लोहगाव येथील कासार विहीर ( बारव ) शिलालेख
हा शिलालेख पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील लोहगाव विमानतळ मार्गावर मुख्य रस्त्यालगत भारतीय विमान स्थळ हद्दीत मौजे कसबे लोहगाव येथे गावात असलेल्या एका चौकोनी आकाराच्या बारवेवर पायऱ्या उतरल्या कि समोर मुख्य भिंतीवर एका देवकोष्ठ सारख्या आकाराच्या चौकटीत मध्यभागी बसवला आहे. शिलालेख उठाव स्वरूपाचा असून ६ ओळीचा असून जुन्या वळणाच्या मराठी भाषेत आहे .काळाच्या ओघात शिलालेखाची अक्षरे झिजलेली असून पुसट झालेली आहेत ,तर कोपर्यावरील काही अक्षरे तुटून गहाळ होत आहेत .या शिलालेखात विशेष असे एक तागडीचे निशाण आहे .लेखात खुप प्रमाणत संक्षिप्त रूपे आहेत .
गावाचे नाव : मु पो लोहगाव .ऐअर फोर्से हद्द , ता.हवेली , जि. पुणे.
शिलालेखाचे वाचन :
१.श्रीगणेशायनमाग्र काळीकायेन्म (फुटले )
२.श्रीशाळीवाहन शके १५३४ परीध
३.वी शंवशरे कारतीक वदी तीज आत
४.र तदीनी सीउजी व काळोजी पीता केशो
५.जी माता रंभाई वंश थीटे शोमवंशी
६.कासार कसभे लोहगांव श्रीरस्तु ,!!!
जी.पी.एस. 18.594623,73.923033
शिलालेखाचे स्थान : बारवेच्या मुख्य पायऱ्या उतरल्या कि समोर मध्यभागी एका चौकटीत बसवलेला आहे
अक्षरपद्धती : उठाव स्वरूपाचा लेख आहे
भाषा/लिपी : मराठी देवनागरी(जुने वळण )
प्रयोजन : पिण्याच्या पाण्याकरिता बारव विहीर बांधल्याची / बांधकामाची स्मृती जपणे.
मिती / वर्ष : शके १५३४ परिधावीनाम सवत्सरे कार्तिक वद्य ३
काळ वर्ष : सतरावे शतक – रविवार १ नोव्हेबर १६१२
कारकीर्द : निजामशाही ,जहागीर शाहजी राजे भोसले .
व्यक्तिनाम : शिवजी ,काळोजी ,केशोजी ,रंभाई .
ग्रामनाम :-मौजे कसबे लोहगाव
अर्थ : शालिवाहन शकाच्या १५३४ व्या वर्षी परिधावी नाम संवत्सरातील कार्तिक वद्य ३या दिवशी
म्हणजेच १ नोव्हेबर १६१२ रविवार या दिवशी श्री गणपती चरणी तत्पर असलेले मौजे कसबे लोहगाव येथील सोमवंशी कुळातले केशोजी पिता व रंभाईमाता यांचे पुत्र शिवजी व काळोजी यांनी मौजे लोहगाव गावा मध्ये एक पिण्याच्या पाण्यासाठी विहीर बांधली ,किवां विहारीच्या च्या जीर्णोद्धाराला सुरुवात केली किंवा ते काम पूर्ण झाले.
शिलालेखाचे वाचक : कै ल .रा .पांगारकर
प्रकाशन :-तुकोबाचे चरित्र - पुरुषोत्तम लाड –पान १४१, भा. ई सा ,वार्षिक इतिवृत्त तृतीय (शके १८३७ )
संदर्भ -(IE VI-२१)
संक्षेप :- श्रीगणेशायनमाग्र–गणेशायनमा,शाळीवाहन-शालिवाहन,शके–सके,शंवशरे–संवत्सरे,कारतीक–कार्तिक ,वदी-वद्य - तीज –तृतीया , तदीनी-त्या दिवशी . सीउजी-शिवजी ,शोमवंशी –सोमवंशी ,कसभे –कसबे
शिलालेखाचे महत्व :-.
