जवळा येथील अहिल्याबाई होळकर बारव शिलालेख .
हा शिलालेख अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्म गाव चौंडी गावाशेजारी मौजे जवळा गावात गावापासून अर्धा किमी अंतरावर भैरोबा मंदिराशेजारी एका चौरसाकृती आकाराच्या भव्य अश्या मोठ्या बारवेच्या पायऱ्या उतरल्या कि उजव्या बाजूस दोन शिळेवर कोरलेला आहे. विशेष म्हणजे ही बारव भव्य असून एका प्रकारचा मोठा तलाव असल्यासारखी असून तिचे प्रवेश द्वार उत्तराभिमुख आहे ..सदर शिलालेख कोरीव स्वरूपाचा असून १० ओळीचा शुद्ध मराठी भाषेत आहे .शिलालेख दोन शिळेवर दोन भागात विभागला आहे शिलालेखाची अक्षरे वातावरणाचा परिणाम तसेच पाऊस माऱ्यामुळे थोडी जीर्ण झाली आहेत . त्यामुळे अक्षरे स्पष्ट दिसत नाहीत.शिलालेखाची सर्व अक्षरे सुस्थितीत नसून काही भागात तुटली आहेत . सुरवातीला व शेवटी उभे दोन दंड आहेत थोड्या प्रयत्नाने शिलालेख अगदी सहजपणे वाचता येतो.
गावाचे नाव : मु.पो जवळा (बहिरोबा मंदिर ) ता. जामखेड , जि. अहमदनगर :
शिलालेखाचे वाचन :
१. II श्री गणेशाय नमः स्वस्ति II
२.II श्री नृप शालिवाहन शके II
३.II १७०८पराभव नामा द्वी II
४.II उत्तरायने वैशाख शुक्ल II
५.II ३ तृतीया इंदू
६. वासरे समदिनी
७. श्रीमंत मातुश्री
८.अहिल्याबाई
९. होळकर यांनी
१०.केला असे. II
जी.पी.एस. : १८°३४'३५.५ "N ७५°१५'२७.७"E
शिलालेखाचे स्थान :-बारवेच्या मुख्य प्रवेशद्वार पायऱ्या उतरल्या कि उजव्या बाजूस दोन शिळेवर दोन भागात कोरलेला आहे
अक्षरपद्धती : कोरीव स्वरूपाचा लेख आहे
भाषा : शुद्ध मराठी देवनागरी आहे
प्रयोजन : बारवचे जिर्णोधार /बांधकामाची पूर्ण केल्याची स्मृती जपणे .
मिती / वर्ष : –शालिवाहन सकें १७०८ पराभव नाम संवत्सर वैशाख शुक्ल तृतीया इंदुवासरे
काळ वर्ष : १८ वे शतक -१ मे सन १७८६{ सोमवार }उत्तरायण
कारकीर्द :-सवाई माधवराव पेशवे ,
व्यक्तिनाम : पुण्यश्लोक श्रीमंत मातोश्री अहिल्याबाई होळकर .
ग्रामदेवता :-श्री गणेश,.
शिलालेख संशोधन:- श्री. राजेश पोपटराव इंगळे
शिलालेखाचे वाचक : श्री.अनिल किसन दुधाने .
प्रकाशक :
अर्थ :- शालिवाहन शकाच्या १७०८ व्या वर्षी पराभव नाम संवत्सरा मध्ये वैशाख शुद्ध तृतीया या महिन्यात सूर्याचे उत्तरायण चालू असताना म्हणजेच सोमवार १ मे १७८६ या दिवशी मौजे जवळा येथे पुण्यश्लोक मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांनी एका बारवेचे बाधकाम पूर्ण केले .
