थोरल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्यात पाऊल ठेवलं तेव्हा पुणं उजाड होतं. आदिलशाही सरदारांच्या धामधुमीमुळे गावचा गणपती देखील ठकारांच्या वाड्यात एका कोनाड्यात होता. पुढे जिजाऊसाहेबांनी पुण्याचं रुपडं पालटलं तेव्हा ठकारांच्या या गणपतीची विधिवत कसब्यात स्थापना केली. पुण्यात इतर गणपतीची मंदिरं, घुमट्या नसतीलच असं नाही. कदाचित कागदपत्रांअभावी ठोसपणे नाही सांगता येणार. पण कसबा गणपती मात्र जिजाऊसाहेबांनी पुन्हा उत्साहाने बसवल्याच्या नोंदी धडफळ्यांच्या यादीत आहेत. हेच पुढे ग्रामदैवत झालं. खुद्द थोरल्या शिवछत्रपती महाराजांनी दि. १९ मार्च १६४७ रोजी कसब्याच्या या 'मोरया'ला दररोज अर्धा शेर तेल नंदादीपासाठी लावून दिल्याचं पत्रं ठकारांच्याच संग्रहात उपलब्ध झालं आहे. महाराजांच्या काळात पुण्यावर अनेक आक्रमणं झाली, पण कसब्याचं देवस्थान मात्र शाबूत राहिलं. औरंगजेब दक्षिणेत उतरला तेव्हाच्या धामधुमीत मोठा उत्सव इथे करणं अशक्यच होतं. पण शाहूछत्रपती महाराज सिंहासनाधिश्वर झाल्यानंतर पुण्यभवताली पुन्हा शांतता नांदू लागली. बाळाजी विश्वनाथ हे सुरुवातीला पुण्याचे सरसुभेदार असले तरी त्यांचं राहणं सुपे-सासवडातच होतं. पुढे इ.स. १७२५ मध्ये शाहू महाराजांनी बाजीरावांना पुणं जहागीर म्हणून बहाल केलं, आणि पुणं हे पेशव्यांचं घर बनलं. शनिवारवाड्यात राहायला येण्यापूर्वी पेशवे घराण्याचा मुक्काम काही वर्ष पुण्याचे हवालदार धडफळे यांच्या वाड्यात होता.
बाजीरावांसारखा पराक्रमी, त्यातूनही खुद्द शाहू महाराजांचा पंतप्रधान राहू लागल्याने पुण्याला बाळसं येऊ लागलं. त्यातून, पेशवे घराण्यात गणेशभक्ती ही आधीपासूनच दिसत असल्याने गणेशोत्सव थाटामाटात साजरा झाला नसल्यासच नवल. खुद्द बाजीराव आणि चिमाजीअप्पा हे शिवभक्त होते, पण गणपती देखील शेवटी शिवपुत्रच ना. शनिवारवाड्यात मुख्य दरबाराची जी जागा होती त्या महालाचं नावाचं "गणेश महाल", "गणपती रंगमहाल" असं आढळतं. पण अर्थात, हा गणेश रंगमहाल बाजीरावांच्या काळात नव्हता. मुळात, आज जो शनिवारवाडा दिसतो आहे तोच बाजीराव गेल्यानंतर जवळपास दहा-पंधरा वर्षांनी बांधलेला आहे. बाजीरावांनी जो वाडा बांधला तो याहून खूप लहान होता. तो नेमका कोणता होता हे सांगणं आज कठीण असलं, तरीही आजचं बाजीराव पेशव्यांच्या वाड्याचं जोतं, मस्तानी महालाची जागा, मागची चिमणबाग, होमशाळा, आणि पहिल्या चौकाचा काही भाग एवढाच मर्यादित असावा. याशिवाय नोकर-चाकरांना राहण्यासाठी काही जागा आणि अन्नग्रह इत्यादी. वाड्याभवताली कच्चं कुसू होतं. पुढे नानासाहेब पेशव्यांनी १७५०-५५ दरम्यान वाड्याला भव्यता बहाल केली, ज्यात अनेक इमारती, तटबंदी आणि गणपती रंगमहाल सुद्धा बांधला गेला. बाजीरावांच्या काळात गणेशोत्सव नेमका कुठे होत असेल यासंबंधी अधिक माहिती मिळाल्यास ते औत्सुक्याचं ठरेल. नानासाहेबांनी शनिवारवाड्याच्या आग्नेय तटात, कसब्याच्या समोरच एक भक्कम दरवाजा बांधला, ज्याच्या बाहेर गणेशाचं लहानसं पण सुंदर मंदिर होतं, आजही आहे! पूर्वी दिल्ली दरवाजातून जाण्यायेण्यासाठी प्रत्येकाला परवानगी नसे. वाड्याचा सारा राबता इतर चार दरवाजांमधून होत असे. त्यातही, गणेश दरवाजा हा मुख्य होता, जिथून प्रवेशताना आपोआप गणेशाचं दर्शन होईल अशी व्यवस्था नानासाहेबांनी केली होती.
