मराठे आणि राजपूत परस्पर संबंध. (पूर्वार्ध)
आपण भारताच्या इतिहासात महाराणा प्रताप,बाप्पा रावळ,छत्रसाल,दुर्गा दास राठोड आदि राजपूत योद्ध्यांनी धर्मवेड्या मोगल सुलतानांना कडवट प्रतिकार करून त्या काळात हिंदू धर्म टिकविण्यात मोठे बलिदान,योगदान दिल्याचे वाचले आहे.तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा घास घ्यायला चालून आलेल्या मोगली सैन्यात राजपूत सरदारांचा भरणा असल्याचे पण वाचले आहे. मिर्झाराजे जयसिंगनी तर शिवरायांची अशी कोंडी केली की महाराजांना मिर्झा राजांच्या सर्व अटी मान्य करून औरंगजेबच्या दरबारात पेश व्हावे लागले,तर दुसरीकडे जसवंतसिंह,उदेभान राठोड वगैरे राजपूत सरदार/किल्लेदारानी प्रदीर्घ काळ पुण्याच्या आसपास मराठ्यांच्या हालचालीवर मर्यादा टाकल्या.तृतीय पानिपत युद्धात राजपूत तटस्थ राहिले जे अबदालीच्या पथ्यावर पडले.मराठे आणि राजपूत.. दोघेही हिंदू. मोगल दोघांचा समान शत्रू,दोघेही शिवभक्त. असे असून सुद्धा ह्या दोघात भावनिक समरसता आली नाही.जय एकलिंगजी अल्ला हो अकबर बरोबर मिळून हर हर महादेवाशी लढले. नंतर हर हर महादेव जय एकलिंगशी लढले. दोघांचा शत्रू समान असून सुद्धा मराठे आणि राजपूत एकत्र येऊन त्याच्याशी लढण्या ऐवजी एकमेकानविरुद्ध का लढले ? याचे उत्तर जाणून घेण्यासाठी आज ह्या लेखात राजपूत आणि मराठे ह्या भारतातील दोन प्रमुख लष्करी शक्तींच्या (dominant military powers) संबंधांचा आढावा घेतला आहे
मराठे राजपूत संबंधाचे मुख्यतः तीन भाग पाडता येतील.
1-अगदी सुरुवातीपासून ते औरंगजेबच्या मृत्यू पर्यन्त,
2-औरंगजेबच्या मृत्यू पासून ते तृतीय पानिपत युद्धा पर्यन्त आणि
3-तृतीय पानिपत युद्धोत्तर म्हणजे मराठी सत्तेचा ऱ्हास होऊन इंग्रजी अंमल स्थापन होईपर्यंत.
समस्त हिंदूंना अत्यंत पवित्र असणाऱ्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एकट्या महाराष्ट्रात पांच ज्योतिर्लिंगे आहेत.तसेच बारा वर्षातून एकदा येणारा सिंहस्थ कुंभ मेळा नाशिकला गोदावरी नदीच्या सान्निध्यात होतो. ह्या दोहोंमुळे महाराष्ट्रात हिंदुस्थानातील सर्व भागातून यात्रेकरू येत असतात.त्यामध्ये उत्तरेकडून सामान्य राजपूत तसेच मोगली सैन्यात कार्यरत असलेले राजपूत सरदार,सैनिक पण असत.त्यांचे ह्या क्षेत्रात उपाध्ये पण असत.18 व्या शतकात मराठ्यांच्या दिल्लीतील प्रसिद्ध हिंगणे वकिलांचे पूर्वज जयपूरच्या कछवाह राजघराण्याचे नाशिक येथील तीर्थोपाध्ये होते. असे संबंध धार्मिक कर्म कांडांशी संबंधित असल्याने व्यक्तिगत पातळीवर होत असत.त्याला राजकारणाचा स्पर्श होत नसायचा.
