भाग ७
मराठी फौजा पुढे पेशावरास आल्या. अटकेच्या पुढे ६० की.मी.वर पेशावर आहे. तेही ओलांडून मराठी फौज खैबर खिंडीत आली. मराठ्यांनी तिथून अफगाणिस्थान पाहिला. काबुल कंदाहारचा बिकट प्रदेश पाहताच तो जिंकण्याची उर्मी मराठी फौजेत उठली. हर हर महादेवच्या आरोळ्या अफगाणिस्थानात उठल्या. मग एक अतर्क्य घडले. मराठी फौजांनी पंजाब, सिंध मधून अब्दालीला पिटाळल्याच्या बातम्या पार इराण पर्यंत पोहोचल्या. आणि इराणच्या बादशाहने मराठ्यांना एक पत्र पाठवले! रघूनाथरावाने लाहोर हून पुण्यास एक पत्र पाठवले. त्यात इराणहून आलेल्या पत्राचा उल्लेख आहे. खुद्द राघोबादादाचे ४ मे ५८ चे पत्र पेशवे दफ्तरात उपलब्ध आहे.त्याचा मजकूर खालील प्रमाणे -
“… लाहोर, मुलतान, कश्मीर व अटके अलीकडील सुभ्यांचा बंदोबस्त करून अंमल वसवावा त्यास काही झाला व काही होणे तोही लवकरच करतो.तैमुर सुलतान व जहांखन तांची फौज लुटून घेतली. थोडी फौज झाडत पडत अटके पार पिशावरास पोचली. अब्दाली इराणवर चालोन जाता त्याची फौज इराणच्या बादशाहने लुटली. तसा तो परत कांदाहारास आला. पाठीवर इराणी फौज येऊन धामधूम करू पाहते. जबरदस्तखान व मुकर्रबखान या प्रांतीचे सरदार व जमीनदार जबरदस्तीने अब्दालीकडे रुजू होते तेही बदलून हंगामा करतात. हल्ली रफिक होवून सेवा करू, अब्दालीस तंबी करू अश्या त्यांच्या अर्ज्या आल्या आहेत. अब्दालीचा धर सुटला आहे. सारांश त्याचा जोर तिकडून होतो ऐसे नाही.तिकडून इराणचे पातशाहने जेरदस्त केले आणि इकडून जोर पोचून सरकारचा अंमल अटकेपार करावा. अब्दालीचा पुतण्या व दलातेचा वारस स्वामीपाशी देशास आला तो स्वामिनी आम्हापाशी पाठविला त्यास अटके पलीकडे थोडी जागा बसावयास देवून अटकेपार काबुल पिशावरचा सुभा देऊ. अब्दुस्समद खान व त्याची फौज सरकारात पाडाव आहे. तो त्याची व या प्रांतीची फौज, मोगल, इराणी सवे देऊन मशारनिल्हेची रवानगी करतो. हे तिकडे पैरवी करतील, स्वामींचे पुण्याप्रतापे अब्दालीस जोर पोचून तंबी करतील. पारिपत्य उत्तम प्रकारे करून अटकेपार अंमल वसवतील. लाहूर प्रांती रेणको अनाजी व रायाजी सचदेव ऐसे ठेविले. गोपाळराव गणेश यांचा हि पैगाम आहे तेही राहतील. इराणचे पातशाहचे स्वदस्तूरचे कागदही आम्हास व मल्हाररावास आले होते. की लवकर कंदाहारेस यावे आणि अब्दालीचे पारपत्य करून अटकेची हद्द करावी. परंतू आम्ही काबुलचा सुभा अब्दुल रेहमान स्वामीनी पाठवला त्यास देतो. फौज वगैरे थोडे बहुत साहित्यही करतो. काबुल व कंदाहार हे अटकेपारचे सुभे हिंदुस्थानकडे अकबरापासून आलमगिरा पर्यंत होते ते आम्ही विलायतेत का द्यावे ? तो इराणचा अम्मल करील. आम्ही कंदाहार पावेतो अम्मल बसवून तूर्त त्यास गोडच जबाब पाठविणार आहोत. जंबू काश्मीर वगैरे तमाम वकील आले आहेत. माम्लात थोडी बहुत अटके अलीकडील करीत आहोत. पलीकडील संपूर्ण तूर्त होत नाही खटपट मात्र होते. तूर्त तातादिमुळे होईल तेवढे करतो. पुढील स्वारीस सरदार जो कुणी मातबर येईल तो बंदोबस्त करील. मुलुख दो चौ करोदीचा, जमीनदार मावास मोठे मोठे आहेत. आम्ही नावास मात्र खंडणी करतो, जेथे २५ लक्षांचा मुलुख तेथे १-२ लक्षही येणे कठीण आहे. तूर्त माघारे फिरवायचा डौल स्वामींचे आज्ञेवरून धरिला आहे, यामुळे जे होईल ते करितो , तटी लावत नाही. तूर्त आदिनाबेगावर सारा एख्तीयार दिला आहे. त्यास कामावसीने लाहोर मुलतान दिले आहे. यंदा तर सारे शिबंदी खालीच जाईल, शिबंदी वारताच कठीण पडेल. २-३ वर्षांनी काही सोयिस पडेल. स्वामीस कळावे. र. छ.२५ शाबान.”
No comments:
Post a Comment