नामांकित वास्तू
नामांकितांच्या वास्तू
" इंदुमती हॉल "
इंदुमती राणीसाहेब यांचा बंगला ( सर्किट हाऊस)
इंदुमती राणीसाहेब या छत्रपती शाहू महाराजांच्या धाकट्या स्नूषा.प्रिन्स शिवाजी या लाडक्या राजपुत्राचा विवाह करण्याचं ठरवल्यावर शाहू महाराजांनी शोधून काढलेलं एक अनमोल रत्न. बऱ्याच मुलींची परीक्षा महाराजांनी घेतली होती. या वधुपरीक्षेवेळी तोफखाने (हे विद्यापीठाच्या तोफखाने यांचे तीर्थरूप -खासगी कारभारी असावेत. ) यांचं सहाय्य त्यांनी घेतलं होतं. सासवडच्या शंकरराव पांडुरंगराव जगताप यांची ही कन्या - जमुना , ६ डिसेंबर १९०६ रोजी जन्मलेली. दिसायला देखणी , गोरीपान , सुदृढ आरोग्यसंपन्न आणि चुणचुणीत. वधुपरीक्षेवेळी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना "बोका" या शब्दाचं स्त्रीलिंग "भाटी" असं सांगून तिनं बाजी मारली होती.
६ जून १९१७ रोजी प्रिन्स शिवाजी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. हा हा म्हणता नव्या नवलाईचं वर्ष सरलं आणि दुर्दैवाने घाला घातला. डुकराच्या शिकारीसाठी कुंभोजच्या जंगलात गेलेल्या तरण्या राजपुत्राचा घोड्यावरुन पडून अपघाती मृत्यू झाला. लग्नाआधी शुक्रवार पेठेतील जनवाडकर वैद्य यांच्याकडे जमुनाची पत्रिका दाखवायला गेलेल्या आप्तांना भविष्य जाणणाऱ्या वैद्य
जनवाडकर यांनी वर्तवलेलं" ही मुलगी लग्न होऊन राजघराण्यात जाईल , पण सुख हिच्या नशीबात लिहिलेलं नाही " हे भविष्य खरं ठरलं. अवघं बारा वर्षांचं वय. लग्नाचा अर्थ कळण्याआधीच वैधव्य पदरी पडलं.
१०० वर्षांपूर्वीचा तो काळ. बालविधवा , त्यातून राजघराण्यातली. किती बंधनं पडण्याची शक्यता. पण या कोवळ्या मुलीच्या पाठीशी तिचा पहाडासारखा सासरा उभा होता.
आपल्या रयतेच्या सुखदुःखाची काळजी करणारा राजा आपल्या सुनेची हुषारी वाया जाऊ देणार नव्हता. पुत्रवियोगाचं स्वतःचं दुःख बाजूला ठेवून शाहू महाराजांनी संस्कारक्षम वयाच्या या सुनेच्या शिक्षणाचा विचार केला. वाड्यातील राणीवशात परंपरेत बुडालेल्या स्त्रीवर्गाचा विरोध तिला सहन करावा लागू नये , यासाठी तिला सोनतळी कॅम्पवर रहायला नेऊन ठेवलं.सोबत समवयस्क कम्पॅनियन मुली ठेवल्या.रोज सकाळी ११ ते ५ या वेळेत येऊन सर्व विषय शिकवणारे शिक्षक नेमले. शिस्तबध्द दिनक्रम आखून दिला आणि इंदुमती राणीसाहेबांचं शिक्षण मार्गी लावलं. तिला शिकारीत पारंगत केलं. अश्वारोहणात कुशल बनवलं .ड्रायव्हिंग शिकवलं. राज्यकारभाराचा गाडा ओढत असताना तिच्याकडं आपलं जराही दुर्लक्ष होऊ दिलं नाही. " घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी" अशी अवस्था होती महाराजांची. इंदुमती राणीसाहेब यांना लिहिलेल्या एका पत्रात महाराज त्यांना सासरी जाणाऱ्या शकुंतलेला कण्व मुनींनी केलेल्या उपदेशाचा दाखला देतात. सोबतच्या सख्यांशी प्रेमानं वागावं , नोकरांना चांगलं वागवावं असा उपदेश करतात.