गणपतीचं सगळ्यात जास्त कोडकौतुक आणि उत्सव कोणी केला असेल तर तो नानासाहेब पेशव्यांनी. शहर पुणे वसवण्यासोबतच त्यांनी गणपती ही आराध्य देवता आणखी उत्साहाने पुजली. इ.स. १७५२ मध्ये नानासाहेब पेशव्यांनी थेऊरच्या गणपतीला सोन्याचा हत्तीचा रथ केला असल्याची नोंद त्यांच्या रोजनिशीत आहे. डिसेम्बर इ.स. १७४६ मध्ये गोपिकाबाईंच्या डोळ्याला काही दुखापत झाली होती, आणि कदाचित दृष्टी अधू झाली होती. तेव्हा घरातल्याच कोणीतरी रांजणगावच्या गणपतीला नवस केला. काही काळात गोपिकाबाई बऱ्या झाल्याने रांजणगावचा हा नवस फेडल्याची नोंद नानासाहेब पेशव्यांच्या रोजकीर्दीत आहे. मोरगाव आणि थेऊर ही नानासाहेबांची आणि भाऊसाहेबांची आवडती गणपतीची ठिकाणं. पुढे माधवरावांना थेऊर जास्त आवडण्याचं कारण हे त्यांच्या वडिलांपासून चालत आलेलं होतं. इ.स. १७५४-५५ मध्ये नानासाहेबांनी काही देवस्थानात अधिष्ठानं सुरु केली त्यात पाळी आणि रांजणगाव या दोन गणपतींचं उल्लेख आहे. खुद्द शनिवारवाड्याच्या गणेश दरवाज्याच्या बाजूला गणपतीचं लहानसं देऊळ बांधण्यात आलं होतं. शनिवारवाड्याच्या दिल्लीदरवाजा हा सताड उघडा नसे. सामान्यतः वर्दळ ही गणेश दरवाज्यातूनच होत असे. यावेळेस साहजिकच गणपतीचं दर्शन घेतलं जाई. शिवाय रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांनाही या गणपतीचं दर्शन आपसूक घडे.
शिवापूरकर देशपांडे यांच्या शकावलीत नानासाहेबांविषयी म्हटलंय की, "पुणियाची वस्ती वाढवली. गणपतीचा उच्छाह करू लागले. वाडियात सात खणी इमारत बांधून नाचाचा दिवाणखाना केला. गणपतीचा उच्छाह तिथे करीत होते. सामराज्य प्रज्या नांदविली". नानासाहेबांच्या काळात सुबत्ता आणि स्थिरता आली, तेव्हा गणपतीचा उत्सवही मोठ्या प्रमाणात होऊ लागला. खुद्द शनिवारवाड्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असे. गणपतीची आरासही केली जात असे. नानासाहेबांच्या दि. ५ ऑगस्ट १७५४च्या रोजकीर्दीतील एका नोंदीत गणपतीजवळ फुलाचे झाड करण्याबद्दल आज्ञा केली आहे. यासाठी फिरंग्यांकडून मखमली पेटी आणि रेशमी फुलं आली होती. अर्थात ही मागवून घेतली असावीत.
