' वणंगपाळ बारा वजीराचा काळ 'अशी ज्या घराण्याची ख्याती ते घराणे म्हणजे फलटणचे नाईक निंबाळकर घराणे होय.मराठी मुलखातील प्राचीन घराण्यापैकी नाईक निंबाळकर यांचे हे घराणे . चौदाव्या शतकात बहामनी सुलतानाच्या काळात दख्खन वर राज्य करणार्या वनगोजी राजा निंबाळकर यांचा मोठा दरारा होता. बहामनी सुलतान सुध्दा वनगोजी राजा निंबाळकर यांच्याशी वचकुन असे त्यामुळे त्याने वनगोजी राजेंशी सलोख्याचे संबंध ठेवले होते. छत्रपती शिवरायांची जशी फलटण ही सासुरवाडी तशीच शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले हे सुद्धा नाईक निंबाळकरांचे जावई होत. म्हणजे शहाजी राजांचे हे आजोळ घराणे आहे. शहाजी राजांच्या मातोश्री दीपाबाई राणीसाहेब या फलटणच्या नाईक निंबाळकरांच्या होत्या. फलटण हे छत्रपती शिवरायांची सासुरवाडी म्हणून जसे मराठी मुलखाला ज्ञात आहे तसेच शहाजीराजे यांचे ते आजोळ म्हणूनही मराठी मुलखाला ज्ञात आहे .
अशा या फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील दहिगाव आणि भाळवणी या ठिकाणी वास्तव्यास आलेले साबाजी जगदेवराव ,सईबाई राणीसाहेब, बजाजी ही मुधोजी नाईक निंबाळकर यांची चार अपत्ये.
या पैकी साबाजी व जगदेवराव रा दोघा भावांची घराणी मराठी इतिहासात पुढील शंभर दीडशे वर्ष आपल्या पराक्रमाने, शौर्याने तळपत राहिली आहेत. या पराक्रमी पुरुषांनी त्यांच्या निष्ठेने,शौर्याने फार मोठा मान मरातब मिळवला.छत्रपती शिवाजीराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या हालचाली पुणे, सुपे या त्यांच्या जहागिरीत चालू झाल्या ,तरीही हे घराणे आदिलशाही सलतनीशी एकनिष्ठ राहून त्यांची इमाने इतबारे सेवा करत राहिले. दहिगाव आणि भाळवणी येथील नाईक निंबाळकर घराण्यात अनेक वीर पुरुष एकामागून एक निर्माण होऊन आपल्या पराक्रमांनी त्यांनी, ज्यांचे पदरी राहिले त्यांची प्राण पणाला लावून निष्ठेने सेवा बजावली.
साबाजी यांनी फलटण येथून निघाल्यावर दहिगाव येथे वास्तव्य केले .त्यांच्याकडे सावर्डे कर्यात खानापूरची जहागिरीची सनद होती. ती पुढे राजाराम महाराजांनी अमृतराव नाईक निंबाळकर यांच्या नावे केली.
साबाजी नाईक निंबाळकर यांना मुधोजी, तुकाराम ही दोन मुले.मुधोजी यांना मूलबाळ नव्हते. तुकाराम यांना अमृतराव,शहाजी, पिराजी व कन्या राधाबाई अशी चार अपत्ये होती. यातील अमृतराव आणि राधाबाई या बहिण भावांनी इतिहासात आपले नाव कायमचे कोरले. अमृतराव निंबाळकर हे राधाबाईचे भाऊ व नागोजी माने यांचे मेहुणे होते. अमृतराव प्रथम मोगलांकडे मनसबदार म्हणून काम पहात होते. परंतु नंतर ते मराठ्यांकडे येऊन संताजी घोरपडे यांचे बरोबर छत्रपतींची सेवा करू लागले.
इ.स. १६९३ साली अमृतराव नाईक निंबाळकर मराठ्यांचे सैन्य घेऊन भीमा नदी ओलांडून मोगली प्रदेशात घुसले .त्यांचा पाठलाग करण्यासाठी मोगलांनी प्रसिद्ध सेनानी हिम्मतखान यांना रवाना केले .परंतु मराठे चपळ हालचाली करीत रवाना झाले .त्यामुळे हिंम्मतखान काही करू शकला नाही .यावर्षीच्या आक्टोबर महिन्यात अमृतराव यांच्या हाताखाली चार हजार स्वार देऊन संताजी घोरपडे यांनी स्वतः सहा हजार स्वारांनिशी मळखेडच्या बाजूस कुच केले होते .अमृतराव निंबाळकर यांनी वर्हाडातील मोगली प्रदेशात हल्ले व लुटालूट करून मोगलांना हैराण केले होते. अमृतराव यांना छत्रपती राजाराम महाराजांनी सनद दिली.त्यातील मजकूर असा "चंदीस ताम्र आला. म्हणवून स्वामीच्या पायाशी एकनिष्ठता धरून चंदीस येऊन तांब्रासी युद्ध करून पराभवाते पावविला" तुम्ही पूर्वी तांब्राकडे होता.
ऐशियास स्वामीचे राज्य म्हणजे देवता भूमी . या राज्यास तांब्राचा उपद्रव न व्हावा , महाराष्ट्र धर्म राहावा , स्वामीच्या राज्याची अभिवृद्धि व्हावी, या उद्देशे स्वामीच्या पायाशी एकनिष्ठता धरून तुम्ही चंदीचे मुक्कामी स्वामीपाशी आलेत सबब तुमावर कृपाळू होऊन सरदेशमुखीचे नूतन वतन करून दिल्हे.