अभ्यासाबरोबर तिचं मन रमावं म्हणून तिला एक वाघाचा बछडा पाळायला आणून देतात. इंदुमती राणीसाहेब यांची मॅट्रिक परिक्षा उत्तीर्ण झाली की त्यांना दिल्लीच्या मेडिकल कॉलेजमध्ये शिकायला पाठवून डॉक्टर करण्याचा महाराजांचा मानस होता. एकदा दिल्ली दौऱ्याच्या वेळी तिथल्या मेडिकल कॉलेजच्या प्राचार्यांशी इंदुमती राणीसाहेब यांचा परिचय या आपल्या भावी विद्यार्थिनी असा महाराजांनी करून दिला होता. पण तिथंही राणीसाहेबांचं दुर्दैव आड आलं. इंदुमती राणीसाहेब मॅट्रिक होण्याआधीच महाराजांचं निधन झालं. त्या दिवशी मुंबईत "पन्हाळा लॉज"मध्ये महाराजांच्या पायाशी बसलेल्या इंदुमतीदेवींची काय अवस्था झाली असेल याची कल्पनाही करवत नाही.
१९२५ साली मॅट्रिक्युलेशन परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या त्या राजघराण्यातील पहिल्या महिला होत्या.
महाराजांच्या निधनामुळे मेडिकल शिक्षण घेण्याचा विचार बाजूला राहिला, तरी महिला शिक्षणासाठी राणीसाहेबांनी आपलं उभं आयुष्य वेचलं.
१९५४ साली त्यांनी " ललित विहार" या संस्थेची स्थापना केली.१९ एप्रिल १९५४ रोजी महाराणी शांतादेवी गायकवाड प्रशिक्षण संस्था, महाराणी विजयमाला छत्रपती गृहिणी महाविद्यालय, औद्योगिक कला भवन, मॉडेल हायस्कूल फॉर गर्ल्स अशा संस्था स्थापन करताना बडोद्याच्या शांतादेवी गायकवाड यांच्याशी पत्रव्यवहार करून माहिती मिळवली आणि नंतर सहाय्यही.
महाराणी विजयमाला राणीसाहेब यांनी त्याचवेळी जुन्या राजवाड्याच्या काही भाग देऊन संस्थेच्या जागेचा प्रश्न मार्गी लावला होता. (या संस्थेचं तात्यासाहेब तेंडुलकर ज्युनिअर कॉलेज काढण्यासाठी आणि पुढं
राजारामपुरीतल्या महिला वसतिगृहाचं नूतनीकरण करण्यासाठी प्राचार्या कै. मालती ठाकूर बाईंच्या काळात आम्ही तेंडुलकर यथाशक्ती हातभार लावू शकलो याचा आम्हाला अभिमान वाटतो.)
राजवाड्यात राहून सामाजिक कार्य करणं राणीसाहेबांना कितपत शक्य होईल अशी शंका महाराजांना वाटणं स्वाभाविक होतं. म्हणूनच स़ोनतळीतील वास्तव्य संपल्यावर महाराजांनी इंदुमतीदेवींची स्वतंत्र सोय बावडा रस्त्यावरच्या ( या बंगल्याला "आयर्विन हॉल " असं म्हणत, असं ऐकलेलं होतं.) या टुमदार सदनात करुन दिली होती. ताराबाई पार्कातून कृषी खात्याच्या शेतीवाडीकडे जाणाऱ्या बावडा मार्गावर ही वास्तू अगदी शांत वातावरणात गर्द वनराईत उभी होती. तिथं अस्तित्वात असणाऱ्या एका कोनशिलेवरचा मजकूर पुढीलप्रमाणे आढळतो -
GUEST HOUSE
CONSTRUCTED
DURING THE REIGN OF SIR SHREE SHAHU CHHATRAPATI MAHARAJA G.C.S.I., G.C.N.O.,L L D MAHARAJA OF KOLHAPUR
UNDER THE DIRECTIONS OF
SHRIMANT PIRAJIRAO
BAPUSAHEB GHATGE
SARJERAO WAJARAT MA AB CSI CIE, CHIEF OF KAGAL
OPENED BY
SHRIMANT YUWARAJ CHHATRAPATI RAJARAM MAHARAJA
ON THE 10 th OCTOBER 1915
PLAN BY M/S JIWABA
KRISHNAJI CHAVAN
OVERSEER KAGAL
M/S VISHNU KRISHNAJI
CHAVAN CONTRACTOR
COMMENCED 20 th OCTOBER 1914 FINISHED
10 th OCTOBER 1915.
पायऱ्या चढल्यावर प्रशस्त व्हरांडा , मध्यवर्ती पोर्चमधून सरळ प्रवेश केल्यावर एक दिवाणखाना व त्याच्या मागल्या बाजूला आणि दोन्ही बाजूला शयनकक्ष, ग्रंथालय व अभ्यासिका (असाव्यात असा अंदाज) अशा मध्यम आकाराच्या खोल्या. या इंदुमती लॉजचं सर्किट हाऊसमध्ये रुपांतर झाल्यापासून बाहेरचा भाग तसाच राहिला तरी अंतर्गत भागात वेळोवेळी बरेच फेरफार झालेले दिसतात. उंचच उंच छतावर कौलं आहेत. पोटमाळ्यासारखी रचना वरच्या बाजूला दिसते.अलिकडं या दोन्ही बाजूंना असलेल्या कक्षांना विशाळगड , सिंहगड , भुदरगड अशी नावं देण्यात आली आहे. आजच्या दिवशी मुख्य दालनात काही दुरुस्ती - सुतारकाम चालू असलेलं आढळलं.
