विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 17 August 2023

कर्जबाजारी पेशवे आणी पेशवाईतील सावकार.

 

कर्जबाजारी पेशवे आणी पेशवाईतील सावकार
लेखन :अरविंद गायकवाड


(सर्वांनी आवर्जून वाचावा असा लेख. कृपया लेखास जातीय रंग देऊ नये ही विनंती. इतिहासात्मक प्रबोधन एव्हढाच हेतू हा लेख लिहिताना ठेवलेला आहे.)
कर्जाचे कारण वयक्तिक असो सरकारी असो किंवा धार्मिक. पेशव्यांस वेळोवेळी फार मोठं मोठाली कर्जे काढावी लागलेली आहेत हे खालील लेखावरून तुमच्या निदर्शनास येईल.
विशषेतः पेशवेकाळात कर्ज देण्या-घेण्याचा व्यवहार फार मोठ्या प्रमाणात चालत असे. खुद्द पेशवे, सरदार ह्यांना नेहमी कर्ज काढावे लागत असल्याने सावकारी धंदा करणाऱ्या पेढ्यांचे मोठे जाळेच राज्यात निर्माण झाले.
वेळप्रसंगी छत्रपतीही कर्ज काढत असत. हे कर्ज फेडण्याची जबाबदारी छत्रपतींनी नियुक्त केलेल्या पेशव्यांस पूर्ण करावी लागत असे.
वेगवेगळ्या मोहिमांसाठीही पेशव्यास कर्जे काढावी लागत असत.
पेशवाईत ब्राम्हण सावकारांची संख्या मोठी होती. उदाहरणार्थ: विठोबा नाईक रास्ते, श्रीधर पाठक, सीताराम श्रोत्री, रामकृष्णभट वैद्य, अंतोबा भिडे, जिनभट गाडगीळ, बालंभट वैद्य, रघुनाथराव पटवर्धन, .......असे खूप सारे ब्राम्हण सावकार आहेत.
लाखो रुपये एका रकमेने ते कर्जाऊ देत असत. कर्जाची रक्कम जर मोठी असेल तर तीन चार सावकार मिळून सामाईक कर्ज देत असत.
हातावर कर्जाऊ रकमाही देण्याचा प्रघात होता. परंतु खते लिहून कर्जे देण्याचा प्रघात जास्त विश्वसनीय असल्याने त्याचा
वापर मोठ्या प्रमाणात होत असे. पेशवाईत वचन चिठ्ठीचा प्रकार फारसा आढळताना दिसत नाही. कर्जरोखे आणि गहाण खाते हीच मुख्यतः असत. जसे तारण गहाण असे तसेच कब्जे गहाणही असे.
पुण्यातील सर्वच पेशव्यांना वाडेहुडे बांधण्याचा मोठा शौक असल्याने त्यासाठी ते कर्जे घेत असत. पेशव्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन सरदार मंडळीही गावे आणि तीर्थे वसविण्यासाठी कर्ज घेत असत. विठोबा नाईक रास्ते हे पेशवाईत मोठे सावकार होते. त्यांनीच वाईची वस्ती वाढवून धर्मपुरी पेठही वसविली.
बाजीराव, नानासाहेब, रघुनाथराव यांना इमारती, वाडे वसविण्याचा छंद होता. दुसरा बाजीराव नादान जरी असला तरी त्यालाही वैभवाची, विलासाची आणि डाम डौलाची भारी हौस होती.
पेशव्यांच्या स्रिया ह्या धार्मिक कार्यात फारच अग्रेसर असल्याने दानधर्म, तुलादान, तीर्थयात्रा यांवर लाखो रुपयांनी खर्च करीत असत. खुद्द पेशवेही दानधर्मांवर, तीर्थयात्रांवर जेवणावळींवर मनसोक्त पैसे खर्च करत असत.
पेशव्यांचा आणि त्यांच्या स्रियांचा अति धार्मिक पणा हा स्वराज्याला फार महागात पडलेला आहे.
एकूणच काय खुद्द पेशवे आणि त्यांच्या स्रिया यांचे विलासी खर्चाऊ जीवन हेच त्यांना कर्जात बुडविणारे ठरले.
पेशव्यांच्या स्रियांची धर्मकार्ये, लग्नकार्ये, वस्र, दागदागिने, सण उत्सव यांवर होणार अमाप खर्च पाहता पेशव्यांना कायम सावकारांवर अवलंबून राहावे लागत असे.
