विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 4 July 2023

अबुल हसेन उर्फ तानाशहा कुतुब्शाहाचे दिवाण-मादण्णा पिंगळी\पिंगळे

 

# इतिहासाने दखल घेतलेली दिवाण मंडळी.

५ -

अबुल हसेन उर्फ तानाशहा कुतुब्शाहाचे दिवाण-मादण्णा पिंगळी\पिंगळे
लेखन ::#प्रकाश लोणकर

मराठे आणि मोगल ह्या दोहोन्पैकी कुणा एकाला वगळून कुणाचाच इतिहास पूर्ण होणार नाही इतके ह्या दोन्ही सत्तांचे एकमेकांशी प्रदीर्घ काळ म्हणजे जवळपास २६-२७ वर्षे—संघर्षाचे संबंध राहिले होते.राजपुत्र अकबर आणि मराठ्यांचे छत्रपती संभाजी महाराज ह्या दोघांचे पारिपत्य करण्याच्या निश्चयाने औरंगजेब उत्तरेकडून नोवेंबर १६८१ मध्ये आपले प्रचंड सैन्य,सामग्री घेऊन दक्षिणेकडे येता झाला.त्याच्या प्राधान्य यादीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या आणि नंतर छत्रपती संभाजी महाराजांनी बळकट केलेल्या मराठे,कुतुबशाही आणि आदिलशाही ह्या दक्षिणी सत्ताधीशांच्या संघातील दोन्ही मुसलमानी शाह्या मोडणे प्रथम क्रमांकावर होता.त्याबरहुकूम मोगलांनी लष्करी मोहीम आखून प्रथम सप्टेंबर १६८६ मध्ये आदिलशाही आणि त्यानंतर एक वर्षाने म्हणजे सप्टेंबर १६८७ मध्ये कुतुबशाही संपवली.त्यानंतर त्यांनी दक्षिणी महासंघातील बलाढ्य शत्रू मराठ्यांकडे आपला मोहरा वळवला.आज आपण कुतुबशाहीतील अशा दोघा शूर,स्वामीभक्त,उत्तम प्रशासक म्हणून इतिहासाने नोंद घेतलेल्या मादण्णा आणि आकण्णा मराठी मूळ असलेल्या बंधूंपैकी मादण्णा यांची ओळख करून घेऊ या.

मादण्णा कुतुबशाहीच्या शेवटच्या सुलतानाचे-अबुल हुसेनचे- इ.स.१६७३ ते १६८६ अशी तेरा वर्षे दिवाण होते.त्यांना अबुल हुसेनने सूर्यप्रकाशराव असा किताब पण दिला होता.मादन्नांचे घराणे वारंगळ प्रांतातील हनुमनकोंडा येथील होते.त्यांचे वडील भानुदासपंत तेथील मुलकी कारभार,कर वसुली वगैरे कामे करीत असत.भानुदासपंताना आकण्णा (आकोबा),मदन्ना(महादबा)विसन्ना(विसोबा)आणि मृत्युंजय अशी चार मुले होती.भानुदासपंत जरी तेलुगु भाषिक वारंगळ प्रांतात उदरनिर्वाहासाठी आले असले तरी त्यांचे पूर्वज महाराष्ट्रातील होते.परंतु भाषिक कारणांनी ह्या सर्वांची नावे दाक्षिणात्य पद्धतीची झाली असावी.कंसात दिलेली नवे त्यांची मूळ नावे असावी,छत्रपती शिवाजी महाराजांनी मादण्णा ह्यांस महादण्णा म्हणून संबोधले आहे.भानुदासपंतांचे दोन नातू ( मुलीचे पुत्र)येंगण्णा उर्फ रुस्तुमराव आणि गोपण्णा उर्फ रामदास हे सुद्धा कुतुब्शाहीतील मोठे शूर आणि कर्तबगार सरदार म्हणून प्रसिद्ध होते.मादण्णांचा पुतण्या पोडल लिंगप्पा कर्नाटकात सुभेदारीपर्यंत पोहचला होता.दस्तुरखुद्द आकण्णा आणि मादण्णा स्वकर्तृत्वावर कुतुबशाहीच्या अंतिम वर्षात अत्यंत महत्वपूर्ण सेनानी,मुत्सद्दी,राजकारणी होते.अशा प्रकारे भानुदासपंत पिंगळी ह्यांच्या परिवाराला कुतुब्शाहीत अतिशय महत्वाचे आणि मानाचे स्थान होते.

