नामांकित वास्तू ,
नामांकितांच्या वास्तू
शिवाजी पेठेतील मूळचा "पंत अमात्य बावडेकर वाडा" आज "नरकेवाडा" म्हणून सर्वांना परिचित आहे. पण तो मूळचा हुकुमतपनाह रामचंद्रपंत अमात्य यांच्या वंशजांचा - पंत अमात्य - बावडेकर वाडा होता , हे आजच्या पिढीला ठाऊक नसणं स्वभाविक आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नूषा करवीर संस्थापिका पुण्यशील ताराराणी महाराजांनी चैत्र शुद्ध प्रतिपदा इ.स. १७०७ या दिवशी मंगल प्रभातीच्या सूर्योदयाच्या वेळी कोल्हापूर ही आपली राजधानी जाहीर केली होती. त्यावेळी जुना राजवाडा इथं भूमिपूजन करण्यात आलं होतं.
त्याच शुभ दिवशी रामचंद्रपंत अमात्य यांनी हुजुरांची आज्ञा घेऊन आपल्या स्वतःच्या निवासाची नियोजित जागा ठरवली होती.तिथंही भूमिपूजन पार पडलं.
माधव मोरेश्वर पंडित ( पंडित हे आडनाव कागदोपत्री बावडेकर वापरत.) यांच्या देखरेखीखाली हे बांधकाम पूर्ण झालं होतं. बावडा महालातून सागवान , शिसम , नाणा , वेळू , बांबू या जातीचं लाकूड सामान आणण्यात आलं. रंकाळा खाणीतला जो काळा दगड आणवला , त्याचे मापानुसार दगड घडवण्याचं काम टोप या गावच्या बेलदारांकडे सोपवण्यात आलं. इतर कामांसाठी पिराची वाडी , मानबेट , बोरबेट इथले कुशल व कष्टाळू कारागीर - कामगार बोलावण्यात आले.
या वाड्याची रचना निवासी दालनं , धान्याची कोठी , गाडीखाना , घोड्यांची पागा , दुभत्या पाळीव जनावरांचा गोठा , सदरेवर काम करणाऱ्या कारकून , फडणवीस यांची कामाची ( कचेरीची) जागा , शिलेदार व राऊतांची सोय व व्यवस्था विचारपूर्वक केलेली होती. सोवळेकरी , स्वयंपाकी पाणके , शागीर्द यांचीही व्यवस्था केलेली होती.
छत्रपती शाहू महाराजांच्या काळात या वाड्यात पूर्वी मोठी तालीम ( आखाडा ) होती. महाराष्ट्रातील फिल्म कंपनीच्या काळात बाळासाहेब यादव , बाबुराव पेंढारकर , (दिग्दर्शक माधवराव शिंदे यांचे ज्येष्ठ बंधू दिनकरराव शिंदे. हे दिनकरराव शिंदे १९२० साली इंग्लंडमधल्या ऍंटवर्प इथं झालेल्या ऑलिंपिकला गेलेल्या पहिल्या भारतीय संघात निवडले गेले होते. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या कुस्तीत ते थोडक्यात अपयशी ठरले.) भवानी मंडपातील स्तंभावर दिनकरराव शिंदे यांचंही नाव कोरलेलं आहे. नवी बुधवार पेठ १९२९ मध्ये शिवाजी पेठ झाली. १९३३ मध्ये याच दिनकरराव शिंदे यांनी शिवाजी पेठेतील सर्व चळवळी आणि कार्याचं केंद्र ठरलेल्या "शिवाजी तरुण मंडळा"ची स्थापना १९३३ मध्ये केली या वाड्याजवळ केली होती.पुढं १९६४ मध्ये मंडळाच्या "शिवाजी मंदिर" ची पायाभरणी करण्यात आली , जे श्री शिवाजी मंदिर शिवाजी म्हणजे पेठेची शान आहे. १९१४ नंतर त्याचं नूतनीकरण करण्यात आलं आहे.
साधारण १०० वर्षांपूर्वी वसंत देशपांडे ,मानाजीराव माने , नीळकंठ जमेनीस ही मंडळी व्यायाम आणि कुस्तीचे धडे घ्यायला बावडेकर आखाड्यात येत. इथंच (गुरव गल्लीत रहाणाऱ्या) बलदंड बाळासाहेब यादव यांचं पिळदार शरीर बघून प्रभावित झालेल्या महाराष्ट्र फिल्म कंपनीत काम करणाऱ्या बाबुराव पेंढारकर यांनी त्यांना "सैरंध्री" चित्रपटातील भीमाच्या भूमिकेची ऑफर दिली होती. ("किचकवध" चित्रपटाचा इतिहास आणि सेन्सॉरशिपची सुरुवात याआधी दोन लेखांमध्ये सांगितलेली आहेच.)