आता अश्या वेगवेगळ्या कौटुंबिक आणि राजकीय खर्चांचा मेळ बसविण्यासाठी पेशव्यांना वारंवार मोहिमांवरही जावे लागे. परत अश्या मोहिमांवरही खूप खर्च होत असे. ह्या मोहिमांसाठीही पेशवे कर्ज काढताना आढळतात.
म्हणजे थोडक्यात एक कर्ज चुकविण्यासाठी दुसरे कर्ज.
ब्राम्हणांच्या जेवणावळींवर पेशवे अफाट खर्च करत असत. जेवणावळी ह्या ब्राम्हणांसाठीच असत. इतर समाजासाठी नाही. ( अभ्यासूंना विनंती: कोणाच्या वाचनात इतर समाजासाठीही पेशव्यांनी जेवणावळी दिल्याचे वाचनात आले तर जरूर सांगावे.)
दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांना १८०३ मध्ये केळीच्या पानावर साग्र संगीत जेऊ घातले होते. सर बॅरी क्लोज पुण्यात इंग्रजांचा रेसिडेंट असताना लॉर्ड व्हॅलेन्शिया या इंग्रज अधिकाऱ्याने पुण्याला भेट दिली होती. त्यांच्या सन्मानार्थ बाजीराव साहेबांनी हिराबागेत खास ब्राह्मणी जेवणाची मेजवानी दिली.
केळीच्या पानावर डाव्या बाजूला चटणी, लोणचे, पापड, कुरडया, कोशिंबीर, उजव्या बाजूला सात प्रकारच्या भाज्या, मध्यभागी साधा वरण-भात, साखरभात व सुरळी केलेली
पुरणपोळी, शिर्याची मूद. पानाबाहेर सार, कढी, आमटी, तूप, खीर अशा पातळ पदार्थांनी भरलेले द्रोण. अशी ह्या थाळीची मांडणी होती. आख्या पुण्यात अश्या जेवणावळींच्या विविधतेने भरलेल्या पंगती रंगात असत.
मात्र ह्याच पेशवाईतल्या शेतकऱ्याला दुष्काळ आणि सततची युद्धे यांमुळे उपाशी तापाशी आपले सणवार आणि दवस
ढकलावे लागत असत.
'पेशवाई हि खाण्यामुळे बुडाली' हि म्हण जी रूढ झाली त्याला अशी काही कारणे आहेत.
ब्राम्हणांना पैश्यांच्या रूपात दान दक्षिणाही मोठ्या प्रमाणात वाटली जात असे.
रावबाजीच्या शेवटच्या कारकीर्दीत दक्षिणेची रक्कम ८ ते १० लाखांपर्यंत गेली होती.
पेशवाईत ब्राम्हण सोडून इतर समाजातील गोर-गरिबांना दान दक्षिणा दिल्याची उदाहरणे दुर्मिळच आढळतात. तसेही धर्मानुसार ब्राम्हण सोडून इतरांना दान धर्म करण्याचा अधिकारही नव्हता. (भिकारी हा अपवाद आहे.)
पेशव्यांना कोणत्या कारणासाठी पैसे लागत असत, त्यासाठी किती पैसे सावकारांनी कर्जाऊ दिले याचे तपशील उपलब्ध ऐतिहासिक कागद पत्रांवरून पाहावयास मिळतात.
बाबूजी नाईक बारामतीकरांसारखे सावकार तर इतके जबरदस्त होते कि पेशव्यांनी वेळेत कर्जफेड केली नाही तर पेशवाईवर हक्क दाखविण्याचे धाडसही ते करून दाखवत असत.
१४ जानेवारी १७३९ रोजी पेशव्यांनी पुण्यात जो तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम केला त्यात मोघे, काम्बरस, दशपुत्रे, भिडे, कानडे, अनगळ अश्या १४ सावकारांची नावे आहेत. थोडक्यात काय तर तिळगुळ घ्या गोड गोड बोला.
१७४० च्या काही कागदपत्रांवरून असे दिसून येते कि पेशव्यांना कर्जपुरवठा करणाऱ्या सावकारांची संख्या ही दीडशेच्या आसपास आहे.
काही सावकार पेशव्यांस प्रत्यक्षपणे कर्ज देत असत तर काही दुसऱ्या मोठ्या सावकारामार्फत 'गुजारतिने' कर्ज देत असत. अश्या सावकारांमध्ये थत्ते, दातार, गाडगीळ, गोसावी, चिपळूणकर जोशी, तांबवेकर, तुळशीबागवाले, दीक्षित, पटवर्धन, पाठक, बिवलकर, भावे, भिडे, मोघे, रास्ते अशी आजून बरीच नावे सापडतात.
