विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 17 August 2023

शहीद शिंदे नेसरीकर यांचा बंगला.

 

नामांकित वास्तू
नामांकितांच्या वास्तू













शहीद शिंदे नेसरीकर यांचा बंगला.
शहीद सत्यजित शिंदे नेसरीकर पथ.साईक्स एक्स्टेंशन.
"जो शहीद हुए हैं उनकी
जरा याद करो कुर्बानी"
आजच्या स्वातंत्र्यदिनी आपल्या कोल्हापूरच्या एका शहीदानं दिलेल्या कुर्बानीची याद उजागर करण्यासाठी आज या वास्तूविषयी लिहायला घेतलं आहे.
परीख पुलाखालून साईक्स एक्स्टेंशन कडे जाणाऱ्या रस्त्यावर हॉटेल रणजीत आहे ना , त्याच्या मागल्या बाजूला श्री अजितसिंह शिंदे यांचा हा बंगला आहे.
हे शिंदे मूळचे कर्नाटकातील शिंद्यान्मनोळी गावचे. तिथून ते तोरगलला व पुढं नेसरीला आले. या गोष्टी ६०० वर्षांपूर्वीच्या. कारण नेसरीचा यांचा वाडा ६००+ वर्षांचा आहे.
वाडा कसला गढीच म्हणायला हरकत नाही. अहो ६-६ फूट रुंदीच्या भिंती आहेत त्या वाड्याच्या.
( पुढं कधीतरी लिहूया त्या वाड्याबद्दल.)
९० वर्षांपूर्वी निकम या जागा मालकांकडून नेसरीकर यांनी इथली ही १० गुंठे जागा व त्यावरचं घर खरेदी केलं होतं. शेजारी असणाऱ्या नवल व्हिला मध्ये एक ख्रिस्ती डॉक्टर रहायच्या. जवळ पवार (यांची जुळी मुलं सुध्दा सेव्हन्थ डे शाळेत शिकत माझ्या कन्येच्या वर्गात .) , हिअरिंग एडस् वाले नागपूरकर यांची घरं. आता तिथं साधासा दुमजली बंगला आहे. बंगल्याच्या वरच्या मजल्यावर एका दालनात शहीद पुत्राचा लष्करी गणवेश , त्यानं कमावलेली पदकं , चषक , अर्धपुतळा , लष्करातर्फे अंतिम यात्रेच्या वेळी पार्थिवावर घातलेला व अग्निसंस्कार करण्यापूर्वी काढून घडी केलेला तिरंगा ध्वज , बाळपणापासूनच्या फोटोंचे केलेले कोलाज् इत्यादी "सर्व काही सत्यजित " आहे
काळानुरूप बदल करत आवारात नवी बांधकामं - हॉटेल रणजीत वगैरे उभी राहिली आहेत. इथं महत्वाचा आहे तो तिथं जन्मलेला , घडलेला , धडपडलेला, उठलेला , सावरलेला, मानवतेचे आणि देशभक्तीचे संस्कार घेऊन देशासाठी अमर झालेला योध्दा-
शहीद मेजर सत्यजित अजितसिंह शिंदे - नेसरीकर.
छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात सत्यजित यांचे आजोबा
सुलतानराव उर्फ भय्यासाहेब इथं प्रथम दर्जाचे सरदार होते. वयाच्या ११ व्या वर्षीच महाराजांनी त्यांना कोल्हापुरात आणलं होतं.
नेसरीकर शिंदे घराणं लढवय्यांचं. कोल्हापूर छत्रपती संभाजी महाराज यांना नेसरीकर शिंद्यांनी लढाईत साथ दिली होती. १८१९ साली नेसरीकर शिंद्यांपैकी एक वीर जतच्या लढाईत धारातीर्थी पडले होते. पुढच्या काळात आझाद हिंद सेनेचे मेजर जनरल जगन्नाथराव भोसले यांनी पराक्रम गाजवला होता, ते भोसले हे दौलतराव शिंदे यांचे मामा होते. तर अशा एकेका शूर नातेवाईकांची सत्यजित यांच्या सभोवताली मांदियाळी.
