एक अल्पपरिचित वीर
मित्रांनो छत्रपति राजाराम महाराजांच्या काळात ज्यांची तलवार तळपली, ज्यांच्या नावाने शत्रुचे सैन्यच काय,शत्रुची जनावरे सुद्धा बावरायची अशा रणमार्तंड संताजीराव घोरपडे यांना ओळखत नाही असा माणुस अवघ्या महाराष्ट्रात शोधुनही सापडणार नाही. त्यांच्या पराक्रमाचे, धाडसाचे किस्से जगप्रसिद्ध आहेत. त्यांचे वडिल म्हाळोजीबाबा घोरपडे, स्वतः त्यांनी, त्यांच्या बहिरजी आणि मालोजी या भावांनी स्वराज्यासाठी केलेले बलिदान सर्वश्रृत आहेच. त्यांच्या कर्तुत्वा विषयी वेगळे सांगायची गरज नाही.
पण मी थोडक्यात सांगणार आहे सरसेनापती संताजीरावांच्या खाद्याला खांदा लाऊन लढणा-या, आपल्या पराक्रमाने छत्रपति राजाराम महाराजांकडुन शाबाशकी आणि "हिम्मतबहाद्दर" हा खिताब मिळवणा-या वीर विठोजीराव चव्हाण यांच्याबद्दल.
मित्रांनो मी खलिल शेख, तुमच्या बरोबर हा लेख शेअर करतोय. नेहमी प्रमाणे लेख आवडल्यास आपल्या प्रतिसादाची अपेक्षा आहेच. आणि काही चुकत असल्यास (व्याकरण सोडुन) मार्गदर्शन करावे.
स्वराज्य संकल्पक महाराजा फर्जंद शहाजी राजे यांच्या पदरी असलेल्या सैन्यात मुळ सोलापुर जिल्ह्यातील, पंढरपुर तालुक्यातील तोंडले-बोंडले या गावचे बालोजीराव चव्हाण होते. ते शहाजी महाराजां बाबतीत अत्यंत निष्ठा बाळगुन होते. ज्या-ज्या वेळी शहाजी महाराजांना सत्ताकेंद्रे बदलावी लागली त्या-त्या वेळी बालोजीराव शहाजी महाराजां सोबत असायचे. त्यांनी थोरल्या महाराजांची साथ कधिच सोडली नाही. म्हणुन त्यांची पदोन्नति होऊन त्यांना सरदारकी दिली गेली.
ह्याच बालोजीरावांचे पुत्र राणोजी राव जे महाराज शहाजी राजे कर्नाटकात असताना त्यांच्या बरोबर एक विश्वासु सदस्य म्हणुन होते. पुढे जेंव्हा थोरल्या महाराजांनी शिवबाला विजापुरहुन निरोप दिला. तेंव्हा जी काही चतुर, तल्लख, आणि निष्ठावान मंडळी शिवबा बरोबर महाराष्ट्रात पाठवली त्यात राणोजी चव्हाण पण होते, शिवरायांच्या अनेक मोहिमते भाग घेऊन राणोजींनी पराक्रम गाजवला. या राणोजींचेच पुत्र विठोजी चव्हाण होत. पराक्रमाची परंपरा, आणि निष्ठेची असाधारण संस्कृती जपणा-या घराण्यातील सदस्य असणा-या विठोजींनी पण स्वामीनिष्ठेपाई आणि स्वराज्य प्रेमापोटी अचाट पराक्रम गाजवले. त्यातीलच एक महत्वपूर्ण घटना, जी शिवकाळातील एका घटनेची आठवण करुन दिल्याशिवाय रहात नाही! ती म्हणजे शाहिस्तेखानावर स्वतः शिवरायांनी केलेला आत्मघाती हल्ला!
