पावनपरिसर रणसंग्राम
१० नोव्हेंबर १६५९ प्रतापगडच्या छावणीत छत्रपती शिवरायांनी आदिलशाही दगाबाज सरदार अफजलखानाला यास शेरास सव्वाशेर या न्यायाने दगलबाजीनेच ठार केले. अफजलखानासारख्या अत्यंत धाडसी पण तितक्याच कपटी सरदाराचा युद्धनिपुन शिवरायांनी मोठ्या कौशल्याने वध केला या घटनेमुळेच छत्रपती शिवराय तसेच महाराष्ट्रातील मराठा पूर्ण जगताला खऱ्या अर्थाने समजले. या विजयामुळे मोगल, आदिलशाही, इंग्रज, डच, पोर्तुगीज यांसारख्या सत्तांना मराठ्यांची दहशत वाटू लागली. ही दहशत एवढी होती की, मराठ्यांनी अवघ्या १८ दिवसांत आदिलशाहीचा प्रतापगड पासून पन्हाळगड पर्यंतचा बराच मोठा मुलुख काबीज केला. यामध्ये रांगणा, भुदरगड, विशाळगड तसेच आदिलशाहीच्या उपराजधानीचा मान असलेला पन्हाळगड हे किल्ले घेतले.
दि. २८ नोव्हेंबर १६५९ रोजी शिवराय स्वतः पन्हाळगडावर आले आणि रात्री मशालीच्या उजेडात त्यांनी पन्हाळा पाहिला. मराठ्यांच्या दहशतीमुळे आदिलशाहीतील कोणीही सरदार शिवरायांच्या विरोधात लढायला तयार नव्हता त्यामुळे आदिलशाह अतिशय चिंतेत होता. बादशहाचा हा प्रश्न सुटला तो विजापूर दरबारशी बेबनाव होऊन कर्नाळ प्रांतात गेलेला सरदार सिद्दी जोहर याचा माफीनामा पाहून. सिद्दी जोहरने बादशहापाशी पुन्हा आपणास चाकरीत घेण्याची विनंती केली. या गोष्टीचा फायदा घेऊन आदिलशाहाने सिद्दीला 'सलाबतखान' हा किताब देऊन शिवरायांच्या विरोधात पाठविले. आदिलशाहाने सिद्दीबरोबर ४० हजारांची प्रचंड फौज, पिडनायक बेडरचे कर्नाटकी पायदळ आणि मोठी रसद दिली तसेच बादशहाच्या आज्ञेवरून रुस्तमजमा, फाजलखान, बाजी घोरपडे, सिद्दी मसूद, बड़ेखान, भाईखान यांसारखे मातब्बर सरदार जोहरला येऊन मिळाले.
पन्हाळगडचा वेढा :-
सिद्दी जोहरच्या येण्याची बातमी स्वराज्यातील चाणाक्ष हेरांनी शिवरायांना दिली. यावेळी महाराज मिरजेच्या मोहिमेत होते. हि बातमी समजताच ते पन्हाळगडावर म्हणजेच स्वराज्याच्या तत्कालीन सीमेवरील किल्ल्यात आले. याचे कारण म्हणजे जास्तीत जास्त युद्ध हे स्वराज्याच्या बाहेर व्हावे जेणेकरून स्वराज्यातील रयतेला त्रास होऊ नये, अशी भूमिका शिवरायांची होती. सिद्दीने पन्हाळगडाला चारही बाजूने कडक