पुतळे कोल्हापुरातले -
कोल्हापुराबाहेरचे - कोल्हापूरच्या राजांचे -
चिमासाहेब महाराज यांचं स्मारक
१८५७ च्या बंडाची पहिली ठिणगी कोल्हापुरात पडली होती ती १८४४ मध्ये. पण ते बंड पूर्णपणे अयशस्वी ठरलं होतं. ३१ जुलै १८५८रोजी रामजी शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली २७ पलटणीतील शिपायांनी बंड करून पन्नास हजारांचा सरकारी खजिना लुटला आणि सोळांकूरात मंदिरात लपलेल्या तीन इंग्रजांची कत्तल केली. बेळगावाहून आलेल्या लेफ्टनंट केर यानं हे बंड मोडून काढत उठाव करणाऱ्या सैनिकांना फाशी दिलं . काहींना गोळ्या घातल्या. काहींना नव्या राजवाड्याच्या आवारात तोफेच्या तोंडी दिलं. पुन्हा दूसरा उद्रेक झाला तो त्याच वर्षी डिसेंबर मध्ये. तो उठाव मोडून काढण्यासाठी मुंबईहून कर्नल जेकबला धाडण्यात आलं. महाराज बाबासाहेब यांचे लहान सावत्र बंधू चिमासाहेब यांचं स्वतंत्र बाण्याचं पाणी चतुर जेकबनं ओळखलं आणि चौकशीसाठी म्हणून रात्रीच्या वेळी त्यांना ताब्यात घेतलं. गुपचुप त्यांची रवानगी वाघाटणे बंदरातून मुंबई मार्गे कराचीला करण्यात आली. तिथं त्यांना स्वतंत्र बंगला बांधून बंदोबस्तात ठेवण्यात आलं. आपल्या जन्मभूमीपासून दूर परक्या जागी १८ वर्ष एकांतवासात राहून १५ मे १८६९ रोजी त्यांचं निधन झालं. काही काळानंतर स्थानिक लोकांनी लिहारी नदीच्या काठी त्यांची समाधी बांधली. स्वातंत्र्य मिळेपर्यंत कोल्हापूरातून दर वर्षी त्यांचा स्मृतीदिनानिमित्त जाऊन पुण्यस्मरण केलं जात असे, असं ऐकलं होतं. छत्रपती शाहू महाराज कराचीला गेले असताना योगायोगाने जिथं त्यांची निवास व्यवस्था होती तो बंगला चिमासाहेब यांना ठेवण्यासाठीच बांधला गेला होता असं त्यांना समजलं होतं , तेव्हा त्यांच्या मनात काय भावना जागृत झाल्या असतील ?
कोल्हापूरात आज ज्याला "क्रांती उद्यान " म्हणून ओळखलं जातं त्या उद्यानात या तडफदार स्वाभिमानी क्रांतीवीराचा अर्धपुतळा उभारण्यात आलेला आहे.
छत्रपती राजाराम महाराज दुसरे यांचा फ्लॉरेन्स मधला पुतळा आणि स्मारक.
छत्रपती चिमासाहेब महाराज यांचं १८५७ मधलं बंड मोडून काढल्या नंतर तत्कालीन राज्यकर्ते छत्रपती बाबासाहेब महाराज ( तिसरे शिवाजी) यांच्यावर ब्रिटिश सरकारने कडक बंधनं घातली. त्यामुळे ते नाममात्र राज्यकर्ते राहिले. त्यांचा कुणी वारस नसल्याने सरदार पाटणकर घराण्यातील नागोजीराव पाटणकर या १६ वर्षांच्या युवकाची दत्तक म्हणून निवड करण्यात येऊन राजाराम महाराज म्हणून २९ ऑक्टोबर १८६६ रोजी पुण्यात दरबार भरवून मुंबईचा ब्रिटीश गव्हर्नर बार्टल फियर यांच्या उपस्थितीत त्यांचं राज्यारोहण करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांना १७ तोफांची सलामी देण्यात आली होती. अल्पवयीन राजाराम महाराज यांना शिकवण्यासाठी जमशेटजी नौरोजी उनवाला या पदवीधर पारसी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती.शिवाय असिस्टंट रेसिडेंट कॅप्टन एडवर्ड वेस्ट यांचंही मार्गदर्शन त्यांना लाभलं.त्यामुळे इंग्लिश शिक्षणात तसंच क्रिकेट , बिलियर्ड्समध्येही महाराज पारंगत झाले होते. ड्युक ऑफ एडनबरो यांच्या मुंबईत झालेल्या स्वागत समारंभात महाराजांनी सफाईदार इंग्रजी भाषणसुध्दा केलं होतं. या दुसऱ्या राजाराम महाराजांच्या काळातच १८६९ साली राजाराम हायस्कूलची स्थापना करताना कौशल्य पूर्वक शाळेची कल्पना त्यांनी पोलिटिकल एजंट ऍंडरसन याला पटवून दिली होती. ज्यातून पुढं राजाराम कॉलेज उभं राहिलं. मॅट्रिकच्या परीक्षेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना राजाराम महाराज स्वतःच्या हाताने शिष्यवृत्ती द्यायचे.न्यायालयात जाऊन दिवाणी - फौजदारी कामात स्वतः लक्ष द्यायचे.