मागच्या बाजूला स्वयंपाकघर , गाडी ठेवण्यासाठी गॅरेज , सेवकांच्या रहाण्याची सोय आहे. सर्किट हाऊस झाल्यापासून इथली गर्दी वाढली. वहानांची ये जा वाढली.व्ही आय पी मंडळींचे मुक्काम होत असल्याने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येतो. आता काही वर्षामागे नवी इमारत बांधून. सोयी वाढवल्या आहेत.आवारात
जुन्या काळातले मोठे वृक्ष आहेत. एक छोटंसं हनुमान मंदिर आहे.
इथल्या बकुळवृक्षाखाली बकुळफुलांचा सडा पडलेला नेहमी दिसतो.
साहित्य , ललितकलांच्या दर्दी आस्वादक असणाऱ्या राणीसाहेबांची ग्रंथसंपदा मोठी होती.( त्यांचा हा ग्रंथ संग्रह त्यांच्या माघारी कुठं गेला ठाऊक आहे का कुणाला ? ) मराठी , इंग्रजी , संस्कृत भाषेतील अनेक दुर्मिळ ग्रंथ त्यांनी जमवले होते. तो नुसता दिखाऊ संग्रह नव्हता. त्यांचं वाचनही भरपूर असे. वरुण तीर्थ वेशीतील जेरेशास्री यांच्या वाड्यात दुपारच्या वेळी जाऊन शास्त्रीबुवांकडून भगवद्गीता व ज्ञानेश्वरीतील शंकांचं निरसन शास्त्रीबुवांच्या पायाशी बसून त्या अगदी नम्रतेनं करुन घेत असत. गुरुमहाराज वाड्यात शास्त्रीबुवांच्या प्रवचनालाही त्यांची हजेरी असे.
पाश्चात्य अभिजात वाड्.मया खेरीज आनंदीबाई शिर्के सारख्या समकालीन महिलांच्या लिखाणाकडेही त्यांचं लक्ष असे.( तसे दाखले त्यांच्या भाषणात मिळत.) वि. द. घाटे यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या करवीर ग्रंथालय परिषदेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं होतं. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर जन्मशताब्दी साजरी करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता.अनेक पुस्तकांच्या प्रकाशनासाठी सहाय्य केलं होतं.
विपुल वाचन तर त्या करतच, पण संगीताचा कान असल्यामुळे नाट्य व व शास्त्रीय संगीताच्या बऱ्याच दूर्मिळ ध्वनिमुद्रिका त्यांच्या संग्रहात होत्या. त्यामुळे त्यावरुन एच्. एम. व्ही. कंपनी बालगंधर्वांच्या अनुपलब्ध दुर्मिळ गाण्यांच्या ध्वनिमुद्रिकांच्या आवृत्ती
बालगंधर्व शताब्दीनिमित्त पुन्हा एकदा काढू शकली. ( बालगंधर्वांच्या अखेरच्या काळात त्यांनी आर्थिक मदत केली होती असं ऐकलं होतं.)
हे त्यांचे उपकार मराठी नाट्य संगीत रसिकांना विसरता येणार नाहीत.
सोनतळीत सुनबाईंना वाघाचा बच्चा आणून देणाऱ्या शाहू महाराजांनी इंदुमतीराणीसाहेबांना गाडी चालवण्यास शिकवलं होतं. (आपल्या गाडीसमवेत या वास्तू च्या आवारात काढलेला त्यांचा एक फोटो माझ्याकडे होता पण आज ऐनवेळी सापडेना.)
शिक्षणसंस्था, वसतिगृहं इत्यादींच्या उद्घाटन सोहळ्याला त्या आवर्जून उपस्थित रहात.आपल्या द्रष्ट्या सासऱ्यांनी इथंतिथं लावलेल्या विद्येच्या इवल्याशा रोपांचे वेलू गगनावरी गेलेले पहाताना त्यांना धन्यता वाटली असेल.रत्नागिरीत शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या अनावरण समारंभाला उपस्थित रहाताना, रयत शिक्षण संस्थेत छत्रपती शाहू महाराजांच्या तैलचित्राचं अनावरण करताना, साताऱ्यात जिजाऊ मॉंसाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण करताना आपल्या घराण्याचा सार्थ अभिमान त्यांना वाटला असावा.
