स्वराज्य उभारणीच्या सुरुवातीच्या काळात शिवराय शत्रुंचा एक खजिना लुटण्यास गेले असता, त्या ठिकाणी मोगलांचा पराकोटिचा द्वेश करणारी आणखीन एक व्यक्ती तोच खजिना लुटण्यासाठी आपल्या काही सहकाऱ्यांबरोबर आली होती! त्यावेळी शिवरायांनी त्या व्यक्तीस स्वराज्याचे महत्व पटवून त्यांना स्वराज्य सेवेत सामील करून घेतले. ते म्हणजे सातारा जिल्ह्यातील, खटाव तालुल्यातील भोसरे गावचे "कुडतोजी गुजर!"
मित्रांनो मी खलिल शेख, सर्वपरिचित असणारे स्वराज्याचे तिसरे सरनोबत श्री. प्रतापराव गुजर यांच्या बद्दलचे अल्पपरिचित असणारे काही प्रसंग आणि त्यांच्या मुलांनी केलेल्या त्यागाबद्दल मी लिहीलं आहे. नेहमी प्रमाणे लेख आवडल्यास तुमच्या प्रतिसादाची अपेक्षा आहे आणि काही चुकत असल्यास (व्याकरण सोडुन) मार्गदर्शन करावे.
अत्यंत बलशाली, पराक्रमी, आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचे मालक असणारे कुडतोजी आपल्या पराक्रमांमुळे लवकरच शिवरायांच्या निकटवर्तीय गटात सामिल झाले.
स्वराज्यासाठी होणा-या लढायांमधे आपल्या तलवारीच पाणि शत्रुला पाजणा-या कुडतोजींना सैन्यात उच्चपद प्राप्त झालेले होते. अशातच इ.स.१६६५ मधे मिर्झाराजा जयसिंह आणि दिलेरखान दिल्लीपती बादशाह औरंगजेबाच्या हुकुमाने स्वराज्य संपवण्याच्या हेतुने दख्खनमधे उतरले.आणि स्वराज्यात हाःहाकार माजला! मिर्झाराजेंनी स्वराज्या भोवती, शिवरायांभोवती आपला फास आवळायला सुरवात केली, तर रयतेवर मोगली फौजेच्या अत्याचाराने परिसिमा गाठली! या परचक्रात अबाल-वृद्ध, आया-बहिणी, लेकी-सुना एवढेच नाही तर जनावरे सुद्धा पिसली जाऊ लागली! शिवराय या परचक्रातुन स्वराज्याला कसे सोडवावे या काळजीत होते. शिवरायांची ती उलघाल कुडतोजींना बघवेना. आणि कुडतोजींचा निर्णय झाला! एके दिवशी गुपचुपपणे कुडतोजी राजगड उतरले, आणि पुरंदरच्या जवळच असलेल्या मिर्झाराजाच्या छावनी जवळ आले! "या मिर्झाराजामुळेच माझा राजा चिंताग्रस्त आहे. माझ्या राजाने जे आमच्या साठी रयतेच राज्य उभारायच स्वप्न पाहिलय,ते सत्यात उतरायच्या आधिच हा त्याला गिळंकृत करु पहातोय! जो माझ्या शिवरायांच्या चिंतेच कारण बनेल त्याला जगायचा अधिकार नाही." असा ठाम निर्णय करुन छावणीतील पहारेक-यांना गुंगारा देत लपत-छपत कुडतोजींनी मिर्झाराजेंचा मुख्य तंबु गाठला! आसपासचा अंदाज घेत कुडतोजी आत शिरले! पण मिर्झांना चाहुल लागली होती! तोपर्यंत कुडतोजी मिर्झांच्या पलंगापर्यंत पोहोचले होते. कमरेचा खंजीर काढुन ते वार करणार, त्याआधिच मिर्झांच्या ईशा-याने कुडतोजी पकडले गेले. पकडल्या नंतर सर्वात पहिला प्रश्न मिर्झांनी विचारला, "तु शिवाजींचा माणुस आहेस ना?" कुडतोजी छाती ताणुन म्हणाले "हो". अतिशय चतुर असलेल्या मिर्झाचां दुसरा प्रश्न होता, "पण हे कृत्य करायला तुला शिवाजींनी सांगितलेले नाही, बरोबर ना?" कुडतोजींना आश्चर्य वाटले! त्यांनी प्रतिप्रश्न केला, "तुम्हाला कस माहित?" मिर्झाराजे हसुन म्हणाले, "मी शिवाजींना चांगले ओळखुन आहे, शिवाजी असा उतावळेपणा अजिबात करणार नाहीत! त्यांनी जर मला खत्म करायची योजना आखली असती तर मी आत्ता तुझ्याशी बोलायला जिवंत राहिलो नसतो!" मग मिर्झांनी कुडतोजींना आपल्या लष्करात उच्चपद देण्याच्या बोलीवर सामिल होण्यास सांगितले. शिवरायांवर प्रचंड प्रेम आणि श्रद्धा असणारे कुडतोजी म्हणाले, "हवेतर माझी गर्दन मारा, पण मी शिवरायांना धोका देऊ शकत नाही, माझे इमान फक्त शिवरायांच्या पायाशी, आणि माझी तलवार उचलली जाईल फक्त स्वराज्याच्या शत्रुवरच!!" कुडतोजींचे ते बाणेदार उत्तर ऐकुन मिर्झांनी कुडतोजींना काहीही करता सोडुन दिले!