मादण्णा आणि आकण्णा बंधूंचा कुतुबशाहीतील उत्कर्ष: गावातील म्हणजे हनुमकोंडा येथील वडील करत असलेल्या कामात आकण्णा आणि मदण्णा ह्या बंधुद्वयाना रुची नसल्याने ते इ.स.१६६० च्या सुमारास हैदराबादला आले.त्यांना मीर जाफर ह्या सरदाराकडे पोतदारीचे काम मिळाले.सातवा कुतुबशहा अब्दुल्ला(कारकीर्द १६२६-१६७२)याच्या एका मुलीचा विवाह जमविण्याकामी मदण्णा आणि आकण्णा यांची मीर जाफरला बरीच मदत झाली.आठव्या आणि अंतिम कुतुबशाह अबुल हसन तानाशाहचा विवाह मदण्णानी जमवून दिला.सातव्या कुतुब्शाहाच्या मृत्यू नंतर(एप्रिल १६७२) त्याचा जावई अबुल हसन तानाशाह पातशहा झाला.(कार्यकाळ:इ.स.१६७२ ते १६८८) त्याची मेव्हणी (पत्नीची मोठी बहिण)फातिमा खानन हिचा अबुल हुसेन तानाशाह तक्तन्शीन होण्यास विरोध होता.परंतु मदण्णा,आकण्णा तसेच मुसेखन,सय्यद मुझफ्फर ह्यांनी मुस्लीम/मराठे सैनिकांच्या मदतीने फातीमाचा विरोध मोडून काढला.अबुल हसन कुतुबशाहणे त्याला तक्तनशीन होण्याकामी मदत करणाऱ्या सर्वाना निरनिराळी महत्वाची पदे दिली.मदण्णा यांना मुजुमदारी तर आकण्णास सबनिशी मिळाली.नंतर कुतुबशाहची फर्माने काढण्याचे काम पण मदाण्णाना मिळाले.इ.स.१६७५ च्या सुमारास मुझफ्फरखानला दिवाण पदावरून काढून टाकून अबुल हसन कुतुबशाहने मदण्णा यांस आपले दिवाण म्हणून नियुक्त केले. अशा तऱ्हेने दिसामाजी आकन्ना-मदण्णा बंधूंचा कुतुबशाहित उत्कर्ष वाढतच गेला.ह्यावेळी मदण्णाना सूर्य प्रकाशराव हा किताब पण देण्यात आला. गोवळकोंडा येथील हिऱ्याच्या खाणी,तेलंगण भागातील सुपीक जमीन,तसेच उत्तम प्रशासन ह्यामुळे ह्या बंधूनी कुतुबशाहीला एक संपन्न,श्रीमंत राज्य केले. आपल्याला धोका उतरेकडील मोगलांकडूनच असेल याची मदण्णा,अकण्णा यांनी ओळखले होते.ते ध्यानात ठेवून त्यांनी मराठ्यांशी जवळिकेचे संबंध ठेवले होते.

कुतुब्शाहाचे दिवाण झाल्यानंतरच्या कुतुबशाहीतल्या महत्वपूर्ण घडामोडी :