जगतगुरु तुकाराम महाराज यांचे आजोळ लोहगाव ,येथे कनकाई पोटी त्यांचा जन्म झाला .तुकोबाराय यांची बहुतांशी कीर्तने लोहगाव येथे झाली आहेत . तुकोबां आजोळी लोहगांवीं आल्यानंतर भजन कीर्तने करीत व त्यांच्या१४ टाळकऱ्या पैकी ४ टाळकरी हे लोहगांवचे होते १. कोंड पाटील. २. आंबाजीपंत ३. नावजी माळी ४. शिवजी कासार होत.शिवजी हा तुकोबाराय यांचा चागला मित्र होता. ते लोहगाव येथील शिळा मंदिर यथे बोलत बसत .रंभाई व केशोजी यांचा मुलगा शिवजी व काळोजी यांनी पिण्याच्या पाण्याकरिता विहीर बांधली. या वरून शिलालेखात असलेलें शिवजी कासार हे धार्मिक ,व दानी वृत्तीचे असून त्यांनी बारव बांधून समाजासाठी मोठे सामाजिक कार्य केले आहे . या पैकी शिवजी कासार हा मोठा मातब्बर असून त्याच्याकडे ५०० बैल होते यांचा कासाराचा व्यवसाय होता म्हणजे कथिल भांडी ,पत्रे , बांगड्या बनवायचा व विकायचा व्यवसाय होता .पूर्वी कथिलाच्या बांगड्या बनवीत असत .कथिल म्हणजे शिसे , तांबे पितळ ,जस्त ,जर्मन इत्यादी धातूचे मिश्र स्वरूप असते . त्या वस्तू मोजावयास तराजू लागत असे .एखादा व्यक्ती व्यापारी आहे आणि व्यापाराचे चिन्ह तराजू आहे ,शिलालेखात वरच्या बाजूस तागडी /तराजू याचे चिन्ह कोरलेला आहे .एखाद्या शिलालेखात एका ठिकाणी पिण्याच्या पाण्या करिता बारव बांधून एक चांगले सामाजिक काम करून त्यावर आपल्या व्यवसायाचे, व्यापाराचे चिन्ह (तागडी )कोरून समाजासमोर कायमचे कोरून ठेवणे हेच या शिलालेखाचे विशेष महत्व आहे .
तुकोबांचे लोहगाव माहिती :-
लोहगाव हे राजमाता जिजाऊ याच्या जहागिरीचे गाव होते
लोहगांव हे येरवड्या कडून पुण्याच्या ईशान्ये बाजूस नऊ मैलांवर लोहगांव असून प्रसिद्ध खेडें आहे तेथील नागनाथाच्या देवळाभोंवतील जागेस लोहगांव हें नांव होतें. असें म्हणण्यास काय आधार आहे तो पाहूं. हे तुकोबांचे आजोळ .त्यांचा जन्म इथला .त्याच्या जीवनाची काही वर्षे लोहगावी गेली .त्यांची बहुतांशी कीर्तने लोहगावी झाली .त्यांच्या १४ टाळकऱ्या पैकी ४ टाळकरी लोहगावचे होते.
तुकोबाराय यांचे १४ टाळकरी नावे :-
तुकोबांचे मुख्य धृपदे टाळकरी १४ होते म्हणून महीपतीबाबाने त्याचा बऱ्याच ठिकाणी उल्लेख केलेला आहे. तुकोबांचे कीर्तनात हे ध्रृपद धरीत.असत
१. महादजीपंत कुलकर्णी देहू गावचे कुलकर्णी- याचा उल्लेख बहिणाबाईचे गाथेतही आलेला आहे - देवालयाच्या बांधकामावर यांची देखरेख होती.
२. गंगाधरबाबा मवाळ - (तळेगाव), अभंग लेखक, हे तुकोबांचे सेवेस लागल्याचा कागदोपत्री उल्लेख आहे.
३. संताजी तेली जगनाडे - (चाकणकर) - तुकोबाचे अभंग लेखक.
४. तुकया बंधू कान्होबा.
५. मालजी गाडे, (येलवाडी) - तुकोबांचे जामात.
६. कोंडोपंत लोहकरे - लोहगाव.
७. गवार शेट वाणी - सुदुंबरे.
८. मल्हारपंत कुलकर्णी - चिखली.
९. आबाजीपंत लोहगावकर.
१०.रामेश्वरभट्ट बहुळकर.
११.कोंडपाटील, लोहगाव.
१२.नावजी माळी - लोहगाव.
१३.शिवबा कासार - लोहगाव.
१४.सोनबा ठाकूर - कीर्तनांत मृदंग वाजवीत असत
लोहगांवकरचे देहूकरांपेक्षांही तुकोबावर ज्यास्त प्रेम होतें.