धार्मिक प्रयोजणा व्यतिरिक्त राजपुतांचा मराठ्यांशी संबंध येत गेला तो त्यांच्या मोगली सैन्यातील सैनिक,सरदार,मनसबदार ह्या स्थानांमुळे.(by virtue of their holding military posts इन Mughal army) ह्या काळात राजपुतांचा मराठ्यांशी संबंध आला तो मराठ्यांच्या शत्रूचे साथीदार (friends ऑफ foe) म्हणूनच. मोगलांनी क्वचितच राजपुताना प्रथम दर्जाचे स्थान दिले. त्यांची तैनाती नेहमी प्रमुख मुस्लिम सरदाराच्या हाताखाली असायची वा कधी कधी दोघे बरोबरीने काम करत असत आणि ह्या दृष्टिकोणातूनच त्यांचे मराठ्यांशी संबंध असायचे, मोगली कारभारात असलेल्या दुय्यम स्थानामुळे त्यांना मराठ्यांशी स्वतंत्र रीतीने संबंध ठेवता यायचे नाही.तसेच मोगलांचे दक्षिण( मराठे,आदिलशाही,व कुतुबशाही) विषयीचे धोरण नेहमीच आक्रमक राहिल्याने आणि राजपूत मोगलांच्या बाजूने लढत असल्याने त्यांचे मराठ्यांचे कधीच जमले नाही. मराठ्यांसाठी जे कुणी मोगलांबरोबर असतील ते सर्व स्वराज्याचे दुश्मन होते. त्या काळात मोगली सत्तेविषयी एकूणच जनमानसात इतके आकर्षण होते की कित्येक मराठे सरदार पण नशीब अजमावण्यासाठी मोगलाना मिळाले पण एकही राजपूत वा मुस्लिम मनसबदार मराठ्यांकडे आलेला आढळत नाही.याचा अर्थ असा नाही की राजपुताना मोगली साम्राज्या विषयी विशेष जिव्हाळा,प्रेम,निष्ठा होती. जयपूर,जोधपुर,यासारख्या काही राजपूत संस्थानिकानि मोगली सत्तेपूढे हार मानून त्यांच्याशी एकतर्फी
(फक्त आपल्या मुली मोगलाना द्यायच्या,त्यांच्या नाही घ्यायच्या) विवाह संबंध जोडून आपली सत्ता टिकवली.मराठे मोगलांशी इतक्या निकराने का लढताहेत हे राजपूत आणि त्यांच्या संस्थानिकांना कधीच उमगले नाही. आपणही मराठ्यांसारखे प्राणपणे लढून स्वतंत्र राहू अशी भावना न कधी त्यांच्यात निर्माण झाली, न तेवढे धैर्य,धाडस ते दाखवू शकले.राजपुतानी मोगलांप्रति इतकी समर्पण भावना ठेवूनही मोगलानी त्यांच्यावर कधी विश्वास ठेवला नाही, त्यांना कधीही स्वतंत्रपणे कुठल्या मोहिमेवर पाठवले नाही. कायम कुठल्या तरी मुस्लिम सरदाराचे लोढणे हेतु पुरस्सर त्यांच्या गळ्यात अडकवलेले असायचे.आदिलशाहीत गेलेल्या मराठे सरदारांची जशी स्थिती होती तशीच मोगलांकडे गेलेल्या राजपूत सरदारांची होती.
