विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 7 August 2023

सरदार विचारे यांचा इतिहास

इतिहासाच्या अभ्यासाची सुरुवात करायची झाल्यास त्याची सुरुवात आधी स्वतःच्या आडनावापासून , गावापासून करावी असे आमचे ज्येष्ठ इतिहास संशोधक आ. श्री. आप्पा परब सांगतात. म्हणूनच कि काय त्यांच्या घरी येणाऱ्या प्रत्येकाला ओळख विचारताना ते त्यांचे आडनाव आणि गावाचे नाव आवर्जून विचारतात. मी हि असाच साधारण २०१३-१४ साली आप्पांच्या संपर्कात आलो आणि आप्पांच्या घरी माझे येणेजाणे वाढले ते अगदी आजतागायत. आता तर काय अगदी घरचे नाते निर्माण झाले आहे आप्पांसोबत अगदी आजोबा नातवासारखे.
तर सांगायचा मूळ मुद्दा असा कि मी हि पहिल्यांदा आप्पांकडे गेलो असताना आप्पांनी मला माझ्या आडनावाविषयी विचारले आणि मग माझ्या हाती त्यांचे शिवरायांच्या अष्टराज्ञी हे पुस्तक दिले.
"विचारे म्हणजे महाराजांचे सोयरे. राॕयल मराठा , राजघराणे. तु विचारे आडनावाचा अभ्यास करायलाच हवास. विचार्यांचे इतिहासातील उल्लेख शोधायला हवेस , विचारे वसईच्या मोहिमेत होते शोध तू तुला सापडेल - इति आप्पा परब. आणि मग शोध सुरु झाला इतिहासातील विचारे आडनावांचा उल्लेख कुठे कुठे सापडतोय याचा. आयडीयल , मॕजेस्टीकसारखी दादरमधल्या पुस्तक विक्रि केंद्रांवर माझं येणंजाणं वाढलं . तिथल्या पुस्तकांत विचार्यांविषयी कुठे उल्लेख मिळतोय का याचा शोध सुरु झाला, मुंबई पुण्यातील इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या मित्रमंडळींकडे विचारपूस सुरु झाली.
हेतू प्रामाणिक असला कि गोष्टी आपसूकच मिळत जातात पण त्यासाठी प्रयत्न करायलाच हवेत. मी हि ते केले आणि एक एक करत उल्लेख मिळत गेले.
पहिला उल्लेख सापडला तो आंतरजालावर , मूळ सनदेचा शोध सुरु आहे.
"१५ व्या शतकात वसलेल्या पालशेत गावाच्या निर्मितीचे मूळ जनक विचारे घराण्यातील सन १५१० साली मौजे खारपाटण येथून स्थलांतर करुन आपल्या सलामती नामक गलबताने प्रवास करुन पालशेत या ठिकाणी दाखल झाल्याचे येसाजी गुणाजी पटेकर यांच्याकडील सनदेमधून कळते. यासाली सर्वप्रथम पालशेतनजीकच्या बुधल गावी, त्यानंतर काही काळ अडूर मौजे गावी वास्तव्य करुन याठिकाणी असलेल्या भीषण पाणीटंचाईच्या कारणास्तव कृष्णाजी भिवा विचारे या मराठा घराण्यातील गृहस्थाने त्यांच्यासह आलेल्या सात कुटूंबासह पालशेतमधील देवपाट म्हणजे आजच्या पाटावरचीवाडी येथे वास्तव्य केले.येथून पुढे विचारे पालशेत बारभाई येथे वास्तव्यास गेले. पटेकरांचे वंशज त्यांच्याच कुशीत म्हणजे आजच्या चिंचबंदर याठिकाणी वास्तव्य करुन राहिले. श्री देवी झोलाई आणि श्री.महालक्ष्मी भगवती या देवींची प्रणप्रतिष्ठापना विचारे घराण्याने या गावची ग्रामदेवता म्हणून केली.
