विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 2 August 2023

#नाना_वाडा

 










#नाना_वाडा
#नाना_फडणवीस म्हणजे उत्तर पेशवाईतले महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व. उत्तर पेशवाईत साडेतीन शहाणे होते. खुद्द पेशव्यांचे मुत्सद्दी कारभारी सखारामबापू बोकील, निजामाचा दिवाण विठ्ठल सुंदर व नागपूरकर भोसल्यांचे दिवाण देवाजीपंत चोरघडे हे तिघे पूर्ण शहाणे व नामा फडणीस अर्धे शहाणे समजले जात. त्यांनी निजाम-हैदर-टिपू व इंग्रज यांना तोंड देऊन पेशवाई सांभाळली. दि. १३ मार्च १८०० रोजी नानाच्या मृत्यूनंतर मात्र पेशवाईला ग्रहण लागून ती १७ वर्षांतच अस्तंगत झाली. नानांच्या मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजे १४ मार्च १८०० रोजी इंग्रज रेसिडेंट कर्नल पामर याने पुण्याहून गर्व्हनर जनरल लॉर्ड वेलस्लीला लिहिलेल्या पत्रात ‘नानाच्या मृत्यूबरोबरच पेशवाईतील शहाणपण व मुत्सद्दीपणा यांनीही पुणे दरबाराचा निरोप घेतला’ असे लिहिले आहे.
बाळाजी जनार्दन भानू ऊर्फ नाना फडणवीस मूळचे कोकणातील वेळासचे. बाळाजी विश्वनाथांची कर्तबगारी पाहून छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना #पेशवा म्हणून नेमले. बाळाजींनी विनंती करून शाहू महाराजांकडून राज्याची फडणविशीही आपल्याकडे मागून घेतली व ती वस्त्रे हरी महादजी भानू यांना दिली. अशा रीतीने भानूंकडे फडणविशी आली. हरी महादजींचा अल्पकाळात मृत्यू झाला. त्यानंतर बाळाजी महादजींकडे फडणविशी आली. दिल्लीहून चौथाई व सरदेशमुखीच्या सनदा आणण्यासाठी बाळाजी विश्वनाथांनी आपल्याबरोबर बाळाजी महादजींना नेले. परतताना एका लढाईमध्ये बाळाजी महादजी मारले गेले. बाळाजी महादजींच्या मृत्युनंतर रामाजी महादेव यांच्याकडे फडणविशी आली. बाळाजी जनार्दन ऊर्फ नाना व त्यांचे चुलत बंधू मोरोबादादा ही त्यांची नातवंडे. या दोघांचे शिक्षण विश्वासराव व माधवराव यांच्याबरोबर झाले. नानांकडे वयाच्या अवघ्या १४ वर्षी फडणविशीची वस्त्रे आली. त्याचवेळी कलमदान व शिक्के मिळाले. शिक्क्यावर “ श्री शिवचरणन लिननिरत जनार्दनसुत बाळाजी पंडित ” असे लिहिलेले.
#नाना_फडणवीस यांना नवनवीन कल्पना राबवून त्यातून काही भव्य निर्माण करण्याची आवड होती. इंग्रजांमुळे पाश्चात्त्य देशातून आलेल्या सुधारकी कल्पनांचा त्यांनी अनेक ठिकाणी खुबीने वापर करून घेतला होता. 'जनाईचा मळा' नावाने ओळखली जाणारी जागा विकत घेऊन, त्यांनी #बेलबागेची उभारणी केली. त्याचबरोबर काळ्या वावरात जागा घेऊन तेथे ही प्रशस्त बाग तयार केली होती. सध्या हि जागा # नातू_बाग या नावाने ओळखली जाते. पुणे शहरातील व्यापार-उदीम वाढविण्यासाठी त्यांनी #हनुमंत_पेठ म्हणजेच सध्याची #नाना_पेठ वसवली. ठिकठिकाणी हौद बांधून पाण्याची सोय केली. भीमाशंकरचे देऊळ बांधण्यास नानांनी सुरुवात केली होती; परंतु ते त्यांच्या हयातीत पूर्ण होऊ शकले नाही.
शनिवारवाड्याच्या जवळच नानांनी आपल्यासाठी एक वाडा बांधला. #शनिवारवाड्याकडून #श्रीमंत_दगडूशेठ_हलवाई_गणपती कडे जाताना उजवीकडे #वसंत_ टॉकीजच्या अलीकडे एक २५०-३०० वर्षांपूर्वीचा जुना वाडा उभा दिसतो, तोच हा #नाना_वाडा.
नानांच्या हयातीत शेवटच्या बाजीरावाच्या काळात नानांच्या सर्व मिळकती जप्त झाल्या त्यात हा वाडासुद्धा होता. या वाड्याचा दर्शनी भाग बहुतेक करून जराच्या तसा शाबूत आहे . वाड्याला मोठे प्रवेशद्वार असून लाकडी नक्षीकाम केलेला दरवाजा आहे. हा वाडा दुमजली असून, वरच्या मजल्यावर लाकडी खिडक्या आहेत.
वाड्याच्या आत ऐसपैसे मोकळा चौक असून ठिकठिकाणी महिरपदार दगडी कमानी आहे. प्रवेशद्वाराच्या वर लाकडी नक्षीदार कमानी आहेत. भिंतीवर पौराणिक देखावे दाखवणारी उत्तम भितीचित्रे होती, #पुणे_महानगरपालिकेने संवर्धनाच्या नावाखाली त्याला पांढरा रंग फासला. मागच्या आठवड्यापर्यंत एक चित्र शिल्लक होते. आता पर्यंत ते हि नष्ट झाले असेल.वाड्याला चिकटून एक भव्य व मजबूत अशी दगडी इमारत आहे. या इमारतींच्या जागीही पूर्वी वाडाच होता; परंतु तो पडल्यावर ती जागा पुढे डेक्कन एज्युकेशन सोसायटीने विकत घेतली आणि त्या ठिकाणी न्यू इंग्लिश स्कूल, नाना वाडा ही शाळा सुरू केली. इ.स.१९५२ मध्ये सोसायटीने ही इमारत पुणे महापालिकेला ५ लाख रुपयांना विकली व त्या पैशांतून न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड ही घुमटवाली इमारत बांधली.
संदर्भ:
फोटो १ : Portrait of Nana Fadnavis Artwork by John Thomas Seton
पुण्यनगरीतील वाडे व वास्तू - डॉ. एच. वाय. कुलकर्णी
हरवलेले पुणे – डॉ. अविनाश सोहनी
वैभव पेशवेकालीन वाड्यांचे – मंदा खांडके
असे होते पुणे – म. श्री. दीक्षित
तुम्हाला आमचा हा #आठवणी_इतिहासाच्या प्रकल्प कसा वाटत आहे हे नक्की कळवा आणि त्याचबरोबर तुम्हाला अशा काही पुण्याच्या आजूबाजूच्या वास्तूंबद्दल माहिती असेल ज्या भूतकाळात गेल्या आहेत, तर आम्हाला तिथे भेट द्यायला आणि त्याची माहिती गोळा करून तुमच्यासमोर आणायला नक्कीच आवडेल.
like करा, share करा आणि follow करा.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...