१९३४ च्या सुमारास झालेल्या या वाड्याच्या लिलावाच्या वेळी कै. चंद्रोबा गोविंदराव नरके यांच्याबरोबर गुजरीतले काही धनाढ्य सराफही हजर होते.बोली चालू असताना कै.नरके यांनी सरळ जाहीर करुन टाकलं , "कोणी कितीही बोली लावली, तरी माझा त्यावर एक रुपया असेल." अखेर ६५००० /- रुपयांत कै.चंद्रोबा नरके यांनी तो वाडा त्या लिलावाच्या वेळी विकत घेतला.
या नरकेवाड्याला लागून असलेल्या पंत अमात्य बावडेकर आखाड्याच्या जागेचा ताबा मात्र आजही बावडेकर घराण्याकडे यांच्याकडे आहे. मात्र आखाडा मंडळातर्फे चालवला जातो.
आखाड्यालगत एक नृसिंह मंदिर आहे. प्रवेशद्वारापाशी पूर्वी हत्ती जाऊ शकेलशी एक भव्य कमान होती. म्हणजे वैभवशाली दिवसात इथं नक्कीच हत्ती झुलत असले पाहिजेत. वैभवशाली दिवसात इथं एक घोड्यांची पागा सुध्दा होती.
१९७२ साली कोल्हापूर नगरपालिका महानगरपालिका झाली.कै. द्वारकानाथ कपूर हे कोल्हापूरचे पहिले प्रशासक असतांना कोल्हापूर शहरातले रस्ते बनवत असता , तर रस्तारुंदीकरणात जुन्या काळातील ही कमान पाडण्यात आली.
बावडेकर वाड्यात मध्यभागी ६०× ६० एवढा मोठा चौक होता. तिथं एकदा अल्लादियॉ खॉं साहेबांची मैफल झाली होती. अशा महफिली आणि जलसे त्या काळात इथं वारंवार होत असत. कमानी शेजारी सुरक्षेसाठी रखवालदारांची चौकी होती.
काही काळ इथं "चित्रवाणी" नावाचा चित्रिकरण स्टुडिओ होता आणि तिथं चित्रिकरणं होत असत. ४०-५० नारळाची झाडंही पूर्वी तिथं होती.
पूर्वी वाड्यातील चाळसदृश्य दुमजली इमारतीच्या खणांमध्ये काही कुटुंबं भाड्यानं रहायची. ग.दि. माडगुळकर यांची सासुरवाडी या वाड्यात होती.( म्हणजेच कै. विद्याताई माडगूळकर यांचं माहेर. माहेरच्या त्या कु.पद्मा पाटणकर.) त्या तेव्हा सुप्रसिद्ध असणाऱ्या सोळांकूरकर मास्तरांच्या गाण्याच्या क्लासला जात असत. तिथं संगीत रसिकांचा जणू मेळा भरायचा. पु.ल. देशपांडे , वामनराव कुलकर्णी , धोतर - टोपी वेषधारी हुपरीकर नाईक ही मंडळी या वाड्यात वरचेवर येत. बालगंधर्वांच्या कन्या पद्माताई खेडकर व जावई मा.दुर्गादास इथंच रहायचे. पुढं अखेरच्या काळात मात्र त्या दाभोलकर कॉर्नर जवळच्या शास्त्रज्ञ महाडिक ( महादेवराव महाडिक यांचे बंधू ) यांच्या बंगल्याशेजारच्या दुमजली चाळीत राहायला होत्या. ( तिथं बालगंधर्व स्टाईल नऊवारी लुगडं कसं नसायचं हे शिकून घ्यायला मी जायचे.)
आपल्या मुलीला भेटायला बालगंधर्व ,- नाना या वाड्यात नेहमी येत , त्यांचा मुक्काम मात्र वांगी बोळातल्या आपल्या एका रसिकाच्या जमदग्नी सावकार यांच्या घरात असायचा.)
स्वातंत्र्यपूर्व काळात कोल्हापूरातील क्रांतिकारकांच्या गुप्त बैठका या वाड्यात होत असत.जी. डी. लाड , श्याम येडेकर, नागनाथ नायकवडी ही मंडळी इथं चालणाऱ्या गुप्त बैठकांना हजर असत. दलितमित्र बापूसाहेब पाटील येत. बाबुभाई परीखही येत. धुळ्याचा खजिना लुटण्यात सहभागी असलेले स्वातंत्र्य सैनिक धोंडीराम माळीही या बैठकांना हजर असायचे.
संयुक्त महाराष्ट्र समितीचे ( नंतर आमदार झालेले ) त्र्यंबक सीताराम कारखानीस यांच्या भगिनी श्रीमती लीलाताई गोविंद फडणीस यांना वाड्याच्या वरच्या मजल्यावर मुलींची शाळा श्री सरस्वती गर्ल्स हायस्कूल काढण्याची परवानगी कै. नरके यांनी त्या काळात दिलेली होती.