#पालशेत हे नाव १५ व्या शतकात प्राप्त झाले. त्याआधी या गावाचा उल्लेख पालपटमय बंदर असा आढळतो. पाणतळी शेतीचा परिसर म्हणून यास पाणशेत आणि मग पुढे अपभ्रंश होऊन १५ व्या शतकात पालशेत नाम प्राप्त झाले . एका ऐकिव माहितीवरुन त्या सरदाराचे नाव #संभाजीरावविचारे असे आढळते .सदर सरदार विजापुरात आदिलशहाच्या दरबारात होते असे सांगितले जाते. त्यांची माहिती ओक (महाजन ) दप्तरात सापडते."
यानंतरचा उल्लेख आढळतो तोसुद्धा आंतरजालावरच #बांदलांच्या #गजापूरच्या प्रसिद्ध #घोडखिंडीच्या लढाईतला. याविषयीची मूळ कागदपत्रे तपासणे आवश्यक आहे.
" बांदलांच्या ६०० शिबंदिच्या जोरावर राजांनी हि धाडसी मोहिम आखली. हि फौज सह्याद्रीच्या वाघाला मगर मिठीतून सोडवणार होती. काळसर्पाच्या मगरमिठीतून स्वराज्य सोडवणार होती. त्या फौजेत हिरडस मावळातील दोन पाणीदार मोती बांदलांच्या तुर्यात चमकत होते. बाजी प्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे . बरोबर होत्या ६०० नागव्या तलवारी,ढाली धारण केलेले वीर शंभूसिंग जाधवराव, खाटपे , #विचारे, चोर, गव्हाणे,कोंढालकर,शिरवले, पोल,पारठे, शिंदे, महाले समस्त मावळातील १२ बलुतेदार.
तिसरा उल्लेख आढळतो पंडित संकर्षण सकळकळेकृत #शिवकाव्य या पोथीतील सर्ग ५ मधील श्लोक ५३ सांगतो की, शिवरायांनी सह्याद्री पायथ्याच्या मुलुखात प्रवेश करुन तेथे गुप्तपणे व घाईघाईने (गंधर्व पद्धतीने ) जयश्री नावाच्या तरुणीचे पाणिग्रहण करुन हि तरुणी शंकरराय मोरे कुलोत्पन्न , विचारवंत उपकुळ विचारे घराण्यातील होती. हिचे माहेरचे नाव जयश्री आणि सासरचे नाव #लक्ष्मीबाई असे होते. पुढे सर्ग ६ मधील श्लोक क्र. १ सांगतो कि राज्ञी जयश्रीसहित शिवाजीराजे स्वस्तयन करुन मंगल वाद्य घोषात स्वतःचे नगराकडे निघाला. सदर विवाह १४ जानेवारी १६५६ रोजी जावळीमध्ये मकरसंक्रमणाच्या मुहूर्तावर राजाभिषेक विधी सुरु करुन पंडीत सकळकळे ब्राम्हण गुरुच्या हस्ते राजाभिषेक करवून घेतला.
तंजावर येथील बृहदीश्वर शिलालेखात शिवराज्ञींची नामावळी सांगताना नमूद केले आहे कि, विचार्यांची लेक. - शिवरायांच्या अष्टराज्ञी - आप्पा परब.
किल्ले खेळण्याच्या आसमंतात कोकणांत आणि देशावर सांप्रत #विचारे घराणी आहेत. - शिवरायांच्या अष्टराज्ञी - आप्पा परब.
"करवीरकर सरदारांच्या कैफियतीत मलकापूर तालुक्यातील मौजे येलेवाडीचा सर्जेराव #आबाजीराव #विचारे सांगतो कि, आपल्या पिढीजात जमिनीच्या उत्पन्नापैकी विशाळगडाकडे पंचद्वाही हिशे दोन वजा होतात बाकी ऐवज" - शिवरायांच्या अष्टराज्ञी - आप्पा परब.
