भाग ३
२२ ऑक्टोबर १७५७ रोजी दसर्याच्या सुमुहूर्तावर दादासाहेब दिल्लीहून पंजाबच्या मोहिमेस निघाले. काही काळ दुआबात अंमल बसवून दादासाहेब गड्मुक्तेश्वरी तीर्थास गंगास्नानास गेले. महिना डिसेंबर ५७ दरम्यान नजीब मागे मागे हटत गेला व मराठे गंगेच्या प्रदेशात प्रबळ होत गेले. नजीबखानाचा गुरु कुतुबशहा सहारनपुर भागात पाळला व मराठ्यांशी लढताना जबर जखमी झाला व पळोन गेला. मराठे उत्तरेत पंजाबच्या दिशेने सरकू लागले. कर्नाल जिल्ह्यातील कुंजपुरा इथे मराठ्यांचा सामना नजीबच्या तोफ्खानाचा प्रमुख नजाबतखानशी झाला. त्याने ५ लाख भरून स्वतःचा बचाव केला. या सौदेबाजीतही मल्हाररावाने नजाबतला वाचवले व रोख रक्कमेवर शत्रूला अभय दिले असे हिंदी बातमीदाराच्या नोंदीत सापडते. एकंदरच काय तर उत्तरेच्या राजकारणात मुरब्बी असलेल्या ६३ वर्षीय मल्हारराव यांनी २३ वर्षीय तरुण दादासाहेबांना आपल्या मुठीत ठेवले होते.
तिकडे पंजाबात अब्दालीने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात बंडाळी उठली ज्याने मराठ्यांचे काम सोपे झाले. कपुरथळा संस्थानाचा मुल पुरुष जस्सासिंग अहलुवालिया, पतियाळा घराण्याचा संस्थापक आलासिंग जाट ज्याचा मराठी कागदपत्रात ‘आला जाठ’ असा उल्लेख येतो, आणि जस्सासिंग रामगडीया ह्या तिघांनी शीख सैन्य एकत्र करून पंजाबात अफगाणवरोधी मोहीम काढली आणि पठाणांची पंजाबातून हकालपट्टी सुरु केली. अमृतसर येथील सुवर्णमंदिर जे अब्दालीने एप्रिल ५७ मध्ये जाताना उध्वस्त केले होते व तेथील पवित्र तळ्यात माती भरून त्यावर शेती करायला लावली होती ते मंदिर ह्या तिघांनी पुन्हा उभे केले व तळे पुन्हा बांधले. पंजाब मोहिमेवर निघताना होळकरांचा जनाना व परीवार होता. त्यांना कुरुक्षेत्री पूजा-अर्चा करावयासाठी नेण्यात आले होते. कुंजपुरा हाती आल्यानंतर काही काल होळकर परिवार तेथे वास्तव्यास होता. सरहिंदेवर अब्दालीतर्फे अब्दुस्समदखान होता त्याने तिथून निघताना होळकरांचा परिवार पकडून नेला आणि शाहबाद येथे कैदेत ठेवला. हे नवीन प्रकरण उद्भवले परंतु लवकरच निकाली लागले. होळकरांच्या परिवाराच्या सुरक्षारक्षकांनी त्वरित शाहबादेवर निकराचा हल्ला चढवून त्यांना सोडवले आणि अब्दुस्समदखानाला तिथून पिटाळून लावले.
No comments:
Post a Comment