सवाई जयसिंह याने बनवलेली भयंकरी तोफेचा काठापूर येथील राजस्थानी भाषेतील शिलालेख प्रकशित!!!!!
उपलब्धी व स्थळ
हा शिलालेख पुणे जिल्यातील आंबेगाव तालुक्यातील मौजे काठापूर बुद्रुक येथील प्राथमिक शाळेच्या पुढे एका शेड मध्ये असलेल्या चौरसाकृती ओट्यावर एका तोफेवर ज्या ठिकाणी तोफेला बत्ती देतात त्या ठिकाणी मध्यभागी तोफेवर कोरलेला आहे . शिलालेख खोदीव स्वरूपाचा असून ७ ओळीचा असून राजस्थानी मिश्रस्वरूप भाषेत आहे. काळाच्या ओघात वातावरणामुळे तोफेस गंज लागला असल्यामुळे व काही ओरखडे लागले असल्यामुळे शिलालेखाची अक्षरे झिजलेली असून पुसट झालेली आहेत .तोफेची लांबी साधरण ७ फूट लांबीची असून दीड फूट व्यासाची आहे तोफेच्या मध्यभागी मजबूत दोन कान असून त्याच्या पुढे हा लेख कोरलेला आहे ,तोफेचे मुख (वाघ्र्यमुखी) वाघाच्या तोंडाचे असून तिचे नाव भयंकरी असे आहे .
गावाचे नाव : मु पो काठापूर बुद्रुक ,ता.आंबेगाव ,जि .पुणे
शिलालेखाचे वाचन :
१.श्री महाराजाये नमा
२.श्री राजा जयसिंह
३.(दे )व की सरकारा मा या
४.व ठाकर कास्यकार कान
५.संवत १७५५ तोप कौन
६.म भयंकरी चैत् वदी १३
७.सौम्य
जी.पी.एस. :१८.९७ ” ७४ ’ १४ ,७४.१४ ’’५७ ’३५
शिलालेखाचे स्थान :-तोफेवर मध्यभागी वाघ्र्यमुखाच्या मागच्या बाजूस आहे
अक्षरपद्धती : कोरीव स्वरूपाचा लेख आहे
भाषा : देवनागरी लिपी मराठी राजस्थानी मिश्र जुनी वळणाची
प्रयोजन : भयंकरी नावाची ओतीव तोफ बनवल्याची/ओतल्याची स्मृती जपणे .
मिती / वर्ष : सवंत १७५५ –शके १६२० बहुधान्य नाम संवत्सरे चैत्र शुद्ध १३सौम्य
काळ वर्ष : १७ वे शतक – १४ मार्च १६९८
कारकीर्द :-औरंगजेब बादशहा
व्यक्तिनाम : महाराजा श्री सवाई जयसिंह ,यादव ठाकर(कास्यकार)
शिलालेखाचे वाचक : डॉ .श्रीकृष्ण जुगनू ,श्री अनिल दुधाने
अर्थ :-राजस्थानी सवत १७५५ ,म्हणजे शालिवाहन शकाच्या १६२० व्या वर्षी बहुधान्य नाम संवत्सरात चैत्र वाद्य १३ ला जयपूर येथील महाराजाधिराज श्री राजा सवाई जयसिंह देव यांच्या सरकार मध्ये (लोह कीट सिदी) म्हणजे कधीही गंज न लागणारी विविध मिश्र धातूची तोफ यादव ठाकर कास्यकार कारागीराने १४ मार्च १६९८ च्या दिवशी तोफ ओतून तयार केली किवा बनवली .या तोफेचे नाव हे भयंकरी असे ठेवले आहे .
शिलालेखाचे महत्व :-
तोफांचे साचे तयार त्यात तोफ ओतून /बनवून त्यांना नाव देण्याची आपल्याकडे चांगली परंपरा आहे. लोखंडी धातू ओतून कारागीर लोखंड, तांबे पितळ ,गण मेटल इत्यादी धातू वितळवून योग्य प्रमाणात त्या साच्यातून तोफ तयार करतात. या तोफाची नावे राज्यकर्ते व सहसा स्वताची किवा युद्धाशी संबंधित शब्दांवर आधारित ठेवत असत . असा संदर्भ वीर रास, रौद्र रास या दुर्गासप्तशती ग्रंथामध्ये आढळतो. त्याचप्रमाणे जसे आपल्याकडे मुलाचे नामकरण होते तसे उत्तरेकडे तोफांच्या नावाचे विधी व नियमित पूजाही होते. तोफखाना जितका मोठा असेल तितका तो व्यक्ती अधिक शक्तिशाली असे . युद्धात तोफखाना मारून शत्रूच्या तोफा आणि तोफगाडे ताब्यात घेण्याची परंपरा आहे.