त्याकाळात समुद्र प्रवास करुन विलायतेला जाणं निषिद्ध मानलं जात असे.राजाराम महाराज यांनी मात्र या रुढी परंपरांना न जुमानता परदेश गमन करत युरोप दौरा केला. युरोपातील अनेक देश , विद्यापीठं , म्युझियम पाहिली.लंडनच्या पार्लमेंटलाही भेट दिली.प्रिन्स ऑफ वेल्स व महाराणी व्हिक्टोरिया यांच्या भेटी घेतल्या. भारतातील संस्थानिकांपैकी गादीवर असतांनाअसा दौरा करणारे छत्रपती राजाराम महाराज हे पहिलेच राजे होते.
परतीच्या प्रवासात त्यांना थंडीचा त्रास सुरू झाला. सोबतच्या मुस्लिम हकिमाचे उपचार काही लागू पडेनात.
इटलीची राजधानी फ्लॉरेन्स इथं इंग्लिश डॉक्टरांनी केलेल्या औषधोपचारांनी काही गुण न येता ३० नोव्हेंबर १८७० च्या मध्यरात्री त्यांचं आकस्मिक निधन झालं. आता प्रश्न उभा राहिला अंत्यसंस्कारांचा. इटलीच्या चर्चचे पोप तिथं हिंदू धर्मानुसार अग्निसंस्कार करण्यास परवानगी देणं शक्य नव्हतं.व्हिक्टोरिया राणीच्या इटलीतील वकिलांनी मध्यस्थी केल्यानंतर कशीबशी अग्निसंस्कार करण्याची परवानगी मिळाली.फुलांनी सजवलेल्या रथातून महाराजांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली.फ्लॉरेन्स शहराबाहेरील नदीकिनारी महाराजांवर अंतीम संस्कार करण्यात आले.असा अग्निसंस्कार इटलीत पहिल्यांदाच घडत होता.पुढं राजाराम महाराजांच्या अस्थी कोल्हापूरकरांच्या हाती आल्यावर त्यांचं गंगेमध्ये विधिवत विसर्जन करण्यात आलं.
या छत्रपती राजाराम महाराजांच्या दहनस्थळी चार वर्षांनंतर एक स्मारक उभारण्यात आलं.१७ जून १८७४ रोजी पूर्ण झालेल्या या स्मारकाचं डिझाईन कोल्हापूरात अनेक सुंदर वास्तू उभारणाऱ्या मेजर चार्ल्स मॅंट यांनीच केलेलं आहे.तिथं बसवलेला शुभ्र संगमरवरी पुतळा चार्ल्स फुलेर या शिल्पकाराने घडवलेला आहे. पुतळ्यावर आकर्षक मेघडंबरी आहे.
४०० एकराच्या" Cascine Park " या विस्तीर्ण उद्यानात हे स्मारक उभं आहे.इटालियन , इंग्लिश, हिंदी व पंजाबी भाषांमध्ये लिहिलेला स्मृती फलक आहे.या स्मारकाला "Monumonto all' Indiano " या नावानं ओळखलं जातं. १९७४ साली या स्मारकाला शंभर वर्ष पूर्ण झाली, म्हणून तिथं जवळच एक पूल बांधण्यात आला व त्या पुलाला "इंडियानो ब्रिज" असं नाव देण्यात आलं.