शिलालेखाचे महत्व :- शिलालेखाची सुरुवात श्री गणेश स्तुतीने झाली आहे. शिलालेखाची शिळा गुळगुळीत असून त्यावरील अक्षरे देखील सुबक असून एकसारखीच आहेत जागे अभावी दोन वेगवेगळ्या शिळेवर लेख कोरला आहे पहिल्या शिळेवर प्रत्येक ओळीच्या सुरवातीला व शेवटी उभे दंडदिले आहेत.मात्र दुसऱ्या शिलेच्या सुरवातीच्या व शेवटच्या शब्दाला दंड दिले आहेत.अहिल्याबाई यांचे जन्मगाव चौंडी हे गाव आहे .याच गावाशेजारी जवळा हे गाव त्याच्या जहागिरीत येते ,त्या ठिकाणी शेती व शेतकऱ्यांच्या सुविधे करिता बारव बांधून त्यांनी एक सामाजिक व पुण्याचे कार्य शिलालेख स्वरुपात कोरून कायम स्वरूपी समाजासमोर ठेवले आहे .शिलालेखात अहिल्याबाई होळकर यांचा उल्लेख श्रीमंत मातुश्री असा केला आहे . पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना कित्येक उपाधीने संबोधले जाते परंतु अहिल्याबाई होळकर यांना श्रीमंत मातोश्री उपाधीने संबोधले गेलेला हा एकमेव पहिला शिलालेख आहे .आणि हेच या शिलालेखाचे विशेष महत्व आहे .
अहिल्याबाई होळकर यांची माहिती :-
पुण्यश्लोक अहिल्याबाई यांचा जन्म चौंडी या गावी माणकोजी आणि सुशिलाबाई यांच्या पोटी ३१ मे १७२५ साली झाला.पुढे माणकोजी शिंदे यांनी अहिल्याबाई यांना लिहायला वाचायला शिकवलं तिला समृद्ध, कर्तुत्ववान बनवलं. खंडेराव होळकर यांची धर्मपत्नी आणि मल्हारराव होळकर यांची सून म्हणून १७३३ ला होळकर कुटुंबामध्ये नांदू लागली. इ.स १७५४ कुंभेरीचं युद्ध झाले आणि खंडेराव होळकर यांनी युद्धामध्ये आपला देह सोडला. खंडेरावांच्या मृत्यूनंतर मल्हाररावानी अहिल्याबाई याना सती जाऊ दिले नाही.मल्हारावांनी अहिल्यामधील तेज, हुशारी, कर्तुत्व क्षमता जाणली होती.मल्हारराव होळकर यांच्या मृत्यू नंतर त्याच्या माळव्याच्या जहागिरीचा कारभार अहिल्याबाई यांनी चोख बजावला होता .उत्तम राज्य कारभार,आणि प्रभावी नेतृत्व याच्या जोरावर त्यांनी आपल्या राज्याची घडी वसवली होती माळव्याच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या ‘तत्त्वज्ञानी राणी’ धर्मरक्षक,महान कर्मयोगिनी,साहसी,पराक्रमी,स्त्रीकर्तृत्वाचा दीपस्तंभ जणू सद्गुणांची खाण म्हणून पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई ओळखल्या जातात. एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे.
उचित न्यायदानासाठी त्या प्रसिद्ध होत्या. शेती व शेतकरी उद्धारासाठी त्यांनी अनेक निर्णय घेतले.त्यांनी इतक्या विहरी आणि बारवा बांधल्या कि आजही कोणतीही बारव आणि मंदिरे नदी घाट पाहिले कि त्यांची पहिली आठवण होते . अहिल्याबाई धार्मिक होत्या परंतु धर्मांध नव्हत्या. राणी अहिल्याबाईंनी भारतभर अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले व त्यांचा जीर्णोद्धार केला. त्यामध्ये अनेक तीर्थ स्थळाचा प्रामुख्याने समावेश आहे. श्रावण वद्य चतुर्थीस १३ ऑगस्ट १७९५ साली अहिल्याबाई चे प्राण पंचतत्वात महेश्वर येथे नर्मदा नदीकाठी विलीन झाले.त्या ठिकाणी त्यांची भव्य अशी समाधी छत्री उभी केलेली आहे .
अश्या थोर माऊलींचे वर्णन करताना शाहीर प्रभाकर म्हणतात
सती धन्य धन्य कलियुगी अहिल्याबाई।
गेली किर्ती करूनिया भूमंडळाचे ठायी ।
महाराज अहिल्याबाई पुण्यप्राणी।
संपूर्ण स्त्रियामध्ये श्रेष्ठ रत्नखाणी।।
संक्षेप :- शुक्ल/श्रुध :-शुद्ध ,सामदिनी –त्याच समांतर दिवशी.(जोड दिवस )
संदर्भ -(IE VII -३७४ )
माहिती व संकलन :-अनिल किसन दुधाने.
No comments:
Post a Comment