करवीर छत्रपतींच्या जुन्या राजवाड्यामध्ये छत्रपतींच्या देवघरालगतच एक तख्त ठेवलेले आहे. त्या तख्तावर भगवे वस्त्र अंथरलेले असून त्यावर शिवरायांची तसबीर ठेवलेली आहे. राजवाड्यास भेट देणाऱ्या अनेक पर्यटकांच्या मनात हा प्रश्न येतो की, हे तख्त कुणाचे असावे ? तर, हे तख्त खुद्द छत्रपति शिवरायांच्या दैनंदिन वापरातील तख्त आहे. गेली साडेतीनशे वर्षांपासून छत्रपति घराण्याने हे तख्त जपून ठेवलेले आहे.
कोल्हापूरास राजधानी स्थापन झाल्यानंतर छत्रपति शिवाजी महाराज दुसरे यांनी १७८८ साली हे तख्त पन्हाळगडावरुन कोल्हापुरास आणले व आपल्या राजवाड्यामध्ये तख्ताची स्थापना केली. पण अनेकांस असा प्रश्न पडतो की, स्वराज्याची राजधानी सुरुवातीस राजगड व त्यानंतर रायगडावर होती, तर शिवरायांचे तख्त पन्हाळगडावर कसे ? तर, कोल्हापूरच्या राजवाड्यातील शिवरायांचे हे तख्त म्हणजे महाराजांचे 'सिंहासन' नसून, महाराजांच्या दैनंदिन वापरातील 'आसन' होते. शिवकाळात स्वराज्यात असणाऱ्या प्रत्येक गडावर एक तख्त ठेवलेले असायचे. महाराज गडावर आले की फक्त महाराजच या तख्तावर बसायचे. हे तख्तही याच पद्धतीचे असून पन्हाळगडास सिद्दी जौहरचा वेढा पडला असताना महाराज गडावर होते, तेव्हा महाराज याच तख्तावर बसत असत. आपल्या आयुष्यातील सलग सर्वाधिक काळ महाराजांनी पन्हाळगडावर व्यतीत केला, ते याच तख्तावर विराजमान असत, यामुळे महाराजांच्या या तख्तास ऐतिहासिक व भावनिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे.
किल्ले पन्हाळगडावर करवीर राज्याची स्थापना केल्यानंतर ताराऊंनी आपले सुपुत्र छत्रपति शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक केला पण हे तख्त खुद्द थोरल्या महाराजांचे असल्याने तख्ताचा आदर राखण्यासाठी शिवरायांनंतर कोणतेही छत्रपति या तख्तावर बसले नाहीत, उलट छत्रपतींनी या तख्तास मुजरा करण्याची प्रथा पूर्वापार चालत आलेली आहे. आजही कोल्हापूरचे छत्रपति शिवरायांच्या या तख्तास मुजरा करतात. पन्हाळगडावरील हे तख्त शिवरायांचेच असल्याने महाराणी ताराराणींसाठी हे तख्त पूजनीय होते. म्हणूनच त्यांनी या तख्ताचा मान राखण्यासाठी विशेष दंडक घालून दिलेला आहे.
काही अभ्यासक अशी शक्यता वर्तवतात, कि छत्रपतींच्या गादीवर शिवरायांनंतर "शिवाजी" या नावाचे एकूण चार छत्रपति झाले, त्यामुळे हे तख्त थोरल्या शिवाजी महाराजांचे नसून नंतरील एखाद्या शिवाजी महाराजांचे असावे. याविषयी थोडासा जरी अभ्यास केला तर असे लक्षात येते की, शिवरायांनंतर गादीवर आलेले "शिवाजी" म्हणजे राजारामपुत्र शिवछत्रपति होय. पण या शिवछत्रपतिंना कैद करुन राजारामपुत्र दुसरे संभाजी गादीवर आले. संभाजीराजेंनी ज्यांना कैद केले, त्यांच्याच तख्ताची ते पूजा अथवा त्यास मुजरा करतील, हे शक्य नाही. त्यामुळे हे तख्त राजारामपुत्र शिवाजी महाराजांचे असावे, हि शक्यता फोल ठरते.
यानंतर संभाजीराजेंच्या पुत्राचे नावही शिवाजीच होते, पण हे तेच शिवाजी महाराज ज्यांनी १७८८ साली हे तख्त पन्हाळगडावरुन कोल्हापूरास आणले व राजवाड्यामध्ये स्थापित केले. ते या तख्तावर बसत नसायचे, त्यामुळे हे तख्त या शिवाजी महाराजांचेही नव्हे. याच शिवाजी महाराजांनी शिवरायांचे तख्त कोल्हापूरास आणले असल्यामुळे यानंतरच्या दोन शिवाजी महाराजांपैकी एकाचे हे तख्त असण्याची शक्यताच उरत नाही.
शिवरायांचे हे तख्त अत्यंत साध्या पद्धतीचे असून लाकडी आहे. कोल्हापूरच्या छत्रपतिंना एखादे तख्त पूजायचेच असते, तर त्यांचेकडे असणाऱ्या सोन्याच्या तख्ताची त्यांनी पूजा केली असती. पण सुवर्णसिंहासनावर बसणारे कोल्हापूरचे छत्रपति लाकडी तख्तास मुजरा करतात, त्यापुढे नतमस्तक होतात, त्याअर्थी हे तख्त साधेसुधे नसून खुद्द शककर्ते शिवछत्रपति महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेले तख्त आहे, हे सिद्ध होते.
तसेच कोल्हापूरचे छत्रपति शहाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली स.मा. गर्गे यांनी लिहिलेल्या "करवीर रियासत" या ऐतिहासिक ग्रंथामध्येदेखील हे तख्त शिवरायांचे असल्याबाबतची विशेष नोंद आहे.
कोल्हापूरच्या छत्रपति घराण्यामध्ये अनेक प्रथा परंपरा पूर्वापार चालत आलेल्या आहेत. शिवरायांच्या वापरातील अनेक ऐतिहासिक मौल्यवान वस्तू कोल्हापूरच्या छत्रपतींनी जपून ठेवलेल्या आहेत. जुन्या राजवाड्यातील शिवरायांचे तख्तही यांपैकीच एक आहे. शककर्ते शिवछत्रपति महाराजांचे हे तख्त फक्त छत्रपति घराण्यासाठीच नव्हे तर आपणा सर्वांसाठी वंदनीय आहे.
No comments:
Post a Comment