पंचगंगातीरी जन्मलेल्या आपल्या कोल्हापूरच्या एका छत्रपतींवर
तिथं दूरदेशी परक्या भूमीवर ---- नदीकाठी अंत्यसंस्कार व्हावेत हा कोणता दुर्योग ? परक्या भूमीवर अंतिम श्वास घेणाऱ्या छत्रपतींचं एक स्मारक तिथं दूरदेशी इटलीत उभं आहे, म्हणून शीर्षकाच्या विषयात मोडत नसूनही ही माहिती आज दिली आहे.
राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या युरोप दौऱ्यात २४ जुलै १९०२ रोजी आपल्या या पूर्वजाच्या समाधीस्थळाला भेट देऊन पुतळ्याला पुष्पमाळा घालून धूप कापूर लावून पूजा केली होती आणि गरीबांना अन्नदानही केलं होतं.
४ थे छत्रपती शिवाजी महाराज
यांचं अहमदनगर येथील स्मारक
छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांची कहाणी अत्यंत हृदयद्रावक आहे. छत्रपती राजाराम महाराज दुसरे यांच्या निधनानंतर सावर्डे इथल्या नारायण दिनकरराव भोसले यांना ३ डिसेंबर १८७१ रोजी दत्तक घेण्यात आलं आणि त्यांचं नाव शिवाजी असं ठेवण्यात आलं.
१८७६ च्या दुष्काळाच्या काळात दुष्काळग्रस्तांसाठी मानवतावादी कार्य केल्याबद्दल महाराणी व्हिक्टोरिया यांनी त्यांना " नाईट कमांडर ऑफ दि स्टार ऑफ इंडिया " हा किताब दिला होता.नवीन राजवाडा , कोल्हापुरातले रस्ते , रंकाळा तलाव , कामाला आरंभ , टाऊन हॉल सारख्या इमारती त्यांच्या काळात उभ्या राहिल्या. पण इंग्रजांविरुद्ध बंड उभारण्याचा प्रयत्न करत असल्याच्या संशयावरून ब्रिटिशांनी स्टेट कारभारी नेमला.तत्कालिन दरबारी दिवाण व ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांचा अतोनात मानसिक व शारीरिक छळ आरंभला.वेड लागल्याची अफवा उठवून त्यांना अहमदनगर इथं हलवून तुरुंगात डांबण्यात आलं. अंगरक्षक सोल्जर ग्रीन यानं केलेल्या अमानुष मारहाणीत प्लीहा फुटून त्यांचा अकाली मृत्यू ओढवला. तिथंच अहमदनगरात त्यांचे अंतिम संस्कार परशुराम उमाजी भोसले यांच्या कडून उरकून घेण्यात आले. ३० डिसेंबर १८८३ रोजी त्यांच्या अस्थी - रक्षा कोल्हापुरात पाठवण्यात आल्या. इथं त्यांचं विसर्जन पंचगंगा नदीत करण्यात आलं. या शिवाजी महाराज चौथे यांची दहनभूमी रेशिडेन्शियल हायस्कूलसमोर आहे. महाराज छळ प्रकरणी महाराज कोल्हापुरात असतानाच लोकमान्य टिळक व आगरकर यांनी केसरी मध्ये आवाज उठवला होता.त्याबद्दल त्यांच्यावर केस घालून त्या दोघांना डोंगरी तुरुंगात तीन महिने तुरुंगवासही भोगावा लागला होता. (कै. रणजित देसाई यांची या घटनेवर आधारित एक कथा - बहुतेक "मेखमोगरी" या नावाची आहे.)
पुढं छत्रपती शाहू महाराजांनी अहमदनगरला जाऊन त्यांच्या समाधीचं दर्शन घेतलं होतं आणि १९१८ मध्ये श्री छत्रपती चौथे शिवाजी महाराज मराठा बोर्डिंग हाऊस हे वसतिगृह सुरू करण्यात आलं.
कोल्हापुरातील पुतळ्यांविषयी लिहितांना कोल्हापुराबाहेर असणाऱ्या या कोल्हापूरच्या महाराजांच्या स्मारकांविषयी माहिती ओघात सांगावीशी वाटली.
"पुतळे कोल्हापुरातले " या लेखमालेचा समारोप करुन उद्यापासून
"कोल्हापुरातील नामांकित वास्तू - नामांकितांच्या वास्तू " ही नवी लेखमाला सुरू करणार आहे.
१५ जुलै 2023
अनुराधा अनिल तेंडुलकर
कोल्हापूर
९८८१२०४०५०.
No comments:
Post a Comment