औरंगजेब 20 फेब्रुवारी 1707 रोजी मरण पावला त्यानंतर झालेले मोगल बादशाह अधिकाधिक दुबळे आणि त्यामुळे परावलंबी निघाले. त्यामुळे राजपूत मनसबदारांनी त्याचा फायदा उचलून काही प्रमाणात स्वतंत्रपणे वागण्यास,मोगलाना कबूल केलेल्या खंडण्या देण्यात,चालढकल सुरू केली होती. तरी पण मोगलाई च्या दुर्बलतेचा लाभ उठवून स्वतंत्र व्हावे असे कोणाही राजपूत मनसबदारास वाटले नाही.सर्वानी एकत्र येऊन मोगलांच्या गुलामीतून मुक्तता मिळविण्यासाठी झगडणे सोडून ते आपसातच भांडत राहिले.आपसातील भांडणे मिटविण्यासाठी राजपूत मनसबदार नव्याने उदयास आलेल्या मराठी सत्तेकडे धाव घेऊ लागले.औरंगजेबच्या मृत्यू नंतर मराठ्यांची सत्ता वाढत वाढत इतक्या परमोच्च बिंदुला पोहचली की साक्षात मोगल बादशहाला सुद्धा आपले तक्त सुरक्षित ठेवण्यासाठी मराठ्याना पाचारण करण्याची वेळ आली.मोगलांच्या दुर्बलतेमुळे मोगल बादशहाने मोगली राज्याचे अंतर्गत आणि बाह्य शत्रूंपासून रक्षण करण्यासाठी इ. स.1752 मध्ये मराठ्यां बरोबर अहमदिया करार केला,त्याच्या अंमलबजावणी साठी इ. स.1759 मध्ये शाही फर्मान जारी करून त्यांना अधिकार (power) दिले.यामुळे मराठ्याना मोगल साम्राज्या बरोबर केलेले करार,व्यवस्था न पाळणाऱ्या,बंडखोरी करणाऱ्या देशी सत्ताधाऱ्यांना ज्यात राजपूत पण आले,ताळ्यावर आणण्याचे अधिकार मिळाले.याशिवाय आधी सांगितल्या प्रमाणे राजपूत संस्थानीक आपापसातील वाद मिटविण्यासाठी पण मराठ्याना बोलावू लागले.अशा तऱ्हेने औरंगजेब मरण पावल्यावर मराठ्यांचा राजपुतांशी दोन प्रकारे सरळ संबंध येऊ लागला.
औरंगजेब मरण पावल्यावर तीन वर्षानी,इ..स.1710 मध्ये राजपूत संस्थानिकानि पुष्कर सरोवराच्या काठी एकत्र जमून प्रदीर्घ चर्चा करून,यापुढे राजपुतानी आपल्या मुली मुसलमानांस देऊ नये,उदेपूरच्या घराण्याने इतर राजपूत घराण्यांशी बंद केलेले बेटी व्यवहार पूर्वी प्रमाणे चालू करावे,जयपूर,जोधपूर व अन्य राजपूत घराण्यात अनेक स्त्रियांपासून झालेल्या संततीत उदेपूर घराण्याच्या मुलींपासून झालेल्या संततीला राज्याचा वारस नेमतेवेळी प्राधान्य द्यावयाचे,वगैरे बाबी ठरवल्या.उदेपूर घराणे(शिसोदिया) वंशशुद्धीच्या दृष्टीने उर्वरित राजपूत घराण्यांमध्ये सर्वोच्य दर्जाचे समजले जाई.(छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज सुद्धा शिसोदिया घराण्यातील होते.)त्यामुळे उदेपूर घराण्यातील मुलगी पत्नी,सून म्हणून करण्याकडे इतर राजपूत घराण्यांचा कल,इछा असायची. मुळात हा करार मुसलमानां विरूद्ध होता,पण तसे न होता त्यातील वारसा संबंधीच्या तरतुदीवरून राजपुतांमध्येच आपापसात पुढील शंभर वर्षे भयंकर कलह,संघर्ष माजला.दोन्ही पक्ष वाद सोडविण्यासाठी मराठ्यांची मदत घेऊ लागले.परिणाम स्पष्ट होता,हरलेला पक्ष मराठ्यांवर वेळ मिळेल तेव्हा सूड उगवणार! याशिवाय मराठयाना आपल्या हिश्याची चौथाई,सरदेशमुखी तसेच मोगल बादशाहितील थकीत खंडणी वसुल करण्यासाठी पण बळाचा वापर करणे भाग पडल्याने राजपूत मराठ्यां विरुद्ध गेले.वास्तविक अकबराच्या वेळेपासून राजपूत मोगलाना खंडणी देऊन आपली राज्ये सुरक्षित राखत. बादशाह दुर्बल झाल्याचे पाहून त्यांनी खंडणी देण्यास टाळाटाळ् सुरू केली. बऱ्याचदा मागण्या करूनही ही मंडळी खंडणीच्या रकमा भरत नसत आणि थकबाकी फुगत जायची. शेवटचा उपाय म्हणून मराठयाना लष्करी कारवाई करण्याशिवाय दूसरा मार्ग नसायचा. मराठ्यांकडून पराभव दिसू लागताच राजपूत संस्थानिक युद्ध थांबवून तहाची बोलणी सुरू करून थकबाकीतील जमेल तेवढी रक्कम भरून तह करत. मराठे गेल्या नंतर परत पुढच्या वर्षी तोच प्रकार घडायचा. प्रसंगी मुसलमान सरदारांची,अन्य असंतुष्ट राजपूत सरदारांची मराठ्यांविरुद्ध मोट बांधण्याची पण ते हिम्मत करायचे.
अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज,थोरले शाहू महाराज,थोरले बाजीराव पेशवे यांनी जोपासलेला मराठे राजपूत बंधुभाव कालौघात परस्पर शत्रुत्वात रूपांतरित होऊन त्याची किमत ह्या दोघाना आणि पर्यायाने अवघ्या हिंदुस्थानास चुकवावी लागली.मराठ्यांनी राजपुतां मधली भांडणे सोडविण्यात घेतलेल्या पुढाकारामुळे ह्या दोघात झडलेल्या संघर्षांची माहिती उत्तरार्धात दिली आहे.
संदर्भ:1-मराठ्यांचा इतिहास खंड दूसरा आणि तिसरा. संपादक अ. रा. कुलकर्णी आणि ग. ह. खरे
2:मराठी रियासत खंड चार. ले. गो. स. सरदेसाई.
-- Prakash Lonkar.
मराठे आणि राजपूत परस्पर संबंध(उत्तरार्ध)
मराठे आणि राजपूत यांच्यातील संबंध बिघडण्यामागे प्रामुख्याने राजपुतांमधली तीन भांडणे कारणीभूत ठरली ज्यामध्ये मराठयाणी हस्तक्षेप केला होता. त्याचा थोडक्यात आढावा घेऊ या.
1-जयपूर गादी च्या वारसावरून निर्माण झालेला वाद-जयपूर नरेश सवाई जयसिंगला उदेपूर घराण्यातील शिसोदिया परिवारातील मुलीशी विवाह करण्याची खूप इछा होती.आपली मुलगी देण्यासाठी शिसोदिया घराण्यातील महाराणा अमरसिंहने पुढील तीन अटी घातल्या होत्या.1-महाराणा ची मुलगी चंद्रकूवर सवाई जयसिंगच्या सर्व राण्यात थोर (seniormost) समजली जावी.2-तिला होणारा मुलगा सर्वात थोरला समजला जाऊन त्याला जयपूरची गादी मिळावी आणि 3-मुलगी झाल्यास मुसलमानस देऊ नये. जयसिंगने ह्या अटी मान्य केल्यावर महाराणाची मुलगी चंद्रकूवरचा जून 1708 मध्ये जयसिंग बरोबर विवाह झाला.ह्यातील दोन नंबरच्या अटीमुळे पुढे मोठे महाभारत घडले.चंद्रकूवरला पहिली मुलगी झाली,दुसऱ्या वेळी मुलगा—माधव सिंह -झाला.जयसिंगला माधवसिंग जन्माला येण्यापूर्वी अन्य राणी पासून झालेला ईश्वरसिंह नावाचा मुलगा होता.सावत्र मुलांमधील वारसाचा वाद मिटविण्या पूर्वीच सप्टेंबर 1743 मध्ये जयसिंग मरण पावला. माधवसिंगला जयपूरची गादी मिळावी म्हणून त्याचा मामा महाराणा जगतसिंह ईश्वरसिंहावर चालून आला.चाळीस दिवस आमने सामने उभे राहूनही त्यांच्यात युद्ध झाले नाही.ईश्वरसिंहाने माधवसिंहास 24 लाख रुपये उत्पन्नाचा भाग देण्याचे मान्य केले पण माधवसिंहला ते मंजूर नव्हते.पुन्हा एकदा दोन्ही पक्ष समोरासमोर उभे झाले.ह्यावेळी ईश्वरसिंहाने आपल्या मदतीस मराठ्याना बोलावले होते.शिंदे,होळकर आणि ईश्वरसिंहाच्या संयुक्त फौजानी माधवसिंहाचा धुव्वा उडवला. मराठ्यांच्या मदतीने जय मिळाल्यावर ईश्वरसिंहाची बुद्धी पालटून त्याने माधवसिंहाला काही सुद्धा देण्यास इन्कार केला.