लाखलगाव रामाचे गोदावरी नदी घाट शिलालेख .नासिक
हा शिलालेख नासिक जिल्ह्यातील मुख्य वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या किनारी नाशिक छत्रपती संभाजी नगर रोड वरील नाशिक पासून अवघ्या तीस किमी अंतरावरील मौजे लाखलगाव रामाचे गावातील गोदा तीरावर जो घाट आहे. त्या घाटाच्या तट भिंतीत एका शिळेवर बसवलेला आहे . सदर शिलालेख कोरीव स्वरूपाचा असून ७.ओळीचा असून शुद्ध मराठी भाषेत आहेत . शिलालेखास रंग मारल्यामुळे तसेच पाण्याच्या प्रवाहामुळे अक्षरे स्पष्ट दिसत नाहीत शिलालेखाची सर्व अक्षरे सुस्थितीत नसून तुटलेली आहेत . मात्र शिलालेख थोड्या प्रयत्नाने अगदी सहजपणे वाचता येतो.
गावाचे नाव : मु.पो लाखलगाव रामाचे . मुख्य गोदावरी घाट ता. जि. नासिक
शिलालेखाचे वाचन :
वाचन
१.शके १६६३ दुर्मती
२.नाम सवत्सरे मार्ग-
३.शीर्ष सुध १ तदि-
४.ने श्री गंगा चरणी ल-
५.क्ष्मण कृष्णा तत्पर शि-
६.वराम कृष्णा फाटक
७.निरंतर श्रुभवतु(न)
जी .पी.एस. : १९.९९ ” ७४ ’ १७ ,७३.९२ ’’२५’ ६७
शिलालेखाचे स्थान :नदी घाटावरील तटाला बाजूच्या भिंतीवर शिळा आहे
अक्षरपद्धती : उठाव स्वरूपाचा लेख आहे.
भाषा : शुद्ध मराठी देवनागरी
प्रयोजन : नदीकाठी घाट बांधल्याची / बांधकामाची स्मृती जपणे.
मिती / वर्ष :शके १६६३ दुर्मती नाम संवत्सरे मार्गेश्वर शुद्ध १
काळ वर्ष : अठरावे शतक -२८ नोव्हेबर१७४१ शनिवार
कारकीर्द छ .थोरले शाहू महाराज सातारा , पेशवेपद- बाळाजी विश्वनाथ
व्यक्तिनाम:- लक्ष्मण कृष्णा ,शिवराम कृष्णा फाटक
ग्रामनाम :-
शिलालेखाचे वाचक : श्री. अनिल किसन दुधाणे.
अर्थ :- शालिवाहन शकाच्या शके १६६३ व्या वर्षी दुर्मती नाम संवत्सरात गंगा (गोदावरी ) चरणी तत्पर असलेले श्री लक्ष्मण कृष्णा ,शिवराम कृष्णा फाटक यांनी गोदावरी नदीच्या तीरी मार्गेश्वर वद्य१च्या दिवशी म्हणजेच २८ नोव्हेबर१७४१ शनिवार रोजी घाट बांधला / बांधकामे केली किवा त्याचा जीर्णोद्धार केला.
शिलालेखाचे महत्व:- प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे नासिक होय त्याच मुळे याच परिसरातील बहुतांशी ठिकाणांना आध्यत्मिक व धार्मिक महत्व प्राप्त झालेले आहे . लाखलगावला ‘लाखलगाव रामाचे’ असेही म्हटले जाते. श्रीराम नाशिकमध्ये वनवासासाठी असताना सीतेला हव्या असलेल्या सोनेरी हरणाचा पाठलाग करीत ते नांदूरमध्यमेश्वरपर्यंत गेले होते. सोनेरी हरणाच्या रूपातील मारीच राक्षसाचा वध करून ते पुन्हा नाशिककडे परतत असताना लाखलगावात विश्रांतीसाठी थांबले होते. म्हणून लाखलगाव रामाचे, तर लाखेश्वर मंदिरामुळेच गावाला लाखलगाव म्हटले जाते,मुघल काळात औरंगजेबाने या गावाचे नाव लाखनाबाद असे ठेवले होते अशी आख्यायिका स्थानिक सांगतात ..
शिवराम कृष्णा आणि लक्ष्मन कृष्णा फाटक यांनी त्यांच्या संपत्तीच्या हिश्शातून शके १६६३ ला गोदावरीच्या काठावर सुंदर घाट बांधल्याचा उल्लेख असलेला शिलालेखही घाटावर आहे.नदीकाठी नेहमी संस्कृती नांदत असते . हा घाट बांधताना वास्तुविशारदाने आपले सगळे कसब वापरल्याचे पहायला मिळते. घाटाचे काम विशिष्ट कोनात केलेले आहे. सुंदर आकर्षक व भक्कम बुरूज, पायऱ्या, नदीला पाणी कमी अथवा जास्त असेल हे गृहित धरून निर्धोक अशा घाटाची बांधणी हे घाटाचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.
याचबरोबर त्यांनी लाखलगाव रामाचे या गावात सिद्धेश्वर सारखे शिव मंदिर गोदावरी तीरी बांधून जन सामन्या करिता धार्मिक द्वारे खुली करून देणे ही एक महत्वाची बाब आहे .यावरून ते धार्मिक आणि सांस्कृतिक वृत्तीचे होते हे सिद्ध होते एका कर्तबगार व्यक्तीने मंदिरा आणि घाटा सारखे बांधकाम करून जन सामान्यासाठी धार्मिक व सामाजिक कार्य करून शिलालेखाच्या स्वरुपात कोरून लोकाच्या नजरेसमोर कायमचे ठेवले हेच या शिलालेखाचे विशेष महत्व आहे .
