विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 23 September 2023

सर सेनापती धनाजीराव जाधव

🚩

सर सेनापती धनाजीराव जाधव  🚩
धनाजीराव जाधव यांचे घराणे म्हणजे शिवाजी महाराजांचे मातुल घराणे होय. जिजाऊंचे वडील लखोजी जाधवराव व बंधू अचलोजी जाधवराव या दोघांनी जाधव घराण्याला सतराव्या शतकाच्या आरंभी मोठी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली होती .दौलताबाद व सिंदखेडराजा मुलूख इत्यादी भागात त्यांचा दरारा होता. पण दौलताबादेस निजामशहा कडून विश्वासघाताने लखोजी जाधवराव व त्यांचे दोघे पुत्र अचलोजी ,रघुजी आणि नातू यशवंतराव हे सर्व पुरूष एकाच वेळी मारले गेले .या प्रकारानंतर अचलोजींचा अल्पवयीन मुलगा संताजी यांचे पालन-पोषण शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊ साहेब यांनी केले .जिजाऊ यांचे जेष्ठ पुत्र संभाजी आणि भाचा संताजी हे दोघे समवयस्क होते .ते एकत्र वाढले परंतु दुर्दैवाने ते दोघेही कनकगिरीच्या युद्धात एकदमच मारले गेले .
संताजींचा मुलगा शंभूसिंह छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर असत .पुढे पावनखिंडीच्या लढाईत शौर्य आणि पराक्रम गाजवताना धारातिर्थी पडलेले शंभूसिंह यांच्या पोटी १६५० च्या सुमारास धनाजीराव यांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोपवलेल्या ऊमराणी येथील लढाईत धनाजीराव जाधव प्रथम महाराजांच्या नजरेस पडले. जिजाऊंच्या संस्कारात तावून सुलाखून निघालेले शंभर नंबरी सोने म्हणजे धनाजीराव जाधव .धनाजीराव हे मृदुभाषी ,शांत ,व हाताखालच्या लोकांना सांभाळून घेणारे ,मराठा सरदारांशीच नव्हे तर मोगल सरदारांशी शिष्टाचाराने वागणारे, राजकारणाच्या वाऱ्याची दिशा पाहून आपले धोरण ठरविणारे मुत्सद्दी सेनानी होते .धनाजी जाधवांना खानदानी मराठे सरदारात प्रमुख समजत .
धनाजीराव जाधवांच्या कर्तबगारीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकीर्दीतच सुरू झाली असली तरी ,त्यांचा खरा पराक्रम छत्रपती राजाराम महाराज व ताराराणी यांच्या काळातच दिसून आला .धनाजीराव जाधव सौम्य प्रकृतीचे असल्यामुळे गोड बोलून कार्य साध्य करून घेत .त्यामुळे हाताखालचे लोक त्यांच्यावर अत्यंत प्रेम करत त्यामुळेच छत्रपती राजाराम महाराजांबरोबर त्यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध निर्माण झाले होते .संपूर्ण स्वातंत्र्ययुद्धाच्या २६ वर्षांच्या कालखंडात सतत लढाया करणारा हा मराठ्यांच्या बाजूचा एकमेव सेनानी होता.
धनाजीराव जाधव यांनी शेकडो लढाया केल्या, विजय मिळवले यांची नुसती यादी करायची म्हटली तर पुस्तकाची अनेक पुष्ठे खर्ची पडतील .छत्रपती रााजाराम महाराज व ताराराणी यांच्या काळात धनाजीराव जाधव एक सारखे धावपळीच्या लढाया करताना दिसून येतात.१७०० साली धनाजीराव जाधव यांनी २००० कोसांच्या हालचाली केल्या होत्या .