१९ डिसेंबर १९८९ रोजी जन्मलेले सत्यजित बाळपणापासूनच धाडसी , जिद्दी आणि खिलाडू वृत्तीचे. घरी खानदानी वातावरण. नित्य सूर्योपासना, गायत्री मंत्र पठण असे उत्तम संस्कार त्यांच्यावर झालेले. शिवरायांचा इतिहास वाचण्याची, समजून घेण्याची आवड. ( बंधू व्यंकोजी यांचा बारावीत शिकणारा मुलगा कुमार शिवजीतसुध्दा मी भेटीला येणार म्हणून शिंदेंच्या इतिहासाचा अभ्यास करुन सज्ज होऊन बसलेले.) घरातली शिकवण मोठ्यांना मान देण्याची , नम्रपणा ची. जवळच्या सेव्हन्थ डे ऍडव्हॅन्टीस्ट स्कूलमध्ये व छत्रपती शाहू विद्यालयात त्यांचं शालेय शिक्षण झालं. वाचनाची प्रचंड आवड आणि ट्रेकिंगचं वेड. उत्तम गोलंदाज असलेल्या , प्रखर बुद्धिमत्ता लाभलेल्या सत्यजित यांनी अनेक प्रश्नमंजुषा स्पर्धांमध्ये यश मिळवलं होतं. सैन्यदलात गेल्यावर तिथंही ४० किलो वजन पाठीवर घेऊन पळण्याच्या स्पर्धेत सत्यजित यांनी आपल्या बटालियनला तब्बल ३८ वर्षांनंतर विजेतेपद मिळवून दिलं होतं.
सहा फूट चार इंच उंचीच्या ७६ किलो वजनाच्या , सडपातळ बांधा असलेल्या सत्यजित यांच्या उमद्या राजबिंड्या व्यक्तिमत्त्वाची मोहिनी पडून सारे त्यांच्याशी मैत्री करायला उत्सुक असत.दोस्ती करतांना त्यांनी कधी गरीबी श्रीमंती , खानदान , जातीपातीचा विचार केला नाही. डी. डी. शिंदे कॉलेजमधले मित्र त्यांना "झंप्या" म्हणत. कुणी परिसरातले कुणी शम्मू , सम्या म्हणत. शिवाजी विद्यापीठाच्या युवा महोत्सवात ४० + संघामधून चषक पटकावण्याचा पराक्रम त्यांनी केला होता.
सेनेत जाण्याचं स्वप्न त्यांनी लहानपणापासूनच बघितलेलं. स्वतःच्या कुटुंबात नसले तरी नातेवाईकांपैकी बरेच जण सैन्यात.मेजर जनरल भोसले , वडिलांचे मामेभाऊ. कर्नल विजयसिंह गायकवाड,
कै.कॅप्टन दिपक नेसरीकर, ( बाबा नेसरीकर यांचे सुपुत्र), कर्नल थोपटे (आतेभाऊ) , मेजर दौलतराव घोरपडे - दत्तवाडकर ( मावसभाऊ) अशांची उदाहरणं डोळ्यासमोर होती.जवळच "मराठा हाऊस " मध्ये रहाणाऱ्या कर्नल शिवाजी थोरात सरांचं मार्गदर्शन त्यांनी घेतलं होतं.
जून २००० मध्ये त्यांची I M A डेहराडून साठी निवड झाली. पासिंग आऊट सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी घरची मंडळी गेली होते.इंडियन मिलिटरी ऍकॅडमी मधून ८ डिसेंबर २००१ रोजी कमिशन प्राप्त करुन मेजर या पदावर रुजू होणारे ते देशातील सर्वात लहान वयाचे मेजर होते.
लेफ्टनंट सत्यजित यांची पहिली नेमणूक २००१ मध्ये बंगालच्या सिलिगुडी इथं झाली. पुढची नेमणूक राजस्थानात ( ऑपरेशन पराक्रम) आणि अखेरची नेमणूक जम्मू काश्मीर सीमेवर "ऑपरेशन रक्षक" साठी झाली, ती अखेरचीच ठरली.
" वीर सैनिकाची अखेरची मोहिम "
जम्मू काश्मीर मधल्या राजौरी या अतिसंवेदनशील जिल्ह्यात इन्फन्ट्री बटालियन कार्यरत होती."घातक प्लाटून" या तुकडीचं नेतृत्व करत होते मेजर सत्यजित शिंदे. कालाकोट सेक्टर मधल्या कलालार गावात मोहम्मद गनी याच्या घरात दहशतवादी दडून बसलेले असल्याची खात्रीलायक खबर मिळाली आणि मेजर शिंदे यांनी गावात झडती घ्यायला सुरुवात केली. टेकडीवर पळून जाऊ पहाणाऱ्या दहशतवाद्यांचा पाठलाग आपल्या सहा सहकाऱ्यांसह मेजर शिंदे करु लागले. दोन्ही बाजूंनी बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव सुरू होता. काही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात त्यांना यश आलं.पण शत्रूनं झाडलेल्या गोळ्यांपैकी एक गोळी मेजर शिंदे यांच्या मस्तकात घुसली आणि भारतमाता आपल्या एका सुपुत्राला गमावून बसली.