वेढा घातला. स्वतः सिद्दी जोहर, फाजलखान, रुस्तमजा, बडेखान यांनी पूर्वेकडून म्हणजेच चार दरवाजाच्या बाजूने वेढा दिला. सिद्दी मसूद, बाजी घोरपडे, भाईखान, पिडनायक बेडर यांनी पश्चिमेकडून म्हणजेच तीन दरवाज्याकडून बेढा दिला व इतरांनी दक्षिण व उत्तरेकडून वेढा दिला. पावसाळा जवळ आल्याचे पाहून सिद्दीने आपल्या छावणीतील तंबुना पावसाळी छपरे बांधून घेतली. हा वेढा उठवण्यासाठी सेनापती नेताजी पालकर व सिद्दी हिलाल यांनी विजापूरपर्यंत धडक मारून तिकडे धामधूम उडवली यामुळे सिद्दीवर दबाव येईल असा प्रयत्न होता. पण त्याचा उपयोग झाला नाही. ते राजधानी राजगडावर परत आले. जिजाऊ माँसाहेब पन्हाळगडचा वेढा फोडण्यासाठी स्वतः आपली १० हजाराची फौज घेऊन सज्ज होत्या पण सेनापतींनी आऊसाहेबांना थांबवले आणि स्वतः पन्हाळगडचा वेढा मोडून काढण्यासाठी तयार झाले.राजमाता जिजाऊंनी त्या दोघांना तडक पन्हाळ्याचा वेढा फोडण्यासाठी पाठविले. या योद्धांनी जोहरच्या फौजेवर जोराचा मारा केला. या युद्धाचे वर्णन करताना समकालीन कवी परमानंद म्हणतो, "त्या सेनापतीच्या व हिलालाच्या हाताखालचे हे शत्रूसैन्य समीप आलेले ऐकून त्यास विरोध करण्यास जोहरानेसुद्धा भालेकरी व पट्टेकरी असे पुष्कळ योद्धे तिकडे पाठविले. तेव्हा मोठा गर्व वाहणारे,भाले, पारा, धनुष्यबाण धारण करणारे धिटाईचे असे ते सर्व सिद्दी शिवरायांच्या त्या अतिप्रचंड व समृद्ध सेनेस वाटेत अडवून शस्त्रे उगारून तिच्याशी लढू लागले. तेथे शत्रूबरोबर हिलालाच्या चकमकी झाल्या. त्यात बाणांनी डोकी तोडण्यात आली व भाल्यांनी हात तोडण्यात आले. तेव्हा हिलालाचा रागीट व अभिमानी पुत्र सामर्थवान वाहवाह शत्रूच्या व्यूहात शिरला. मोठे भव्य व लाल डोळे असलेला शत्रूची छाती फोडणारा तो जवान हस्तचापल्य दाखवित असता अत्यंत प्रेक्षणीय दिसत होता. नंतर विशेष आयुधांनी लढणाऱ्या त्या महायोद्ध्यांनी त्या मानी वाहवाहास युद्धाच्या अग्रभागी घोड्यावरून खाली पाडले व तो बेशुद्ध झाला. भाला मोडून व शरीर छिन्नभिन्न होऊन अतिविव्हळ झालेल्या त्या वाहवाहास शत्रूंनी अतिशय हर्ष करीत आपल्या गोटाकडे नेले. ( सिद्दी हिलाल आणि सिद्दी वाहवाह हे मराठा फौजेत होते.)