. अमृतराव नाईक निंबाळकर दक्षिणेकडे डिसेंबर १६९६ साली आयवर कुटीचे लढाईत मरण पावले. यावेळी छत्रपती राजाराम महाराज जिंजी किल्ल्यावर होते .किल्ल्यास मोगल सेनापती जुल्फीकारखान याचा वेढा पडला होता .त्याच वेळी संताजी आणि धनाजी यांचे तुंबळ युद्ध आयेवार कुटी येथे झाले .यावेळी छत्रपतींना संताजी घोरपडे यांचे बाबत छत्रपती राजाराम महाराज त्यांच्या कानावर कागाळ्या घातल्या गेल्या. संताजी घोरपडे छत्रपती महाराजांचे आदेश पाळत नाहीत .त्यांचा विचार स्वतंत्र होण्याचा आहे.असे छत्रपतींना सल्लागारांनी भरून दिल्याने संताजी घोरपडे यांचे सेनापतीपद यावेळी काढून घेण्यात आले होते .ते सेनापतीपद धनाजी जाधवांकडे देण्यात आले .धनाजी जाधव यांना संताजी घोरपडे यांचेवर चालून जाऊन पकडण्याचा हुकुम छत्रपतींनी दिल्याने कांचीपुरम जवळ आयेवारकुटी येथे मराठ्यांचे छत्रपती व सेनापती यांची ही अभूतपूर्व लढाई घडून आली ! ही लढाई मोठी धुमश्चक्रीची झाली. या लढाईत छत्रपती राजाराम महाराजांचा पराभव होऊन ते संताजी घोरपडे यांचे कैदी बनले ! धनाजी जाधवास रणांगणावरून पलायन करावे लागले! अमृतराव निंबाळकरास कैद होऊन हत्तीच्या पायी जावे लागले. या लढाईत अमृतराव नाईक निंबाळकर संताजी घोरपड्यांकडून मारले गेले होते.
छत्रपती राजाराम महाराज आणि धनाजी जाधव हे बरेच मोठे सैन्य घेऊन संताजी घोरपडे यांवर तुटून पडले. त्यांच्या सैन्याच्या आघाडीवर अमृतराव निंबाळकर अद्वितीय असा सेनानी होता. परंतु या युद्धात अमृतराव संताजी घोरपडे कडून मारले गेले.आपला भाऊ अमृतराव ,संताजी घोरपडे यांचे कडून मारले गेले याचे दुःख राधाबाई माने यांना खूप झाले होते.त्याची परिणती म्हणून राधाबाई माने यांनी थेट संताजी घोरपडे यांचेवर मारेकरी घालून त्यांची हत्या घडवून आणली.
संताजी घोरपडे दहिगावच्या लढाईत हनमंतराव निंबाळकर यांचे कडून पराभूत होऊन महादेवाच्या डोंगरात राहू लागले होते. दहिगावच्या लढाईत संताजी घोरपडे यांचा पराभव झाल्यामुळे त्यांनी या परिसराचा आश्रय घेतला होता. अमृतराव निंबाळकरांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी राधाबाई माने यांनी संताजी घोरपडे यांच्यावर मारेकरी घातले.संताजी आंघोळ करीत असताना व निशस्त्र अवस्थेत असताना त्यांना ठार मारले. ज्या कन्हेर गावात संताजींना मारले गेले ते गाव नागोजी माने म्हसवडकर यांच्या ताब्यात होते. त्यामुळे या भागातील संताजींच्या हालचाली त्यांना ठाऊक असणे शक्य होते.
संताजी घोरपडे यांची हत्या ही गोष्ट मराठी इतिहासात दुरगामी परिणाम करणारी ठरली. संताजी ,धनाजीच्या पराक्रमाने औरंगजेब बादशहा धास्तावून गेला होता. बादशहाचे मोठमोठे उमराव संताजी कडून पराभूत झाले होते. त्यामुळे संताजी घोरपडे यांची हत्या बादशहाला मोठी समाधानाची आनंदाची गोष्ट वाटली. संताजी घोरपडे यांची हत्या झाली ही बातमी आणणाऱ्या सेवकाला औरंगजेबाने ' 'खुशखबरखान 'ही पदवी दिली यातच संताजी घोरपडे यांच्या पराक्रमाची औरंगजेबाला वाटणारी धास्ती स्पष्ट दिसून येते.
नाईक-निंबाळकर घराण्यातील प्रत्येक पिढीत पराक्रमी लोक निपजले. अमृतराव निंबाळकर या वीर पुरुषांनी आपले प्राण मराठ्यांच्या लढाईत रणांगणावर ठेवले.
सध्या अमृतराव नाईक निंबाळकर यांचे वंशज लेंगरे जिल्हा सांगली ता.खानापूर येथे वास्तव्यास आहेत.
सध्या सरकार श्रीमंत अमृतराव दत्ताजीराव नाईक-निंबाळकर व( २ )श्रीमंत सरकार धैर्यशील दत्ताजीराव नाईक-निंबाळकर वास्तव्यास आहेत. (परंपरागत चालत आलेले नाव म्हणून प्रथम मुलाचे नाव ही अमृतराव दत्ताजीराव नाईक-निंबाळकर असे ठेवले आहे )
लेखन
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर
संदर्भ
सोलापूर जिल्ह्याचा इतिहास
गोपाळराव देशमुख
मराठी रियासत
गो .स .सरदेसाई
शिवपुत्र छत्रपती राजाराम
डॉक्टर जयसिंगराव पवार
No comments:
Post a Comment