत आजानुबाहू असल्याची आख्यायिका होती.नागपूरकर भोसल्यांच्या दौलतीत त्या काळी देवाजी पंतांइतकी हुशार,विद्वान,अष्टपैलू व्यक्ती दुसरी कुणी नव्हती.नाना फडणीस त्यामुळे त्यांचा उल्लेख दिवाकरपंतदादा असा आदरयुक्त भावनेने करत. देवाजीपंतांचे कुणी वंशज शिल्लक नाहीत.चुलत भावकीतले नरखेड इथे अजूनही वास्तव्यास आहेत.
प्रकाश लोणकर
संदर्भ:१-मराठी रियासत-खंड ४ आणि ५ ले. गो.स.सरदेसाई
२-मराठ्यांचा इतिहास-खंड २ आणि ३-संपादक ग.ह.खरे,अ.रा.कुलकर्णी
३- पेशवे-ले.श्रीराम साठे
No comments:
Post a Comment