गणपतीचा उत्साह हा जवळपास दहा दिवसांचा असे. या दहा दिवसांत निरनिराळी गाणी-बजावणी, कीर्तने, नृत्य वगैरे कला सादर केल्या जात. यात सामान्यतः दहा दिवसांचा जर मेळ घातला तर पन्नास एक हरदास-गोसावी, तितकेच गवय्ये, शंभरच्या आसपास नृत्य करणारे कलावंत/कलावंतिणी, वीस-पंचवीस वादक वगैरे असत. हे सगळे एकाच दिवशी नसे. वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे कलाकार आपली सेवा गणपतीसमोर सादर करत. पेशव्यांकडून त्यांना बक्षिसादाखल बिदागी मिळत असे. याशिवाय त्यांना मानाचे पोशाख, दागिने वगैरेही दिले जात. शनिवारवाड्यात गणपतीची स्थापना होताना मोठ्याने आरत्या वगैरे म्हटल्या जात. तोफांचे वीस-पंचवीस बार काढण्यात येत. खुद्द शनिवारवाड्यासोबत फडके, फडणीस वगैरे सगळ्या सरदारांच्या घरीही गणपती बसत असत. दुपारच्या भोजनानंतर संध्याकाळी नृत्य आणि त्यानंतर रात्री कीर्तन चालत असे.
नानासाहेबांच्या मृत्यूनंतर माधवराव गादीवर आले. ते तर गणपतीचे आत्यंतिक भक्तच. त्यामुळे शनिवारवाड्यात गणेशोत्सव पूर्वीप्रमाणेच सुरु असणार यात वाद नाही. तशा नोंदीही रोजकिर्दींमध्ये आहेत. पुढे नारायणरावांच्या गर्दीत आणि नंतरच्या काळात शनिवारवाड्यातला उत्सव काही काळ थंड पडला. पण तरीही इतर लोकं हा उत्सव करत असत. नाना फडणीस वगैरे प्रभूती इतरांकरवी हा उत्सव करून घेत होते. गणपती विसर्जन नदीवर होई तेव्हा वाजंत्र्यांचा एक ताफा असे, आणि गणपती पालखींत बसवून विसर्जनासाठी नेला जाई. सवाई माधवराव पुरंदरावर जन्मले, तेव्हा काही काळ पेशव्यांचा गणेशोत्सव तेथे करण्यात आला. त्यात १७७८ च्या गणपतीचा उल्लेख आहे की, विसर्जनासाठी हत्तीच्या पिल्लाच्या पाठीवर जरीपटका दिला होता. शिवाय तेजरावा नावाची एक हत्तीण शिवापुराहून मुद्दाम आणली होती. याच वर्षी पुण्यात मुद्दाम नाना फडणीस आणि सखारामबापूंनी मोठ्या उत्साहाने साजरा केला, गेली चारपाच वर्षे विशेष उत्सव झाला नव्हता म्हणून.
सवाई माधवरावांच्या कारकिर्दीतील गणेशोत्सवाचं रूप तर आणखी भव्य होतं. परसनिसांनी दिलेली माहिती मनोरंजक आहे. गणेश महाल अत्यंत उत्कृष्टरित्या सजवण्यात येऊन जवळपास केळीच्या खुंट्याएवढ्या मोठ्या मेणबत्या हरिदासांच्या दोन्ही बाजूला लावण्यात येत. शिवाय झुंबरं आणि दिवे यांनी सारा गणेशमहाल उजळून निघे. शिवाय ठिकठिकाणी असलेल्या आरशांमुळे हा प्रकाश आणखी पसरे आणि झगमगाट होई. उत्सवाच्या दहाव्या दिवशी शाडूच्या गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन करायला पेशवे स्वतः जात. नदीवर धूप-आरती वगैरे होई आणि मग विसर्जन केले जाई. एके वर्षी इंग्रजांचा रेसिडेंट चार्ल्स मॅलेट हा आपल्या कुटुंबासह (कुटुंब म्हणजे पत्नी) शनिवारवाड्यात येऊन गेला. आपल्या उत्सवासोबतच पेशवे आणि सरदार एकमेकांच्या घरीही जात. सवाई माधवरावांच्या कारकिर्दीत एक उल्लेख आहे की पेशवे फडणिसांकडे आले असता नाना फडणीसांनी श्रीमंतांना गणपतीनिमित्त खास हिरवा बऱ्हाणपूरी पोशाख दिला. तिथे पानदान, अत्तर वगैरे झाल्यावर पेशवे दाजीबा फडक्यांच्या वाड्यात गेले. तिथून मग ते कसब्यात येऊन गणपतीचं दर्शन घेऊन शनिवारवाड्यात गेले.