महिपतबाबांनी केलेंला लोहगाव चा उल्लेख -
मधुरेसी कृष्ण जन्मला पाही
परी गोकुळीच्या सुखासी पार नाहीं ।
तैसा तुकयाचा प्रेमा सर्वही लोहगावी लूटिला ॥ ( भक्तलीलामृत ३६-१०४)
असें मोठ्या सहृदयपणानें म्हटलें आहे. तुको-बांचे अनेक नामसप्ताह
• तेथीचे जन अवघे भाविक ।
सप्रेम सुख भोगिती. !!
तुकोबांची कीर्तनें देहुत विठ्ठलमंदिरांत, पुणवडीस नागनाथाच्या देवळांत व लोहगावी शिळा मंदिरात याप्रमाणे तीन ठिकाणी मुख्यतः होत. या सर्व ठिकाणांपैकी लोहगाव करांचे प्रेम काही विशेष होते.
लोहगावी ल. रा. पांगारकर व हभप विष्णु- बोबा जोग गेले होते व तेथील गांवकयांच्या मेळांत त्यांच्या घरचे जुने कागदपत्र पाहत पाहत एक रात्र काढली , तेव्हां परंपरेची माहिती, कागदपत्रांतील पुसट उल्लेख, गांवची रचना व महिपतोबाबांचे वर्णन या सर्वांचा उत्कृष्ट मेळ पटून तुकोबांचे लोहगांव तें हेंच याविषयी त्यांनी खात्री करून घेतली .
(१) तुकोबांचे आजोळ तेथें 'मोझे' आडनावाचें एक घराणें होतें तें होय. तुकोबांच्या आजोळच्या घरांत त्यांची बसायची एक शिळा आहे. तुकोबा लोहगावी येत तेव्हां या शिळेवर बसून भजन करीत. ती शिळा तुकोबांचे पश्चात एका सुंदर वृंदावनावर ठेवली असून वारकरी मंडळी तेथें दररोज भजन करित असत पंढरीहून परत येताना येथे त्यांचा मुक्काम कार्तिक वद्य ९ सतेथे आजही होतो..
(२) नावजी माळी व शिवजी कासार यांची लोहगावी वस्ती असून शिवजी तर मोठा मातबर होता. शिवजी कासाराचा वाडा मोठा असावा असे आज त्याच्या पडक्या भिंतींवरून दिसते. वाडा पश्चिमाभिमुख होता. या वाड्यासमोर महादेवाचे दगडी लहानसें देऊळ आहे त्या देवळांत तुकोबा अनेकवार शिवजी बरोबर बोलत बसत.या देवळात तुकोबांनी शिवजीस उपदेश केला होता .शिवजी कडे ५००बैल होते कथिल शिसे भांडी , पत्रे वगैरेंचा त्याचा मोठा व्यापार होता. तुकोबांचे वेळी पुनवाडी गाव कसबे लोहगावच्या खाली होते . लोहगावची अनेक पडकी घरें, तीथला विस्तृत महारवडा, तेथील माळी व कासार यांची घरे व एकंदर गांवाचा डौल पाहतां लोहगांव तुकोबांच्या काळी मोठा कसब्याचा गांव होता असें वाटतें. लोहगावाहून पायवाटेनें आळंदी २॥ कोस, देहू ७ कोस व सासवड ९ कोस आहे. लोहगावी कासार, खांदवे, मोझे व माळी यांची वस्ती पुरातन आहे. माळी लोकाची ४ बुडे इत्यादी वतनें आहेत. पैकी १ तळेकर २ घोरपडे ३ गरुड व ४ भुकण.
(३) दोनशे वर्षापूर्वीच्या कागदपत्रांत भुकण माळी विशेष सांपडतात व नांवजी हें नांवही क्वचित् सांपडतें. एका गांवकीच्या पत्रांत ' सदरहु कान्होजी रायगडास महाराजापाशी चाकरीस होता तो मरावयास गावी आला' असे वाक्य आढळलें. तात्पर्य काय की नावजी माळी व शिवबा कासार यांच्याही पूर्वीपासून माळी, व कासार यांची गांवांत वस्ती असून तुकोबांचे आजोळ घराणें जें मोझे त्यांची ही येथे वस्ती जुनाट आहे.