पुण्यात जसे पेशव्यांच्या आश्रयामुळे ब्राम्हण सावकारांचे मोठे प्रस्थ होते तसे सातारला नव्हते. सातारा राजधानीत परिस्थिती वेगळी होती. दुसऱ्या राज्यावर विजय मिळविल्यावर झालेल्या तहात खंडणीचे कलम असे. युद्ध झाल्यानंतर शत्रूच्या
प्रदेशातील खंडणी तिथल्या तिथेच सर्वच्या सर्व लगेच गोळा करता येत नसे.
किंबहुना ती उपलब्ध नसे. त्यामुळे सावकारामार्फत हुंड्याच्या स्वरूपात त्यांची वसुली करण्यात येई. १७५३ च्या श्रीरंगपट्टणच्या स्वारीत मराठ्यांनी दहा लाख नऊशे रुपयांची खंडणी आकारली होती. ह्या खंडणीची रक्कम सातारच्या बारा
सावकारांच्या पेढ्यांच्या नावाने गोळा केली गेली होती. ह्या सावकारांच्यात नऊ नावे हि गुजराथी सावकारांची आणि दोन नाव लिंगायत सावकारांची आहेत. साताऱ्यास ब्राम्हण सावकारांची संख्या हि कमी असावी असे ह्यावरून दिसते.
पेशवाईच्या काळात पुणे शहरातील सावकारांच्या संख्येत चित्पावन ब्राम्हणांचे प्रमाण व त्यांचे व्यावसायिक वर्चस्व मोठ्या प्रमाणात वाढलेले आढळून येते.
मुळात स्वतः पेशवे हे चित्पावन ब्राम्हण आणी भट घराण्यातील असल्यामुळे त्यांचे अनेक सरदार आणी जहागीरदार हे चित्पावन होते. पेशवेकालीन सावकारीत चित्पावन ब्राम्हणांचे महत्व वाढीस लागण्यास हे एक महत्वाचे कारण होते.
बर हे सगळे पिढीजात सावकार होते असेही नाही. ह्यातील कित्येक जण हे पूर्वी फार गरीब होते. उदाहरणार्थ मोरशेठ सुरवातीस साताऱ्यास एक लहान दुकानदार होते,
रामशास्त्री प्रभुणे लहानपणी एका सावकाराकडे नोकरच होते.
खासगी पुरोहिताचे काम करणाऱ्या अनेक ब्राम्हणांनी आपल्या दक्षिणा व इतर उत्पन्न साठवून सावकारी सुरु करून चांगला जम बसवून मध्यम व मोठे सावकार बनल्याचेही उदाहरणे पेशवाईत सापडतात.
पेशवाईत सगळ्यात प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे ब्राम्हणवर्ग हा इहवादी वृत्तीचा झालेला दिसतो.
धर्म-शास्राने घालून दिलेले नियम स्वतःच पायदळी तुडवून
( थोडक्यात देवधर्म, पौराहित्य वगैरे... ) पुण्याच्या ब्राम्हण वर्गाने जमेल त्या मार्गाने पैसे मिळविण्याचे उद्योग केले. मात्र इतर वर्गाला धार्मिक गोष्टींमध्ये बोट घालण्याचा अधिकार नव्हता. ( कारण धर्मशास्र. )
असे पैसे मिळून देणारे अनेक व्यवसाय असत कि ते स्वीकारताना ब्राम्हणवर्गाला बिलकुल संकोच होत नसे. उदाहरणार्थ: नोकर, शेतकरी, आचारी, पाणके, जासूद, कारकून, सैनिक, सावकार, दुकानदार, व्यापारी, वैद्य वगैरे..
ब्रम्हेन्द्रस्वामी धावडशीकरासारखा धार्मिक वृत्तीचा देशस्थ ऋग्वेदी ब्राम्हण स्वतःला मिळालेली दाने आणी देणग्या साठवून पुढे मोठा सावकार बनला.
ह्या ब्रम्हेन्द्रस्वामीने पेशव्यांना व इतर सरदारांना लाखो रुपयांची कर्जे दिल्याची पत्रे उपलब्ध आहेत. बाजीरावाने ब्रम्हेन्द्र स्वामींकडून कर्ज घेतले होते. ते दिलेले कर्ज व्याजासहित परत मिळावे म्हणून ब्रम्हेन्द्रस्वामी यांनी
बाजीरावाकडे तगादा लावल्याचे पत्र मोठे गमतीशीर आहे.