त्यांच्या पाठीमागून धावून धावून झुल्फिकारखाना सारखा मातब्बर सेनानी सुद्धा मेटाकुटीला आला होता. शत्रूवर अचानक छापा टाकावा, सापडेल त्याला कापून काढावे ,लगेच माघार घ्यावी ,रसदी माराव्या, ठाणेदारांना पकडावे अशा गनिमी पद्धतीने धनाजीराव जाधव लढत राहिले. त्यामुळे मोगलांच्या छावणीत त्यांच्या नावाचा मोठा दरारा निर्माण झाला होता. खुद्द औरंगजेबही धनाजीराव जाधव यांना घाबरून होता .मोगलांची घोडी पाण्यावर घातली असता एखाद्या वेळी पाणी पीत नसत, तेव्हा त्यास पाण्यात संताजी-धनाजी दिसतात की काय असा प्रश्न मोगल सेनानी विचारत असत .
हे खुद्द मोगल इतिहासकारांनी त्यांच्या पराक्रमाच्या गाथा या पुस्तकात सांगितल्या आहेत .१६९७ ते १७०८ या काळात धनाजीराव जाधव सरसेनापती होते .छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याची धूरा धनाजी जाधवराव यांनी सांभाळली .छत्रपती शाहू महाराजांना छत्रपती बनवण्यात त्यांचा मोठा वाटा होता .छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात धनाजीराव जाधव यांनी फलटणच्या मैदानात बादशहाच्या फौजेशी हमरीतुमरीची लढाई करून रनमस्त खान यांचा पाडाव केला .
या पराक्रमावर खुश होऊन छत्रपती राजाराम महाराजांनी धनाजीराव जाधव यांचा सन्मान केला त्यांना वस्त्रे आभूषणे देऊन जयसिंगराव हा किताब दिला .छत्रपती राजाराम महाराज चंदी प्रांतात जाताना जिंजीला धनाजीराव जाधव यांनी मोठा पराक्रम केला म्हणून त्यांना सरनोबत हे पद दिले गेले. मोगलांपासून सुटका झाल्यावर शाहूराजे सैन्य गोळा करीत खानदेश मार्गे सातारला पोहोचले तेव्हा महाराणी ताराराणीने छत्रपती शााहूंचा गादीवरचा हक्क अमान्य केला.
संताजी घोरपडे मरण पावल्यानंतर सरसेनापती धनाजी जाधवरावांनी सरसेनापती पदाची सूत्रे हाती घेतली .शाहू महाराजांना छत्रपती बनवण्यात धनाजी जाधव रावांचा मोठा वाटा होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर धनाजी व संताजी यांनी मोठा पराक्रम केला. श्रीवर्धनहून साताऱ्याला आलेल्या बाळाजी भट व त्यांच्या कुटुंबाला आधार देण्याचे काम धनाजी जाधवराव यांनी केले .धनाजी जाधवराव यांनी छत्रपती शाहू महाराजांकडे शिफारस केल्यामुळे बाळाजी भटाला प्रथमतः पेशवाईची सूत्रे मिळाली.
१२ जानेवारी १७०८ मध्ये छत्रपती शााहू राजांनी स्वतः साताऱ्यास राज्यभिषेक करविला .त्यावेळी छत्रपती शााहू हेच स्वराज्याचे खरे वारस आहेत म्हणून धनाजी जाधवराव यांनी छत्रपती शााहू महाराजांचा पक्ष स्वीकारला होता.धनाजी जाधव यांना छत्रपती शाहू महाराजांनी सेनापतिपद दिले. पण धनाजीराव जाधव यांना हे सेनापतिपद फार दिवस उपभोगता आले नाही. छत्रपती शााहू महाराज विशाळगड व पन्हाळगड मोहिमेवर असता जून १७०८ मध्ये वारणा नदीच्या काठी वडगाव येथे पायाला जखम होऊन धनाजी जाधवराव मृत्यू पावले.
🙏अशा या पराक्रमी, "शूर योद्याला स्मृतीदिनीनिमित्त आमचा मानाचा मुजरा "🙏
लेखन ✒️
इतिहास अभ्यासक
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

 

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...