होळकरांना ईश्वरसिंहाची माधवसिंहाला काहीच न देण्याची भूमिका मान्य नव्हती.त्यांनी सुचविले की माधवसिंहाला चार परगणे देऊन ईश्वर सिंहाने वाद मिटवून टाकावा. याउलट जयाप्पा शिंदे आणि त्यांचा कारभारी रामचंद्र बाबा यांची भूमिका होती.त्यांचे म्हणणे होते की यापूर्वी मराठ्यानी ईश्वरसिंह ची बाजू घेतली असल्याने आता त्याच्या विरुद्ध लढणे न्यायोचित ठरणार नाही. मार्च 1747 मध्ये बुंदीचा पदच्युत राजा उम्मेद सिंह,माधव सिंह आणि मामा महाराणा जगतसिंह पुन्हा एकदा ईश्वर सिंहावर चालून गेले.ह्यावेळी त्रिवर्गाने मल्हारराव होळकरना दोन लाख (?) रुपये देऊन आपल्या बाजूने लढण्यास बोलविले.मल्हाररावानी आपला मुलगा खंडेराव यास एक हजार घोडेस्वार घेऊन त्रिवर्गाच्या मदतीस पाठवले होते.परत एकदा माधवसिंहाचा पराभव झाला.
शिंदे होळकर ह्या मराठ्यांच्या उत्तरेतील बलवान सरदारांतच राजपुतांमधील वाद सोडविता सोडविता वाद निर्माण झाले.तेव्हा नानासाहेब पेशवे ह्या वादाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वतः राजस्थानात आले. त्यांना होळकरांची भूमिका पटली ---ईश्वरसिंहने माधवसिंहाला
काही तरी दिलेच पाहिजे.पण ईश्वरसिंह काही त्यासाठी तयार होईना. शेवटी 3 ते 8 ऑगस्ट 1748 ह्या काळात ईश्वरसिंह आणि होळकर यांच्यात सहा दिवस युद्ध होऊन ईश्वरसिंहचा पराभव झाला.ह्या युद्धात शिंदे होळकरांकडून लढले नाही.पराभव होऊनही ईश्वरसिंह मराठ्यांचे ऐकेणा.आपले मराठ्यांपुढे काही चालणार नाही असे उमगल्याने ईश्वरसिंहाने 14 डिसेंबर 1750 ला विषारी नागाचा दंश करवून घेऊन आत्महत्या केली आणि माधवसिंहास जयपूरचे राज्य मिळून गेले.तरी पण त्याच्या मनात मराठ्यांप्रति कृतज्ञता नव्हती.त्याने प्रमुख मराठे सरदारांना मेजवानीस बोलावून जेवणात विष घालून त्यांना ठार मारण्याचा कट रचला होता पण कुणीही सरदार जेवायला न गेल्यामुळे तो कट फसला.दुसरे दिवशी म्हणजे 10 जानेवारी 1751 रोजी जयाप्पा पांच हजार मराठ्यां सोबत जयपुरमध्ये बाजारहाट करण्यासाठी,शहर पाहण्यासाठी निःशंक मनाने आले होते.माधवसिंहने शहराच्या वेशी बंद करून तीन हजार मराठ्यांची घात रचून भीषण कत्तल केली.तसेच मराठ्यांचा वकील गोविंद तिमाजिला विष घालून ठार मारले. एवढयावर त्याचे समाधान झाले नाही,त्याने मराठ्यां विरुद्ध लढायला अहमदशाह अबदालीला आमंत्रण पण पाठवविले.
