नामांकित वास्तू
नामांकितांच्या वास्तू
कर्नल ( निवृत्त) विजयसिंह गायकवाड यांचा हा वाडा. ( डायमंड हॉस्पिटल व महावीर कॉलेजजवळ ) मसुद माले गावची ही गायकवाड मंडळी. तिथं त्यांची शेती व वाडा आहे.श्री. विजयसिंह गायकवाड यांचे आजोबा मल्हारराव दत्ताजीराव गायकवाड ( जन्म १८६१ ) करवीर संस्थानच्या "लाल रिसाला" मध्ये होते. त्यांचे वडील ( विजयसिंह गायकवाड यांचे पणजोबा) सरदार असून त्यांना " विश्वासराव " व "सरकवास" या मानाच्या पदव्या होत्या.
मल्हारराव गायकवाड यांनी १२५ वर्षांपूर्वी हा वाडा बांधला.इथली मूळ जमीन साडेसात एकर होती.( पुढं तिथं प्लॉटस् पाडले गेले.) या वाड्याचा बिल्टअप एरिया ११००० चौरस फूट आहे. सगळं बांधकाम घडीव दगड व माती चुन्याचं , एकदम पक्कं आणि मजबूत. १८-२० फूट उंचीचं सीलिंग आहे. भिंती रुंद . खिळा ( मोळा ) ठोकता येत नाही असं.
या दुमजली वाड्याला दोन्ही बाजूंना उंच टॉवर्स आहेत. टॉवर्सवर विद्युत रोधक ( lightning condoctors) बसवलेले आहेत.
तळमजल्यावर मोठं दिवाणखान्याचं दालन व चार खोल्या. गच्चीवरुन बुरुजांवर ( टॉवरकडे ) जाण्याचा जिना आहे. सर्व ठिकाणी शोभिवंत हंड्या व झुंबरं टांगलेली.पूर्वी जमीन होती. नंतर फरशी घालण्यात आली.
पूर्वीची निरनिराळी शस्त्रं, कपाटं , फडताळं , मेजं , मोठे हंडे , घंगाळं , तसबिरी व शोभेच्या अनेक वस्तू , कर्नल साहेबांना वेळोवेळी मिळालेली पदकं या वाड्यात एका कपाटात ठेवलेली आहेत.
सर्व टेबलं , तिपाया , मूर्ती, लाकडी शिसवी सामान नुकतंच तेलपाणी केल्यासारखं चकचकीत आणि लख्खं.
वरच्या मजल्यावर ही गायकवाड मंडळी रहातात. वर १३-१४ दालनं ( खोल्या) आहेत. मागच्या बाजूला घोड्यांची पागा व गोठा. पू्र्वी तिथं गाई म्हशी व घोडे असायचे. ४ पहारेकरी व ३ पागेदार असत. स्वयंपाकघरं हुजुरांचं व इतर सर्व सेवकांचं अशी दोन निरनिराळी होती.
सुरूवातीच्या काळात सगळ्या मोकळ्या जागेत शेती करत असत.भात , घरी लागणारी भाजी व इतर पिकं घेत असत.
मोठ्या दिवाणखान्यात फक्त खुर्च्या कोच अशी बैठक व्यवस्था आणि इतर भागात पोम्या ( पोमी- जरा पातळसर रुई भरलेली गादी.) लोड , तक्के अशी भारतीय बैठक असायची.
संस्थानी काळात सरदार मंडळींचं राहणीमान कसं असेल याची कल्पना देणारी सारी सजावट.
दरबारी सरदार असल्याने दसऱ्या दिवशीच्या सीमोल्लंघनाला दरबारी पोषाख चढवून दसरा चौकातील शाही दसरा सोहळ्याला उपस्थित रहाण्याची घराण्याची परंपरा आजही सांभाळली जाते.
दसरा व दिवाळी सण उत्साहात आणि वाड्याच्या इतमामानुसार साजरे केले जायचे तसेच आजही केले जातात.
५ दिवसांचा गणपती व गौरी बसवले जातात. पूर्वी किंक्राती दिवशी शिकारीला जाण्याची प्रथा पाळली जात असे. विजयसिंह यांचे पिताजी तरबेज शिकारी होते. घोड्यावरून भाल्याने शिकार करण्यात अत्यंत कमी पारंगत. प्रिन्स शिवाजी यांच्या अखेरच्या दुर्दैवी अपघातावेळी त्या शिकारमोहिमेत ते सहभागी होते. विजयसिंह यांच्या मातोश्री महागावकर ( साईक्स एक्स्टेंशन) यांच्या कन्या. १० जून १९६२ रोजी जन्मलेल्या
कर्नल( निवृत्त) गायकवाड यांचं शिक्षण कोल्हापूर व पाचगणी इथं झालं. एन.डी.ए. मध्ये प्रशिक्षण घेऊन पुढं ते भारतीय सेनेत रुजू झाले. ठिकठिकाणी सेवा देत कर्नल पदावरून निवृत्त झाले.
