विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 28 July 2023

छत्रपति घराणे आणि पंढरीचा विठोबा एक अतुट जिव्हाळा

 



छत्रपति घराणे आणि पंढरीचा विठोबा एक अतुट जिव्हाळा
आषाढी वारीचे वेध सर्व महाराष्ट्रांला लागले आहेत. सर्वदुर लोक आता पंढरपूरकडे चालत येत आहेत. कोणी कोठुन, कोणी कोठून येत आहेत ते सांगताहि येत नाहि. कोणी धनवान असेल कोणी निर्धन. पण विठोबा हे अजब रसायन आहे. यार यारे लहान थोर। या ते भलते नारी नर। याप्रमााणे त्याचे लेखी कोणी धनवान कोणी गरिब असा भेदभाव नाही. त्याला सारे सारखे भक्त. सकळासी येथे आहे अधिकार। सारे त्याचे. तो साऱ्यांचा. मग त्याची पुजा, आराधना, उपासना सगळेच करणार. तिथे कसला आलाय भेदभाव.
पुजा कशी करावी? हा प्रश्न असला तरी त्याला उत्तर आहेच की.
पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छती।
हे गीतेत त्यानेच सांगितले आहे. हे ज्याला जशी होईल तशी करावी. कोणी पाणी अर्पावे, कोणी फळ, कोणी फुल कोणी पान. ज्याला जे जमेल त्याने ते वहावे.
सार लोक त्याप्रमाणे यथाशक्ती, यथामती, यथाद्रव्य, करित आले आहेत. काेणी महापुजा करतात, कोणी अलंकारपुजा, कोणी लक्ष तुलसीअर्चन पुजा, कोणी कोटी तुलसी अर्चन पुजा, कोणी जलाभिषेक कोणी दुग्धाभिषेक, कोणी आम्ररसाभिषेक, कोणी इक्षुदंडरसाभिषेक वा अजून काहि. कोणी देवाला पालखी वाहतो, कोणी रथ, कोणी वाचादत्त घोडा वाहिल, कोणी हत्ती, कोणी सोने - कोणी चांदी, कोणी हिरे - कोणी मोती, कोणी अलंकार कोणी नमस्कार. पण त्याने भक्तांशी देव काहि वेगळा वागत नाहि. देवाला सर्व सारखेच. आपल्याला आनंद प्राप्ती देवप्राप्ती देवाला भक्त प्राप्ती सारखीच.
या साऱ्या भक्तांचे मांदियाळीत राव आले राणे आले, राजे आले महाराजहि आले आणि रंकहि. रंकांच्या नोदी इतिहासात क्वचित सापडतात. पण राव राजे राणे यांच्या अधिक सापडतात. राव राजे महाराजे झाले म्हणून काये झाले, ते हि भक्त आहेतच की. त्यांना हि आस्था आहे. श्रद्धा आहे. भावना आहेत त्यामुळे ते हि पुजा करते होता.
पंढरीच्या बाबतीत असेच अनेकानेक राजे महाराजे यांच्या नोंदी आपणास पहावयाला मिळतात. मग त्या विजयनगरचे सम्राटापासून पासून ते प्रधान हेमाद्रीपर्यंत अन् स्वराज्यांचे छत्रपतिं पासून अनेकानेक सरदार यांच्या पर्यंत सर्व नोंदी इतिहासात दिसतात.
अनेक लोक विचारतात स्वराज्य निर्माते छत्रपति शिवाजी राजांनी पंढरीला कधी आले होत काय? त्यांनी पांडुरंगाचे दर्शन घेतले होते काय?
आज मित्तीस असा ठोस कोणताहि कागद उपलब्ध नाहि त्यामुळे तसे भक्कमपणे सांगता येत नाही. मात्र भोसले कुळाच्या इतर नोेंदीवरुन आपणास याबाबत माहिती होवू शकते. काही तर्क बांधू शकतो हे मात्र खरे.
बाबाजी राजे भोसले यांनी आपले पुत्रांची नावे थोरले मालोजी आणि धाकले विठोजी ठेवले यावरुन ते विठ्ठलभक्त होते असे म्हणता येते. शिवाय त्यांनी आपले जहागिरितील पेडगावीं सन १५९६ मधे विठलदेवासाठी एक चावर म्हणजे सुमारे ७५ एकर जमिन अकोवा गोसावी बिन गोदोबा गोसावी बडवे पुजारे यांना इनाम दिली होती. तसे पत्रच उपलब्ध आहे.
शिवाय बरोबरच परसोजी भोसले यांचेहि सन १५९९ चे एक बोलके पत्र उपलब्ध आहे. त्यात ते म्हणतात देवस्थाने विठोजी व नरसिंह जे देवस्थाने असतील तेथील दिपवाते व विठोजीचा भक्त अकोवा गोसावी त्याची अडशेरी दरोज चालविणे व दिपवातीस तेल दररोज चार टाक देत जाणे.