आपले श्वशूर विचारवंत यांजकडे किल्ले खेळण्यावर शिवराय काही दिवस राहिले असे कवी #परमानंद सांगतो.- शिवरायांच्या अष्टराज्ञी - आप्पा परब.
पुढे पेशवाईतील उल्लेख :
" सुवर्णदुर्ग हाती आल्यामुळे समशेरबहाद्दर आणि दिनकर महादेव यांनी रत्नागिरीच्या किल्ल्याला वेढा घातला. रामजीपंतांनी या वेढ्यासाठीही विल्यमला विनवले. अर्थात रामाजीपंतांच्या पूर्वीच्या अनुभवावरुन विल्यम मदत करणार नाही हे रामजीपंतांनी ताडले होतेच. झालेही तसेच. हिच गत अंजनवेल आणि गोवळकोटच्या किल्ल्याच्या बाबतीतही झाली. अखेरीस हरी दामोदर आणि महिपतराव कवडे यांनी दि. १४ जानेवारी १७५६ रोजी आंग्र्यांचा किल्लेदार मोत्याजी विचारे यांच्याकडून #अंजनवेल जिंकून घेतला. #गोवळकोटही याच सुमारास काबिज झाला". - इतिहासाची सुवर्णपाने : तुळाजी आंगर्यांचा पराभव सत्य आणि असत्य - कौस्तुभ कस्तुरे.
सन १७२७ साली सरखेल कान्होजी आंग्रे यांनी डर्बी हे इंग्रजांचे जहाज दाभोळजवळ संघर्षपूर्ण आरमारी लढाई अंती जप्त केले यात सरदार #मोत्याजीरावविचारे यांनी महत्त्वाची भुमिका बजावली. सदर युद्ध प्रसंग - सरखेल कान्होजी आंग्रे मराठा आरमार या डाॕ. द.रा. केतकर लिखीत पुस्तकात वर्णिला आहे.
नानासाहेब पेशव्यांच्या कारकिर्दीपासून विजयदुर्गचे धुळप घराणे मराठा आरमारात प्रमुख म्हणून ओळखले जात होते. आंग्रे काळातही धुळपांनी आपल्या पराक्रमाचे दर्शन दाखविले होते. धुळपांबरोबर #विचारे , कुसवेकर, सुर्वे, जावकर असे तरबेज दर्यावर्दी सरदार आरमारात होते. - माझी इतिहासातील मुशाफिरी - डाॕ. द.रा. केतकर.
#मानोजीविचारे - जंजिर्याच्या आरमारात होते. १६७० च्या मुसाळच्या लढाईत पकडले गेले.- Chronicle Of Maratha - बाळाजी मोडक.(१८८९)
#दत्ताजीविचारे - गुराब भवानीप्रसाद सरदार दत्ताजी विचारे.
While fighting with an english gally, the sails of Bhavaniprasad caught fire. It was then towed to the fort of kolaba (Alibag)by Dattaji Vichare ( vide the inscription in plate 9) - A History Of Maratha Navy And Merchantships - भा.कृ.आपटे
#वसईचा #रणसंग्राम म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील एक सुवर्णपान. पोर्तुगीजांच्या मते या युद्धामध्ये जवळजवळ दोन लाख लोक या ना त्या प्रकारे सामील होते. मराठ्यांच्याकडून अनेक नामवंत ह्या युद्धासाठी अहोरात्र दिवसेनदिवस प्रयत्न करीत होते. या मोहिमेतल्या अनेक नामवंत वीरांमधे एक नाव #जिवजीरावविचारे यांचे आहे याचा सार्थ अभिमान वाटतो.- किल्ले वसई - रमेश नेवसे.
