विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 12 August 2023

श्री सप्तकोटेश्वर देव!!

 




श्री सप्तकोटेश्वर देव!!
गोमंतक मोहिमेत या मंदिराला भेट देण्याचे भाग्य लाभले आणि या परिसराने, या सप्तकोटेश्वर च्या मंदिराने मनात एक वेगळीच भुरळ घातली.
या ठिकाणी नतमस्तक होताना गोमंतक चे १२ व्या शतकातील अनभिषिक्त सम्राट म्हणजेच कदंब राज्यांनी केलेले श्री सप्तकोटेश्वर देवाचे मंगल पूजन ही आठवले.मात्र त्या नंतर पोर्तुगीज अत्याचार आणि या पवित्र ठिकाणचे निघून गेलेले पावित्र्य ही आठवले. मात्र श्रीमन छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार सोमवार दिनांक ६ एप्रिल १६६८ या वर्षी केला. त्यामुळेच या पवित्र ठिकाणचे मांगल्य, पावित्र्य पुन्हा एकदा जपले गेले.तसा शिलालेखच छत्रपती शिवरायांनी इथे कोरला आणि आजही तो शिलालेख आपल्याला पाहायला मिळतो.
अनेक स्थित्यंतरे गेली , मात्र या ठिकाणचे पावित्र्य तसेच अबाधित राहिलंय. नुकतेच ASI आणि गोमंतक सरकार यांच्या पुढाकाराने या मंदिराचा अतिशय उत्तम जीर्णोद्धार झालाय.
जीर्णोद्धार आधीचे आणि नंतरचे मंदिर यामध्ये छानसा बदल करून या मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले.
माझ्या मनात मात्र गेले कैक महिने एक वेगळीच गोष्ट घुटमळत होती. ती म्हणजे १२ व्या शतकातील कदंब राजघराण्याने या मंदिराच्या नावे पाडलेले सोन्याचे नाणे संग्रहात मिळविण्याचे. अगदी अचूक आणि योग्य वेळ आली आणि हे नाणे माझ्या संग्रहात आले.
जेंव्हा या नाण्याला स्पर्श केला, तेंव्हा काय सांगू ती अनुभूती? अक्षरशः अंगावर रोमांच उभे राहिले होतेच. पण राहून राहून हे नाणे एकदा तरी श्री सप्तकोटेश्वर देवाला पुन्हा एकदा जाऊन स्पर्श करण्याची इच्छा जागृत झालेली आहे.
देव सप्तकोटेश्वरच जाणे ती इच्छा कधी पूर्ण होईल.
सदरहू नाणे हे श्री जयाकेशी तिसरा याने त्याच्या राज्यकारकीर्दीत पाडलेले सोन्याचे ४.३७ ग्राम चे नाणे आहे. आज अनेकांचे कुलदैवत असलेल्या श्री सप्तकोटेश्वर देवाचे या नाण्यावर नाव छापलेले आहे. कारण कदंब राजे स्वतःला "श्री सप्तकोटेश्वरलब्धवर प्रसाद" अशी बिरुदावली मिरवत असत.तसेच या नाण्याच्या पुढील बाजूला कदंब राज्याचे राजचिन्ह छापलेले आहे.
या क्षणाला अनेक मित्र, अभ्यासक यांना हे नाणे बघता यावे म्हणून इथे दर्शविण्याचा मोह मात्र आवरता नाही आला. अशी पवित्र ठिकाणची नाणी प्रत्यक्ष संग्रहात येणे हे परम भाग्यच म्हणायचे.
बहुत काय लिहिणे? आपला संदर्भासहित अभ्यास सतत चालूच राहावा हीच मनीषा.
किरण शेलार.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...