हि दोनही पत्रे शिवाजी महाराजांचे जन्माचे आधी सुमारे ३०-३५ वर्षे आधीची आहेत.
मल्हार रामराव चिटणीसकृत सप्तप्रकरणात्मक शिवचरित्रात आणि शिवदिग्विजय बखरीत शहाजीराजे सन १६६० मधे श्रीतुळजापुरी येवून श्रीदेवीचे दर्शन घेवून देव ब्राह्मणपुजा करुन श्रीपंढरीस येवून पुढे पत्रे पाठविली असा उल्लेख शहाजीराजे शिवाजी राजाचे भेटीला विजापुरातून निघाले त्यावेळी करण्यात आलेला आहे.
छ. शिवाजी महाराजांनी शके १५९३ अर्थात सन १६६१ मधे संत ज्ञानेश्वर माऊलींसाठी आळंदी येथील १ खंडी २|| मण धान्याचे उत्पन्न दिल्याचे पत्र उपलब्ध आहे. पुढे औरंगजेबाच्या धामधुमीत राजाराम महाराज जिजींला गेल्यावर तेथे आळंदीचे मोरो भास्कर कुलकर्णी यांचे विनंतीवरुन जिजाऊसाहेब, छ. शिवाजी महाराज, आणि संभाजी महाराज यांनी जी नेमणूक करुन दिली होती ती चालविणेबद्दल राजाराम महाराजांची आज्ञा उपलब्ध आहे.
छत्रपति शिवाजी महाराजांनी जयसिंगाबरोबर पुरंदरचा पाच कलमी तह केला आणि मोगल सेनेसह विजापूर जिंकणेसाठी कुच करते झाले. त्यावेळी महाराजांनी एक एक ठाणे जिंकत फलटण, खटाव, भाळवणी, मंगळवेढा मार्गे विजापूरकडे प्रयाण केले. त्यावेळी दिनांक १८ डिसेंबर १६६५ ला महाराजांच्या फौजांनी मंगळवेढा जिंकला. या काळात महाराज पंढरपुरात येवून गेले असतील असा विचार व्यक्त होवू शकतो.
बरोबरच सुमारे १६७० सालीचे एका यादीत पुढीलप्रमाणे उल्लेख आहे. ‘‘यादी सके १५६१ सौम्य सवछरे पुस सुध बीज तदिनी देवे स्थळ त्यागिले. १५६२ ( सन १६७०) साधारण संछरी सिवाजी भोसल्याचे भेटीस गेलो होतो’’ म्हणजे पंढरपूरातील देवाचे संबंधाने काहि बडवे मंडळी शिवाजी महाराजांना भेटावयास गेले होते असे म्हणता येते. तिथे काय झाले? ते का भेटले ? वा महाराजांनी याबाबत काय केले ? याबाबत मात्र काहिही माहिती कळत नाहि.
छत्रपती संभाजी महाराजांची पंढरपूर वारीला जाणाऱ्या पालखी दिंडीला संरक्षण दिलेली पत्रे अन् पालखीला मदत केल्याची सरंजाम दिल्याची हि दानपत्रे उपलब्ध आहेत.
यानंतर मात्र छ. संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज सातारकर यांनी सन १७०९ साली विठोबाचे अभिषेक, पुजा, नैवेद्य, दिपआराधना यासाठी १८० होन आणि गोपाळ विठ्ठल बडवे यांना विठ्ठलाची पुजा यथासांग करावी म्हणून वर्शाला १८० होन अशी भरघोस रक्कम दिली होती. ते ही आपले काकासाहेब राजाराम महाराज यांनी दिलेल्या यापूर्वीचे दानाचे वा वर्षासनाचे पत्राचा यात उल्लेख करतात. ते पुनरूद्धारीत करीत आहेत असेच या पत्रावरून दिसते .