आपल्या कोल्हापूरच्या राजघराण्यात सर्वसामान्य जनतेला नेहमी प्रवेश असे. तिच परंपरा इंदुमती राणीसाहेबांच्या या वास्तूत पाळली जायची.शिक्षण क्षेत्रातील मंडळी, अमेरिकेन मिशनरी मंडळी यायची तसेच खेड्यापाड्यातील लोकही आपलं मागणं कानावर घालायला येत.सगळ्यांना या इंदुमती हॉलमध्ये मुक्तद्वार होतं.
रेड क्रॉस सोसायटीचं काम राणीसाहेब करत.माईसाहेब बावडेकरांच्या शिक्षणकार्यात त्यांचा सहभाग असे. मादाम मॉंटसोरी कोल्हापुरात आल्या होत्या तेव्हा राणीसाहेब सर्व कार्यक्रमांना उपस्थित होत्या. राजाराम कॉलेजच्या नव्या इमारतीत त्यांनी बराच रस दाखवला , त्यासाठी १२५ एकर जागा सरकारला दिली. रोज संध्याकाळी सागरमाळावर फिरायला गेल्या , की त्या बांधकामावर एक नजर टाकल्यावाचून रहात नसत.
एवढी कामं केली त्यांनी आयुष्यभर पण नेहमी प्रसिद्धीपासून चार हात दूर राहणंच पसंत केलं.स्वत:ची एकसष्ठी साजरी करण्यास नकार देऊन फक्त सहकारी भगिनींचा घरचा प्रेमाचा समारंभ त्या स्वीकारला होता.
सारं आयुष्य समाजासाठी, शिक्षणासाठी खर्ची घालणाऱ्या या राजघराण्यातील स्त्रीला प्रौढ जीवनात तरी जिच्यापाशी मन मोकळं करता येईल अशी एखादी सखी भेटली असेल का ? राजघराण्यात अभिप्रेत असणारं एक तटस्थ अंतर सांभाळताना त्यांच्या मनाचा किती कोंडमारा झाला असेल ? मनीचं गूज कुणापाशी बोलून दाखवलं असेल त्यांनी ? श्रवण- वाचन आणि संगीतानं जीवनातील या त्रुटी भरुन काढता येतात ?
शाहू महाराज आणखी जगते , तर या लेकीसारखं ममत्व बाळगलेल्या एकाकी युवतीचं जीणं सुखी करण्यासाठी त्यांनी आणखी एखादं धाडसी सुधारक पाऊल उचललं असतं का ? आपल्या एका बहिणीचा होळकरांशी आंतरजातीय विवाह ठरवणाऱ्या महाराजांसाठी हे अशक्य नक्कीच नव्हतं. डॉक्टरकीचं शिक्षण घेऊन परतल्यावर कोणत्या नव्या सुधारणा त्यांनी केल्या असत्या ?
असे अनेक (उत्तरं नसलेले) प्रश्न समोर उभे रहातात.
सदैव सौम्य रंगाच्या साड्या , गळ्यात एखादा मौक्तिक सर आणि डोक्यावर खानदानी पध्दतीनं घेतलेला पदर. मूद्रेवर निरांजनाच्या उजळणाऱ्या ज्योतीसारखे शांत- तेजस्वी भाव !
या वास्तूलाही असेच प्रश्न पडत असतील का ? नियतीचे अघोरी चटके सहन केलेल्या त्या एकाकी दुर्दैवी जीवाच्या दुखऱ्या जखमांवर या वास्तूनं फुंकर घातली असेल का कधी ?
या वास्तू समोरुन जाताना नेहमी इथल्या बकुळ फुलांची तुलना त्या अभागी राजस्नूषेशी करावीशी वाटते मला, तशीच या वास्तूला वाटली असेल का कधी ? तसंच सुगंधी पण उपेक्षित जीवन !!
बाराव्या वर्षी वैधव्य येऊनही शांत , समाजाभिमुख जीवन व्यतीत करणाऱ्या- जिचं वर्णन कोल्हापुरात आलेल्या राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी "भारतीय संस्कृतीचं प्रतिक" अशा समर्पक शब्दांत केलं होतं -
त्या अभ्यासू , प्रज्ञावंत त्यागमूर्तीला शत शत नमन!
संदर्भ -
इंदुमती राणीसाहेब -
कृ. गो. सूर्यवंशी.
ऋणनिर्देश -
श्री राम देशपांडे.
२२ ऑगस्ट २०२३
अनुराधा अनिल तेंडुलकर
कोल्हापूर
९८८१२०४०५०
No comments:
Post a Comment