छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या कार्यास सुरुवात केली होती. तळागळातील, सर्व जाती जमातीचे लोक राजांच्या या कार्यात सहभागी होत होते. जुलुमाच्या अंधारावर स्वातंत्र्याचा सूर्योदय तोरणा जिंकून कधीच झाला होता. पुढे मराठ्यांनी आपले घोडे जुन्नर शहराकडे वळवले. जुन्नर काबीज केल्या नंतर अहमदनगर शहर मारले. मराठ्यांच्या या पराक्रमाचे वर्णन सभासदाने असे केले आहे कि, “ मोगलांशी मोठे युद्ध केले. सातशे घोडे पाडाव केले. हत्ती हि पाडाव केले. द्रव्य बहुत सापडले. ते समयी पागा बाराशे व शिलेदार दोन हजार जहाले. अशी तीन हजार स्वरांची बेरीज झाली.” या मोहिमेत आघाडीवर होते ‘माणकोजी दहातोंडे.’ यांच्या पराक्रमावर राजे खूप खुश झाले. सभासद म्हणतो कि, “तेव्हा माणकोजी दहातोंडे सरनोबत लष्कराचे केले.” आशा रीतीने स्वराज्याचे घोडदळाचे पहिले सरनोबत होण्याचा मान माणकोजींना मिळाला.
माणकोजी दहातोंडे हे सूर्यवंशी क्षत्रिय मराठा या कुळातले. त्यांची जन्म तारीख उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांचा जन्म अंदाजे इ.स. १५९२-९५ मध्ये झाला असावा. दहातोंडे १४व्या शतकात मध्यप्रदेशात वास्तव्यास होते. १६व्या शतकात ते उजैन, ग्वालेर मार्गे महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रातील त्यांचे मुळगाव अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील चांदा हे होते. माणकोजी हळूहळू मोठे होत होते. आपले शरीर त्यांनी बलदंड बनवले होते. त्यामुळे त्यांना निजामशाहीत नोकरी करण्याची आज्ञा झाली. सुरुवातीला त्यांनी निजामशाहीत नोकरी केली.
निजामशाहीत माणकोजी शहाजीराजांच्या पदरी होते. शहाजीराजांच्या अत्यंत विश्वासू माणसांपैकी ते एक होते. त्यांनी मुघलांविरूद्ध अनेक लढायांत भाग घेतला आणि सर्व लढायात मोठा पराक्रमही केला. शहाजीराजांनी अहमदनगर जवळ भातवाडी येथील प्रसिद्ध लढाईत पराक्रम गाजवला. यामुळे त्यांचे निजामशाही दरबारात वजन वाढले. पण त्यामुळे दरबारात त्यांच्या विरुद्ध भांडणे व कटकारस्थाने उभी राहिली. म्हणून त्यांनी निजामशाही सोडली आणि आदिलशाहीशी संधान बांधले. तिथे त्यांना ‘सरलष्कर’ हा किताब देण्यात आला. पुढे निजामशाहीत वजीर मलिक अंबरचा मृत्यू झाला. त्याच्या नंतर त्याचा मुलगा वजीर झाला. पण कटकारस्थानी स्वभावामुळे निजामशाहीला त्याच्या काळात उतरती कळा लागली. निजामशाही सावरण्यासाठी निजामाच्या आईने शहाजीराजांकडे साकडे घातले. यावेळी शहाजीराजांच्या डोक्यात स्वराज्याचा विचार चालू होता. परिस्थिती अनुकूल पाहून ते आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले.
शहाजीराजांनी निजामाच्या वंशातील एका मुलाला निजामशहा म्हणून घोषित केले. एक नवे राज्यच त्यांनी स्थापन केले होते. यावेळी त्यांनी सरनोबत म्हणून माणकोजी दहातोंडे यांची नियुक्ती केली. शहाजीराजे आणि माणकोजी आता मुघल व आदिलशाही यांच्या संयुक्त फौजेशी लढत होते. पण त्यांचे बळ अपुरे पडले. शेवटी इ.स. १६३६ साली ते मुघलांना शरण गेले. आशा रीतीने स्वराज्य स्थापनेचा पहिला प्रयत्न फसला. या शरणागतीमुळे निजामशाही तर पूर्णपणे संपली. तिचा प्रदेश मुघल व आदिलशहाने वाटून घेतला. शहाजीराजे, आदिलशाहा व शाहजहान यांच्यात तह झाला. त्या तहामुळे शहाजीराजांना महाराष्ट्रातुन बाहेर काढण्यात आले. पण पुणे-सुपे हि त्यांची जहांगीरी आदिलशाहीत गेली. ती त्यांना परत देऊन आदिलशाही दरबारात घेण्यात आले. शहाजीराजांच्या बरोबर झालेल्या चर्चेमुळे माणकोजीनीही विजापुरी सेवा स्वीकारली. शहाजीराजे तर कर्नाटकात गेले. पण जातांना त्यांनी पुणे-सुपे जहांगीरीवर जी विश्वासू माणसे ठेवली होती, त्यात माणकोजी हि होते.
शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या कार्यात माणकोजी दहातोंडे, गोमाजी नाईक, रघुनाथपंत, शामराजपंत हि मंडळी हि सामील झाली. माणकोजीना सरनोबत केल्यानंतर त्यांनी आपला घोडा चौफेर उधळला. किल्ले कोंढाणा इदलशाहीत होता तो त्यांनी भेद करून घेतला. पुढे लोहगड व विसापूर या किल्ल्यांवर भगवा फडकवला. मराठी फौजेची दहशत त्यांनी विजापूरकरांच्या मनात निर्माण केली होती. ते फक्त सरनोबतच नव्हते. तर ते राजांचे मार्गदर्शक हि होते. त्यांच्या अनुभवामुळे तसेच युद्धनितीमुळे सुरुवातीला अनेक लढाया त्यांनी जिंकल्या. शहाजीराजांकडून त्यांनीही ‘गनिमी कावा’ आत्मसात केला होता. स्वराज्य विस्तारात त्यांनी खूप मोठे योगदान दिले. पुरंदरच्या विजयाचा आनंद महाराजांनी माणकोजी सोबत साजरा केला.
इ.स.१६५६ साली राजांनी जावळी घेण्याचा बेत आखला. त्यावेळीहि माणको जीनी खूप मदत केली. रनतोंडीचा घाट माणकोजी व रघुनात बल्लाळ यांनी सर केला. त्या ठिकाणाहून शत्रू पुढे जाऊ नये म्हणून नाकेबंदी केली. त्यांच्या निष्ठेमुळे, पराक्रमामुळे ते भोसल्यांच्या घरातलेच एक बनले होते. इ.स.१६५७ मे१४ ला पुरंदरवर सिंहाच्या छाव्याने आपली पहिली डरकाळी फोडली होती. सईबाई राणीसाहेबानां पुत्ररत्न झाले होते. घरात नातावासमान युवराज आल्यामुळे माणकोजींचा आनंद द्विगुणीत झाला. या आनंदात त्यांनी गडावर सर्वाना साखरे वाटली असेही म्हणतात.
वाढत्या वयाबरोबर माणकोजींची प्रकृती हळूहळू ढसळत चालली होती. आता त्यांना लढाया पेलवत नव्हत्या. मार्च १६५९ रोजी दरबार भरवण्यात आला होता. दरबारात मोठे मातबर सरदार उपस्तीत होते. राजे गादीवर बसले होते. जिजाबाई आपल्या जागेवर बसल्या होत्या. त्यांच्या मांडीवर २ वर्षांचे शंभुबाळ बसले होते. इतर मान्यवर आपआपल्या जागी होते.©RohitSarode राजांनी माणकोजीना पुढे बोलावले. राजे म्हणतात,
“माणकोजी, आपण श्रींच्या राज्याची इमाने-इतबारे सेवा केली. कुठेही खंड पडू दिला नाही. आमच्या प्रत्येक आज्ञेचे पालन केले. खरच आपल्यासारखी माणसे मिळायला मोठी पुण्याई लागते.”
माणकोजी म्हणतात,
“राज आपण बोललात जीवाच सोन झाल. हुकुम करा कोणती मोहीम आहे सांगा! तुम्ही फक्त बोट दाखवा, तो मुलुख स्वराज्यात आलाच म्हणून समजा.”
एवढे वय झाले असूनही ते ताटमानेने नी निधड्या छातीने बोलत होते.
राजे हसले आणि म्हणाले,
“नाही माणकोजी! आता तुम्ही मोहिमेवर जायचं नाही.”