१-छत्रपती शिवाजी महाराजांचा दक्षिण दिग्विजय मोहिमेचा मार्ग कुतुबशाहि मुलुखातून जात होता..कुतुबशाहच्या दरबारातील मराठ्यांचे वकील प्रल्हादपंत निराजीनी महाराज प्रत्यक्ष भागानगराला( आताचे हैदराबाद) येण्यापूर्वी कुतुबशाहचे सर्वेसर्वा मदणा यांना महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या उद्दिष्ठांची सविस्तर माहिती दिली. महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेचा एक हेतू दक्षिणेकडील सत्ताधीशांची उत्तरेकडील मोगल सत्ताधाऱ्यांविरुद्ध एकजूट जमवून आणणे हा सुद्धा होता.येथील राज्ये दक्षिणी राज्यकर्त्यांच्याच हातात राहावी न कि उत्तरेकडील मोगलांच्या हातात. तसाही कुतुबशाहीचा नैसर्गिक कल मोगलांपेक्षा मराठेशाहीकडे आधीपासून होताच.कुतुबशाहीत सुरुवातीपासून घोरपडे,जाधव,पंडित धर्माराव,असिराव,भालेराव,मुरार जगदेव,रंगराव नाईक,कृष्ण नाईक,विठोजी काटे,बाबाजी काटे,साबाजी हरकारा यांसारखे लढवय्ये मराठे सरदार होतेच. मदण्णा दिवाण झाल्यापासून कुतुबशाहीत अंतर्गत व्यवस्थेत मराठ्यांचे प्रमाण आणखीन वाढले. उत्तरेकडून दक्षिणेत आलेल्या पठाण सरदार नोकरी करायचे दक्षिणेत पण निष्ठा ठेवायचे उत्तरेकडे! त्यामुळे ह्या घरभेद्या पठाण सरदारांची आदिलशाही आणि कुतुबशाहीला नेहमी भीती वाटायची.कुतुबशाहाला विश्वास होता कि मोगलांच्या विरोधात मराठेच त्यास मदत करतील आणि मोगलांच्या विरोधात पण शेवटपर्यंत तेच टिकतील.कुतुबशाहाच्या दरबारात पहिल्यापासून प्रल्हाद निराजी हे मराठ्यांचे वकील होतेच.त्यांनी,त्यांचे वडील निराजी रावजी आणि रघुनाथपंत कोरडे यांनी कुतुबशहाचे दिवाण मदण्णा यांच्याशी सविस्तर बोलणी करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भागानगर भेटीचा कार्यक्रम ठरवला.इ.स.१६७७ च्या जानेवारी महिन्याच्या अखेरीस महाराज वेंगुर्ल्यावरून भागानगरकडे रवाना झाले.मजल दरमजल करत महाराज चार मार्च १६७७ रोजी कुतुबशाहाच्या हद्दीत प्रवेश करते झाले.कुतुबशाहाच्या आज्ञेनुसार मदण्णा त्यांचे बंधू आकण्णा, आणि कुतुबशाहीतील नामांकित सरदार,मुत्सद्द,नागरिक महाराजांच्या स्वागताला सामोरे गेले होते.महाराजांच्या राजेशाही स्वागतासाठी संपूर्ण हैद्राबाद शहर श्रुन्गारण्यात आले होते.महाराजांच्या सोबत रघुनाथपंत हणमंते, येसाजी कंक, नेताजी पालकर, हंबीरराव मोहिते, मानाजी मोरे, सूर्याजी मालुसरे, केसो निळो, बाळाजी आवजि, श्यामजी नाईक आदी मराठे सरदार, मुत्सद्दी होते. भव्य मिरवणुकीने आणि भागानगरवासियांकडून होत असलेल्या भव्य स्वागताचा स्वीकार करून महाराज कुतुबशाहाला भेटण्यासाठी त्याच्या दादमहाल या राजवाड्यात आले. त्यांच्यासोबत मदण्णा,अकण्णा,जनार्दन पंत प्रल्हाद निराजी, सोनाजी नाईक व बाबाजी ढमढेरे हि मंडळी होती. महाराज आणि कुतुबशाहाची गळाभेट होऊन दोघांनी परस्परांना प्रेमालिंगन दिले. महाराजांसाठी खास स्वतंत्र उच्चासन बनविण्यात आले होते. कुतुबशाहने महाराजांना स्वहस्ते आदरपूर्वक त्या सिंहासनावर बसविले. शेजारच्या सिंहासनावर कुतुबशाह बसले,त्यांनी मदण्णाना पण बसायची आज्ञा केली.उभय्तांची बैठक सुमारे तीन तास चालली होती.महाराजांच्या एकेक उत्कट पराक्रमांची माहीती कुतुबशाहने खुद्द महाराजांकडून ऐकली आणि उपस्थितांस मोठा आनंद झाला.मुलाखत संपल्यावर कुतुबशाहने महाराजांस स्वहस्ते निरोपाचे विडे देऊन त्यांच्या सरदारांची प्रशंसा करून त्यांना बहुमोल वस्त्रे,घोडे,हत्ती,कंठ्या,शिरपेच,तुरे,हत्यारे देऊन गौरवांकित केले.

