विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 3 July 2023

इ.स.१८५७ च्या सशस्त्र उठावाची पहिली छोटी आवृत्ती... वेल्लोर येथील उठाव.

इ.स.१८५७ च्या सशस्त्र उठावाची पहिली छोटी आवृत्ती... वेल्लोर येथील उठाव.
१० मे १८५७ ह्या दिवशी मीरत इथे इंग्रजांच्या नोकरीत असलेल्या हिंदुस्थानी सैनिकांनी बंड पुकारले.ह्या बंडामागे जी विविध कारणे सांगितली जातात त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे इंग्रज आपला धर्म बुडवून आपल्याला ख्रिश्चन बनविणार आहेत अशी सर्वसाधारण जनमानसात पसरलेली भीती हे होते..ह्या भावनेतून इंग्रज सत्तेस प्रतिकार करण्यासाठी देशभर त्या काळात विविध गट,समूह,व्यक्ती,पुढारी प्रयत्नशील होते.
इ.स.१८५७ चा उठाव होण्यापूर्वी तसाच एक उठाव सुमारे ५१ वर्षांपूर्वी वेल्लोर इथे घडला होता त्याला १८५७ च्या उठावाची आद्य आवृत्ती असे म्हणता येयील.एकोणीसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात हिंदुस्थानातील मोठ्या भूभागावर तत्कालीन इस्ट इंडिया कंपनीणे नियंत्रण मिळविले होते.इंग्रज जिंकलेल्या भागात आपली प्रशासन व्यवस्था लागू करण्याच्या प्रयत्नात होते.अशा प्रशासकीय सुधारणात सैन्यदल सर्वात वरच्या क्रमांकावर होते.त्यावेळी विविध प्रांतातील सैनिकांच्या पोशाखात प्रशिक्षणात,वरिष्ठ कनिष्ठ संबंध,नेतृत्वाची शिडी
( command structure ) वगैरे कशातच सारखेपणा नव्हता. कारण ब्रिटीश इंडिया सैन्यदलातील सैनिक देशातील विविध चालीरीती,परंपरा,श्रद्धा,रूढी असलेल्या भागातून आले होते.इंग्रजांनी सैन्य दलाचे प्रमाणीकरण करण्यासाठी,त्यात सुसूत्रता,एकजिनसीपणा आणण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली.सैन्य दला मध्ये संघ भावना निर्माण करण्याच्या दृष्टीने ह्या सर्व गोष्टी अत्यंत महत्वपूर्ण होत्या.देशाच्या विविध भागातील सैनिक विविध प्रकारचा पेहराव करत असत,त्यांच्या टोप्या,फेटे,पगड्या अनेक प्रकारच्या असत,लढाई केवळ अनुभवाच्या जोरावर करत असायचे.त्यासाठी कुठले विशेष शास्त्रशुद्ध,व्यावसायिक प्रशिक्षण दिलेले नसायचे.गंध लावणे,दाढी ठेवणे,कर्णभूषणे घालणे,विविध प्रकारची वस्त्रे घालणे,इत्यादी मुळे सैन्यात एकजिनसीपणा दिसायचा नाही.यासाठी विविध नियम बनवून इंग्रज सेनापती क्र्याडोकने मद्रास मध्ये प्रसिद्ध केले.या नियमांनुसार सर्व सैनिकांसाठी एकसमान पेहराव निश्चित करण्यात आला,दाढी ठेवणे,गंध लावणे,वाटेल ते शिरोभूषण घालणे,इ.वर बंदी घालण्यात आली.या प्रतिबंधांमुळे सैनिकांच्या मनातील इंग्रज आपल्या धार्मिक बाबतीत ढवळाढवळ करून आपल्याला ख्रिश्चन बनविणार असल्याच्या भितीस बळच मिळाले.
इंग्रज,निजाम आणि मराठे ह्या दोस्तत्रयी बरोबर झालेल्या लढाईत टिपू सुलतान ४ मे १७९९ ला मारला गेला.त्यानंतर इंग्रजांनी टिपू च्या कुटुंबियांस पेन्शन देऊन अर्काट जवळील वेल्लोर येथील किल्ल्यात ठेवले होते.या कुटुंबात बारा मुले आणि सहा मुली होत्या.यातील सहा मुलगे आणि चार मुली यांची लग्न झालेली असून पाचव्या मुलीचा विवाह समारंभ चालू असताना किल्ल्यावरील सैनिकांनी दंगा सुरु केला.टिपू कुटुंबियांस किल्ल्याबाहेर पडण्यास प्रतिबंध असून कर्नल म्यारियट च्या अधीन ३७० युरोपियन आणि १५०० हिंदुस्थानी सैनिक बंदोबस्ताला होते.दहा जुलै १८०६ रोजी पहाटे तीन वाजता किल्ल्यात एकाएकी सगळीकडून तोफा,बंदुकांचे आवाज येणे सुरु झाले.हिंदुस्थानी शिपाई आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी रात्री गुप्तपणे एकत्र येऊन गोऱ्यानवर हल्ला केला.