राजावळीच्या उतारावर पलीकडून बाजीराव बेलोसे वगैरे लोक गेले तेव्हा चौकीवर शत्रूचे ३० माणूस उभे होते.त्यांनी तिची चाहूल घेतली व यांना हटकले तोच हे येऊन भिडले व कापाकापीस सुरुवात केली. हा दंगा दोन्ही बाजूच्या चौकीदारांनी ऐकून धोक्याची सूचना देण्याकरता बंदुकाचे आवाज केले. चौकीदार मारामार करिता बोभाटा झाला म्हणूनच शंकराजीपंतांस वर सांगितलेला धाडसाचा इलाज करावा लागला. तो म्हणतो , " खंडो चिमणाजी पोहूनच गेले. त्यांनी श्रम बरा केला. बाळाजी केशव, मोराजी शिंदे, बाजीराव बेलोसे, #विचारे, रामजी सुर्वे व समस्त लोक उतेकर मावळे व हटकर यांनी सर्वांनी. बहुत मेहनत पोहणारास झाली ते श्री जाणे !" - वसईची मोहिम - य.न. केळकर.
या अपरंपार सेनासंभरा पेशव्यांची ठेवणीतली सारी वीररत्ने एकत्र झाल्यासारखी दिसत होती. मातबर लोकांत पिलाजी जाधव, मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे,राणोजी शितोळे, गणपतराव मेहेंदळे, रामचंद्र हरी पटवर्धन, बापूजी भिवराव, कंठाजी बांडे, विभूतराव सतकर, शंकराजीपंत फडके,कर्णाजी शिंदे, खंडो चिमणाजी, रायाजी शंकर, आप्पाजीराव खानविलकर, गणोजीराव खानविलकर, रुद्राजी शिंदे, विठोजी कदम, जिवाजीराव विचारे, सुभानजी नाईक, गंगाजी नाईक व त्यांचे बंधू गणेशजी नाईक, नामाजी देसाई, भानजी देसाई, गंगाजी देसाई, बबनजी प्रभु, गणेशजी प्रभु वगैरे अनेक नामांकित लोक होते. शंकराजी केशव व अणजूरकर मंडळी , भंडारी मंडळी यांना मोर्चास व दमाम्यास व सुरुंगास व तोफांस सामान, बंगले व वाडे व तट्टे व झांप , सोडशिड्या, दारुगोळा वगैरे सामान पुरवावयास लागले असे बखरकार लिहितो.तीन महिने अहोरात्रंदिवस जमिनीस अंग लागले नाही" - #वसईची #मोहिम - य. न केळकर.
आदिलशाही झाली , शिवशाही झाली , पेशवाई झाली आता राजर्षी शाहूंच्या करवीर गादीकडे वळू.
इ.स. १८४४ मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी अधिकार सूत्रे धारण केली त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की स्टेशनजवळ एक व्यापारी पेठ करता येणे शक्य आहे. म्हणून त्यांनी इ.स. १८९५ मध्ये शाहूपुरी पेठ वसवण्याची आज्ञा केली. १९२० पर्यंत त्या वेळचे संस्थानचे इंजिनियर रावसाहेब विचारे व नगरपालिकेचे सुपरिटेंडेंट श्री . भास्करराव जाधव यांनी ती पार पाडली.
नाविन्याचा ध्यास असणारे छत्रपती शाहू महराज आँलम्पिक स्पर्धेचे मैदान पाहण्यासाठी रोम येथे गेले होते. तिथे कुश्तीचे मैदान त्यांनी पाहिले. असेच मैदान कोल्हापूर मध्ये सुद्धा हवे असे स्वप्न त्यांनी पाहिले ...त्याच पद्धतीने मैदान करण्याची जबाबदारी रावबहादूर विचारे यांच्यावर सोपविन्यात आली. १९०७ ला हा प्रकल्प हाती घेण्यात आला १९१२ ला तो पूर्ण झाला. या मैदानाचे वैशिष्ट्ये म्हणजे तब्बल २५ ते ३० हजार प्रेक्षक या मैदानात बसु शकतात आणि मैदानाच्या कुठल्याही अँगल मधून प्रत्येक प्रेक्षकाला ही कुश्ती पाहता येते.