राजांच्या या बोलण्यामुळे सारे चकित झाले. माणकोजीच्या नेत्रकडा अश्रुनी भरून आल्या. स्वतःला सावरत ते म्हणतात,
“राज अस बोलू नगासा. गरिबा कडन काही चूक झालीया तर एक वकत माफ करा. पर अस पायापासून दूर नगा करू.”
राजे पुन्हा हसले आणि म्हणाले,
“माणकोजी! आता तुमच वय झाल. पर मुलखात स्वारी तुम्हाला आता झेपत नाही, हे आम्ही जाणतो. त्यात तुमची प्रकृतीही सध्या ठीक नसते. तुम्ही खूप केल आमच्यासाठी. त्यामुळे आम्ही एक निर्णय घेतला आहे.”
राजांचा स्वर निश्चयी होता. सारी सदर प्राण कानात घेऊन तो निर्णय ऐकायला तयार झाली. राजे पुढे बोलू लागले,
“यापुढे श्रींच्या राज्याचे सरनोबत माणकोजी नसतील.”
माणकोजीच्या अंगाचा थरकाप उडाला. नेत्रकडा अश्रुनी भरून आल्या. त्यातच पुढचे शब्द त्यांच्या कानी पडले.
“आम्ही माणकोजीना श्रींच्या राज्याचे प्रमुख सल्लागार व युद्धशात्रतज्ञ म्हणून नियुक्त करीत आहोत.”
माणकोजी स्वराज्याचे Senior Adviser and Warfare Minister बनले. राजांनी दरबारात त्यांचा खूप मोठा सत्कार केला होता. सदरेवर त्यांचे खूप मोठे वजन होते. त्यांच्या सल्ल्याशिवाय पुढील कामकाज होत नसे. बुधवार दि. ९ नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगडावर खूप महत्वाची बैठक भरली होती. त्या बैठकीला प्रमुख सल्लागार माणकोजी दहातोंडे, बहिर्जी नाईक, कान्होजी जेधे, सुभानजी इंगळे, जिवाजी महाले, संभाजी कावजी कोंढाळकर, बाजी जेधे, कृष्णाजी गायकवाड, सिद्दी इब्राहीम, पंताजी, मोरोपंत, नरोपंत यांसारखे मोठ-मोठे मुत्सदी विचारवंत हजर होते. प्रसंग तसा बाका होता. कारण राजांना दुसऱ्यादिवशी अफजलखानच्या भेटीस जायचे होते. भेटीस कसे जावे? यासाठीचे हे शेवटचे खलबत होते. राजांनी विचारले,
“ खानास भेटावयास कैसे जावे?”
माणकोजी म्हणतात,
“ शिवबा! खान कपटी तेव्हा अंगास सील करावे.”
बघता बघता रात्र टळली. भेटीचा दिवस उजाडला. राजे तय्यार होऊन खानाच्या भेटीस निघाले. दरवाज्यात माणकोजी उभे होते. त्यांना पाहून राजे म्हणतात, “काळजी करू नये. आम्ही सुखरूप परतू.” ठरल्या प्रमाणे भेट झाली. खानाचा वध झाला. माणकोजी राजांची वाट पाहत दरवाज्यातच उभे होते. राजे येतांना दिसले. त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू जमा झाले. त्यांनी राजांना मिठी मारली. सगळ ठरल्याप्रमाणे पार पडल. स्वराज्यावरच खूप मोठ संकट दूर झाल.
हळूहळू माणकोजीची तब्येत फार बिघडत चालली. ते आता अंथरुणाला खिळले होते. आणि जुलै ते ऑगस्ट दरम्यान इ.स. १६६२ मध्ये गडावर वाईट बातमी आली. “स्वराज्याचे पहिले सरनोबत, प्रमुख सल्लागार व युद्धशात्रतज्ञ माणकोजी दहातोंडे यांचे शिवापूर येथे निधन झाले.” तब्बल २० वर्ष त्यांनी स्वराज्याची सेवा केली होती. आयुष्यभर त्यांनी संपत्तीचा मोह केला नाही. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या मनात फक्त स्वराज्याची चिंता होती.
◆सभार
मा.श्री. संतोष दहातोंडे
(माणकोजी दहातोंडे यांचे वंशज.)
संदर्भ सूची :-
◆राजा शिवछत्रपती
◆ छावा
◆श्रीमान योगी
◆ सभासदाची बखर
No comments:
Post a Comment