एवढा मोठा पराक्रम करूनदेखील सिद्दी जौहरच्या प्रचंड फौजेपुढे नेताजी व हिलाल यांचा टिकाव लागला नाही. यावेळी पन्हाळ्यावर ७ ते ८ हजाराची फौज महाराजांचे जवळ होती. यामध्ये किल्लेदार त्र्यंबक भास्कर, रायाजी नाईक बांदल, हैबतराव बांदल, बांदल सेनानी बाजी प्रभू देशपांडे, विठोजी काटे, संभाजी जाधव, शिवाजी काशिद हे वीर होते. किल्ल्यावरील फौजेने मोठ्या हिम्मतीने किल्ला ४ ते ५ महिने लढवत ठेवला. किल्ल्यातील वीर तोफा तसेच गोफणीतील दगडांचा मारा शत्रूसैन्यांवर करत होते.याचबरोबर रात्रीचा अचानक गड उतरून बेसावध शत्रूसैन्यावर मारा करायचा व परत यायचे हे गनिमीकाव्याचे युद्ध महत्त्वपूर्ण ठरत होते पण वेढा काही हालत नव्हता. यावेळी राजापूरकर इंग्रजांनी आपला व्यापारी स्वार्थ साधला. आपल्याकडील तोफगोळे खपविण्यासाठी इंग्रजांनी जोहरशी पत्रव्यवहार केला. जोहरने लगेच इंग्रजांकडून १ तोफ व ५० गोळे मागवले. हे साहित्य घेऊन इंग्रज अधिकारी रेव्हींग्टन, सिंघॉम, गिफर्ड व वेलजी सिद्दीच्या फौजेत दाखल झाले. या स्वार्थी इंग्रजांनी पन्हाळ्याच्या पूर्वेकडील मार्कडेय डोंगरावरून (सध्याचा पावनगड) लांबपल्याची तोफ चढवून पन्हाळ्यावर प्रचंड तोफगोळ्यांचा मारा केला. तोफगोळे किल्ल्यांवर आतपर्यंत येऊ लागले. परिस्थिती बिकट होती,याचवेळी मोगल सरदार म्हणजेच खुद्द औरंगजेबाचा मामा शाहिस्तेखान प्रचंड फौज घेऊन स्वराज्यावर चालून येत असल्याचे महाराजांना कळले. स्वराज्यावर आलेल्या या दुहेरी संकटावर मात करण्यासाठी महाराजांना त्वरित निर्णय घेणे गरजेचे होते.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शिवरायांनी पन्हाळगड वरून निसटण्याची अत्यंत महत्त्वपूर्ण आणि बिनचूक अशी योजना आखली. ही योजना जितकी बिनचूक होती तितकीच धोकादायक होती. ही योजना म्हणजे शिवरायांचे युद्धकौशल्य आणि मराठ्यांची स्वामीनिष्ठा या दोन्हीची साक्ष आहे.
* पन्हाळगडातून यशस्वी सुटका आणि शिवाजी काशिद यांचे बलिदान :-
शिवरायांनी योजनेप्रमाणे आपला वकील सिद्दी जोहरच्या छावणीत पाठवला आणि आपण पूर्णपणे शरण येत असल्याचे सांगितले तसेच पुढच्या दिवशी स्वतः येऊन भेटणार असल्याचे सांगितले. हि बातमी समजताच सिद्दी खुश झाला पण सिद्दीच्या फौजेत थोड़ी गाफिलता आली असावी. या गोष्टीचा फायदा घेऊन दि.१२ जुलै १६६० रोजी रात्रीच्या वेळी स्वतः शिवराय आपल्यासोबत १००० मावळे, दोन पालख्या १५ उमदे घोड़े घेऊन पन्हाळगडच्या राजदिंडी या दरवाजातून निघाले. या बाजुच्या वाटेत असलेला फौजेचा वेढा फोडून मराठे वेगाने निसटले. शिवरायांनी आधीच आखलेल्या योजनेप्रमाणे शिवाजी काशिद यांना नेहमीचा लवाजमा म्हणजेच एक पालखी आणि ४०० सैनिक देऊन खुद्द स्वतःची वेशभूषा परिधान करण्यास सांगून प्रती शिवाजी म्हणून तयार केले. शिवाजी काशीद यांना प्रचलित राजमार्गाने म्हणजेच मलकापूरकडे जाणाऱ्या मार्गाने विशाळगडकडे पाठवले व स्वतः शिवराय ६०० बांदल सैन्य बरोबर घेऊन हेरानी आधीच विस्मरणात गेलेली प्राचीन फरसबंदी मार्ग शोधून काढला होता. या तत्कालिन प्रचलित नसलेल्या मधल्या वाटेने विशाळगडच्या दिशेने निघाले, शिवाजी काशिदांची पालखी आणि ४०० सैन्य राजमार्गाने जात असताना रात्री चांदण्याच्या उजेडात शत्रुसैन्याला दिसली. या शत्रू सैन्याने काशिदांची पालखी घेरली. यावेळी नक्कीच तुंबळ युद्ध झाले असणार कारण शिवराय सहजासहजी पकडले जाणार ही गोष्ट कोणालाही पटणारी नव्हती.दुर्दैवाने यावेळी शिवाजी काशिदांना पकडले आणि चार दरवाज्याखाली असलेल्या जोहरच्या छावणीत आणले. सिद्दी जोहरच्या छावणीत शिवरायांना ओळखणारे अनेक सरदार होते. हा शिवाजी नाही हे समजताच सिद्दीने प्रती शिवाजी दिसणाऱ्या शिवाजी काशिदांना भाल्याने मारले. ( *** शिवाजी काशीद यांना कसे मारले हि कथा पूर्वी पासून पन्हाळगड परिसरात सांगितली जाते.)