सवाई माधवरावांच्या काळातील एक इंग्रज अधिकारी, कॅप्टन मूर म्हणतो, "पुण्याच्या राजवाड्यात त्यांची खोली उत्कृष्ट आहे. तिला गणेश महाल म्हणतात. विशेषतः गणेशोत्सवाच्या वेळी त्याला आदर दाखवण्यासाठी अनेक अभ्यागत येतात. त्यांचे पेशवे स्वागत करतात. मी तिथे एकाच वेळी शंभराहून अधिक नृत्य करणाऱ्या युवती पाहिल्या". मूर म्हणतो, "या खोलीच्या एका टोकाला सोन्याचा मुलामा दिलेली एका कोनाड्यात मूर्ती आहे". ही मूर्ती बहुदा गणपतीचीच असावी, कारण महाल गणपतीच्याच नावाने होता. पण जेम्स वेल्स ने रेखाटलेल्या चित्रांवरून पुढे डॅनियलने जेव्हा शनिवारवाड्यात प्रसिद्ध गणेश रंगमहालाचं चित्रं काढलं आहे त्यात एका बाजूला गणपती आणि एका बाजूला विष्णू अशा दोन्ही मूर्ती दिसत आहेत. अर्थात, या चित्रातही काही त्रुटी आहेत, उदाहरणार्थ लाकडी खांबांऐवजी युरोपीय पद्धतीचे संगमरवरी खांब वगैरे. पण बहुतांशी गणपती आणि विष्णू अशा दोन्ही मूर्ती तिथे असाव्यात.
दुसऱ्या बाजीरावांच्या कारकिर्दीतील एका गणपतीउत्सवातील घटना सांगून हा लेखनप्रपंच संपवतो. भाद्रपद शुद्ध ४ ला गणपतीची प्रतिष्ठापना झाली. त्यानंतर पेशवे "गणपती दर्शने घ्यावयास गेलो" म्हणतात म्हणजे ते निरनिराळ्या ठिकाणच्या, निरनिराळ्या लोकांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घ्यायला गेले असं दिसतं. दर दिवशी शनिवारवाड्यात पाचशे ब्राह्मणभोजन होत असे. गणपती विसर्जनाच्या दिवशी "केशरीरंग जाहला" अशी नोंद आहे. म्हणजे नेमकं काय ते समजत नाही. जे निरनिराळे गोसावी वगैरे आले होते त्यांना शेले-पागोटी वाटण्यात आली. कलावंतिणी वगैरेंना सुद्धा वस्त्रं मिळाली. संतभोजन झाले. नव्या बिछायती करण्यापासून गुलालबुक्क्यापर्यंत सगळा खर्च यात नमूद आहे. गणपतीच्या बाजूला दोन चोपदार काम उभे राहत. त्यांनाही नवी वस्त्रे वगैरे सगळं दिलं जाई.
एकंदरीतच, अठराव्या शतकातील पुण्यातला गणेशोत्सव असा होता..
© कौस्तुभ कस्तुरे
चित्र-
१) गणपती रंगमहालात चार्लस मॅलेट सवाई माधवरावांशी तह करताना. सवाई माधवरावांच्या बाजूला नाना फडणीस, बहिरो रघुनाथ मेहेंदळे वगैरे मुख्य व्यक्ती आहेत. चित्रावरूनच महाल किती प्रचंड असेल याची कल्पना येते.
२) सवाई माधवराव पेशवे गजाननाची आराधना करताना. चित्र सौजन्य: छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई.
Repost with minor edits..
No comments:
Post a Comment