शिलालेखात असलेला सवाई जयसिंह याच्या कारकिर्दीत ही तोफ तयार करून त्यावर सिंहाचे मुख कोरून तिचे नाव भयंकरी असे तिचे नामकरण केले होते .सवाई जयसिंहाने त्याच्या बहीनीचा नवरा बुद्धसिंहाचे बुंदी चे राज्य बळकावले होते .बुद्धसिंहाने माळव्यातील सुभेदार मल्हारराव होळकर यांची मदत घेवून १७३३मध्ये मंदसौर येथे लढाई केली यात मल्हारराव होळकर यांचा सेनापती संताजी वाघ याने सवाई जयसिहांचा यांचा लढाईत पराभव केला होता.या लढाईतएकूण ७ तोफा संताजी वाघ याने जिंकल्या होत्या त्यातली ही भयंकरी तोफ मल्हारराव यांनी संताजी वाघ यास भेट दिली .पुढे ही तोफ त्यांनी पुणे येथील काठापूर येथे आणून तेथील स्वताच्या गढीच्या समोर ही तोफ ठेवली होती.
सवाई जयसिंह यांचे सामाजिक, राजकीय ,आर्थिक,धार्मिक कार्य अतिशय मोठे असे आहे .त्याने स्वताच्या कारकिर्दीत तोफ बनवून त्यावर स्वताचे नाव देवून कायमस्वरूपी जनतेसमोर धातुलेख कोरून ठेवला शिवाय राजस्थानी भाषेत असलेला हा प्रथम लेख आहे हे या धातू लेखाचे महत्व आहे .
महाराजा सवाई जयसिंह याची ऐतिहासिक माहिती :-
महाराजा सवाई जयसिंग दुसरा हा भारतातील राजस्थानमधील आमेरचा शासक होता. जयसिंग दुसरा याचे पूर्ण नाव सवाई जयसिंग दुसरा होते. मुघल सम्राट औरंगजेबाने त्यांना सवाई ही पदवी बहाल केल्याचे सांगितले जाते.जयसिंग द्वितीय यांना लहानपणापासूनच गणित, स्थापत्यशास्त्र आणि खगोलशास्त्र या विषयात प्रचंड रस होता. त्यांनी अनेक वैद्यकीय शाळा बांधल्या. सवाई जयसिंगच्या वेधशाळांमध्ये दिल्ली, वाराणसी, जयपूर, उज्जैन आणि मथुरा यांचा समावेश होतो.वडिलांच्या आकस्मिक मृत्यूनंतर वयाच्या ११ व्या वर्षी त्यांनी राज्याच्या सिंहासनावर आरूढ झाले.
सवाई जयसिंगचा काळ १६९३ पासून मानला जातो महाराजा जय सिंह यांचे खरे नाव विजय सिंह होते. पण औरंगजेबाने त्याचे नाव विजय सिंह वरून जयसिंग असे बदलून त्याला आमेरचा उत्तराधिकारी म्हणून स्वीकारले.
जयसिंग द्वितीय यांचा जन्म ३ नोव्हेंबर १६६८ रोजी झाला. आमेर येथे घडली. त्यांच्या आईचे नाव राणी इंद्र कंवर आणि वडील अमरेचे राजा बिशन सिंग होते. तो त्याच्या भावांमध्ये सर्वात मोठा होता. पंडित जगन्नाथ हे त्यांचे गुरू आणि सल्लागार मानले जातात.अंबर (आमेर) च्या राजाच्या आकस्मिक मृत्यूनंतर, जयसिंग दुसरा वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी राजा झाला. १७०१ मध्ये जेव्हा त्याने मराठ्यांकडून विशालगडचा किल्ला ताब्यात घेतला तेव्हा औरंगजेबाने त्याला सवाई ही पदवी बहाल केली.
दिल्लीचा शासक मोहम्मद शाह याच्या दरबारातही तो हजर झाला. जयसिंग द्वितीय ने १७३४ मध्ये सम्राट मोहम्मद शाह यांच्या सन्मानार्थ ‘झिझ मोहम्मद शाही’ नावाचे एक पुस्तक पर्शियन भाषेत लिहिले.
औरंगजेबाच्या मृत्यूनंतरही दिल्ली बादशहाच्या जवळच होती. त्यांच्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून नवीन सम्राटाने हिंदूंवर लादलेला जिझिया कर रद्द केला.
सवाई हे जयसिंग वेधशाळेच्या बांधकामासाठीही ओळखले जाते. सवाई जयसिंग यांनी बांधलेल्या वेधशाळेत आजही दिल्ली आणि जयपूर येथील वेधशाळा पाहता येतात. त्यांनी भारतात अनेक ठिकाणी जंतरमंतर वेधशाळाही बांधली.