(ह्या ब्रम्हेन्द्रस्वामींवर आणी त्यांच्या पैशांवर भविष्यात एक चांगला लेखच लिहील. )
१७६९ च्या एका उपलब्ध यादीवरून असे दिसते कि नऊ सावकारांनी मिळून पेशव्यांना साडे सतरा लाखाचे कर्ज दिले. यांपैकी दोन सावकार म्हणजे परांजपे आणी काबरस
यांनी साडेसात लाख रुपये कर्ज पेशव्यांस दिले होते.
ह्या कर्जाऊ धोरणामुळे पेशव्यांना अश्या सावकारांना मान सन्मान देऊन कायम खुश ठेवावे लागत असे. एवढेच नव्हे तर ह्या कर्जाऊ प्रकरणांमुळे पेशव्यांनी सावकारांशी सोयरे संबंधही प्रस्थापित केल्याची उदाहरणे आहेत.
उदाहरणार्थ बाळाजी विश्वनाथ पेशव्याची पत्नी राधाबाई ही सावकार दादाजी जोगदेव बर्वे यांची मुलगी आहे.
ही राधाबाई पेशवे अत्यंत धोरणी बाई होती. व्यावहारिक दृष्टीने पेशव्यांच्या सोयरिकी श्रीमंत घरात करण्याची खटपट राधाबाई करत असत.
थोरली सून काशीबाई हि महादजी कृष्ण जोशी चासकर सावकार यांची मुलगी होती.
थोरली नात सून गोपिकाबाई हि भिकाजीपंत शामजी रास्ते गोखले-वाईकर यांची मुलगी होती. शामजी रास्ते गोखले-वाईकर हे तेंव्हा पुण्यातील मोठे सावकार होते.
नानासाहेब पेशव्याची दुसरी बायको राधाबाई हि पैठणच्या नारायणराव वाणवळे सावकारांची मुलगी होती. सावकार सासरेबुवांनी जावई बाप्पु नानासाहेबांसाठी पैठणला मोठा तीन चौकी वाडाही बांधला होता.
रघुनाथराव पेशव्याची बायको आनंदीबाई हिचे वडील रघुनाथ महादेव ओक हे हि सावकार होते.
पेशव्यांच्या घरात आलेल्या ह्या सगळ्या सावकारांच्या मुलींना आपल्या वडिलांकडील आडनावाचा मोठा अभिमान असायचा कारण कि ह्या सगळ्यांचे बाप हे पेशव्यांस कर्ज देत असत आणि पेशवे ह्या सावकारांचे देणे लागत असत.
पेशव्यांच्या सोयरिकीमुळे आपल्याला राजाश्रय मिळेल आणि आपली भरभराट होईल अशी विचारसरणी सावकारांची असावी असे दिसते. तसेच सावकारांच्या सोयरिकीमुळे आपलीही आर्थिक भरभराट होईल असे पेशव्यांना वाटत असे हे पुराव्यांवरून दिसते.
जसे बाजीराव पेशव्याला कर्जाने छळले तसेच बाळाजी बाजीराव म्हणजे नानासाहेब पेशव्यालाही कर्जाने छळले. भाऊबंदकी आणि अंतस्थ कारभारातील बेबंदशाहीमुळे
नानासाहेब पेशव्याचे कर्ज वाढत गेले.
आपल्याला पैश्यांची किती गरज आहे हे दाखवून देणारे एक पत्र उपलब्ध आहे.
हे पत्र नानासाहेब पेशव्याने मल्हारराव होळकर आणि जयाप्पा शिंदे याना लिहिलेले आहे.
पत्रात म्हंटले आहे, " नालबंदीस तोटा तूर्त दहा लाखाचा आला. तुम्हीही ऐवज न पाठविला. यास्तव जरूर पोटाचे संकटामुळे रसदा घेतल्या. सर्वांपुढे इलाज आहे.
पोटापुढे काही इलाज नाही. तो विचार तरी काय लिहावा."
मल्हारराव होळकरांनी नानासाहेब पेशव्याची मोठं मोठी कर्जे फेडली होती. तशी कर्जे जयाप्पा शिंद्यांनीही पेशव्यांची फेडावीत अशी विनंती पत्रे नानासाहेब पेशव्याची आर्थिक नड किती भयंकर होती हे दर्शवितात.
