आळे येथील ज्ञानेश्वर महाराज वेद मुखी रेडा समाधी मंदिर शिलालेख
हा शिलालेख पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पुणे नासिक मार्गावर मुख्य रस्त्यालगत मौजे आळे गावात असलेल्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्या मुखी वेद वदवले त्या रेड्याच्या समाधी मंदिराच्या मागील बह्याभागावर वरच्या बाजूस खिडकी खाली कोरलेला आहे. शिलालेख खोदीव स्वरूपाचा असून ११ ओळीचा दोन शिळेवर कोरला असून शुद्ध संस्कृत मराठी मिश्र भाषेत आहे.पहिल्या तीन ओळीत श्लोक असून इतर ओळी मराठी भाषेत आहेत रंगरंगोटी मुळे काळाच्या ओघात शिलालेखाची अक्षरे झिजलेली असून पुसट झालेली आहेत ,तर काही अक्षरे मुजून गेली आहेत .अक्षरांच्या खोलीत वेगळा रंग मारल्या मुळे अक्षरे सहज वाचता येतात.
गावाचे नाव : मु. पो- आळे ता.जुन्नर , जि. पुणे .
शिलालेखाचे वाचन :
१ श्री ज्ञानेश्वरायनमः ॥
२ जे स्वधर्मे निष्कामता ॥ अनुसरले पार्था
३ तेकैवल्यपद तत्वता ॥ पावले जगी ॥ अ०३
४ हे मंदीर रा. आनंदराव भिकाजी शेटे ब्रा०
५ आळे यांनी आरंभिले, यांचे पश्चात् +
६ +यांचे पुत्र स्व . रघुपति :
७ राव यांनी हे काम शके
८ १७८५ साली पूर्ण
९ केले.
१० का. रामचंद्रसुतारमी ।
११ वजैराम सु आळे ।।
जी.पी.एस. :१९. १९ ” १६ ’ ५६ ,७४ .१२ ’’८८ ’४४
शिलालेखाचे स्थान : मंदिराच्या मागील बाजूस खिडकीच्या मध्यभागी वरच्या बाजूस आहे
अक्षरपद्धती : कोरीव स्वरूपाचा लेख आहे
भाषा : शुद्ध मराठी संस्कृत , देवनागरी लिपी
प्रयोजन : मंदिर बांधल्याची / बांधकामाची स्मृती जपणे.
मिती / वर्ष : शके १७८५ : रुधिरोद्रगिरी सवत्सरे
काळ वर्ष : एकोणिसावे शतक –सन १८६३
कारकीर्द : ब्रिटीश आमदानी
व्यक्तिनाम : संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज ,आनंदराव भिकाजी शेटे, स्व . रघुपति :
राव शेटे , रामचंद्र सुतार,जयराम सुतार
ग्रामनाम :-मौजे आळे
अर्थ :ज्ञानेश्वर महाराजांना वंदन!!! कर्मयोगाच्या ३ ऱ्या अध्यायात माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतायेत कि हे अर्जुना, जे लोक कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता निर्मळ मनाने काम करत राहतात, स्वधर्माचे आचरण करतात ते लोक या जगामध्ये तत्वत: श्रेष्ठ अशा मोक्षाला पोहोचतात.
शालिवाहन शकाच्या १७८४ व्या वर्षी दुंदभी नाम संवत्सरात म्हणजेच १८६२ साली मौजे आळे येथील ब्राम्हण रामचंद्र भिकाजी शेटे यांनी या ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे बाधकाम सुरु केले .त्यांच्या पश्चात त्यांचे स्वर्गीय पुत्र रघुपती राव शेटे यांनी ते काम शके १७८५ व्या वर्षी रुधिरोद्रगिरी संवत्सरात म्हणजेच १८६३ पूर्ण केले, रघुपती राव यांच्या मृत्यू नंतर हे काम मौजे आळे गावामधील कारागीर रामचंद्र सुतार,जयराम सुतार यांनी ते मंदिर किंवा ते काम पूर्ण केले आहे ,
शिलालेखाचे वाचक : श्री. अनिल किसन दुधाणे.
संदर्भ -(IE VII – १२८)
संक्षेप :-अ –अध्याय ,ब्रा -ब्राम्हण ,स्व –स्वर्गीय ,का –कारागीर
शिलालेखाचे महत्व :- विशेष म्हणजे या शिलालेखात माऊली ज्ञानेश्वर महाराज यांचे नाव असून कर्मयोगाच्या तिसऱ्या अध्यायातील ओवी समाविष्ट आहेत., या मंदिराचे बांधकाम कै. आनंदराव भिकाजी शेटे यांनी शके १७८४ ला सुरु करुन त्यांचे सुपूत्र कै. रघुपंतराव शेटे यांनी मंदिराचे बांधकाम शके १७८५ पुर्ण केले. याच घराण्यातील श्री. भालचंद्र रघुपंतराव शेटे यांनी शके १८७६ फाल्गुन शुद्ध पंचमी दि. २७ फेब्रुवारी १९५५ रविवार रोजी श्री. ज्ञानेश्वर महाराजांची मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली.या शिलालेखात माऊली महावैष्णव संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे नाव आले आहे हेच या शिलालेखाचे विशेष महत्व आहे .
आळंदीच्या तथाकथित धर्म मार्तंडानी श्री ज्ञानेश्वर महाराज व त्यांच्या भावंडांना धर्मात परत घेण्यासाठी प्रमाण म्हणून पैठण येथील धर्म सभेचे शुध्दीपत्र मागितले वरुन ही भावंडे पैठण येथील धर्म सभेमध्ये गेले असताना त्यांना अनेक सत्वपरिक्षांना तोंड द्यावे लागले. त्याचप्रसंगी वाकोबा नावाचा कोळी आपल्या गेनोबा नावाच्या रेड्यास घेऊन जात असताना धर्म सभेतील एका धर्म पंडिताने ज्ञानेश्वर महाराजांना त्या रेड्याचा तुझा आत्मा एकच आहे का? हे सिध्द करुन दाखव असे सांगितलेवरुन ज्ञानदेवांनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवून वेद उच्चारण्याची आज्ञा केली. लगेचच रेड्याच्या मुखातून ऋगवेदाच्या श्रृती बाहेर पडल्या होत्या .
संत निळोबारायांनी लिहिलेच आहे-
येथुनी जाता अलंकापुरीसी । पशु आळीयासी स्थापियेला !!
पुढे नेवासा ह्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचे लेखन केल्या नंतर श्री ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपानदेव व मुक्ताई, रेडा व वाकोबा कोळी हे सर्व बरोबरच्या संतासमवेत आळे गावाच्या उत्तरेस असलेल्या अकलापूर या गावी आले तेथून संतवाडी येथील चौऱ्याच्या डोंगरावरती विसावा घेत असताना समोर दिसणाऱ्या भुमीचे निरीक्षण करीत असताना श्री ज्ञानेश्वर महाराजांनी वर्तुळाकार अशी निसर्गसंपन्न भुमी पाहून या भूमीचे आळे असे नामकरण केले याच भूमीस पुर्वी अलंकापुरी म्हणून संबोधीत असत. सदर ठिकाणी रेड्याने श्री ज्ञानेश्वर महाराजांकडे आपणाला याच ठिकाणी समाधी द्यावी अशी इछा प्रदर्शित केली. त्यावळी ज्ञानदेवांनी पुढील भविष्य जाणुन आजच्या समाधीस्थळी येऊन शके १२१२ (इ. स. १२९०) माघ वद्य १३ (त्रयोदशी) या दिवशी स्वहस्ते या रेड्यास समाधी दिली. आळे गावात त्याचे एक मंदिर बांधले आहे. गर्भगृहात समाधीचा दगड हा रेड्याच्या तोंडासारखा आहे. त्याच्याच जवळ ज्ञानदेवांचा मुखवटा आहे. देवळामध्ये अखंड हरीनाम चालू असतो. चैत्र वद्य एकादशीला इथे मोठी जत्र भरते.या समाधीला श्री ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपनदेव, मुक्ताई या चार भावंडांचे हात लागलेली महाराष्ट्रातील ही एकमेव समाधी आहे. ही समाधी अत्यंत प्राचीन असुन वारकरी सांप्रदयामध्ये या तिर्थक्षेत्राला अत्यंत महत्त्व असुन आळंदी, पंढरपूराच्या खालोखाल वारकरी सांप्रदयात या तिर्थक्षेत्राची गणना केली जाते. ज्या वारकऱ्यांची पंढरपूर आळंदीची वारी चुकते ते वारकरी आळ्याची वारी करुन पंढरपूर – आळंदीच्या वारीचे पुण्य पदरात घेतात.
@©माहिती आणि संकलन :-अनिल दुधाने .
टीप :-सदर कर्यात अमरसिंह पाटील तसेच रवि निंबाळकर यांची मदत व सहकार्य झाले .
No comments:
Post a Comment