विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 23 September 2023

"सिंहगडाचा दुसरा सिंह- नावजी लखमाजी बलकवडे"...!!

 


"सिंहगडाचा दुसरा सिंह- नावजी लखमाजी बलकवडे"...!!
संभाजी महाराजांच्या हत्येनंतर ४ वर्षे लोटली होती. संपूर्ण स्वराज्याचाच घास घेण्यासाठी औरंगजेब चवताळून उठला होता. आज हा किल्ला उद्या तो किल्ला असे एक एक करून सारे किल्ले मोगलांकडे चालले होते. राजाराम महाराज स्वराज्यापासून दूर जिंजीस वास्तव्य करीत होते. स्वराज्याचे काम संताजी घोरपडे, धनाजी जाधवराव, शंकराजी नारायण सचिव, परशुराम त्रिंबक आदी लोकं बघत. राजगड, तोरणा, सिंहगड, पुरंदर आदी बलाढ्य किल्ले शत्रूच्या हाती लागले होते. त्यामुळे ठोस हालचाल करणे मराठ्यांना जमत नव्हते. सह्याद्रीच्या कुशीतल्या ह्या वाघांना जणू सह्याद्रीचीच भीती वाटत असें. हालचालींचा वेग वाढविण्यासाठीच म्हणून की काय धाडसी लोकांच्या सहाय्याने १६९३ च्या दरम्यान स्वराज्याच्या ह्या जुन्या शिलेदारांना पुन्हा स्वराज्यात सामील करून घेण्याच्या उद्देशाने काही बेत सचिव शंकराजी नारायण यांनी आखले. त्यातीलच एक म्हणजे सिंहगडावर पुन्हा कब्जा मिळवायचा.
नावजी हे शंकराजींच्या पायदळातील पंचसहस्त्री. अंगापिंडाने माणूस अगदी दणकट, टोलेजंग जिवंत देखावा. जणू तान्हाजीच त्यो. पण अनुभवाने थोडे कमी. शंकराजीना सिंहगडाचा पूर्ण परिसर अवगत होता. नावजी सारख्या एकट्यांचे हे काम नाही हे टिपूणच विठोजी कारके यांना मदतनीस म्हणून धाडले.२५ जून रोजी निवडक माणसे सोबत घेऊन. या दोन वीरांनी किल्ले राजमाची सोडली. ऐन पावसाळ्याची ही मोहीम. अंधार, चिखल अशात किर्र रानं तुडवीत. ती मावळी भूतांची सेना सिंहगडनजीकच्या जंगलात येऊन पोचली आणि योग्य संधीची वात बघत ५ दिवस दबा धरुन बसले.
दि. ३० जूनच्या मध्यरात्री नावजी शिड्या व दोर बरोबर घेउन सिंहगड चढु लागले.अवघड मार्गानी खाचा-खळग्यातुन ते तटबंदीच्या खाली आले. परंतु किल्ल्यवर मोगलांचे गस्त सुरु होती आणि पहारेकरी सावध होते, २० वर्षांपूर्वी एका सिंहानेच दिलेल्या तडाक्याची याद मनात होतीच. म्हणूनच प्रत्येक किल्लेदाराला सक्त गस्तीचे आदेश औरंगजेबाने आधीच दिले होते. सुर्योदय झाला...तेंव्हा किल्ल्यवरच्या गस्तीवाल्या पथकाची वेळ संपुन नवे लोक गस्तीसाठी आले.. या लवचिक संधीचा फ़ायदा घेउन नावजींनी शिड्या तटाला लावल्या आणि ते मावळ्यांसह सिंहगडवर आले.. मराठे सैनिकांनी त्याबाजुचे पहारेकरी गुपचुप कापुन काढले. अकस्मात हल्ला झाल्याने मोगलांची फ़ार हानी झाली.मराठे किल्ल्यावर आले आहेत अशी चाहुल जर किल्लेदाराला लागली असती तर तो सावध झाला आणि मोगल सैन्याने एकवटुन नावजींच्या लोकांवर हल्ला चढवला असता.पण नावजींनी त्यांचे काम चोख बजावले होते.
पावसाळ्यतल्या धुक्यामुळे लांब वरुन काय चालले आहे ते दिसत नव्हते.जणू पुन्हा निसर्ग मराठ्यांच्या मदतीस धावला होता नावजींचे धैर्य बघुन विठोजी कारकेंना हुरुप आला. ते यावेळी तटाखाली योग्य संधीची वाट बघत थांबले होते. ते ही शिड्या लाऊन वर आले.. आत मराठ्यांचे सर्व सैन्य गडावर पोहोचले होते.. हर हर महादेव च्या गजरात अवघ्या ३०० मावळ्यांनीशी सिंहगडाने परत एकदा १ जुलै १६९३ आषाढ शुद्ध अष्टमी (दुर्गाष्टमी) च्या दिवशी स्वराज्याचा उंबरा ओलांडला. ह्या कामगिरी बद्दल छत्रपती राजाराम महाराज यांनी त्यांना मौजे सावरगाव तर्फ पवन मावळ हा गाव इनाम दिला.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...