( ४ ) गांवांत तुकोबांचे देऊळ आहे. या लोहगांवाशिवाय तुकोबांचे असे स्वतंत्र देऊळ अन्यत्र कोठेही नाही . त्या तुकाराम महाराज मंदिराची स्थापना गुंडोजीबाबांच शिष्य इराप्पा यांनी केली आहे. वीरनाथ महाराज हे तुकाराम महाराजांचे अवतार आहेत अशी मान्यता आहे . हे स्वतः वीरशैव कुळातील पण वारकरी .यांनीच तुकोबांच्या पादुका व शिळा शोधून काढून त्याची लोहगावी स्थापना केली व नाथषष्ठीला उत्सव सुरु केला तो आजही नियमितपणे होतो.
शके सोळाशे व्याण्णवमध्ये | तुका अवतरला स्वतः सिद्ध ||
वीरा नाम बीज बोध । अतिवर्णवीरशावात ।।(श्री गुरुवीरलीलाअमृत -८ )
(५) पुणवाडीच्या बाजूनें लोहगांवांत शिरतांच कासारविहीर लागते. ती मोठी भव्य असून रमणीय आहे. तिचे पाणी आज पिण्यासारखें गांवकऱ्यानी ठेवले नाही. पूर्व, पश्चिम व दक्षिण या तीनही बाजूल तीन तीन कोनाडे असून ४०/५० ब्राह्मण संध्या करावयास बसतील अशी सुंदर चौरस जागा विहिरींतच आहे. विहिरीत दक्षिणेच्या बाजूस शिलालेख कोरला आहे. तो शके १५३४ मधील आहे, शिलालेखावर तागडीचें निशाण आहे. मुख्य मधला शिलालेख सुवाच्य आहे, बाजूची कांही अक्षरें तुटल्या मुळे लागत नाहीत.या शिलालेखावरून सदर गांव शके १५३४ मध्य ' कसबे लोहगांव होते. व त्या साली सीउजी व काळोजी कासार यांनी सदर विहार बांधली हे उघड दिसतें. सदरचा शिलालेख येथे वर दिला आहे. पण वरील सर्व कारणावरून तुकोबांचे लोहगांव हेच होय असे सर्व मते ठरावें असें वाटतें.
लोहगाव येथील शिवजी कासार यांचा इतिहास :
शिवजी कासार यांच्या विषयीची आख्यायिका अशी की, शिवजी कासार हे तुकोबांचे१४ टाळकरी पैकी एक टाळकरी. तुकोबांसोबत शिवबा कासारही हरिनामात सदैव गुंग असत. हरिभक्तीत, विठ्ठलभक्तीत दिवसातला बहुतांश वेळ त्यांचा जायचा. साहजिकच कुटुंबाकडे शिवजी कासारांचे दुर्लक्ष होई. त्यामुळं तुकोबांवर शिवबा कासारांच्या पत्नीचा राग होता. एक दिवस तिनं तुकोबांना अद्दल घडवायची ठरवलं. त्यानुसार तिनं तुकोबांना जेवण्यासाठी बोलावलं. अंघोळ करण्यास सांगितलं, अंघोळीसाठी शिळेवर बसले असताना अचानक शिवबा कासार यांच्या पत्नीनं खूप गरम पाणी त्यांच्या अंगावर ओतलं; मात्र हरिनामात दंग असलेल्या तुकोबांना या अति उष्ण पाण्याचा काहीच त्रास झाला नाही. मात्र, थोड्याच वेळात शिवबा कासार यांच्या पत्नीच्या अंगावर गरम पाणी पडावे, तसे फोड उठले. वेदनेने ती विव्हळू लागली. अखेर रामेश्वर भट्ट यांनी तिला तुकोबा बसलेल्या शिळेखालची माती अंगास लावण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तिनं शिळेखालची माती लावल्यानं अंगाची आग थांबली. लोहगावात शिळा मंदिरात जी शिळा आहे, त्यावर बसून तुकोबा अंघोळ करीत असत. जेव्हा कधी ते देहूत नसत, तेव्हा ते हमखास लोहगावातच असत. कारण देहु पेक्षा त्यांचा अधिक काळ लोहगावात व्यतीत झाल्याचं सांगितलं जातं. तीच ही शिळा. तिची नित्य पूजा होत असून, या शिळा मंदिराकडून तुकाराम बिजेसह विविध सणवार तेथे साजरे केले आजही जातात .
संदर्भ :-तुकोबाचे चरित्र - पुरुषोत्तम लाड,
@माहिती आणि संकलन :-अनिल दुधाने
टीप:- सदर कार्यात लोहगाव येथील श्री .सुरेश जाधव सर ,श्री. विजय खांदवे, प्रमोद बागुल यांचे विशेष सहकार्य व मदत झाली .
No comments:
Post a Comment