भाग २
१७५३
ते ५५ राघोबादादांची स्वारी दुसरी स्वारी उत्तरेत झाली. त्यांच्या
नेतृत्वाखाली मराठ्यांनी राजपुताना, कुंभेरी इथे जबरी खंडण्या लावून
चांगलीच दहशत निर्माण केली होती. कुंभेरीच्या वेढ्यात मल्हारराव होळकरांचे
पुत्र खंडेराव तोफेचा गोळा लागून मारले गेले. मल्हाररावाने तर शपथ घेतली
की “कुंभेरीची सगळी माती खणून यमुनेत टाकतो”. पुढे १ जूनला दादासाहेब
दिल्लीला गेले व त्यांनी वजीरीचा वाद सोडवून इमादुल्मुल्क गाजीउद्दीन
फिरोजजंग (तिसरा) यास वजीर केले व दिल्लीच्या राजकारणात भाग घेतला. बादशाह
अहमदशाहला पदच्युत करण्यात आले व त्यावर आलमगीर(दुसरा) सानी यास बादशाही
मिळाली. जून ते डिसेंबर १७५४ दरम्यान राघोबा दादा दिल्लीची व्यवस्था
पाहण्यात दिल्ली मुक्कामी होते. त्यादरम्यान त्यांनी हिंदू यात्रेकरूंना
गोकुळ, मथुरा, वृंदावन येथील पवित्र यात्रांकारिता बादशाहकरवी कर माफीचे
फर्मान मिळवून दिले. ३ मार्च रोजी सर्व व्यवस्था लावून राघोबादादा परतीच्या
प्रवासाला निघाले पुष्कर, ग्वाल्हेर असा प्रवास करीत दादासाहेब १० ऑगस्ट
५५ रोजी पुण्यास दाखल झाले. दादासाहेबांच्या याच दरम्यान मराठ्यांचा
उत्तरेतील आणखी एक बलाढ्य बुरुज कोसळला. जयाप्पा शिंदे यांचा नागोर येथे
खून झाला. एकंदरच या स्वारीत मराठ्यांचे उत्तरेत बरेच वर्चस्व वाढले होते.
येथील भौगोलिक, सामाजिक आणि राजनैतिक परिस्थितीचा अंदाज त्यांना आला.
No comments:
Post a Comment