दुसऱ्या दिवशी मदण्णानी महाराज आणि त्यांच्या बरोबर आलेल्या प्रमुख मंडळीना आपल्या घरी मेजवानीस बोलाविले होते.मदण्णांच्या मातोश्री भागम्मा यांनी स्वतः महाराज आणि इतर मंडळींसाठी स्वयंपाक बनवून त्यांना वाढला सुद्धा! महाराजांनी पण कुतुबशाहा आणि त्याच्या महत्वपूर्ण सरदार,मुत्सद्द्यांना मेजवानी देऊन विविध नजराणे देऊन त्यांचा सत्कार केला.मराठे आणि कुतुबशाही सरदार,राजकारणी यांच्या गाठीभेटी,परस्परांना मेजवान्या,सत्कार बरेच दिवस चालू होते.ह्या सगळ्यांचे फलस्वरूप म्हणजे दोन्ही पक्षात एक करार झाला.ह्या करारान्वये कुतुबशाहने मराठे भागानगर मध्ये असेपर्यंत त्यांना रोज तीन हजार होन फौज खर्चासाठी द्यायचे मान्य केले,महाराजांच्या पुढील टप्प्यात त्यांना मदत म्हणून पाच हजारांची फौज आणि तोफखाना देण्यास कुतुबशाहने मान्यता दिली.तसेच मराठ्यांनी जिंकलेल्या कर्नाटकच्या प्रदेशांपैकी शहाजीराजांनी जिंकलेला प्रदेश सोडून उरलेला प्रदेश कुतुबशाहला देण्याचे,दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन मोगली आक्रमणाचा प्रतिकार करणे,मराठ्यांनी आपला एक कायम स्वरूपी वकील कुतुबशाहकडे ठेवणे,तसेच कुतुबशाहने मराठ्यांना वार्षिक एक लाख होन खंडणी देणे ह्या बाबी पण मान्य करण्यात आल्या.भागानगरात सुमारे पाउण महिना कुतुबशाहचा पाहुणचार घेऊन महाराज दक्षिण दिग्विजयाच्या पुढील टप्प्याकडे रवाना झाले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेतील पहिला टप्पा मदण्णा आणि आकण्णा ह्या बंधुद्वयांच्या कुतुब्शाहीत असलेल्या प्रभावामुळे कमालीचा फलदायी,यशस्वी ठरला.

मदन्णा,आकान्नांचा शोचनीय अंत: आदिलशाही तसेच कुतुबशाहीतील काही मोगली सरदार गुप्तपणे औरंगजेबला मिळालेले होते.ह्या घरभेद्यांचा मदण्णानी मराठ्यांच्या सहकार्याने बऱ्यापैकी बंदोबस्त केला होता. त्यांनी महत्वाच्या जागी मराठ्यांना,दक्षिणेतील लोकांना सेवेत ठेवण्याचा सपाटा लावला होता.कुतुबशाहला पुढे करून त्यांनी आदिलशहाला पण असेच धोरण अमलात आणण्यास तयार केले.मदण्णा,आकण्णा ह्यांनी दक्षिणी राज्यांची एकजूट केल्यामुळे मदन्नां आणि आकान्ना जिवंत असतील तोपर्यंत मोगलांचा दक्षिणेकडे जम बसने सोपे राहणार नाही हे औरंगजेबने ओळखले होते.फतवा इ आलमगिरी म्हणजे औरंगजेब बादशहाच्या आजज्ञेत ह्या दोघा दक्षिणी बंधूंचा शिरच्छेद केला पाहिजे अशी आज्ञा दिलेली आढळते.मोगलांनी मदण्णा,आकण्णा यांचा काटा काढण्याची कारस्थाने रचावयास सुरुवात केली.दुसरीकडे मदण्णा ,आकण्णांमुळे ज्यांचे हितसंबंध दुखावले गेले होते अशी राजघराण्यातील मंडळी पण कटवाल्याना मिळाली होती.एक हिंदू मुस्लीम राज्याचा दिवाण होऊन सर्व दक्षिणेची सूत्रे चालवत आहे याचे काही कट्टर मुस्लीम धर्मियांना वैषम्य वाटत होते.अबुल हसन कुतुबशाहकडे हस्ते परहस्ते दोघा भावांविरुद्ध विविध स्वरूपाच्या तक्रारी करून त्याचे मन कलुषित,प्रदूषित करण्याचे भरपूर प्रयत्न पण करून झाले पण कुतुबशाहचा मदन्णा,आकान्नानावरील विश्वास कायम,अतूट राहिला. इ.स.१६८५ मध्ये औरंगजेब पुत्र शहा आलमच्या नेतृत्वाखालील विशाल मोगल सैन्याने गोवळकोंड्यावर चाल केली.मालखेड इथे मोगली फौजांनी कुतुबशाही फौजांचा पराभव करून हैद्राबादकडे कूच सुरु केले.विवश कुतुबशहा अबुल हुसेन शहा आलमला शरण गेला.दोन लाख होनांची खंडणी आणि मदण्णा,अकण्णा बंधुंस कारभारातून काढून टाकणे ह्या अटी कुतुबशाहने काबुल केल्या.मोगलांप्रति वफादार असलेला यलमनराव,कुतुबशाहच्या महालातील काही कर्मचारी व पठाण यांनी ह्या दोघा बंधूना ठार मारण्याचा कट अखेरीस पूर्णत्वास नेला.मादण्णाना जरी आपल्याविरुद्ध चाललेल्या कट कारस्थानांची कल्पना होती तरी दरबारातील काही मोगल उच्चपदस्थ मोगलांच्या निष्ठावान सरदारानमुळे त्यांचा बंदोबस्त करणे काहीसे अवघड झाले होते.१६ मार्च १६८६ रोजी दुपारी बारा वाजायच्या सुमारास मदण्णा नेहमी प्रमाणे काम आटोपून कचेरीतून घरी जाण्यासाठी बाहेर पडत असताना त्यांना व बंधू आकण्णा या दोघांना ठार मारण्यात आले.त्यांची प्रेते रस्त्यातून फरफट नेली.मदअण्णांचे शीर औरंगजेब पुत्र शहा आलमकडे पाठविले,त्याने ते औरंगजेबकडे पाठविले.कटवाल्याणी मदन्णा,आकान्ना यांच्या परिवारातील स्त्रिया,मुले,इतर सदस्यांची पण हत्त्या केली.

