महंमदखान बंगश आणि बाजीराव पेशवे
महंमदखान बंगश हे नाव आपल्याला नवीन नाही. बाजीरावांनी बुंदेलखंडात १७२९साली ज्याचा पराभव केला अन छत्रसालाला ज्याच्यापासून वाचवलं, तो बंगश.
पण, आपल्याला हे माहित आहे का, की या बुंदेलखंड स्वारीनंतरही बंगशाला पेशव्यांच्या फौजांनी अजून दोन वेळा मात दिली होती?
एक प्रसंग होता तो १७३२चा चिमाजीअप्पांचा, ज्यात बंगश अगदी नाक मुठीत धरून पुन्हा शाहू महाराजांकडे गयावया करत आला, म्हणाला "तुम्हीच मध्यस्ती करून आता सैन्याला परत बोलवा". यावर महाराज म्हणाले, "मी माळवा बाजीरावाला दिला आहे, जे काही बोलायचं ते त्याच्याशी बोल, तो ठरवेल तसं होईल". अखेरीस बंगशाने अप्पांशी तह केला.
दुसरा प्रसंग म्हणजे १७३६ सालचा. बाजीराव उत्तरेच्या मोहिमेत राजपुतांशी सख्य करण्यात गुंतले असताना बंगशाने पुन्हा बुंदेलखंड आणि माळवा काबीज करण्याचा प्रयत्न केला, पण सरदार बाजी भिवराव रेठरेकरांनी बंगशाला नर्मदेच्या वाळवंटात एका कोपऱ्यात अडकवून शरण यायला भाग पाडलं होतं.
आता बंगश पण कसा पक्का राजकारणी पहा, या दोन्ही प्रसंगांच्या मध्ये जेव्हा राधाबाई काशियात्रेला गेल्या तेव्हा याच बंगशाने राधाबाईंची बडदास्त ठेवली, कारण त्याला माहित होतं, पेशव्याच्या आईच्या केसालाही धक्का लागला तर बाजीराव आपल्या घरात घुसून फरपटत बाहेर आणून मारेल! त्यामुळे त्याने इथे काहीही चलाखी केली नाही.
आता शेवटचा प्रसंग, जो खालच्या पत्रात नमूद आहे. नादिरशाह जेव्हा चाल करून आला तेव्हा बादशाही वाचवण्याची पराकाष्ठा सारेच मुघल सरदार करत होते. पण साऱ्यांना भरवसा हाच होता की आपला इथला कट्टर शत्रू बाजीराव हाच नादिरशहाला हरवू शकतो. म्हणूनच, बंगशाने (बहुदा हिंगण्यांकरवी) कळवलं की बाजीराव जर नादिरशहाला हरवू पाहतील तर मी चाळीस हजार पठाण घेऊन त्यांच्या मदतीला येतो. आपण एकत्र ही मोहीम करू.
अर्थात, बाजीरावांच्या फौजा वसईत गुंतल्या असल्याने अन बाजीराव जमवाजमव करून उत्तरेत जायच्या आधीच नादिरशाह निसटल्याने हे राजकारण पुढे गेलं नाही. पण एकंदरीत, या अशाही गोष्टी आहेत ज्या आपल्याला कदाचित माहीत नसतील.
- कौस्तुभ कस्तुरे
स्रोत: सातारा ऐतिहासिक लेखमाला, भाग २, लेखांक २६६
No comments:
Post a Comment