लाखलगाव रामाचे माहिती ऐतिहासिक माहिती
अप्पाजी गणेश वैद्य थोरल्या माधवराव पेशव्यांचे सख्खे साडू होते. ते पूर्वी अहमदाबादला सुभेदार होते. पेशव्यांनी त्यांना लखनाबादची जहागिरी दिली. अहमदाबादहून येताना त्यांनी प्रचंड संपत्ती सोबत आणली होती सरदार अप्पाजी गणेश हे रत्नागिरी येथील अंजनवेल गावचे. १७७२ च्या दरम्यान अप्पाजी लखनाबादला आले.. गोदाकाठ आणि लाखलगावचा निसर्ग पाहून ते इथेच स्थिरावले. अप्पाजी वास्तुशास्त्राचे गाढे अभ्यासक असल्यामुळे त्यांनी नवीन लाखलगावची रचना वास्तुशास्त्राप्रमाणे केली. सुरक्षेच्या दृष्टीने भक्कम तटबंदीचा कोट गावाभोवती उभारला व त्याला चार वेशी (प्रवेशद्वार) केल्या. यासाठी त्यांनी त्यावेळी दोन लाख रुपये खर्च केल्याची नोंद आहे. पूर्व दिशेची मुख्य वेस आजही त्यावेळच्या वैभवाची साक्ष देताना दिसते. गावातील घरे व मंदिरांची रचनाही वास्तुशास्त्रानुसारच दिसते. गावाच्या मध्यभागी चव्हाटा व धर्मशाळा बांधली. तसेच हनुमान मंदिर, राम मंदिर व त्यातील मूर्तीही त्यांनी उभारल्या आणि गावाला दान दिल्या. गोदाकाठावर घाट बांधला. अप्पाजींचा वाडाही भव्य होता त्यासाठीही एक लाख रूपये त्यावेळी खर्च केले होते. कालांतराने तो पडला. मात्र त्या वाड्याचे अवशेष आजही आपल्या श्रीमंती वैभवाची साक्ष देतात. वाड्यातील लाकडावरील नक्षीकाम थक्क करणारे आहे. अप्पाजींनी त्यावेळी सरदार दाभाडे, सरदार गायकवाड सारख्या सरदारांना १६ लाख रूपये व्याजाने दिले होते. यावरून लाखलगावची श्रीमंती लक्षात यावी. अप्पाजींचे चिरंजीव सरदार अमृतराव वैद्य लढवय्ये होते. कल्याणचा सुभा लुटताना सैन्यात चांगली कामगिरी केल्याने त्यांनाही जहागिरी मिळाली होती. अमृतरावांचे चिरंजीव माधवराव व माधवरावांचा मुलगा अप्पाजी (पणजोबांचे नाव ठेवले) धार्मिक वृत्तीचे होते, अशी माहिती त्यांचे वंशज सुरेश वैद्य देतात. अप्पाजींच्या वंशाचा कुलवृत्तांतही सुरेश वैद्य यांनी जपून ठेवला आहे. यात अनेक ऐतिहासिक नोंदी असल्याने लाखलगावचा इतिहास उलगडतो.
आपाजी वैद्य यांनी गोदाकाठी वाडा, दगडी बांधणीचे पेशवेकालीन पहिलेच लाखेश्वर बाबांचे महादेव मंदिर उभे केलेले आहे. घुमटावरील व खांबांवरील नक्षीकाम सुंदर आहे. या मंदिराच्या दक्षिणेला अनेक समाधी आहेत. त्यात बालकराम स्वामींची साधूमंहतांच्या सहा समाधी आहेत. त्यासमोर गंगा गोदावरी माता मंदिर, दत्त मंदिर व सती माता मंदिर आहे. शनी मंदिरासमोर पेशवेकालीन सिद्धेश्वर मंदिर असून, मंदिरातील नक्षीकाम सुंदर आहे. मंदिराच्या बांधणी संदर्भातील एक शिलालेख गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर असून, शिवराम कृष्णा ,व लक्ष्मन कृष्णा फाटक यानी ते बांधल्याचे त्यात म्हटले आहे.. नदीवरील घाट तीन टप्प्यात असून,पहिला एक टप्पा लक्ष्मन कृष्णा व शिवराम कृष्णा यांनी तो बांधल्याचा उल्लेख शिलालेखात आहे बाकीचा घाट अर्धवट दिसतो.तो अहिल्या बाई होळकर व अप्पाजी, अमृतराव वैद्य यांनी वेगवेगळ्या काळात ते बांधल्याचे दिसते. घाटापासून पूर्वेस काही अंतरावर गोदापात्रात रामकुंड नावाची जागा प्रसिद्ध आहे. पूर्वी नदी ओलांडण्याचा मार्ग या कुंडापासून होता. एका राजाचे वऱ्हाड येथून जात असताना लग्नाच्या वऱ्हाडाशिवाय, रथ, घोडे या रामकुंडात बुडाली, अशी अख्यायिका आहे.लाखलगावचा अनेक पैंलूंचा इतिहास वारसा रूपाने त्यांनी जपला आहे. असेच प्रयत्न गावोगावी व्हायला हवेत.
संदर्भ :- १) वेशीवरील पाउल खुणा -लाखलगाव रामाचे .महाराष्ट्र टाइम लेख –श्री रमेश पडवळ सर
२)IE –VII – पान -२८४-२८५
माहिती आणि संकलन -अनिल दुधाने .
No comments:
Post a Comment