कुडतोजी राजगडावर येईपर्यंत त्यांच्या पराक्रमाची खबर शिवरायांपर्यंत पोहोचली होती! शिवराय खुप नाराज झाले. ते कुडतोंजीना बोलले, " न सांगता न विचारता असले पराक्रम करायची काय गरज होती, उद्या तुमचं काही बर-वाईट झालं असत तर आम्ही काय करायच होतं?" आणि नंतर शिवरायांनी कुडतोजींचा सत्कार पण केला, कारण येवढ्या बलाढ्य शत्रुच्या गोटात एकट्याने जाणे म्हणजे कोण्या येड्या-गबाळ्याचं काम नाही, तो कोणि भिमप्रतापी माणुसच असावा लागतो"!! आणि शिवरायांनी कुडतोजींना पदवी दिली "प्रतापराव". तेंव्हा पासुन कुडतोजी हे प्रतापराव गुजर या नावाने प्रसिद्ध जहाले!!
आपल्या पराक्रमाच्या जोरावर प्रतापराव स्वराज्याचे तिसरे सरनोबत झाले.अनेक युद्धात त्यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्यसेनेने विजय प्राप्त केले. मुघलांबरोबर झालेल्या १६६५ तहानुसार संभाजीराजांना औरंगाबादला मुघल छावणीत पाठवावे लागले त्यावेळी त्यांच्या बरोबर विश्वासु म्हणुन प्रतापराव गेले होते.
१६७१च्या साल्हेरीचे युद्धा वेळी प्रतापरावांनी मोरोपंताच्या साथीने दिलेरखान आणि बहादुरखानाची केलेली फरफट जगप्रसिद्ध आहे. याच वेळी दिलेखान स्वराज्य सेनेचा पाटलाग करत असताना कन्हेरगडाच्या पायथ्याला रामजी पांगेरा आणि त्यांच्या सातशे मावळ्यांनी दिलेरच्या १५००० फौजेला पळुन जायला भाग पाडले, त्याप्रसंगाबद्दल सभासद म्हणतो, "एक प्रहर टिपरी जैसी शिमग्याची दणाणते तैसे मावळे भांडिले!"
त्याच मोहिमेत प्रसिद्ध साल्हेरच्या युद्धात शिवरायांचे लहानणपणी पासुनचे सवंगडी सुर्याजी काकडे लढताना धारातिर्थी पडले. त्यांच्याबद्दल पण सभासद म्हणतो,
"सुर्यराव म्हणजे सामान्य योद्धा नव्हे, भारती जैसा कर्ण योद्धा त्याच्या प्रतिमेचा, ऐसा शुर पडला. या दोनही नरशार्दुलांना आणि त्यांच्याबरोबर धारातिर्थी पडलेल्या सर्व मावळ्यांना मानाचा मुजरा.
दुस-यांदा सुरत लुटल्यावर १६७३ च्या दरम्यान सुरतकरांना आणखी एकदा लुटिचा दम देणारे जाहिर पत्र प्रतापरावांनी पाठवले होते. (पत्र बरेच मोठे असल्याने लिहिले नाही. सरदेसाईंच्या पहिल्या खंडात पा.नं.२७९/२८० वर पत्र आणि मुघल सुभेदाराने दिलेले उत्तर विस्तृत पणे वाचावयास मिळेल)
त्यानंतरचा प्रतापरावाचां ठळ्ळक उल्लेख येतो उमराणी येथे बहलोलखानाला कोंडीत धरुन नाक घासुन माफी मागायला लावण्याच्या घटनेचा किंवा युद्धाचा! हि घटना पण जगप्रसिद्ध आहे! त्यावेळी दया येऊन प्रतापरावांनी बहलोल खानास धर्मवाट दिली! ते महाराजांना रुचले नाही. महाराजांनी कडक शब्दात प्रतापरावांना बोल लावले "सला काय निमित्ते केला?त्याला बुडविला का नाही? कैद का नाही केला? आता शत्रुला गेर्दिस मिळवल्या शिवाय आम्हास तोंड दाखवु नका!" हा खलिता मिळताच प्रतापराव कमालीचे दुःखी झाले,पण त्याहीपेक्षा संतापले जास्त! "माझ्या राजांचा राज्यभिषेक जवळच आहे. आणि या बहलोलमुळे कदाचित मला त्या सोहळ्यास हजर रहाता येणार नाही!" असा विचार करुन ते तडक बहलोलच्या खबरा काढत त्याच्या मागावर निघाले.आणि २४ फे. १६७४ या दिवशी नेसरी गावाजवळ मुक्कामी असताना, आपल्या सहा साथीदारांसह (दिपोजी राऊतराव,विसाजी बल्लाळ, विठ्ठल पिलाजी अत्रे,कृष्णाजी भास्कर, सिद्दि हिलाल,आणि विठोजी शिंदे?) काही कामानिमित्त खिंडीजवळ आले असता खबर आली डोंगरापल्याड बहलोलचा मुक्काम आहे!.....….