या घरात कितीतरी नवलाईच्या वस्तू पहायला मिळाल्या. पूर्वीची शस्त्रं - तलवारी - भाले - बर्ची , चिलखत, बंदुका, माणुस बसेलशा आकाराची पितळी परात , घंगाळं , मोठं थोरलं गंजासारखं कडीचं पातेलं , नक्षीदार कडीचे डबे , पितळी कुकर , समया , तबकं, ब्रिटिश कालीन काचसामान , लाकडी ड्रेसिंग टेबल, बांगड्या ठेवण्याचं कपाट , कटलरी ठेवण्याची शोकेस , एक अगदी जुन्या काळचा पिटारा , सावंतवाडीच्या चितार आळीत मिळणारा वैशिष्ट्यपूर्ण गंजिफाचा पट व सुंदर रंगीत डब्यात ठेवलेल्या सोंगट्या , तंजावरचं- दोन्ही दारं सुध्दा तंजावर चित्रानं रंगवलेलं कपाट आणि आतमध्ये तंजावर पेंटिंग, घोड्यावर स्वार खंडोबा - बानुबाईचं पेंटिंग , एक पेंटिंग पट्टणकोडोलीच्या सुप्रसिद्ध लढाईचंही आहे. पूर्वजांची पोर्ट्रेटस् , पुतळे इ.इ. एक की दोन ! अलिबाबाच्या गुहेत शिरल्यागत अवस्था झाली होती माझी अगदी.
एवढा सुंदर वाडा आणि जतन केलेल्या सुंदर सजावटीच्या वस्तू असल्यानं फिल्म इंडस्ट्रीचं लक्ष या वाड्याकडे गेलं नसतं तरच नवल. "नटसम्राट", "आम्ही दोघी" , "मी इथे तू तिथे"
, "करुणा शिवशंकर" इ. चित्रपटांचं आणि दूरदर्शन मालिका "जमुना " चं चित्रिकरण या वाड्यात झालं होतं.
काळानुरूप अतिशय कमीत कमी वा फक्त अत्यावश्यक तेवढ्याच सुधारणा वा बदल या वाड्यात केले गेले आहेत. त्यामुळे वाड्याची पूर्वीची नजाकत आणि भव्यतेचा स्पष्ट अंदाज येऊ शकतो. साफसफाई आणि देखभालीचं काम मात्र तसंच आणि तेवढंच करावं लागतं.उंचावरचं छत स्वच्छ करणं , लाकडी सामानावर यत्किंचितही धूळ बसू न देणं यासाठी अनेक माणसं सतत कामात जुंपलेली असतात. त्यांच्यावर देखरेख ठेवण्याचं काम कर्नल विजयसिंह यांच्या कन्या पद्मिनीदेवी करत असतात.
बाहेरचं मोठं लॉनही निगा राखून छान टवटवीत व हिरवीगार राखलं जातं.ठिकठिकाणी इनडोअर प्लान्टस् च्या कुंड्या मांडलेल्या आहेत.
देशविदेशात पर्यटन करत असतांना या वाड्याच्या शैलीशी अनुरुप ठरतील अशा शोभेच्या सुंदर वस्तूंची वाड्यात सतत नव्यानं भर पडत रहाते. सारं कुटुंबबराच काळ लष्करी वातावरणात वावरल्यानं या सर्व कामाला एक वेगळीच शिस्त आणि नियोजन लाभलेलं स्पष्ट जाणवतं.
पूर्वजांचा वारसा एवढ्या कसोशीनं आणि कसोशीनं जपणाऱ्या विजयसिंह गायकवाड परिवाराचं खरोखरच कौतुक करायला हवं.आणि कोल्हापूर शहरातील अशा देखण्या वास्तूंचं जतनही.
ऋणनिर्देश -
कर्नल ( निवृत्त) विजयसिंह गायकवाड व परिवार.
१७ ऑगस्ट २०२३
अनुराधा अनिल तेंडुलकर
कोल्हापूर
९८८१२०४०५०.
No comments:
Post a Comment