ह्यात एकूण तेरा अधिकारी आणि ८२ गोरे सैनिक मरण पावले.बऱ्याच जणांनी स्वतःस घरात कोंडून घेतल्याने त्यांचे प्राण वाचले.सकाळी उजेडल्यावर तटावर जमा झालेल्या इंग्रजांपैकी बहुतेकांना बंडखोरांनी ठार मारले.काहींनी टिपू चे निशाण पण फडकावले.बंडखोरांनी नंतर लुटमार करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्यातली शिस्त,एकोपा बिघडून शिक्षेच्या भीतीने ते इतस्तः पळून गेले.आर्काट इथे इंग्रजी सैन्याचा मोठा तळ होता.तेथील अधिकारी कर्नल जिलेस्पीला सकाळी सहा वाजेच्या सुमारास वेल्लोर किल्ल्यावरील बंडाची बातमी कळली.ताबडतोब त्याने वेल्लोरला येऊन अवघ्या दहा मिनिटात बंडखोरांना परास्त केले. चार एकशे जण लढून मेले,बऱ्याच जणांनी तटावरून उड्या टाकून जीव दिले,कित्येक जण पळून गेले.इंग्रजांनी सुमारे सहाशे जणांना पकडून आणले.ह्यावेळी मद्रास इलाक्याचा प्रमुख-गव्हर्नर म्हणून लॉर्ड विल्लीयम बेटींग ( भारतात सतीची चाल बंद करण्यासहित अनेक सामाजिक सुधारणा घडवून आणणारा गव्हर्नर जनरल ) कार्यरत होता.ह्या बंडातील कैद्यांना सहानुभूतीने वागवावे अशी त्याची इच्छा होती पण सेनापती क्र्याडोक बंडखोरांवर कडक कारवाई करण्याच्या मताचा होता.ज्या बंडखोरांवर गुन्हे सिद्ध झाले त्यांना फाशी दिले गेले.ज्यांच्यावरील गुन्हे सिद्ध होऊ शकले नाही अशांचा विचार करण्यासाठी एक वेगळा आयोग पण नेमण्यात आला.शेवटी बेटींग च्या मतास वजन मिळून बऱ्याच बंडखोरांना जीवदान मिळाले.
सुमारे ५१ वर्षांनी—१८५७ मध्ये- झालेल्या सशस्त्र उठावाचे बीज हा दंगा होता.त्याला १८५७ च्या उठावाची एक आद्य,छोटी आवृत्ती,झलक,ट्रेलर समजण्यास हरकत नाही.दंगा सुरु होण्याच्या किमान दोन एक महिने तरी हिंदुस्थानी शिपायात अस्वस्थता,चलबिचल निर्माण झाल्याचे दिसत असूनही इंग्रज अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नव्हती. एकंदरीत त्या वेळी इंग्रज आणि सर्वसामान्य जनता व फौजेतील हिंदी सैनिकात परस्परांबद्दल खूप द्वेष आणि अनादर निर्माण झाला होता.दोहोत समान भाषे अभावी पण संशयाची भावना निर्माण झाली होती.टिपू च्या कुटुंबियांचा ह्या दंग्यात काही हात,भूमिका आहे काय याचा पण इंग्रजांनी कसून तपास केला पण त्यात त्यांना काही सापडले नाही.तरी पण सावधगिरी म्हणून टिपू च्या सर्व नातेवाइकांना वेल्लोरहून ऑगस्ट १८०६ मध्ये कलकत्त्यास हलविण्यात आले.त्या सर्वांचा मृत्यू तिथेच झाला.तसेच तत्कालीन गव्हर्नर विल्लीयम बेटींग व सेनापती क्र्याडोक ह्यांना कार्यमुक्त केले गेले.तीन डिसेम्बर १८०६ रोजी मद्रासच्या गव्हर्नरने इतःपर हिंदुस्थानी लोकांच्या धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करणार नसल्याचा जाहीरनामा तिकडील सर्व भाषात प्रसिद्ध केला.
ज्या विल्याम बेटींग ला वेल्लोर इथे हिंदुस्थानी शिपायांच्या बंडाबद्दल शिक्षा म्हणून कार्यमुक्त करण्यात आले होते त्याच
विल्ल्याम बेटिंग २२ वर्षांनी म्हणजे ४ जुलै १८२८ रोजी भारतात येऊन त्याने गव्हर्नर जनरल पदाची सूत्रे हाती घेतली.ह्या पदावर तो जवळपास सात वर्षे होता आणि त्याने आपल्या कारकिर्दीत हिंदुस्थानात अनेक सामाजिक,प्रशासकीय सुधारणा घडवून आणल्या ज्यातील प्रमुख म्हणजे सती जाण्यास बंदी,ठगांचा बंदोबस्त ह्या होय.
संदर्भ: १)-ब्रिटीश रियासत- खंड २ ले. गो.स.सरदेसाई
२) झुंज क्रांतीवीरांची- ले.सुधाकर पाटील.
 प्रकाश लोणकर...

 

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...