पुढचा प्रसंग सर्वज्ञात आहे, ईथे फक्त एक छोटासा पण मनाला पटणारा बदल करावासा वाटतो. अख्ख जग म्हणतं "वेडात मराठे वीर दौडले सात", पण मी म्हणेन "वेगात मराठे वीर दौडले सात!" याला कारणही तसेच आहे, महाराजांनी शत्रुला संपवल्याशिवाय तोंड न दाखवण्याची आज्ञा दिली होती. आपल्या श्रध्येयास लवकरात लवकर पहसण्यासाठी, त्यांच्या होणा-या राज्याभिषेक सोहळ्यास आपल्याला हजर रहाता यावे, तो आनंदसोहळा याची देही याची डोळा पहाता यावा याच ईच्छेने, परत मोका मिळणार नाही म्हणुन लवकरात-लवकर शत्रुचा खात्मा करुन रायगडी पोहोचायची घाई होती, निव्वळ याचमुळे मी म्हणेन "वेगात मराठे वीर दौडले सात".
प्रतापरावांच्या या उत्युच्य पराक्रमाची थोडीशी उतराई म्हणुन महाराजांनी प्रतापरावांची कन्या जानकीबाईंचा विवाह आपले धाकले पुत्र राजारामांशी केला.
प्रतापरावांच्या निष्ठेचा आलेख ईथेच संपत नाही. त्यांच्या मृत्युनंतरही ही निष्ठा त्यांच्या पुत्रांमधे पहायला मिळते, शेवटी प्रतापरावांचेच रक्त ते!!
शंभुराजेंच्या हत्येनंतर शंभुराज्ञी येसुबाईसाहेब आणि युवराज शाहुंना गिरफ्तार करुन औरंगजेब कडे नेलं गेलं, त्यावेळी त्याने शाहुमहाराजांच्या धर्मांतराचे तिनदा प्रयत्न केले, पण असे म्हणतात की त्याचे ते प्रयत्न त्याच्याच मुलीने सफल होऊ दिले नाहित! तेंव्हा औरंगजेबाने आपली नाचक्की होऊ नये म्हणुन असंभवनिय अट घातली, "शाहु ऐवजी त्याच्या बरोबरच्या दोन उच्चपदस्थ व्यक्ति जर मुस्लिम होण्यास तयार असतील तर मी शाहुवर जबरदस्ती करणार नाही! तेंव्हा शाहुमहाराजां बरोबर गेलेले प्रतापरावांचे दोन पुत्र ह्या अटिवर तयार झाले की, "आम्ही मुस्लिम व्हायला तयार आहोत, पण नंतर तुम्ही शाहुमहाराजांवर जबरदस्ती करणार नसाल तर." बादशहाने शब्द दिल्यावर प्रतापरावांचे दोन पुत्र ज्यांची नावे खंडोजी आणि जगजिवन यांचे धर्मांतर केले गेले आणि त्यांची नावे अब्दुलरहिम व अब्दुलरहिमान अशी ठेवण्यात आली. आणि मुस्लिम मुलींबरोबर त्यांचे निकाह लाऊन दिले गेले! कालांतराने औरंगजेबाच्या मृत्यु नंतर शाहुमहाराजांना दिल्लीचे राजकारण करुन सोडवुन आणण्यात आले. त्यांच्या बरोबर प्रतापरावांचे दोन्ही पुत्र पण सपरिवार आले. पण त्यांच्या त्यागाला शाहुमहाराज विसरले नाहीत. त्यांच्या कागदपत्रात एका ठिकाणी स्पष्ट उल्लेख आढळतो, "आमचा मामा आम्हाबद्दल मुसलमान जाहला." विषेश म्हणजे मामा सावत्र होते. पण जिथे निष्ठा आडवी येते तिथे नाती-गोती सख्ये-सावत्र सगळं काही जळुन खाक होतं! रहाते फक्त निष्ठा आणि निष्ठाच! ईथे आल्यावर स्वधर्मात परत यायची ईच्छा त्यांनी व्यक्त केली. पण "काही कारणास्तव" ते स्वधर्मात येऊ शकले नाहीत! त्यांनी केलेल्या ह्या त्यागासाठी एक छोटीशी उतराई म्हणुन त्यांना परळी खो-यात साठ गावची जमीन इनाम म्हणुन देण्यात आली. आजही प्रतापरावांचे मराठा आणि मुस्लिम वंशज तिथे रहात आहेत. अभिमानाने सांगतात की आम्ही सरनोबत प्रतापराव गुजरांचे वंशज आहोत.
तर मित्रांनो लेख थोडा मोठा झालाय, तरी माझ्या मते तरी पुर्ण नाही. पण तुम्हाला कसा वाटला जरुर सांगा -खलिल शेख, जय शिवराय
No comments:
Post a Comment