विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 30 August 2023

मराठ्यांच्या सर्वात शक्तिशाली राजधानीची स्थापना - सातारा

 





मराठ्यांच्या सर्वात शक्तिशाली राजधानीची स्थापना - सातारा
इसवी सन 1719 ते 1749 याकाळात हिंदुस्थानचे राजकीय आणि आणि लष्करी केंद्र , तसेच मराठा साम्राज्याची राजधानी होते सातारा.सातारा हि मराठा साम्राज्याची सर्वात शक्तिशाली राजधानी ठरण्याचे कारण म्हणजे, १७०८ ते १७४९ च्या काळात या राजधानीवर कधीही हल्ला झाला नाही.त्याशिवाय कोणत्याही आपत्तीत ५०,००० सैन्य लगेच सातार्यात जमा होऊ शकेल अशी व्यवस्था हि त्याकाळी अस्तित्वात होती.
'रायगड' मराठ्यांची एकेकाळची राजधानी परंतु १६८९ मध्ये ती मोगलांनी जिंकली, १७४९ नंतर राजधानी पुण्याला हलली पण राजधानी असताना अनेकदा पुणे शहर शत्रूच्या ताब्यात गेले, लुटले गेले अथवा हल्ल्याला बळी पडले.
१७०८ साली थोरले शाहू मराठ्यांचे चौथे छत्रपती झाले, दरम्यानच्या काळात मराठ्यांनी बचावात्मक धोरण सोडून आक्रमक पवित्रा स्वीकारला होता.दिल्लीवर नजर असलेल्या शाहू छत्रपतींनी किल्ल्यावरून पायउतार होऊन जमिनीवर राजधानी निर्मिण्याचे योजले. सातारा शहर आहे त्या ठिकाणी पूर्वी कसलेही मौजे गाव अथवा कोणताही कसबा नव्हता. मराठा छत्रपतीने नव्याने निर्माण केलेले हे पहिलेच शहर. वाडी,गाव,कसबा असा विकास होत शहर न होता थेट शहर म्हणून निर्मिती झालेलेही सातारा पहिलेच होय.म्हणजेच सातारा जन्मापासूनच शहर होते.
शाहू महाराजांनी शहराच्या निर्मितीच्या वेळी अनेक व्यापारी आणि रहिवासी पेठा वसवल्या.'सदाशिव पेठ' हि प्रमुख व्यापारी पेठ होती. सोमवार,मंगळवार,बुधवार,गुरुवार,शुक्रवार ,शनिवार,रविवार,माची पेठाही वसवल्या गेल्या. शाहूंनी आपले जुने सहकारी ज्योत्याजी केसरकर यांच्या नावाने केसरकर पेठही वसवली होती.शहरात पाणीपुरवठा व्हावा या दृष्टीने आधुनिक पद्धतीचे लहान आणि मोठे कालवे (aqueduct) शहरातून बांधण्यात आले.शाहूंची दूरदृष्टी बघा हि यंत्रणा सातार्यात १७१५ सालीच अस्तित्वात आली तर पुणे आणि कोल्हापूर येथे पाणीपुरवठा यंत्रणा येण्यास १७५९ आणि १७९२ साल उलगडावे लागले.
पेठांबरोबरच काही पुरे जसे कि राजसपुरा,व्यंकटेश पुरा,चिमणपुरा ,कानपुरा,रघुनाथपुरा हे पुरेही अस्तित्वात आले.१७२१ नंतर मल्हार पेठ,यादो गोपाळ पेठ,दुर्गा पेठ यांनीही सातार्याच्या विकासात भर घातली, आणि सातारा राजधानीच्या शहराप्रमाणे शोभून दिसू लागले. विशेष म्हणजे त्याकाळी शहराचा दर्जा फक्त सातार्यालाच होता.
विशेष गोष्ट अशी कि राजधानी असल्यामुळे सातार्याचा विकास त्याकाळात पुणे,कोल्हापूर यापेक्षा वेगाने झाला.फडणीस,दफ्तरदार ,कारकून यासोबतच 'कोतवाल' (पोलीस आयुक्त) आणि कमाविसदार (शहर आयुक्त) या दोन विशेष नेमणुकाही सातार्याच्या प्रशासकीय यंत्रणेत करण्यात आल्या.
सातारा शहर फक्त मराठ्यांची राजधानीच नाही तर देशाची राजकीय राजधानी बनले,मराठ्यांच्या शक्तीचे केंद्र बनले आणि याबरोबरच शाहू छत्रपतींच्या यशाचा कीर्तिस्तंभ सुद्धा बनले.
म्हणूनच कदाचित सातारकरांनी आणि प्रजेनी शाहूंना मानवंदना म्हणून सातार्याला 'शाहूनगरी' असे हि नाव दिले.
चित्र - १. शाहू छत्रपती आणि नानासाहेब पेशवे २. सातारा शहराची प्रशासकीय व्यवस्था ३.शहररचनेचा एक नमुना ४. मराठा वास्तुकला

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...