मदअण्णा आणि आकण्णा यांचा काटा काढल्यानंतर दोन वर्षांच्या आत मोगलांना आदिलशाही( सप्टेंबर १६८६)आणि कुतुबशाही(सप्टेंबर १६८७) संपविण्यात यश येऊन मराठेशाहीचा घास घेण्यासाठी रस्ता मोकळा झाला.

मदण्णा आणि आकण्ना यांच्या कार्याचे महत्व प्रख्यात मराठी इतिहासकार वा.सी.बेंद्रे यांनी खालीलप्रकारे केले आहे.

‘’ मदण्णा व आकण्णा यांनी धूर्तपणे मोगलांच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी सर्व दक्षिणी राज्यांचा संघ केला.त्यांनी दक्षिणी मोहरे व प्यादी हाताशी ठेवून आपल्या बुद्धीच्या जोरावर डाव चांगला रंगविला होता...त्यांचे खून पाडल्यानंतर एका वर्षाच्या आत मोगलांनी दोन मोठ्या पातशाह्या धुळीस मिळविल्या.त्या नंतर दोन-तीन वर्षांत महाराष्ट्र व कर्नाटकचा बराच प्रदेश जिंकला..मराठ्यांचा छत्रपती संभाजी राजांना ठार केले.मराठ्यांच्या राजधान्या जिंकल्या...मराठ्यांना परागंदा होऊन दूर जिंजी इथे दरबार थाटून राज्याची पडझड व्यवस्थित करावी लागली.मराठा राज्य पुन्हा उभे राहिले पण आदिलशाही आणि कुतुबशाही हि बलाढ्य राज्ये पूर्णपणे नष्ट झाली.’’

[#प्रकाश](https://www.facebook.com/hashtag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6?__eep__=6&__cft__[0]=AZU2hf5oUEhH_-TEG_fUcxFM0o9g8wPSZsi-I4q7MaVRKIr-q7x77N-1f1jw7qkyAuSHvc_vdE7IzOfUqqIq4hQzYcMmz6MhDtsMDblsfKpe8TLzTumugKf9Heb7tijvD9xE7fHQLMKZqQmvDl3QOg7K&__tn__=*NK-R) लोणकर

संदर्भ:१- मराठी रियासत खंड १-ले.गो.स.सरदेसाई

२-मराठे व कुतुबशाही-ले.अशोकराव शिंदे सरकार

३-राजा शिवछात्रपती उत्तरार्ध ले.बाबासाहेब पुरंदरे.

४-मराठ्यांचा इतिहास खंड १-संपदक ग.ह.खरे आणि अ.रा .कुलकर्णी

५-मदण्णा आणि आकण्णा छायाचित्रे-श्रेय श्री गुरुप्रसाद कानिटकर आणि अनुराग वैद्य.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...