(*** या ठिकाणी शिवा काशिदांचे व्यक्तिमत्व जानणे गरजेचे आहे कारण स्वतःचा मृत्यू समोर असूनही स्वतःहून या अग्निकुंडात उडी घेणारा हा वीर किती स्वामिनिष्ठ होता, हे समजते तसेच अवघ्या ७ ते ८ महिन्याच्या सानिध्यात पन्हाळगडच्या पायथ्याच्या या लोकांवर शिवरायांची कोणती छाप पाडली असावी. या घटनेतून शिवरायांचे व्यक्तिमत्व किती प्रभावी होते हे या प्रसंगातून समजते.)
यानंतर शिवराय नेमके कुठे गेले असतील याचा अंदाज घेऊन सिद्दी जोहरने आपला जावयी सिद्दी मसूद याला शिवरायांच्या मागावर पाठवले.सिद्दी आपले घोडदळ घेऊन राजमार्गाने विशाळगडकडे अत्यंत वेगाने गेला, जोहरने लगोलग कर्नाटकी पायदळ देऊन पिडनायक बेडरला दुसऱ्या मार्गाने शिवरायांच्या मागावर पाठविले. या अवधीत महाराजांनी बरेच अंतर कापले होते. महाराज ज्या मार्गाने गेले त्याचे वर्णन समकालीन कवी परमानंद यांनी आपल्या शिवभारत या ग्रंथात केले आहे. ते पुढील प्रमाणे " महाराज रात्रीच्या पहिल्या प्रहरी निघाले. आश्चर्याची गोष्ट हि की महाराज असे पालखीत बसून जाताना त्यांच्या मागून सहाशे पदाती गेले. महाराज प्रवास करीत असताना त्यास हेरांनी पूर्वी पाहून ठेवलेल्या मार्गावरील उंचसखल भूमी, विजांनिही तत्क्षणी दाखविली. पुढे मधून मधून पडलेल्या शिळाच्या योगे उंचसखल असलेल्या पर्वताच्या तुटलेल्या कड्यावरून पडताना गर्जना करणाऱ्या नद्याच्या योगे अतिदुर्गम झालेला निळ्या शेवाळाच्या योगे घट्ट असा जांघडभर चिखल असलेला ज्याच्यावर मनुष्याचा संचार दृष्टीस पडत नव्हता असा हेरांनी आधीच पाहून ठेवलेला तो मार्ग रायगडचा स्वामी राजा शिवाजी आक्रमून गेला".
या मार्गावरून जाताना पांढरेपाणी गावाजवळील फरसबंदी मार्गे कासारी नदी ओलांडून हे सैन्य १३ जुलैच्या पहाटे गजापुराच्या खिंडी जवळ आले.
(***** खिंड याचा अर्थ भरगच्च झाडांनी व्यापलेल्या जंगलातील मधली वाट असा भाग होय. सध्या दाखवली जाणारी खिंड हि नैसर्गिक घळ आहे.या ठिकाणी कड्यावरून येणाऱ्या सैन्यास अडवणूक करणे शक्य नाही. या परिसरात अनेक ठिकाणे आहेत जिथं स्थानिक लोक हिच खरी खिंड असे सांगतात.मुळात इतिहास पाहता चौकेवाडी म्हणजेच पांढरेपाणी येथे युद्धास तोंड फुटले आणि विशाळगडच्या पायथ्याशी शेवटचे घनघोर युद्ध झाले. हेच सत्य आहे.)