अवघ्या २१ व्या वर्षी सैन्यात दाखल झालेल्या या तरुण शूरवीराची मेजर सत्यजित यांची तेजस्वी कारकीर्द अवघी ५ वर्षात संपुष्टात आली. देशासाठी लढता लढता २० मे रोजी सत्यजित यांनी रणभूमीवर देह ठेवला.
२२ मे २००५ रोजी त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी कोल्हापुरकरांनी केवढी गर्दी केली होती , त्याची मी साक्षीदार आहे. आई वडील , नातेवाईक यांच्या दुःखाला पारावार उरला नव्हता. आशुतोष शिरोडकर , गणेश , सचिन , सिध्दार्थ , हिमानी अशा मित्रांनी जणू शरीराचा एक अवयवच गमावला होता.आपल्या विनोदी स्वभावानं , मिस्किल बोलण्यानं , टोपण नावांनी हाक मारण्याच्या पध्दतीनं , सकारात्मक विचारांनी त्यांनी सर्वांच्या हृदयात मिळवलेलं स्थान कायम आहे.
१५ जानेवारी २००८ रोजी त्यांना मरणोत्तर देण्यात आलेलं "बलिदान पदक" त्यांच्या मातापित्यांनी मोठ्या धीरोदात्तपणानं व अभिमानानं स्वीकारलं.
नेसरी ग्रामस्थांतर्फे त्यांना " नेसरी भूषण पुरस्कार देण्यात आला. युध्द कौशल्यासाठी सैन्यात दिल्या जाणाऱ्या युध्द कला ट्रॉफीला त्यांचं नाव देण्यात आलं आहे.
सेनांतर्गत क्रीडा स्पर्धा यशस्वी संघाला सत्यजित यांच्या नावाची "शहीद मेजर सत्यजित शिंदे ट्रॉफी" दिली जाते.
त्यांच्या कॉलेजचे प्राचार्य डॉ.आबासाहेब शिंदे यांचं सत्यजित यांना भारतीय सेनाप्रमुख झालेलं बघण्याचं स्वप्न मात्र अधूरंच राहीलं. ज्यांच्या घरचं सगळं व्यवस्थित आहे , त्यांनी सैन्यात जरूर जावं असं सत्यजित यांना वाटे.
सत्यजित यांचे बंधू व्यंकोजीराव इंजिनियर उद्योजक आहेत. मोठ्या विवाहित भगिनी आर्किटेक्ट आहेत. मेजर सत्यजित यांच्या स्मृत्यर्थ कुटुंबाकडून गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या (इंजिनियरिंग सारखं) आवडीचं शिक्षण घेण्यासाठी अर्थसहाय्य केलं जातं. नेसरी गावच्या ग्रंथालयाला दरवर्षी पुस्तकं भेट देण्यात येतात.कोल्हापुरातील मूर्तीकार संजीव संकपाळ यांनी बनवलेला अर्धपुतळा नेसरी गावी बसवण्यात आला आहे.शहीद मेजर सत्यजित शिंदे स्मारक समितीतर्फे दरवर्षी २० मे या स्मृतिदिनानिमित्त निरनिराळ्या स्पर्धा , रक्तदान शिबीर , आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येतं.
प्रत्येक वर्षी पाच गरीब होतकरू विद्यार्थ्यांची निवड करुन त्यांचा शैक्षणिक खर्च उचलला जातो.
सैन्यात जाऊन पराक्रम गाजवण्याची स्वप्न बघणाऱ्या आपल्या मुलाच्या मार्गात आडकाठी न आणणारी , शहीद पुत्राची माता म्हणून स्वतःला धन्य मानणारी त्याची माऊली सौ. संयोगिता देवी शिंदे ( नेसरीकर) खरोखरच धन्य आहेत. शिवाजी जन्माला यावा पण तो शेजाऱ्यांच्या घरात. आपल्या पोटची मुलं आपल्या छत्रछायेखाली सुरक्षित रहावीत असा आपल्यापुरता संकुचित विचार अशा माऊली करत नाहीत म्हणूनच आपण आपल्या घरी सुरक्षित झोपू शकतो याचा विसर आपण कधी पडू देता कामा नये.
१४ मराठा लाईट इन्फन्ट्रीकडून आलेल्या पत्राचा अनुवाद
१) मेजर सत्यजित अजितसिंह शिंदे आय. सी.६१४०७ एक्स यांना इंडियन मिलिटरी ऍकॅडमी या मान्यवर संस्थेतून ८ डिसेंबर २००१ रोजी कमिशन मिळाले.
