विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 23 September 2023

भारतीय इतिहासातील एक झंझावती व्यक्तिमत्त्व यशवंतराव होळकर

 


भारतीय इतिहासातील एक झंझावती व्यक्तिमत्त्व यशवंतराव होळकर
भारतीय इतिहासात होवून गेलेले एक झंझावाती व्यक्तिमत्त्व म्हणजे यशवंतराव होळकर. पेशव्यांनी जप्त केलेले आणि दौलतराव शिंदेंनी बळकावलेले होळकरांचे राज्य महाराजा यशवंतराव होळकर यांनी अनेक लढाया करीत डिसेंबर 1798 मध्ये जिंकून घेतले आणि त्यानंतर पुढे काही दिवसात म्हणजे 6 जानेवारी 1799 रोजी यशवंतरावांनी आपला वैदिक पद्धतीने राज्याभिषेक करुन घेतला. रविवारी (ता. 6 जानेवारी) या घटनेला 220 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकला आहे इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनी….
यशवंतराव होळकरांचा (3-12-1776 ते 28-10-1811) जीवनप्रवास थक्क करणारा आहे. असा थरारक रोमांचक जीवनप्रवास, संकटांची एवढी वादळे, युद्धांचा सतत झंझावात, सतत विजयाची आस, स्वातंत्र्याची आस, विश्वासघात सहज पचवत पुढे जाण्याची तयारी, अफाट नेतृत्वक्षमता, पराकोटीचे युद्धकौशल्य, नितांत दुर्दम्य आशावाद, प्रयत्नांची निराश न होता केलेली पराकाष्ठा, क्षमाशीलता असे सर्व गुण एकत्र असणारा महायोद्धा व राज्यकर्ता जगाच्या इतिहासात क्वचितच सापडेल.
यशवंतरावांना राज्य सोडा, साधी बोटभर जहागीर वंशपरंपरेने मिळालेली नाही. ती त्यांना भिल्ल-पेंढारी व पठाणांच्या स्वत: उभारलेल्या अल्प सैन्याच्या जिवावर प्रशिक्षित पलटणींशी लढून मिळवावी लागली. त्यांनी शिंदे-पेशव्यांच्या घशातून जप्त झालेले होळकरी प्रांत अविरत लढत-लढतच मुक्त केले. एवढेच काय, पण शिंद्यांनी कैदेत टाकलेली पत्नी आणि अल्पवयीन कन्येलाही लढूनच मुक्त केले. गादीचा खरा वारसदार खंडेरावाला मुक्त करण्यासाठी आयुष्य पणाला लावले. त्यांना स्वत:ला इंदुरी गादीची हाव कधीच नव्हती, हे त्यांच्या सर्व कृत्यांवरून सिद्ध होते. हे सर्व प्रांत त्यांनी जिंकलेले होते. एका अर्थाने त्यांनी संपूर्णपणे नव्याने राज्याची पायाभरणी केली होती. शिवरायांनंतर स्वत:चे राज्य स्वत:च्या हिमतीवर मिळवणारा, शेवटपर्यंत स्वतंत्र राहणारा, स्वत:हून एकही तह न करणारा हा एकमेव महायोद्धा होता.
यशवंतरावांत एक अद्भुत चैतन्य सळसळत असायचे. निराशा त्यांना माहीत नव्हती. पराकोटीची व्यक्तिगत संकटे कोसळूनही त्यांनी मनाचे संतुलन ढळू दिले नाही. त्यांच्या स्वत: मैदानात सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून लढण्याच्या वृत्तीमुळे अनेकदा संभाव्य पराजयही त्यांनी विजयात बदलवले आहेत. यशवंतरावांच्या या आक्रमकतेचा व कथित क्रौर्याचा फटका सामान्य माणसाला बसल्याचे एकही उदाहरण नाही. त्यांनी 1803 नंतर ज्याही लढाया केल्या