मराठ्यांना त्याच वेळी दिल्लीला जाण्याची निकड निर्माण झाल्याने त्यांनी कसाबसा तह करून दिल्लीकडे प्रयाण केले.
2-जोधपुर वारस प्रकरण- जोधपुरच्या अजितसिंहने आपली मुलगी दिल्लीचा बादशाह फर्रूखसिअरला दिली होती.नंतर जावयाला पदच्युत करून ठार मारण्याच्या कटात अजितसिंह पण सामील होता. अजितसिंहाला अभयसिंह आणि बखतसिंह अशी दोन मुले होती.अभयसिंहाने गुजरातच्या सुभेदारीवर असताना मराठ्यांचे सरदार पिलाजीराव गायकवाड यांचा खून करवीला होता.(23 मार्च 1732) पुढे अभयसिंहचा खून त्याच्या धाकट्या भावाने-बखतसिंहाने केला.(जून 1749) हिंदू धर्मशास्त्रा प्रमाणे अभयसिंहच्या मृत्यू नंतर त्याचा मुलगा रामसिंहचा जोधपुरच्या गादीवर हक्क होता,पण काका बखतसिंहने बळजबरीने जोधपुर गादी बळकावली.बखतसिंह सप्टेंबर 1752 मध्ये मरण पावला.त्याच्या जागी त्याचा मुलगा विजयसिंग गादीवर बसला.अभयसिंहचा मुलगा रामसिंह ह्यावेळी पण सत्तेपासून वंचित राहीला.
ह्यावेळी दिल्ली मध्ये मराठ्यांच्या दृष्टीने एक खूप महत्वाची घटना घडली. इ. स.1751 मध्ये दिल्लीचा शिया वजीर सफदरजंगला मराठ्यांनी रोहिले,पठाण वगैरे बादशाहीच्या शत्रूना हुसकावून लावण्यात बहुमोल मदत केली होती.त्यामुळे मराठ्यांच्या लष्करी सामर्थ्याची खात्री पटून एप्रिल1752 मध्ये बादशहाने मोगल बादशाहीचे अंतर्गत आणि बाह्य शत्रूंपासून संरक्षण करण्यासाठी मराठ्यां बरोबर काही अटीवर एक करार केला.( अहमदनामा )परिणामी बादशाहीला नडणाऱ्या संस्थानिकांचा ज्यात राजपूत संस्थानिक पण होते,बंदोबस्त करून बादशाहीचे रक्षण करने मराठ्यांना क्रमप्राप्त झाले.त्यानुसार जोधपुर प्रकरणाची तड लावण्याचे काम—विजयसिंहचा पाडाव करून रामसिंहाला गादी मिळवून देणे- जयाप्पा शिंदें कडे सोपविण्यात आले.त्यासाठी जयाप्पा तिथे गेले असताना विजयसिंहने कपट करून जयाप्पांचा खून केला.(25 जुलै 1755) परिणामी मराठ्यांनी विजयसिंह असलेल्या नागौरचा वेढा आणखीन कडक केला.जयपूरकर माधवसिंहाने विजयसिंहच्या मदतीसाठी सैन्य पाठवले पण मराठ्यांपुढे त्यांचे काही चालले नाही. मगरूर विजयसिंहला मराठ्यांशी तह करणे भाग पडले.त्याने निम्मे राज्य रामसिंहला देण्याचे कबूल केले. मराठ्यानी त्याच्याकडून पन्नास लाख रुपये दंडही वसूल केला शिवाय अजमेर आणि जालोरचे किल्ले सुद्धा मराठ्यांना मिळाले.
बुंदी,कोटा व इतर लहानसहान संस्थानिकांमधील वाद पण मराठ्यांच्या मध्यस्थीने मिटले.