विशाळगड थोड्याच अंतरावर राहिला होता तोपर्यंत हेरांनी मसूद सेना आल्याची बातमी महाराजांना दिली. आता वेळ आणीबाणीचा होता महाराजांसमोर आता दुहेरी पेच होता. एक म्हणजे येणाऱ्या मसुद सेनेला थोपवायचा आणि दुसरा विशाळगडच्या पायथ्याशी वेढा घालून बसलेले शत्रू जसवंत दळवी आणि सूर्यराव सुर्वे यांचा वेढा फोडायचा. शिवरायांनी वेळ न दवडता बांदल सेनाप्रमुख रामाजी नाईक यास बोलावले आणि पाठीमागून येणाऱ्या शत्रू सैन्यास थोपवण्याची आज्ञा दिली. यावेळी बांदल सेनापती बाजीप्रभु देशपांडे पुढे आले आणि महाराजाना म्हणाले, रायाजी नेणते (लहान) आहेत. त्यांना घेऊन आपण पुढे जावे. आम्ही निम्मे लोक घेऊन शत्रूस रोखतो. महाराजांनी मान्यता दिली आणि महाराज बाजीला म्हणाले, 'गडावर पोहोचताच तोफेची इशारत दिल्यावर लगोलग निघून येणे. सर्व मावळ्यांनी महाराजांना मुजरे केले. छत्रपती शिवराय रायाजी नाईक आणि ३०० मावळे यांना सोबत घेऊन पुढे विशाळगडच्या दिशेने निघून गेले. इथे खिंडीत ३०० मराठा मावळ्यांनी युद्धाची तयारी सुरू केली. पन्हाळगडापासून खिंडीपर्यंत सतत अविश्रांत धावणारे मावळे पुन्हा जोमाने कामास लागले बाजीप्रभू, संभाजी जाधव, हैबतराव बांदल, विठोजी काटे इत्यादी प्रमुखांनी मावळ्यांना चेतवले गनिमी काव्याचे युद्धास उपयुक्त अशा नैसर्गिक साहित्याचा संचय करून मावळे दबा धरुन शत्रूवर तुटून पडण्यास तयार झाले. समोरून येणारे मसूदचे २ ते ३ हजारांचे घोडदळ मावळ्यांना दिसले, शत्रू जवळ येताच कड्याच्या उंचावर उभ्या असलेल्या मावळ्यांनी दगडांचा एकच मारा सुरू केला. दगडाच्या एक एक ठोक्यानिशी मसूद सेनेतील मोहरे पडू लागले मराठ्यांनी आपल्या गोफणीच्या सहायाने लांबूनचं मसूद सेनेतील पहिल्या तुकडीचा फडशा पाडला. याचवेळी कर्नाटकी पायदळ सैन्य घेऊन पिडनायक बेडर आला. शत्रूचा लोंढा वाढला पण बाजीच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी मोठा पराक्रम केला,यावेळी मराठे तलवार, भाला, विटा, सांग यासारख्या प्रभावी शस्त्रांनी शत्रूवर तुटून पडले. इकडे विशाळगडच्या पायथ्याला स्वतः शिवराय दोन्ही हातात दोन शस्त्रे धारण करून वेढा देऊन बसलेल्या सुर्वे आणि दळवी यांच्या फौजेवर तुटून पडले, अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे शत्रू सैन्यास सावरण्याचीही भ्रांत राहिली नाही. स्वतः महाराजांना लढताना पाहून मराठा मावळ्यांना चेव चढला. महाराजांनी अल्पावधीत हा वेढा फोडला आणि विशाळगडावर पोहोचले. इकडे गजापूरच्या खिंडीत ३०० मावळे अत्यंत त्वेशाने लढत होते. अनेक जखमी झाले धारातीर्थी पडले. या मावळ्यांना फक्त एकच ध्यास होता तो म्हणजे विशाळगडावरून येणाऱ्या तोफेच्या आवाजाचा म्हणजेच शिवराय सुखरूप गडावर पोहोचण्याचा. या लढाईत बाजी प्रभू,संभाजी जाधव ,हैबतराव बांदल यांच्यासह अनेक मराठा योद्धे धारातीर्थी पडले.