खासबाग मैदान हे त्याकाळातील भारतातील आधुनिक पद्धतीने निर्माण केलेले सर्वात मोठे मैदानापैकी एक होते या मैदानामूळेच येथे क्रीडासंस्कृती रुझली ...खाशाबा जाधवच्या रूपाने आँलम्पिकचे पहिले वैयक्तिक मेडल महाराष्ट्रला मिळाले.
#दाजीराव #अमृतराव उर्फ #रावबहादूरविचारे या संस्थनातील कर्तृत्ववान बांधकाम अधिकार्याचे कोल्हापूरमधील बर्याच बांधकामात मोठे योगदान होते आणि त्यांची स्मृती म्हणून कोल्हापूरातील अभयारण्यास #दाजीपूरअभयारण्य हे नाव राजर्षी शाहूंनी दिले.
ते बांधकाम क्षेत्रातील तज्ञ होते. राधानगरी धरण, साठमारी , खासबाग कुस्ती मैदान, पॕलेस थिएटर, सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवमंडप उभारणीत दाजीराव विचारे यांचे मोठे योगदान आहे. दाजीराव शाहूपुरीतील पाच बंगल्यंपैकी एका बंगल्यात रहात होते. बहुजन समाजातील मुलांनी शिकून मोठे व्हावे यासाठी होतकरु मुलांना त्यांनी दत्तक घेतले होते. त्यांची जागा शाळेसाठी नगरपालिकेला त्यांनी दान केली जी विचारे विद्यालय नावाने प्रसिध्द होती. काळाच्या ओघात हि शाळा पाडली गेली. तिथे आता जेम्स स्टोन हे व्यापारी संकुल उभे आहे.
लाॕर्ड व्हाॕईसराॕय याच्याकडून शाहू महाराजांना ब्रिटीश साम्राज्यातील G.C.I.E हि मोठ्या सन्मानाची पदवी मिळाल्यानंतरचे पत्र तसेच कालव्याच्या बांधकामासंंधीचे पत्र प्रसिद्ध आहे. - राजर्षी शाहू छत्रपती पत्रव्यव्हार आणि कायदे - डाॕ. जयसिंगराव पवार.
सत्यशोधक गुरुवर्य केशवराव विचारे - महात्मा ज्योतिबा फुले यांचे तत्वज्ञान प्रमाण मानून व छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रेरणेने बहुजन समाजात फुले तत्वज्ञान रुजवण्याचे अवघड कार्य गुरुवर्य #केशवरावविचारे यांनी केले. सत्यशोधक चळवळ पुढे गुरुजींनी वाढवली. त्यांच्या कार्यावर सहकार नेते श्री. राजारामबापू फाळके यांनी केशवराव गुरुजी जीवन दर्शन हे पुस्तक लिहिले. प्रा. हरी नरके यांनी सत्यशोधक केशवराव विचारे समग्र वाड्मय हे पुस्तक संपादित केले.
प्रा. सौ. उज्वला नलावडे ( एम.ए , एम फिल्)
यांनी सत्यशोधकाची संक्षिप्त गाथा हा चरित्र ग्रंथ लिहिला. श्री. जयवंत गुजर यांनी जगावेगळा सत्यशोधक गुरुवर्य केशवराव विचारे हे पुस्तक लिहिले.
#केशवराव १९४० ला सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष झाले.
पुढे महाअध्यक्ष झाले.
त्यांनी शिक्षणाच्या प्रसारासाठी काॕरस्पाॕन्डन्स विद्यार्थी संघ, पोस्टल क्लासेस, सत्यशोधक विद्यार्थी संघ काढले.