सुप्रसिद्ध हस्ताक्षर संग्राहक श्री राम देशपांडे यांचं कुटुंब १९४९ ते १९७० या वाड्यात रहायला होतं.
त्या काळातील कोल्हापुरातील व्यक्ती , स्थळं आणि घटनांची खडानखडा माहिती वयाची ऐंशी वर्षं ओलांडली तरी त्यांच्या अद्याप स्मरणात आहे.
या घरात येण्याआधी नरके परिवार इतरत्र रहायचा. नंतर ती मंडळी इथं रहायला आली. कै. चंद्रोबा नरके यांचे पुत्र कै. दत्तोबा नरके. ते पदवीधर झाले. तरी शेती व पशुपालन करायचे. त्यांनी कुंभी कासारी साखर कारखाना उभारला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला दिशा देण्यासाठी कुंभी कासारी शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन करुन १९७१ साली डी. सी. नरकेविद्यानिकेतन सुरू केलं. या शाळेत शिक्षण घेतलेले शेकडो विद्यार्थी आज यशस्वी उद्योजक , शेतकरी , व्यावसायिक , शासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
त्यांचे दोन मुलगे कै.शशिकांत व श्री.अरुण.कै. शशिकांत यांच्या दोन मुलांपैकी अजित नरके कुंभी कासारी कारखान्याकडे असतात. तर चंद्रदीप हे राजकारणात कार्यरत आहेत.
सहकाररत्न श्री अरूण नरके क्रीडापटू. छ. शिवाजी पारितोषिक विजेते. कृषी द्विपदवीधर झाले.वडीलांची इच्छा नसतानाही कै. आनंदराव चुयेकर पाटील यांनी अरुण नरके यांना कोल्हापूर जिल्हा दूध संघाकडे घेतलं. अरुण नरके यांनी गोकुळ दूध संघाच्या प्रगतीमधलं त्यांचं कार्य पूर्णतः सहकारी तत्वावर चालवलं. तिथं राजकारणाला कधी थारा दिला नव्हता.
सध्या १८००० चौरस फूट जागेत नरके परिवारातील श्री अरूण नरके , श्री चंद्रदीप नरके , श्री संदीप नरके आदी इथं वास्तव्यास आहेत.) कळंबा इथल्या नरकेंच्या शेतजमीनीवर आता "नरकेवाडी - अमृतधारा" हे कृषी पर्यटन केंद्र सुरु केलं आहे.अरुण नरके यांचे सुपुत्र श्री संदीप नरके यांच्या एका नव्या प्रकल्पाचं काम सुरू आहे.उच्चविद्याविभूषित श्री. चेतन अरुण नरके काही वर्षे परदेशात काम करुन परतल्यावर सहकार व राजकारणात वाटचाल करत आहेत.
भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत क्रांतीकारकांचे कट जिथं शिजले त्या जागेत स्वातंत्र्योत्तर काळात सहकाराच्या कल्पना लढवल्या गेल्या. कितीतरी सहकारी संस्था आणि शैक्षणिक संस्था इथल्या माणसांनी उभ्या केल्या. त्याची प्रचिती गोकुळ सारख्या सहकारी संस्थांची माहिती घेतांना आपल्याला येते. "अरुण नरके फाऊंडेशन" च्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा पूर्ण तयारी ऑनलाईन , ऑफलाईन करुन घेण्यात येते. अभ्यासिकांची सोय आहे. कै.सौ.सुनिता नरके फाऊंडेशन तर्फे व्याख्यानं आयोजित केली जातात. या व्याख्यानासाठी आलेल्या सर्व नामांकित व्याख्यात्यांनी नरकेवाड्याला भेट दिली आहे.काही जणांनी इथं मुक्कामही केला.लेखिका डॉ. विजया वाड , मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख , ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी , लेखिका माधवी घारपुरे , " इडली, ऑर्किड आणि मी" वाले विठ्ठल कामत , अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी , विचारवंत प्रा. राम शेवाळकर , न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, न्यायमूर्ती चपळगावकर, अभिनेत्री लेखिका निशिगंधा वाड, लेखिका प्रतिभाताई रानडे , कवी प्रा. मिलिंद जोशी, कवयित्री डॉ. अरुणा ढेरे, पोलिस कमिशनर अरविंद इनामदार, लेखिका डॉ वीणा देव , होम मिनिस्टरचे भाऊजी व मुंबईच्या सिध्दीविनायक देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री आदेश बांदेकर, डॉ. कर्वे , पोलिस कमिशनर श्री विश्वास नांगरे पाटील, लेखक श्री इंद्रजित देशमुख , सूत्रसंचालिका आणि लेखिका मंगला खाडिलकर , मुख्यमंत्री विलासराव देशमुख , श्री अमित विलासराव देशमुख , मंत्री श्री रणजितसिंह मोहिते पाटील, सध्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार, मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी मंत्री जयंतराव पाटील , दुसरे रायगडचे आमदार श्री जयंत पाटील, सामनाचे संपादक श्री संजय राऊत , ऍड.उज्ज्वल निकम, स्वातंत्र्य सैनिक नागनाथ नायकवडी, ना.भ. निकम , आमदार पी. बी. साळुंखे, मागच्या पिढीतील आमदार कै. त्र्यं. सि.कारखानीस, महाराष्ट्र राज्य सचिव व साहित्यिक नीला सत्यनारायण , कोल्हापुरातील शास्त्रज्ञ आर्.व्ही. भोसले अशी राजकारण , सहकार , कला , साहित्य , संगीत , संशोधन क्षेत्रातील
ख्यातनाम मंडळी या वाड्यात येऊन गेली , ती अरुण नरके यांच्या रसिकतेला दाद द्यायला.
