महाबली शहाजीराजे कैद आणि इतिहासातील अपिरिचित योद्धा खंडोजी पाटील पराक्रम !!
१६३६ साली निजामशाहीचा अस्त झाल्यानंतर निजामशाहीच्या भागाची वाटणी होऊन मोगल आणि आदिलशाह यांच्यात तह झाला, महाबली शहाजी महाराज दक्षिणेत आदिलशाहीत गेले. आदिलशाहीत गेल्यानंतर महाबली शहाजी महाराज यांनी रणदुल्लाखानासोबत कर्नाटक तसेच इतर भागात पराक्रम गाजवला. रणदुल्लाखानाच्या मृत्यूनंतर महाबली शहाजी महाराज स्वतंत्रपणे वागू लागले शिवाय आदिलशाहीतील काही सरदार हे शहाजी महाराज यांच्या तंत्राने वागू लागले. महाबली शहाजी महाराज हे कर्नाटकातील हिंदू पाळीगारांना एकत्र करत आदिलशाहीविरुद्ध बंड पुकारण्याची चिथावणी देत आहेत तसेच स्वराज्य स्थापनेच्या कार्यात शिवाजी महाराजांना छुपी मदत करत आहेत अशा संशयावरून आदिलशाहने शहाजीराजे भोसले यांना अटक करायचे ठरवले. त्यावेळी शहाजीराजे भोसले हे जिंजीच्या मोहिमेवर होते आणि आदिलशाहने याच मोहिमेवर असणाऱ्या आपला वजीर मुस्तफाखान याला शहाजीराजे भोसले यांना अटक करायची कामगीरी दिली. मुस्तफाखान याने शहाजीराजे भोसले यांच्या जिंजी येथील छावणीस अचानक वेढा टाकून बाजी घोरपडे, बाजी पवार, बाळाजी हैबतराव, फतहखान यांच्या सहाय्याने २५ जुलै १६४८ रोजी अटक केली..
महाबली शहाजीराजे भोसले यांना अटक याप्रसंगी घडलेल्या संग्रामात महाबली शहाजी महाराजांच्या पदरी असलेल्या एका वीराने आपला पराक्रम गाजवला, या रणसंग्रामात हा वीर शहीद झाला त्याचे नाव म्हणजे खंडोजी पाटील. खंडोजी पाटील यांनी याप्रसंगी केलेल्या पराक्रमाचे वर्णन शिवभारत या साधनात नोंदवले गेले आहे.
शिवभारतकार कवी परमानंद लिहतात " महाबाहू व महाबलाढ्य शहाजी राजा सज्ज होत आहे आणि त्याचे मोठे सैन्य आकस्मिक भयाने ग्रस्त झाले आहे इतक्यात प्रत्येक युद्धात सिंहाप्रमाणे अकुंठगति असलेला खंडोजी पाटील हा एकटाच घोरपड्यांवर चालून गेला. अंगात कवच घातलेला, अभेद्य ढालीमुळे खंबीर, भाला घेतलेला, अचूक नेम असणारा, तलवार लटकवलेला युद्धात कुशल असलेला खंडोजी पाटील जेंव्हा घोड्यावर बसला तेंव्हा बाजी घोरपडे इत्यादींनी सिंहगर्जना केली. मग वेगवान घोरपडे सरदारांनी पाटील कुलभूषणाला चोही बाजूने घेरले. तेंव्हा त्या तेजस्वी खंडोजी पाटलाने मेघाला भिडणाऱ्या आपला भाला गरगर फिरवून आपल्या घोड्यास हजारो रिंगणे घ्यावयास लावली. नाना प्रकारच्या शस्त्रांनी प्रहार करणाऱ्या, मोठी आयुधे धारण करणाऱ्या वीरांचे त्याने आपल्या भाल्याच्या संतापाने तुकडे तुकडे केले. त्याने आपल्या लांब आणि तीक्ष्ण भाल्याने कोणा एकाचे पर्वत शिखरासारखे शीर छाटून टाकले. त्याने कोणाचा घोडा, भाल्याच्या पात्याने भोकसून हत्तीच्या गंडस्थळासारखा त्याचा उंच खांदा एकदम खाली पाडला. कोणाचे पाय, कोणाची कंबर तर कोणाचे कंठ त्या खंडोजीने कापून काढले. तो पाटील एकटा असूनही अनेक होता असे भासले "
खंडोजी पाटील रणात आपला पराक्रम गाजवत असताना बाजी घोरपडे याने गर्जना करत खंडोजी पाटील यांना युद्धास आव्हान केले. तेंव्हा खंडोजी पाटील याने बाजी घोरपडे याच्या छातीवर वार केला, त्यात बाजी घोरपडे बेशुद्ध पडले. बाजी घोरपडे बेशुद्ध पडलेले पाहून घोरपडेंच्या सहकाऱ्यांनी खंडोजी पाटील यांच्यावर हल्ला चढवला.
या हल्ल्यात देखील खंडोजी पाटील यांनी आपले शौर्य दाखवले, त्याबाबत शिवभारतकार नोंदवून ठेवतात " चोहीकडून योद्ध्यांनी फेकलेली सर्व शस्त्रे अंगावर येऊन पडू लागली, त्यापैकी काहींचे आपल्या भयंकर तलवारीने दोन तुकडे, काहींचे तीन तर काहींचे पाच तसेच काहींचे नऊ नऊ दहा दहा तुकडे केले. बाजराजाने क्षणभर मूर्च्छा आणि क्षणभर अत्यंत विलक्षण स्थितीत स्वतः अनभवून पुन्हा पाटलाशी लढू लागला. जिचा आकार शत्रूंना भयंकर होता अशी प्रचंड गदा बाजराजाने आपल्या कौशल्याने पाटलाच्या अंगावर हाणली. कार्तिक स्वामीच्या तीक्ष्ण शक्तीने क्रोच पर्वत जसा पडला तसा बाजराजाच्या गदेने भिन्न होऊन तो उत्कृष्ट योद्धा खंडोजी पाटील स्वर्गवासी झाला "
महाबली शहाजी महाराज यांच्यावर ओढवलेल्या या संकटसमयी पराक्रम गाजवत स्वामीनिष्ठेसाठी प्राणाची आहुती देणारे इतिहासातील अपरिचित असे एक पान खंडोजी पाटील...
- राज जाधव
No comments:
Post a Comment