विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 23 September 2023

मल्हारराव होळकर : (१६ मार्च १६९३–२० मे १७६६). भाग २

 


मल्हारराव होळकर : (१६ मार्च १६९३–२० मे १७६६).
भाग २
मल्हाररावांनी त्यांच्या आयुष्यात लहानमोठ्या एकंदर बावन्न लढायां-मध्ये भाग घेतला. त्यांपैकी १७२९ आणि १७३१ मध्ये गिरीधर बहादूर व दया बहादूर यांच्याशी झालेली लढाई व त्या दोघांचा केलेला पराभव ही महत्त्वाची मानली जाते. मल्हाररावांनी १७३५–३८ दरम्यान नानासाहेब पेशव्यांबरोबर भोपाळ, गुजरात, अंतर्वेदी, दिल्ली, कोंकण, वसई व आग्रा या ठिकाणी झालेल्या युद्धांत पराक्रम केला. तत्पूर्वीच बाजीरावानेमल्हाररावांना ८२ परगणे जहागीर देऊन माळव्याची राज्यव्यवस्थाहीत्यांच्याकडे सोपविली होती. वरील दोन लढायांशिवाय १७३५ मध्येआग्रा आणि गुजरात, १७३६-३७ मध्ये अंतर्वेद व दिल्ली, १७३७ मध्ये वसई इ. ठिकाणी पेशव्यांनी केलेल्या मोहिमांमध्ये मल्हाररावांनी सहभागघेऊन शौर्य दाखविले. याच सुमारास रेवाकाठचा बराच मुलूख मल्हाररावांनी जिंकला आणि महेश्वर येथे आपले मुख्य ठाणे केले. १७४३ मध्ये सवाई जयसिंगांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांत वारसा हक्काचे भांडण सुरू झाले, तेव्हा मल्हाररावांनी माधोसिंगांस मदत करून गादीवर बसविले. त्याबद्दल त्यांना ६४ लक्ष रुपये खंडणी, रामपुरा, भानपुरा, होडा व टोंक हे प्रांतमिळाले. दक्षिणेच्या सुभेदारीबद्दल झालेल्या निजामुल्मुल्कच्या मुलां-मधील तंट्यात पेशव्यांतर्फे शिंदे व होळकरांनी गाजीउद्दीनला मदतदेण्याचे ठरविले होते. १७५१ मध्ये मल्हाररावांनी रोहिल्यांविरुद्ध अयोद्धेच्या सफदरजंगास मदत केली. १७५४ मध्ये गाजीच्या मीरशिहाबुद्दीन नावाच्या मुलास जाटांविरुद्ध मदत करून जाटांच्या मदतीस आलेल्या दिल्लीच्याबादशहाचा मल्हाररावांनी पराभव केला या वेळी दीगजवळच्या कुंभेरीच्या वेढ्यात खंडेराव हे त्यांचे एकुलते एक पुत्र तोफेचा गोळा लागूनमरण पावले (१७५४). त्या वेळी खंडेरावांची पत्नी अहिल्याबाई या सोडून अन्य भार्या सती गेल्या. या प्रसंगी मल्हाररावांनी प्रतिज्ञा केली, ‘सुरजमल्लाचा शिरच्छेद करून कुंभेरीची माती यमुनेत टाकीन, तरच जन्मास आल्याचेसार्थक नाही तर प्राणत्याग करीन ‘. दिल्लीच्या रघुनाथरावांच्या १७५५ च्या मोहिमेत मल्हारराव हे त्यांच्या सोबत होते. शिवाय १७५६-५७ तसेच १७६६ या राघोबादादांच्या उत्तरेकडील स्वाऱ्यांमध्ये त्यांनी बरीच मदत केली. पानिपतच्या लढाईतील (१७६१) त्यांच्या कामगिरीबद्दल इतिहासाच्या अभ्यासकांत मतैक्य आढळत नाही. मल्हाररावांनी १७६३ मधील राक्षसभुवनच्या लढाईत माधवरावांसोबत निजामाचा पराभव करून पानिपतच्या पराभवाने खचलेल्या मराठा मंडळास संजीवनी दिली.

पहिल्या बाजीरावांनी मल्हाररावांस संधी देऊन संस्थानिकांच्या दर्जास आणून ठेवले आणि उत्तरेकडील चौथचे अधिकार त्यांना प्रदान केले पण बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे (कार. १७४०–६१) यांच्या काळात नानासाहेबांनी मल्हाररावांस लिहिलेली पत्रे उपलब्धआहेत. त्या पत्रांत जयाजी शिंद्यांसोबत त्यांनी माळव्यात चौथाईच्या संदर्भात काही सूचना दिल्या. माधवरावांच्या काळात मल्हारराव होळकर हे माधवरावांनाही वचकून असत. जाटांच्या पारिपत्याकरिता रघुनाथ-रावांबरोबर अलमपूर येथे आले असता तेथेच अतिश्रमाने वृद्धापकाळीमल्हाररावांचे निधन झाले.

मल्हारराव निरभिमानी असून धाडसी व शूर होते. ते फक्त युद्धकलेतच निष्णात नव्हते, तर राजकारण आणि राज्यकारभारातही हुशार व चाणाक्षहोते. आपल्या अंमलाखालील प्रांतांची त्यांनी वसूलनिहाय वर्गवारी करून व्यवस्था लावली होती. एकदा घेतलेला निर्णय ते सहसा बदलतनसत. माळव्यातील आपल्या मांडलिक राजांशी त्यांचे स्नेहपूर्ण संबंधहोते. त्या वेळच्या प्रसिद्ध सरदारांशी त्यांचे सलोख्याचे संबंध असूनराजपुतांपैकी राघवगडचा राजा बलिभद्रसिंग व बागळीचा राजा गोकुळदासहे त्यांचे ऋणानुबंधी स्नेही होते. बाळाजी बाजीराव व त्यानंतरचे पेशवेमाधवराव आणि दादासाहेब मल्हाररावांना पित्यासमान मान देत.

मल्हाररावांच्या पत्नी गौतमीबाई यांच्यापासून झालेले एकुलते एकपुत्र म्हणजे खंडेराव होत. त्यांनी त्यांचा विवाह अहिल्याबाई शिंदे यांच्याशी लावून दिला होता (१७३३). खंडेराव खांदेरीच्या वेढ्यात तोफेचा गोळा लागून मरण पावले (१७५४). त्यांच्या इतर भार्यांबरोबर अहिल्याबाई सती जाणार होत्या पण अहिल्याबाईंना सती जाण्यापासून मल्हाररावांनी परावृत्त केले आणि राज्याची सर्व धुरा त्यांच्यावर टाकली. मल्हाररावांच्या चार भार्यां-पैकी गौतमीबाई आधीच मृत्यू पावल्या होत्या द्वारकाबाई व बजाबाई सती गेल्या, तर हरकूबाई अहिल्याबाईस साथ देण्यास मागे राहिल्या.

संदर्भ : १. कुलकर्णी, अ. रा. खरे, ग. ह. मराठ्यांचा इतिहास, खंड ३, ( पुनर्मुद्रण), पुणे, २००६ .

२. गर्गे, स. मा. संपा. मराठी रियासत, खंड ३, मुंबई, १९८९. ३. गर्गे, स. मा. संपा. मराठी रियासत, खंड ४, मुंबई, १९९०. कांबळे, र. ह. भिडे, ग. ल.

मूळ स्रोत - मराठी विश्वकोष [होळकर, मल्हारराव](https://vishwakosh.marathi.gov.in/20243/)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...