त्या सर्वच्या सर्व इंग्रजांविरुद्धच्या आहेत. एतद्देशीयांविरुद्ध एकही नाही हेही येथे लक्षात घेतले पाहिजे. या सर्व लढायांत-युद्धांत ते अजिंक्य राहिले आहेत हेही उल्लेखनीय आहे. यशवंतराव हिंदू धर्माचे अभिमानी जरी असले तरी त्यांनी अन्य धर्मीयांचा दुस्वास केल्याचे एकही उदाहरण नाही. आपली कन्या भीमाबाई हीस त्यांनी घोडेस्वारी ते सर्व शस्त्रास्त्रांचे शिक्षण दिले तसेच लिहायला-वाचायलाही शिकवले. तत्कालीन सामाजिक स्थितीत राजेरजवाड्यांच्या स्त्रिया या जनान्यात पर्दानशीन वा घुंघटात असायच्या. महाराणी तुळसाबार्इंनाही त्यांनी आवश्यक ते शिक्षण दिले होते. त्यामुळेच यशवंतरावांनंतर त्या राज्यकारभार पाहू शकल्या. यशवंतरावांची शिस्त कठोर होती. आपले इंग्रज अधिकारी फितूर झाले आहेत हे कळताच त्यांनी त्यांना देहांत शासन दिले.
यशवंतरावांचे सर्वात मोठे आणि शिवरायांनंतरचे अद्वितीय कार्य म्हणजे त्यांनी 6 जानेवारी 1799 मध्ये करवून घेतलेला वैदिक राज्याभिषेक. या राज्याभिषेकाची कधीच चर्चा होत नाही. यशवंतरावांना पेशव्यांनी अधिकृत कधीच राजवस्त्रे दिली नाहीत. तरी लोकमान्यतेसाठी व अन्य सरदारांनी आपले महत्त्व जाणावे व आपल्या कार्यात साथ द्यावी म्हणून त्यांनी राज्याभिषेक करून घेतला. एका धनगराचा आधुनिक काळातील हा एकमेव राज्याभिषेक. त्याचे ऐतिहासिक मोल अद्याप आपल्याला समजावयाचे आहे.
यशवंतरावांना जिंकता येत नाही म्हणून वेलस्लीसारख्या गव्हर्नर जनरलची हकालपट्टी इंग्रज सरकारला करावी लागली. भारताबाबतची धोरणे बदलावी लागली. जगात अजिंक्य मानल्या जाणा-या इंग्रज सेनेची इभ्रत जगाच्या वेशीवर टांगली गेली. 1797 ते 1811 असा फक्त चौदा वर्षांचा काळ यशवंतरावांच्या कर्तृत्वासाठी मिळाला. 1797 ते 1803 हा काळ यशवंतरावांना स्वत:चे राज्य व अधिकार प्रतिष्ठापित करण्यासाठी, स्वत:ची पत्नी व कन्येस कैदेतून मुक्त करण्यासाठी वेचावा लागला. 1803 पासून त्यांनी इंग्रजांविरुद्ध सर्वंकष अथक लढा उभारला आणि बलाढ्य इंग्रज सेनांना एकामागून एक 18 युद्धांत पराजित केले. एवढे झंझावाती, दुर्दैवाच्या आघातांनी भरलेले त्यांचे जीवन. पण त्यांचा अजरामर आशावाद कधीच निस्तेज झाला नाही. कोलकात्यावर आक्रमण करून एकट्याच्या जिवावर भारत स्वतंत्र करण्याची त्यांची उमेद अखेरच्या क्षणापर्यंत अभंग होती. मला वाटते,
कोणत्याही महाकवीला स्फूर्ती देईल असेच हे वादळी जीवन होते. असा महामानव आपल्या धर्तीवर जन्माला आला हे आपले भाग्यच आहे. आपण त्यांना समजून घेतले नाही हे आपले दुर्भाग्य आहे. खर तर आपण भारतीयांनी त्यांच्या वीरश्रीचे, स्वातंत्र्यप्रेमाचे पोवाडे मुक्तकंठाने गाऊ शकलो तर ती या महान स्वातंत्र्ययोद्ध्याला खरी आदरांजली असेल.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...