स्वराज्याचे दुसरे धनी छत्रपती संभाजी राजांना दग्याने, फितुरीने कैद करण्यात आली. आणि त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करून शेवटी त्यांची हत्या करण्यात आली! त्यानंतर मराठी सैन्यातले काही सरदार,मातब्बर मंडळी घाबरून किंवा काही कारणास्तव अलिप्त
झाली! परंतु छत्रपती संभाजी राजांना वाचवण्याच्या कार्यात स्वराज्याचे पाचवे सरनोबत म्हाळोजी बाबा घोरपडे धारातीर्थी पडले. म्हाळोजी बाबांचे तीन पुत्र संताजी, बहिर्जी आणि मालोजी यांच्यावर रायगड आणि रायगडावरील महत्त्वाच्या असामींना संरक्षण देणे किंवा वाचवणे ही जबाबदारी आली. त्यावेळी संताजी, बहिर्जी आणि मालोजी आपल्या सेनेसह अचाट पराक्रम गाजवत होते. विठोजी हे सुद्धा प्रत्येक वेळी त्यांच्या बरोबर कायम होते. शंभुराजेंच्या मृत्यु नंतर स्वराज्य गिळंकृत करण्याची स्वप्न पहाणा-या औरंगजेबाची छावणी तुळापूर येथे पडलेली होती.जवळपास दिडलाख सेनेच्या गराड्यात औरंगज़ेब आराम फर्मावत असताना संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी असाच एक अविचारी परंतु संपूर्ण विचारांती घेतलेला निर्णय म्हणजे औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला करून त्याचाच मुडदा पाडायचा! निर्णय ठरला, तिन्ही घोरपडे बंधू आणि विठोजी आपल्या सोबत दोन हजाराची सेना घेऊन निघाले. त्याच वेळी फलटण आणि बारामती येथे असणा-या शहाबुद्दीन खान आणि रणमस्तखान यांच्यावर हल्ला करायला धनाजी जाधवांनची तयारी झाली. ईकडे संताजीराव, विठोजीराव, बहिरजी आणि मालोजी आपल्या सहका-यांसह दिवेघाटाच्या जंगलात दिवसा मुक्काम करून रात्रीच्या वेळी लाख दिड लाखाच्या औरंगजेबाच्या छावणीत शिरले! हुबेहूब छत्रपती शिवरायांनी वापरलेली नीती वापरून, वेळेचे अचुक भान राखत आपली लोकं जागोजागी पेरून पुढे आलेल्या गस्तीच्या लोकांना, चौकी पहा-यांना पटतील अशी उत्तरे देऊन शेवटच्या क्षणाला हे चौघेजण काही ठराविक लोकांबरोबर औरंगजेबाच्या "गुलालबार" नावाच्या शाही तंबू जवळ पोहोचले! परंतु नेमका त्यावेळी औरंगजेब तंबूत नव्हता. म्हणून औरंगजेबाच्या तंबूचे दोर कापून त्याच्या शाही तंबूचे सोन्याचे कळस कापून, तंबुत असलेल्या सोन्या-चांदीच्या शाही वस्तु लुटुन माघारी फिरले. तोपर्यंत मुघलसेना जागी झाली होती. आडवा येईल त्याला कापत, आरडा-ओरडा करत ही चौकडी आपल्या सहका-यांसह थेट पोहोचली ते सिंहगडाला, तेथे किल्लेदार होते स्व. प्रतापरावांचे पुत्र सिदोजी गुजर. तिथे मुक्काम करुन ताजेतवाने होऊन थेट गाठली स्वराज्याची राजधानी रायगड! तेथे जुल्फिकार खान वेढा घालुन बसलेला. त्याच्यावर या चौकडीची संक्रात कोसळली! शत्रुसेना सावध व्हायच्या आधि त्यांच्या सेनेतील पाच हत्ती आणि काही घोडी लुटुन ह्यांनी थेट पन्हाळ्यावर मुक्कामी असणा-या राजाराम महाराजांना पेश केली.
या चौघांच्या या जबरदस्त पराक्रमाने खुश होऊन राजाराम महाराजांनी संताजीरावांना सरसेनापतीपद दिले, आणि "ममलकतमदार" ह्या उपाधिने नावाजले. तर बहिरजींना "हिंदुराव" तसेच मालोजींना "अमीर-उल-उमराव" आणि विठोजींना " हिम्मतबहाद्दर" ह्या उपाध्या देऊन नावाजले.
या नंतर सुद्धा घोरपडे बंधु आणि विठोजींचा झंजावात थांबला नाही स्वतः औरंगजेब संताजींच्या मृत्यु समया पर्यंत एकटा तंबुत थांबायला, आणि सडा बाहेर यायला घाबरत होता!
या तरण्याबांड पोरांच्या अचाट धाडसाने खुद्द बादशहा औरंगजेबाची गाळण उडाली तेथे बाकिच्यांची काय गत, यांच्या या अचाट धाडसाने घाबरलेली गांगरलेली मराठी मंडळी पुन्हा नव्या जोमाने स्वराज्य सेवेत दाखल होऊ लागली.
यानंतर राजाराम महाराज जिंजीला असताना, जुल्फिकारखानाने जिंजीच्या किल्ल्याला घातलेल्या वेढ्यात अडकले असता, मोगली सैन्याबरोबर जबरदस्त लढाई झाली. त्या युद्धात पण विठोजींनी मर्दुमकी गाजवली. आणि वेढा तोडुन राजाराम महाराजांना स्वराज्यात सुखरुप परत घेऊन येत असताना बेंगलुरु जवळ दि. २५ मे १६९६ या दिवशी पुन्हा मोघली सेनेशी सामना झाला. या युद्धात प्रंचड पराक्रम गाजवत, अंगावर असंख्य जखमांचे दागिने लेऊन "हिम्मतबहाद्दर" विठोजी चव्हाण धारातिर्थी पडले. स्वराज्याच्या कामी आले.
अशा पराक्रमी परंतु अल्पपरिचित "हिम्मतबहाद्दर" विठोजी चव्हानांना त्रिवार वंदन आणि मानाचा मुजरा- खलिल शेख
No comments:
Post a Comment