उत्तर हिंदुस्थानातून चाळीस लाख पाठवून दिले तर बरे होईल; पण असे काही होताना दिसत नाही अशी खिन्नताही नानासाहेब पत्रात बोलून दाखवितो.
नानासाहेबावर कर्जाचा बोजा वाढत असतानाच पानिपतचे युद्ध छेडले गेले.
ह्या युद्धाचा खर्च हा नियोजनापेक्षा खूप जास्त होता. पानिपतच्या मोहिमेवर गेलेल्या भाऊसाहेबांची खर्चाची निकड सारखी वाढतच होती. पानिपतची गेलेल्या भाऊसाहेबांची
'जवळचे सगळे पैसे संपले असून नानासाहेब आजून पैसे पाठवा..' असे सांगणारी पत्रे अत्यंत विदारक आहेत.
घरगुती कलह आणि घरगुती कारणासाठी बाळाजी बाजीराव म्हणजे नानासाहेब पेशवा वारंवार कर्ज घेत असे. १० लाख रुपयांसाठी जनकोजी शिंद्यांस पाठविलेली विनवणीपर
पत्रे नानासाहेबाची आर्थिक ओढाताण स्पष्ट करतात.
ह्यावर मी सविस्तर लिहावे तर शब्द पुरणार नाही...
आता आपण उदाहरण म्हणून बाळाजी विशवनाथ पेशव्याने कोणाकडून आणि किती कर्ज घेतले होते ते पाहू:
विठोजी नाईक रास्ते यांजकडून ५००० रुपये
विठ्ठलराव मल्हार यांजकडून २०००० रुपये
श्रीधर नाईक पथक यांजकडून ५००० रुपये
सीताराम नाईक श्रेत्री यांजकडून २७००० रुपये
गंगाधर नाईक वाणवळे यांजकडून ४५०० रुपये
रामकृष्णभट वैद्य यांजकडून १९००० रुपये
अंतोजी बीड यांजकडून १०००० रुपये
जिनभात गाडगीळ यांजकडून ३०००० रुपये
भवानपुरी गोसावी यांजकडून २२००० रुपये
संतोषशेठ माधवे यांजकडून ३५००० रुपये
बाबूजी नाईक वानकर यांजकडून ३६००० रुपये
सदाशिव पटवर्धन यांजकडून ६७००० रुपये
अंतोबा भिडे यांजकडून १ लाख २८ हजार ८५० रुपये
श्रीमंत परमहंस भार्गवराम यांजकडून १लाख रुपये
रघुनाथ पटवर्धन यांजकडून ३ लाख रुपये
विष्णू महादेव यांजकडून ३ लाख रुपये
रामजी अनंत भिडे यांजकडून ४ लाख रुपये
बाबुराव पटवर्धन यांजकडून ३ लाख ४३ हजार २४४ रुपये
शिवराम भेट सोने यांजकडून ५ लाख रुपये
परशराम नाईक अनगळ यांजकडून ४ लाख १४ हजार ४१८
भिमाजी रास्त्यांकडून २ लाख ७१ हजार ३४५
हि अशी २३ सावकारांची नावे आहेत. पण सगळ्यांचीच नावे इथे लिहिणे शक्य नाही.
छोट्या रकमा मी मुद्दाम गाळल्या आहेत. असे लाखोंची कर्जे आहेत.
ह्याशिवाय औरंगाबादच्या भू चांदमळ सावकरांकडून ३० हजार रुपये पेशव्यांनी कर्जाऊ घेतले होते. त्याचा व्याजाचा दर दरमहा २ १/२ रुपये एव्हढा होता. अशी अजूनही
खूप उदाहरणे आहेत.
कधी कधी पेशव्यांना सैनिकांचा पगार द्यायलाही पैसे नसत. ह्या सैनिकांचा पगार मग सावकारांकडून दिला जात असे. आणि ह्यावर व्याजही आकारले जात असे. थकलेल्या
पगारावरून गारदी लोक थेट पेशव्याला तलवार दाखवून कैद करायलाही मागेपुढे पाहत नसत. ( ह्याचे छान उदाहरण आहे. पण शब्दविस्तार भयास्तव इथे देत नाही.)
आता लेखाच्या शेवटाकडे वळतो.
पेशवाईत हि दिलेली कर्जे गोळा करायला सावकार मंडळी भन्नाट योजना राबवित असत.
