भाग ३
दादासाहेबांची ही उत्तर मोहीम सुरु असताना लाहोर भागात आणखी एक राजकारण कलाटणी घेत होते. लाहोर-पंजाबचा सुभेदार मीर मन्नू याचा ३ नोव्हेंबर १७५३ रोजी मृत्यू झाला. मीर मन्नू हा हुशार गृहस्थ होता. त्याला मुश्नुल्मुल्क उमराव अशी पदवी होती. लाहोर आणि सरहिंद प्रांतात राज्य करायचे म्हणजे त्याला आता दिल्ली आणि अब्दाली या दोघांची मान्यता असणे गरजेचे झाले होते. मीर मन्नुने आपल्या सुभेदारी दरम्यान दिल्ली आणि अब्दाली या दोन्ही बाजूंशी सख्य राखून काही प्रमाणात आपली जहागीर राखण्यात यश प्राप्त केले होते. अठराव्या शतकातील पगड्याप्रमाणे बापाच्या मृत्युनंतर मुलाला सुभेदारी मग तो लायक असो अथवा नसो ही एक अत्यंत वाईट पद्धत होती. मन्नुची बायको मुघलानी बेगम ही नेमकी त्याच्या मृत्युच्या वेळी प्रसूत होवून तिला पुत्र झाला व तिने ह्या पुत्राकरिता अब्दालीकडून मान्यता मिळवून स्वतः सुभेदारी पाहू लागली. हिला यापूर्वी एक मुलगी होती जिचे नाव उमदाबेगम. उमदा बेगमेचे लग्न दिल्लीचा नवनियुक्त वजीर इमादुल्मुल्काशी करण्यात आले होते. मुघलांनी बेगमेचे नशीब खराब की तिचा पुत्र अल्पायुषी ठरला आणि बालवयात मृत्यू पावला. अब्दालीने आता पंजाब हस्तगत केले. मुघलानी बेगमेला हाकलून लावले. मुघलानी बेगमने दिल्लीला आपले गाऱ्हाणे कळविले तसा वजीर आपल्या सैन्यासह ७ फेब्रुवारी १७५६ रोजी सरहिंद इथे पोचला.
वरील दादासाहेबांची स्वारी आणि या ५ वर्षांचा विचार करिता आणि माहितीची उपलब्धता पाहता या संपूर्ण प्रकरणावर एक वेगळा लेख अथवा वेगळे पुस्तक लिहिता येईल परंतु इथे ही मोजकी माहिती देण्याचा उद्देश हा केवळ वाचकांना पार्श्वभूमी कळावी इतकाच आहे. लेखाची रटाळता थांबविण्याकरिता मी अधिक तपशील देण्याचा मोह आवरता घेतो आहे.
No comments:
Post a Comment