२) श्री अजितसिंह शिंदे व सौ. संयोगिता शिंदे या लढवय्या मराठा घराण्यात १९ डिसेंबर १९७९ रोजी सत्यजित अजितसिंह शिंदे यांचा जन्म झाला. लहानपणापासून गडद हिरव्या रंगाचा लष्करी गणवेश धारण करून मातृभूमीची सेवा करण्याचे त्यांचे स्वप्न ८ डिसेंबर २००१ रोजी प्रत्यक्षात आले. या दिवशी त्यांनी इंडियन मिलिटरी ऍकॅडमी , डेहराडून येथील तेजस्वी ‌चेटवूड ड्रिल चौकातून लष्करी जीवनात पदार्पण केले.
३) लष्करी सेवेच्या पहिल्या दिवसापासून मेजर सत्यजित अजितसिंह शिंदे यांच्या व्यक्तिमत्त्वात लष्करी अधिकाऱ्यास आवश्यक असे नेतृत्व गुण प्रकर्षाने व्यक्त होत होते. धैर्य आणि हृदयाची विशालता दर्शवणारी करुणा अशा अनेक उत्तम गुणांचे प्रतिक म्हणजे मेजर सत्यजित अजितसिंह शिंदे! कोणत्याही कार्यात उत्कृष्टतेचे शिखर गाठण्यासाठी अविश्रांत मेहनत घेण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे नेतृत्वाची धुरा वाहताना त्यांचा वेगळा ठसा उमटत असे.अतुलनीय धैर्य , अचूक अंदाज आणि धाडस स्वीकारण्याची निर्णयक्षमता तसेच विचारशक्तीची एकाग्रता या गुणांमुळे त्यांच्या अधिकारातील जवानांना इतके उत्तम प्रोत्साहन मिळे की अत्यंत कठीण उद्दिष्टे सहजगत्या आणि अत्युत्तम रीतीने साध्य होत.
४) साध्यासुध्या आणि विशाल दिलाचे मेजर सत्यजित अजितसिंह शिंदे यांच्या वैयक्तिक गरजा अत्यल्प होत्या.त्यांच्या जीवनाचा प्रत्येक क्षण रेजिमेंटची "कर्तव्य , सन्मान आणि धैर्य " ही उद्दिष्टे पालन करण्यात व्यतीत झाला.युध्द परिस्थितीत आणि शांततेच्या काळातही लष्कराची वैभवशाली परंपरा आणि रितीरिवाज जोपासताना ते सर्वोत्तम अधिकारी म्हणून उठून दिसत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असलेली कर्तव्यनिष्ठा आणि ठाम निश्चय या गुणांमुळे प्रत्येक अशक्य कोटीतील मोहीम अत्यंत सहजतेने यशस्वी झाली. जीवनाविषयी उत्कट निष्ठा आणि आनंदाची पखरण करणारे यामुळे कोणत्याही आव्हानात्मक परिस्थितीला ते सामोरे जात. म्हणूनच मेजर सत्यजित अजितसिंह शिंदे यांची प्रत्येक कृती म्हणजे मूर्तिमंत आव्हान असे. कर्तव्य असो अथवा आपत्ती मेजर सत्यजित अजितसिंह शिंदे यांचे एक पाऊल नेहमीच पुढं असे.
५) धनु रास धारण करणारे मेजर सत्यजित अजितसिंह शिंदे हे वीर योद्धा जीवनातील खडतर प्रसंगांचा सामना करण्यास सदैव सज्ज असत. म्हणूनच दहशतवादी हल्ल्यात गोळ्यांचा वर्षाव होत असताना आपल्या कर्तव्यापासून एक क्षणभरही ते विचलीत झाले नाहीत.त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर " माझ्यासारख्या धनू राशीच्या व्यक्तीला कठीण आव्हाने न्याहारीसारखी भासतात."
जीवनाच्या शेवटच्या घटकेपर्यंत मेजर सत्यजित अजितसिंह शिंदे प्रत्येक क्षण " मूर्तिमंत वीर मराठा योध्दा " या रुपातच जगले.
आजच्या स्वातंत्र्य दिनी शहीद मेजर सत्यजित अजितसिंह शिंदे यांना शत शत प्रणाम!
संदर्भ : मेजर सत्यजित शिंदे
चरित्र व आठवणी
संपादक - शशिकला पाटील.
ऋणनिर्देश -
कुमार शिवजीत शिंदे नेसरीकर
श्रीव्यंकोजी शिंदे नेसरीकर
सौ. संयोगिता देवी शिंदे नेसरीकर
श्री अजितसिंह शिंदे नेसरीकर.
१५ ऑगस्ट २०२३
अनुराधा अनिल तेंडुलकर
कोल्हापूर
९८८१२०४०५०

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...