जयसिंग दुसरा जंतरमंतर बांधण्यासाठी ओळखला जातो, तो स्थापत्यकलेचा चमत्कार आहे. तो केवळ राजाच नव्हता तर एक महान खगोलशास्त्रज्ञ आणि शिल्पकार देखील होता.त्यांनी दिल्ली, जयपूर आणि इतर अनेक शहरांमध्ये जंतरमंतर बांधले. जंतरमंतर हे भारतीय वास्तुकलेचे सुंदर उदाहरण आहे
सवाई जयसिंगच्या या वेधशाळेत गुलाबी चमक दाखवण्यासाठी अनेक विचित्र बांधकामे आहेत. जंतरमंतर खरोखरच अनेक अर्थांनी अप्रतिम आहे. हे त्याच्या काळातील सर्वात नवीन उदाहरण म्हणता येईल.
जंतरमंतरमध्ये सम्राट यंत्र, सूर्याचे घड्याळ, सूर्यमालेतील मोठ्या वस्तूंचे अंतर मोजण्यासाठी राम यंत्र आणि सौरमालेतील वस्तूंची स्थिती निश्चित करण्यासाठी जय प्रकाश यंत्र आहे.सवाई जयसिंग द्वितीय यांनी पोर्तुगाल, अरेबिया आणि इतर देशांतून खगोलशास्त्राशी संबंधित अनेक पुस्तके आयात केली. या ग्रंथांचे त्यांनी संस्कृतमध्ये भाषांतर केले. तसेच त्याने युरोपातून एक मोठी दुर्बीण मागवली. होती
जयपूर हे पिंक सिटी म्हणून जगात प्रसिद्ध आहे. सुमारे ३०० वर्षांपूर्वी १८ नोव्हेंबर १७२७ रोजी या शहराची स्थापना झाली. जयपूरच्या गुलाबी शहराची स्थापना माजी महाराजा सवाई जयसिंग द्वितीय यांनी केली होती.जयसिंग द्वितीय (सवाई राजा जयसिंग) यांना स्थापत्य शास्त्रात प्रचंड रस होता. कारण तो एक चांगला खगोलशास्त्रज्ञ आणि वास्तुविशारद सोबतच काहीसा राजा होता. त्याने १७२७ मध्ये जयपूर हे गुलाबी शहर वसवले आणि त्याला आपली राजधानी बनवले.आपल्या अद्वितीय वास्तुकलेसाठी जगप्रसिद्ध जयपूरला ‘जयपूर’ म्हणूनही ओळखले जाते. विश्वाच्या नऊ मंडळांशी संबंधित नऊ आयताकृती क्षेत्रे एकत्र करून त्यांनी जयपूर शहराची निर्मिती केली.ग्रीड प्रणालीच्या आधारे बांधलेले, शहराला व्यवसायांशी संबंधित स्वतंत्र क्षेत्रे वाटप करण्यात आली. या शहरात रुंद सुंदर रस्ते, आणि अनोख्या इमारती, रस्त्यांवरील सावलीची झाडे हे सर्व व्यवस्थितपणे केले ,शहराला पाणीपुरवठ्यासाठी विहिरी आणि गाळ काढण्यासाठी नाले देण्यात आले. अशा प्रकारे, त्या काळी जयपूर हे स्थापत्यकलेचे एक अद्वितीय उदाहरण होते.
सवाई जयसिंग राजाचा मृत्यू-
सवाई जयसिंग द्वितीयचे २१ सप्टेंबर १७४३ रोजी जयपूर येथे निधन झाले. सवाई जयसिंग द्वितीय़ ला २७ राण्या होत्या. यातील ३ राण्या त्यांच्यासोबत सती झाल्या.आजही जयपूरमधील सवाई जयसिंग यांचे स्मारक याची साक्ष देते. १७४३ मध्ये सवाई जयसिंगच्या मृत्यूनंतर, त्यांचा छोटा मुलगा ईश्वरी सिंग जयपूरच्या गादीवर बसला.
संदर्भ ग्रंथ :-
१.राजस्थान का पुरातत्व एव इतिहास –जेम्स टोड
२. होलकरो का इतिहास, - मधूसुदनराव होळकर
३.होळकर शाहीच्या इतिहासाची साधने –वा. वा.ठाकूर
संक्षेप :- सरकारामा-सरकार मध्ये , याव-यादव , ठाकर-ठाकूर , संवत-सवत तोप –तोफ कौनम-काम ,
चैत्-चैत्र , वदी –वद्य,सौम्य-सोमवार
संदर्भ -(IE VI -१९८ )
©माहिती व संकलन :-अनिल दुधाने
टीप .सदर कार्यात डॉक्टर श्रीकृष्ण जुगनु सर ,श्री रामभाऊ लांडे,श्री राहुल वावरे यांचे मदत व सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment