हिंदुस्थानातील बारा ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगे भीमाशंकर, औंढा नागनाथ, परळी वैजिनाथ, घृष्णेश्वर आणि त्र्यंबकेश्वकर यांचा समावेश होतो. ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांच्या वासाने पुनीत झालेला त्र्यंबकेश्वर म्हणजे ब्रम्हगिरी पर्वताच्या पायथ्याशी असलेले शिवस्थान आहे. हनुमंताचे जन्मस्थान, गोदावरीचे उगमस्थान आणि निवृतीनाथाची समाधी याचठिकाणी आहे. सुमारे पाचशे वर्षापूर्वी याठिकाणी वस्ती नव्हती. पुढे मंदिर परिसरात त्र्यंबक नावाचे गाव बसले.
इसवी सन 1357 सालच्या एका संदर्भानुसार देवगिरीच्या यादवांच्या कालखंडात त्र्यंबकेश्वर हे धार्मिक आणि राजकीय हालचालीचे केंद्र होते. पुढे बहामणी काळातही या तीर्थक्षेत्राला महत्वाचे स्थान होते. बहामनीनंतर या परिसरावर अहमदनगरच्या निजामाची सत्ता असून त्यावेळी निजामशाहीकडे चाकरीवर असलेल्या शहाजीराजेंच्या अधिकारात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्राचा भाग असून तेथील गायमुख वगैरे स्थानाविषयी काही वाद निर्माण झाल्यानंतर तेथील पुजारी सोन प्रभू, दत्त देव, गणेश प्रभू आणि त्र्यंबक देव यांनी शहाजीराजांकडे दाद मागितल्याचे आढळून येते. 1630 ला निजामशाही बुडाल्यानंतर त्र्यंबकेश्वर हे मोगलांच्या ताब्यात गेले.
मोगल म्हणजे औरंगजेब आणि छत्रपती शिवराय यांच्यातील राजकीय लढाई सर्वश्रूत असून मोगलांना धडा शिकविण्याकरिता 1664 साली शिवरायांनी ज्यावेळी सुरतेवर पहिली स्वारी केली, त्यावेळी त्यांनी आपण नाशिक आणि त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला जात असल्याची हुल उठविली होती. त्यानुसार 31 डिसेंबर 1663 ला शिवरायांनी प्रत्यक्षपणे त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा करून सुरतेकडे प्रस्थान केले होते. त्यानंतर 1670 ला पुन्हा त्यांनी सुरतेवर दुसरी स्वारी केली. त्यावेळी त्यांनी त्र्यंबकेश्वराचे दर्शनतर घेतलेच सोबत 18 जून 1670 ला तेथील भोसले घराण्याचे उपाधे वेदमूर्ति आपदेभट ढेरगे यांना आपल्या घराण्याची परंपरागत पूजा करण्याकरिता वार्षिक 100 होनाचे वर्षासन देऊन त्यातून नियमितपणे आपल्यावतीने पूजाअर्चा आणि अभिषेक करण्याची सूचना केलेली आहे. 100 होंनापैकी 60 होन हे श्रीची पूजा व नैवेद्याकरिता आणि 40 होन हे अभिषेकाकरिता देण्यात आलेले होते. त्यातून वर्षभर दररोज छत्रपती घराण्याच्यावतीने श्री त्र्यंबकेश्वराला अभिषेक आणि नैवेद्य दिला जात होता. याअर्थाने छत्रपती शिवरायांचा पदस्पर्श त्र्यंबकेश्वराच्या नगरीला झाल्याचे येतो.
छ्त्रपती शिवरायांच्या निधनानंतर 1681 साली बादशहा औरंगजेब ज्यावेळी दक्षिणेत उतरला त्यावेळी 1690 ला औरंगजेबाने त्र्यंबकेश्वराचे मंदिर पाडून टाकण्याची आज्ञा दिल्याची नोंद ‘ द स्टोरी ऑफ इस्लामिक इन्म्पेरीलीसम इन इंडिया’ या पुस्तकात आढळून येते. मात्र त्याची अंमलबाजवणी झाली किंवा नाही हे निश्चित नाही. याचदरम्यान औरंगजेबाचा पुत्र अकबर हा बापाच्या विरोधात बंड करून छत्रपती संभाजीराजांना येऊन मिळाला होता. त्यानुसार 11 मे 1689 साली अकबर त्र्यंबकेश्वरला पोहोचल्याची नोंद आहे. छत्रपती संभाजीराजांच्या कारकिर्दीत 1681 साली छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद ) जवळील हरसूल गावचा रहिवासी असणारा गंगाधर रंगनाथ कुलकर्णी हा औरंगजेबाकडे नोकरीस असताना औरंगजेबाने त्याला बळजबरीने बाटवून मुस्लिमधर्म स्वीकारायला भाग पाडले. चार पाच वर्षे होऊनही याविषयीची त्याच्या मनातील खदखद कायम होती. संधी मिळताच 1685 साली गंगाधर कुलकर्णीने सरळ रायगड गाठून छत्रपती संभाजीराजेंकडे परत मूळ धर्मात घेण्याची विनंती केली.