उरलेले मावळे तोफांचे आवाज ऐकताच जंगलात नाहीसे झाले.मसूदची फौज जिवाच्या आकांताने विशाळगडच्या पायथ्यापर्यंत धावत आली. पण महाराज सुखरूप विशाळगडावर पोहोचले होते. विशाळगडाला वेढा घालण्याचा प्रयत्न मसूद सेनेने केला पण विशालगडावरील ताज्या दमाची मराठा फौज शिवरायांनी वेढा घालू पाहणाऱ्या मसूदसेनेवर पाठवली. शिवरायांच्या मराठा फौजेने मसुदावर प्रचंड हल्ला केला या जबरदस्त प्रहारासमोर मसूदसेना टिकू शकली नाही. या युद्धाचे मोठे बहारदार वर्णन समकालीन कवी परमानंद आपल्या शिवभारत या ग्रंथात केले आहे. परमानंद म्हणतो.... "क्रोधाने डोळे लाल झालेले असे शिवरायांचे योद्धे गडावरून खाली उतरून, मेघाप्रमाणे गर्जना करीत धावून जाऊन, सावधपणे वेढा देणाऱ्यांवर हल्ला करून, उड्या घालून आणि तीक्ष्ण तलवारींनी कापून काढले. तेथे जसवंतराव सूर्याजीराव व दुसरे पुष्कळ सामंत त्यांचा मारा सहन करू शकले नाहीत. पळून जाणाऱ्या त्या सैन्यास परतवून वेगवान मसूदने ग्रहावर हल्ला केला त्याचप्रमाणे शत्रूंवर हल्ला केला तेव्हा तलवारांनी व शक्तींनी एकमेकास जोराने मारणाऱ्या त्या दोन्ही सैन्यांमध्ये मोठे युद्ध झाले. तेव्हा बाहुबलीच्या उन्मत झालेल्या विघ्नाप्रमाने चालून आलेल्या सिद्द्याना युद्धनिपुण मराठयांनी लोळविले. यावेळी फुटलेली शिरस्त्राणे, तुटलेले हातपाय, मस्तक, खांदे मांड्या हे सर्व रणभूमीवर विखुरले होते. कोवळ्या गवताने अत्यंत हिरवीगार असलेली विशाळगड लगतची भूमी शत्रूकडील वीरांच्या रक्ताने एकदम लालभडक झाली".,,,,,,,
श्री शिवछत्रपतींच्या आयुष्यातील अत्यंत रोमहर्षक आणि पराक्रमी इतिहासाचा साक्षीदार असणारा पन्हाळगड ते विशाळगड पर्यंतचा मुलूख हा शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे तसेच अनेक मराठा मावळ्यांच्या बलिदानाने अभिषिक्त झालेला आहे. हा इतिहास एका खिंडीपुरता मर्यादित नसून या पूर्ण परिसरातील असणाऱ्या अनेक ऐतिहासिक घटना ऐतिहासिक वास्तूंच्या अवशेषानी पावन झाला आहे. या पावन परिसराचे पावित्र्य जपा आणि आपला इतिहास जसा होता तसाच रहुद्या त्याला आधुनिक सुशोभीकरणाचा काळा डाग लावू नका.
"जै भवानी,वीर शिवाजी"
राम यादव
कोल्हापूर
१४ जुलै २०२३
No comments:
Post a Comment