याबरोबरच शिवरायांचे धाकटे पुत्र राजाराम महाराज यांचे पुत्र छ. संभाजी महाराज करवीर यांनी संत प्रल्हाद महाराज बडवे यांचे पुत्र रामचंद्र बडवे यांना दिलंली सनद मात्र तशी अप्रकाशित आहे. या सनदेतील लिखाण पाहता छत्रपतिंचा पंढरीरायाप्रतिचा आपला आदर आणि स्वराज्याचे हितासाठीचे कृत्य या दोन्ही गोष्टी दिसून येतात. सदर पत्र पुढीलप्रमाणे
श्री
श्रीपांडुरंग
स्वस्तिश्री राज्याभिशेक शके ४२ मन्मथनाम संवत्सरे पौश शुद्ध दशमी मंदवासर क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शंभू छत्रपति यांनी देशमुख व देशपांड्य मामले मुदगल यासी आज्ञा केली अेसीजे राजरी प्रल्हाद बडवे श्री वास्तव्य पंढरपूर यांचे पुत्र पुत्र रामचंद्र बडवे हुजूर स्वामीच्या दर्षनास आले आणि स्वामी संनिघ विनंती केली की श्री च्या पुजा नैवेद्यास राजश्री कैलासवासी स्वामींनी प्रतिदिन रुपया १ येक प्रमाणे सालिना रुपये ३६० तिनशे साठ रास मोईन करुन दिल्ही होती. परंतु धामधुमीचे प्रसंगामुळे पावत नाही या करिता राजश्री रामचंद्र पंडित हुकुमतपन्हा यांनी श्रीच्या पुजा नैवेद्यास मौजे नांदुर प।। म।। हा गांव कुल बाब कुल कानुन ईनाम करुन दिल्हा आहे. परंतु स्वामींचे पत्र असले पाहिजे म्हणून विधित केले त्यावरुन मनास आणता श्री चे अनादि स्थान आहे त्यास श्री ची नित्यपुजा नैवेद्य चालिल्याने स्वामीस व स्वामींचे राज्यास कल्याण आहे हे जाणून मौजे मा।। म।। नी ले इनाम करुन दिल्हा आहे. त्याप्रमाणे कुलबाब कुलकानुन हलीपटी पेस्तरपटी सहित साविज हकदार व इनामदार करुन इनाम दिल्हा असता तुमी पुर्व मर्यादेप्रमाणे मौजे मा।। म।। राजश्री प्रल्हाद बडवे यांचे स्वाधीन करणे आणि अैवज होईल याकडे पाहणे हे श्री च्या पुजा नैवेद्यास व्यय करतील हे जाणून सदर ईनाम श्रीस उत्तरोत्तर चालविणे प्रतिवर्षी नुतन पत्राचा आक्षेप न करणे या पत्राची नकल घेवून असल पत्र भोगवटीयास रा।। प्रल्हाद बडवे याजवळी परतोन देणे जाणिजे लेखनालंकार
यावरुन हे दिसते की पुर्वी चालू कैलासवासी स्वामीनी दिलेले ३६० रुपये होते म्हणजे राजाराम महाराजांनी ही राशी दिलेली होती. तीच रास संभाजी महाराज करवीर यांनी दिली. याचा अर्थ आपले पुर्वज बाबाजीराजे, परसोजी राजे आणि शहाजीराजे बरोबरच बंधु संभाजी राजे यांनी केलेली यांनी केलेली विठलभक्ती राजाराम महाराजांचे अंगात आली होती ती त्यांनी वर्षासन वा इनामदारी देवून दर्शविली पुढे जशी शाहू छत्रपति सातारकर यांनी वर्षासन देवून चालविली तशीच करवीरकर छ. संभाजी राजांनीहि चालविली.
ती चालवित असता हे केल्याने स्वामीस आणि स्वामींचे राज्यास कल्याण आहे हे शब्द महत्वाचे आहेत. देवास दिल्याने राजाचे आणि राज्याचे म्हणजे रयतेचे हि कल्याण होते त्यामुळे हे चालवित जाणे.
म्हणजे पुर्वसुरी बाबाजीराजे, परसोजीराजे, शहाजीराजे, वंशज छ. संभाजी राजे, त्यांचे पुत्र शाहू महाराज, दुसरे पुत्र छ. राजाराम राजे, त्यांचे पुत्र संभाजीराजे या सर्वानी विठोबासाठी दाने वर्षासन इनामे दिली आहेत. पुढे वेळोवेळी करवीरकर आणि सातारकर छत्रपतिंनीही विठोबास अलंकार अर्पिले आहे. त्याचा विचार करता छ. शिवाजी महाराजहि विठोबास वर्षासन, दान देते झाले असले पाहिजेत असा तर्क करता येइल.
प्रत्यक्षात मात्र तसा अधिकृत कागद वा पुरावा उपलब्ध होई तो केवळ वाट पाहणे एवढेच आपले हाती आहे.
©® आशुतोष अनिलराव बडवे पाटील पंढरपूर
(संतश्री प्रल्हाद महाराज बडवे यांचे वंशज )
सोबत आमचे संग्रहातील करवीर छ. संभाजीराजांचे सनदेचे प्रकाषचित्र दिले आहे.
संदर्भ - १ मालोजीराजे व शाहाजी महाराज, वा सी बेंद्रे
२. श्रीक्षेत्र आळंदी, ग ह खरे,
३. श्री शिवछत्रपतिंचे सप्तप्रकरणात्मक चरित्र, हेरवाडकर प्रत,
४. शिवदिग्विजय बखर,
५. सनदापत्रे
६. शक्तिसौष्ठव, द ग आपटे
७. भा इ सं मं षष्ठ संमेलन वृत्त
८. राजा शिवछत्रपती, बाबासाहेब पुरंदरे
९ . बडवे प्रकाशित कागद
या पोस्ट कामी स्नेही इतिहास अभ्यासक प्रविण भोसले यांचे सहकार्य लाभले आहे.
साभार बहिर्जी

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...