आजच्या सारख्या कोर्ट कचेऱ्या तेंव्हा नव्हत्या. त्यामुळे सावकारासच दिलेले कर्ज वसूल करावे लागत असे.
कर्ज वसूल करायचा एक प्रकार म्हणजे ज्याला कर्ज दिले त्याच्या घरासमोर उपोषणास बसने होय. सावकार कर्ज मागण्यास कर्जदाराकडे आपला नोकर किंवा इतर कोणास पाठवी.
हा मनुष्य ह्या कर्जदाराच्या घरात चोवीस तास उपाशी बसून राही. घराच्या ओट्याच्या पुढच्या दरवाज्यात हा इसम उपाशी बसत असे. आता असे आपल्या घराबाहेर कोणी आपल्याकडे पाहत उपाशी बसल्यास कर्जदाराच्या घरातील लोकही लाजेने उपाशी राहत.
आपणास उपास घडतो आणि बाहेर दारात बसलेला हि उपवासाने तळतळतो आहे हे पाहून कर्जदार शेवटी नाईलाजाने का होईना कर्ज चुकते करत असे.
गंमत म्हणजे कर्जदाराने चटकन पैसे द्यावेत म्हणून सावकार परजातीच्या माणसाचा उपयोग करीत. सावकाराचे नोकर लोक तीन तीन दिवस कर्जदाराच्या दारात उपाशी बसत.
चिपळूणकर नावाची एक व्यक्ती तर कर्जाच्या वसुलीसाठी कर्जदाराच्या दारात २० दिवस उपाशी बसल्याचा दाखल आहे.
एक भिक्षुकाने आपण दुसऱ्याला दिलेले कर्जाऊ पैसे वसूल होत नाहीत हे पाहून गणपतीच्या देवळातच उपोषण करण्यास सुरवात केली. हि वार्ता पेशव्यांच्या कानावर गेल्यावर पेशव्यांनी आदेश देऊन कर्जदाराकडून भिक्षुकाचे देणे ताबडतोब परत करण्याची आज्ञा केलेली आहे.
पेशव्यांची संपूर्ण कारकीर्दच सावकारांच्या कर्जाच्या ओझ्याखाली गेली.
पेशवेकालीन सामान्य मनुष्य कर्जात जन्मून कर्जातच मरत असे. दुष्काळ आणी सततची होणारी युद्धे यांमुळे राज्यकर्ते आणि सामान्य माणसांस सतत पैश्यांची गरज पडत असे. अश्यावेळी सावकाराच्या दारात कर्ज मागायला जाण्याशिवाय दुसरा पर्यायच राहत नसे.
पेशवेकालीन अर्थ व्यवस्था हि कृषी उत्पन्नावरच अवलंबून होती. असे असतानाही पेशवे शेतीच्या उत्पन्नात भर पडेल अशी कोणतीही योजना राबवताना दिसत नाहीत.
दुष्काळामुळे शेतकऱ्यांना अत्यंत खडतर परिस्थितीतून जावे लागत असे. लहान सहान रकमांसाठी सावकारांच्या दाराचे उंबरे शेतकऱ्यांस झिजवावे लागत असत.
सावकार शेतकऱ्याकडून दाम दुप्पट व्याजाने वसूल करत असत. विशेष म्हणजे शेतकऱ्याने कर्ज फेडले नाही आणि तो कर्ज चुकवतानाच मरून गेला तर त्याच्या मुलास ते कर्ज फेडावे लागत असे.
दुःखद म्हणजे सावकारांनाही पेशव्यांचा पाठिंबा असल्यामुळे शेतकऱ्यांचे, गरीब रयतेचे संसार धुळीस मिळत असत.
वतण गहाण ठेऊन घेतलेले कर्ज सावकारांना फारच फायद्याचे असायचे. वतनदाराच्या वतनाचा फायदा घेऊन सावकार लोकांचा भयानक छळ करत असत.
शेतकऱ्याच्या भाजीच्या देठासही हात लावू नये असे सांगून तळहातावरील फोडासारखे रयतेला जपणारे छत्रपती शिवाजी महाराज कुठे आणि स्वराज्य आकंठ कर्जात बुडवून
श्रीखंड-पुरीवर ताव मारणारे कुठे....
शब्द विस्तार भयास्तव इथेच थांबतो. वास्तविक ह्या विषयवार दहा पंधरा लेखच झाले असते इतके विदारक चित्र पेशवाईतील कर्ज आणि सावकारीचे आहे.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...