3-सुरजमल जाटाचे प्रकरण-मोगल बादशाही मोडकळीस आल्याचे पाहून उत्तरेकडील बरेच संस्थानिक बादशाही हुकूम मानेनासे झाले होते.भरतपूरचा संस्थानिक सुरजमल जाट हा अशांपैकी एक होता. बादशाह बरोबर 1752 मध्ये झालेल्या अहमदिया करारा प्रमाणे बादशाहीचे अंतर्गत शत्रूंपासून संरक्षण करण्याची जबाबदारी मराठ्यांवर होती.सुरजमलची राजधानी असलेल्या कुंभेरी ह्या शहरास मल्हारराव होळकरानी वेढा घातला.या वेढ्यात दुर्दैवाने मल्हाररावांचा मुलगा खंडेराव मार्च 1754 मध्ये तोफगोळा लागून मरण पावला. सुभेदारानि सुरजमल जाटा चा पूर्ण नाश करण्याचा चंग बांधला.कुंभेरीची माती यमूनेत नेऊन टाकीन अशी प्रतिज्ञा पण त्यांनी केली. सुरजमलच्या सुदैवाने कुंभेरीचा वेढा चालू असतानाच मल्हाररावाना दिल्लीतील गोंधळ आवरण्यासाठी तिकडे जावे लागले आणि सुरजमल जाट मराठ्यांच्या तावडीतून सुटला.तृतीय पानिपत युद्धात सुरजमल जाट तटस्थ न राहता मराठ्यांच्या बाजूस आला असता तर मराठ्यांची ताकद वाढून त्याचा युद्धावर अनुकूल परिणाम झाला असता. पानिपत युद्धभूमीवरून महाराष्ट्राकडे परतणाऱ्या हजारो मराठे सैनिक,बाजार बुणग्यांसाठी सुरजमलची पत्नी किशोरीराणीने अन्न,वस्त्र,निवाऱ्याची सोय केली होती.
उत्तरेकडील रोहिले,जाट,राजपूत ह्या तीन मुख्य प्रतिस्पर्ध्याना रणभूमीवर मराठ्यांनी अगणित वेळा नमविले.ह्या त्रिवर्गाने मराठ्यांना परास्त करण्यासाठी सर्व भले बुरे मार्ग चोखाळले पण त्यात त्यांना यश मिळाले नाही. या संघर्षाबद्दल मराठ्याना नावं ठेवण्याची प्रवृत्ती तिकडील पक्षपाती इतिहास अभ्यासकांमध्ये आढळते.याला सुरुवात राजपूतांचा इतिहास लिहिणाऱ्या इंग्रज कर्नल टॉड याने केली. त्याची री पुढच्यानी ओढली. टॉडची तक्रार मराठ्यांच्या उत्तरेकडील राज्य विस्तारा संबंधात आहे. तो विचारतो की दक्षिणे कडील मराठ्यांचे उत्तरेत काय काम?अरब,तुर्क,मोगल यांनी आपापली भूमी सोडून हिंदुस्थानात राज्य केलेले टॉडला चालते,त्याच्या स्वतःच्या साता समुद्रा पलीकडील जातभाईनी इथे येऊन राज्य स्थापण्यात त्याला काही गैर,अनैतिक वाटत नाही.सगळा राग मराठ्यांवर! टॉड चा जास्त राग महादजी शिंद्यांवर आहे.इंग्रजाना त्यांच्याच पद्धतीने उत्तर देण्याची क्षमता,धमक आणि चातुर्य फक्त महादजींकडेच होते.महादजी अजून दहा एक वर्षे जगले असते तर आजच्यापेक्षा खूपच वेगळा इतिहास घडलेला दिसला असता.
संदर्भ:1-मराठ्यांचा इतिहास खंड एक आणि दोन. संपादक अ. रा. कुलकर्णी आणि ग. ह. खरे
2-मराठी रियासत खंड चार. लेखक गो. स. सरदेसाई
3-प्रा. डॉ.सदानंद मोरे लिखित दरारा,दबदबा की दहशत लेख.
-- Prakash Lonkar
No comments:
Post a Comment