महिला बौद्धीक शिबीरे भरवली, वक्ते निर्माण केले, सहकार चळवळीचा प्रसार केला,
क्रेडीट - नाॕन क्रेडिट सोसायटिची स्थापना केली,
मजूर सहकारी संघ, कृषी औद्योगिक प्रकल्प राबवले
सातार्यात जांभूळवाडी इंडस्ट्रियल काॕलनी प्रकल्प , फाळके व भक्तवडी सामुदयिक सहकारी शेती सोसायटी लि. काढली.
सातारा जिल्हा शेतकरी संघ स्थापन केला.
कोल्हापूरात ग्रामविकास संचालक व सोसायटी रजिस्ट्रार झाले.
सुरुवातीला ते रेल्वेत नोकरीला होते. सातारा रोडला स्टेशन मास्तर म्हणून बढती पण नोकरी सोडून पूर्ण वेळ सत्यशोधक आणि सहकार चळवळीला.
कोल्हापूर संस्थानचे डायरेक्टर आॕफ रुरल क्रेडीट व को आॕपरेटिव्ह रजिस्ट्रार म्हणून नियुक्ति. विद्यार्थी माला हे पुस्तक लिहिले.
सातारा जिल्हा लोकल बोर्ड , स्कूल बोर्डाचे चेअरमन तसेच व्हाईस प्रेसिंडेंट.
बाँबे प्राॕव्हिन्शियल को आॕप बँकेचे संचालक होते.
शाहू महाराजांनी त्यांना पंचगंगेच्या काठी दहा एकर शेतजमीन देऊ केली. मानधन देऊ केले पण गुरुजींनी ती नाकारली. अशीच आॕफर सहकार क्षेत्रासाठी वैकुंठलाल मेहता यांनी गुरुजींना दिली. मोटार व हजार रुपये पगाराची.
आप्पांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या विचारे आडनावाचा उल्लेख इतिहासात कुठेकुठे मिळतोय हे शोधताना आदिलशाही, शिवशाही, पेशवाई, कोल्हापूरची शाहूशाही अशी विचार्यांच्या नावाची अन् योगदानाची छोटीशी यादी सापडली.
अजून बराच इतिहास बाकी आहे..©चंदन विचारे.
संदर्भ-
१. शिवरायांच्या अष्टराज्ञी - आप्पा परब.
२. शिवकाव्य - संकर्षण सकळकळे (Ref By आप्पा परब )
३. शिवभारत- कवी परमानंद ( Ref By आप्पा परब)
४. इतिहासाची सुवर्णपाने : तुळाजी आंगर्यांचा पराभव सत्य आणि असत्य - कौस्तुभ कस्तुरे.
५. सरखेल कान्होजी आंग्रे मराठा आरमार - डाॕ. द.रा. केतकर.
६. माझी इतिहासातील मुशाफिरी - डाॕ. द.रा. केतकर.
७. Chronicle Of Maratha Empire- बाळाजी मोडक.(१८८९)-( Ref. By Pratish Khedekar)
८. A History Of Maratha Navy And Merchantships - भा.कृ.आपटे
९. किल्ले वसई - रमेश नेवसे.
१०. वसईची मोहिम - य.न. केळकर.
११. राजर्षी शाहू छत्रपती पत्रव्यव्हार आणि कायदे - डाॕ. जयसिंगराव पवार.
१२. जगावेगळा सत्यशोधक गुरुवर्य केशवराव विचारे- जयवंत गुजर.
१३. सत्यशोधकाची संक्षिप्त गाथा - प्रा. सौ. उज्वला नलावडे.( एम.ए , एम फिल्)
१४. माहिती आंतरजालावरील व वर्तमानपत्रातील लेख.
१५. विचारे कुलवृत्तान्त.
विशेष आभार - श्री.प्रतीश खेडेकर
श्री. विनोदकुमार भोंग ,कोल्हापूर. — Pratish Khedekar

 

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...