यावेळी महाराजांनी सरकारकून, न्यायाधीश, उपाध्ये, दानाध्यक्ष यांच्यासोबत चर्चा करुन त्याला प्रायश्चित म्हणून त्र्यंबकेश्वरला पाठविण्यात आले. त्याठिकाणी जाऊन त्याने श्री त्र्यंबकेश्वर आणि श्रीगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालून त्याच्या शुद्धीकरणाचा विधी पार पडला. त्यानुसार 16 मार्च 1986 च्या पत्रांनुसार याविषयी सर्वांना सूचित करण्यात आले. यातील एक वाक्य महत्वाचे असून त्यात ‘ त्याच्या ब्राहण्याविषयी जो कोणी संदेह करील तो देवब्राम्हणद्वेषी, महापातकी समजावे’ असे म्हटलेले आहे. या पत्रावर मोरोपंत पंडित, रघुनाथराव अमात्य, केशो त्रिमळ पिंगळे, संभाजीराजेंचे मेव्हुणे हरजीराजे महाडीक, न्यायाधीश प्रल्हाद निरजी रावजी, रघुनाथ कोरडे, कवि कलश यांच्या सह्या आहेत. त्यानुसार बाटलेल्यांना परत हिंदू धर्मात घेण्याचे धोरण छत्रपती शिवरायाप्रमाणेच संभाजीराजांनीही कायम ठेवलेले असून त्यासाठी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वराची केलेली निवड ही या क्षेत्राच्या अस्तित्वावर प्रकाश टाकणारी आहे.
पुढे छत्रपती शाहू आणि रामराजे यांच्या कालखंडात त्र्यंबकेश्वराच्या तीर्थक्षेत्राला विशेष महत्व आल्याचे दिसून येते. त्यानुसार छत्रपती रामराजे यांच्या काळात बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांनी आज भव्य आणि दिव्य दिसणार्या श्री त्र्यंबकेश्वराच्या मंदिराचा पाया घातला. त्याकरिता पेशव्यांचे कारकून नारायण भगवंत यांची या कामावर नियुक्ती करण्यात आली होती. दिनांक 26 डिसेंबर 1755 यादिवशी प्रत्यक्षपणे श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वराच्या मंदिर बांधकामास सुरुवात झाली. याकरिता वास्तुविशारद यशवंतराव हर्षे यांनी या मंदिराचा आराखडा तयार केला. अनेक लहानथोर शेकडो कारागीर तब्बल 31 वर्षे या मंदिराच्या बांधकामावर अहोरात्र राबत होते. शेवटी श्रीमंत माधवराव पेशवे यांच्या कालखंडात श्री नागेश नारायण यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 16 फेब्रुवारी 1786 म्हणजे शके 1608 पराभवनाम सवंत्सरे माघ वद्य 14, महाशिवरात्री यादिवशी मंदिराचे बांधकाम पूर्णत्वास गेले. यासाठी तब्बल 10 लाख रुपये खर्च झाल्याची नोंद आहे.
त्यातून पूर्व पश्चिम 265 फूट लांब आणि दक्षिण उत्तर 218 फूट रुंद आणि 90 फुट उंचीचे काळ्या पाषाणातील अतिशय देखणे मंदिर साकारले गेले. याविषयीचा अस्सल संदर्भ म्हणून उत्तर बाजूच्या दरवाज्यावर नऊ ओळीत कोरलेला एक शिलालेख उपलब्ध आहे. त्यातील पहिल्या ओळीतील मजकुरानुसार ‘ शके 1677 युवानाम संवत्सरे मार्गशीर्षकृष्णाष्टम्या प्रारंभ ’ तर शेवटच्या ओळीतील मजकूर याप्रमाणे आहे, ‘ शके 1708 पराभव नाम संवत्सरे महाशिवरात्र्या संपूर्ण: ’ यानुसार कृष्णजन्माष्टमी आणि महाशिवरात्र असे दोन मुहूर्त या बांधकामास धरलेले दिसतात.
नाशिकपासून सुमारे 36 किमी अंतरावर त्र्यंबकेश्वर हे तालुक्याचे ठिकाण असून नजीक असलेल्या 4248 फुट उंचीच्या ब्रम्हगिरी पर्वतामुळे या क्षेत्राला वेगळे महत्व प्राप्त झालेले आहे. इतर अकरा ज्योतिर्लिंगापेक्षा या पिंडीची रचना वेगळी असून इतर ठिकाणी पिंडीवरील लिंग वरच्या बाजूस असतो, त्र्यंबकेश्वरमध्ये मात्र पिंडीच्या गोलाकार जागेत थोड्याशा खालच्या बाजूला तीन लिंग कोरलेले आहेत. हे शिव, विष्णु आणि ब्रम्हाचे प्रतिक मानले जातात. आणि म्हणूनच या क्षेत्राला त्र्यंबकेश्वर हे नाव पडलेले आहे.
अत्यंत शांततेच्यावेळी येथील पिंडीत असलेल्या पोकळ जागेतून सिंह गर्जनेसारखा आवाज ऐकायला मिळतो हे याचे वेगळेपण आहे. मंदिरात प्रवेश करण्याकरिता तीन दरवाजे असून उत्तरेकडील दरवाजावर नगारखाना आहे. मंदिरासाठी लागणार्या पाण्याकरिता जवळच अमृतकुंड असून त्याची खोली मंदिराच्या उंचीएवढी आहे. महाशिवरात्री तसेच दर बारा वर्षांनी भरणार्या सिंहस्थ कुंभमेळ्याप्रसंगी याठिकाणी जनसागर लोटतो.
ब्रम्हा, विष्णू आणि महेशाचे एकत्रित दर्शन म्हणजे त्र्यंबकेश्वरच्या स्थानाचे महत्व असून त्याची निर्मिती हजारो वर्षापूर्वी नेमकी कधी झाली हे निश्चित सांगता येत नाही. शिव म्हणजे साक्षात सृष्टीचा निर्माता असून त्याच्यापुढे दुसर्या अगरबत्ती वा धुपाची किंमत काय ?
लेखक Dr.satish kadam (प्रसिद्ध इतिहास अभ्यासक, तुळजा
No comments:
Post a Comment