दिवंगत पतीचा स्मृतीदिनी कार्यक्रम आयोजित नेहमीच केले जातात. पण दिवंगत पत्नीच्या स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करून तिची आठवण जागवणारे फक्त दोन पुरुष मी कोल्हापूरात पाहिले. पहिले सौ. मंगल पोटेंच्या स्मृतीदिनानिमित्त मंगल पुरस्कार प्रदान करणारे श्री सुधीर पोटे व दुसरे श्री अरुण नरके.
ही संवेदनशीलता आपल्याकडं तशी दुर्मिळच. श्री राजा अरुण नरके यांनी केलेला देशविदेशातील पेनं व की चेन्सचा (चाव्या अडकवण्याची गोलाकार कडी) संग्रह देखील बघण्याचा योग एकदा आला होता. एक दिलदार मित्र , साहित्य - कलांचा दर्दी आस्वादक म्हणून गेली पन्नास वर्षे मी अरुण नरके यांना पहात आलेय.गरजवंताच्या पाठीशी उभं रहाणं , अडल्या नडलेल्यांना ( या हाताचं त्या हाताला कळू न देता ) मदत करणं , मित्रपरिवाराला न मागता स्वतःहून सर्व प्रकारचं सहाय्य करणं असे त्यांचे पैलू अगदी आतल्या वर्तुळाशिवाय कुणाला समजणार सुध्दा नाहीत.अगदी अलिकडे झालेल्या क्रीडापटूंच्या एका सत्कार प्रसंगी जानकी मोकाशी या दिव्यांग नेमबाज खेळाडूला एअर पिस्टलसाठी तिथल्या तिथं एक लाखाची मदत त्यांनी केलेली मी पाहिली आहे. नेमबाज तेजस्विनी सावंतला गरज होती तेव्हा नरके यांनी रायफल दिली होती. ग्रामीण भागातील गरीब घरातील टॅलेंट वाया जावू नये म्हणून मदत करताना कधीच श्री नरके मागं पुढं बघत नाहीत. डी. सी.नरके पब्लिक स्कूल, गोकुळ , युथ बॅंक , नरके फाऊंडेशन आदी संस्थांच्या माध्यमातून
शेती आणि सहकार , शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातील कार्याला इथून सुरुवात झाली.
वाड्याच्या मूळ स्वरुपाची पूर्ण कल्पना काळानुसार केलेल्या अंतरंग व बाह्य बदल आणि कालमानानुसार झालेल्या पडझडीमुळे आपल्याला फारशी येऊ शकत नाही. त्यामुळे पूर्वीच्या इतिहासकालीन वैभवाची आपण फक्त कल्पनाच करायची. पण इथं घडलेल्या अनेकानेक ज्ञात अज्ञात घडामोडींमुळे गजांतलक्ष्मी ना नांदलेल्या या वास्तूचं कोल्हापूर शहरा असलेलं महत्त्व करवीर संस्थान स्थापनेपासून आजतागायत कायम राहिलेलं आहे.
ऋणनिर्देश -
श्री संदीप नरके
श्री अरूण नरकेलिखित "गोकुळ गाथा"
श्री राम देशपांडे ( हस्ताक्षर संग्राहक) - पूर्वी या वाड्यात राहिलेले एक भाडेकरु.
श्री उमेश जामसांडेकर-
गुजरी (यांनी बावडा दप्तरातील
संदर्भ पुरवले.)
श्री रविंद्र उबेरॉय.
२५ जुलै २०२३
अनुराधा अनिल तेंडुलकर
कोल्हापूर
९८८१२०४०५०.
No comments:
Post a Comment