विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 1 October 2023

अफझलखानाचे पोट बिचव्यानेच फाडले ?

 

अफझलखानाचे पोट बिचव्यानेच फाडले ?
लेखन ::मालोजीराव जगदाळे





अफझलखान वधाची पोस्ट मागे आलीच आहे , ज्यात प्रस्तुत पोस्ट च्या कर्त्याने असा दावा केला आहे कि शिवरायांनी अफझलखानाचा वध हा बिचवा अथवा वाघनख वापरून नाही तर तलवार वापरून केला आहे.
इतिहासाचा अभ्यास करताना ऐतिहासिक कागदोपत्री नोंद जसे कि फर्मान , पत्र यांना प्रथम दर्जाचे साधन मानण्यात आले आहे. स्तुतीग्रंथ,चरित्रग्रंथ इ. चा क्रमांक नंतरचा आहे.
हा सर्व दावा फक्त एक संदर्भग्रंथ म्हणजे शिवभारत यावर आधारित आहे , इतर सर्व तत्कालीन संदर्भ sideout केल्याचे निदर्शनास येत आहे. सर्व तत्कालीन संदर्भ गृहीत धरून याचे विवेचन करण्याचा प्रयत्न करत आहे.
* पहिला संदर्भ - कविंद्र परमानंदकृत शिवभारतामधील श्लोक -
तं निर्यातयितुं वैर प्रवृत्तोसौ महाव्रतः|
शिवः कृपाणीकाग्रेण कुक्षावेव तमस्पृशत || ३९||
आपृष्टं विद्विषतकुक्षी तूर्णतेन प्रवेशिता |
आकृप्यानाणी सर्वानी सा कृपाणी विनिर्गता||४०||
याचा अर्थ आणि अर्थाचा उहापोह मागील पोस्ट मध्ये असून त्याचा पुनरुच्चार करण्याची गरज येथे भासत नाही , परंतु इथे स्पष्ट पणे 'कृपाण' हा शब्द आलेला आहे ज्याचा सरळसोट अर्थ कट्यार,खंजीर किंवा पेष्कब्ज होतो
आणि दुसरा अर्थ तलवार असा होतो जो इतर काही श्लोकात आलेला आहे.
(कृपाण आणि पेशकब्ज यांचे फोटो जोडत आहे )
विशेष गोष्ट म्हणजे पेशकब्ज आणि कृपाण जवळपास सारखेच दिसतात.
* दुसरा संदर्भ - शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे यांनी दिलेले दानपत्र प्रसिध्द आहे जे २४ ऑगस्ट १६८० रोजी दिलेले होते म्हणजे शिवरायांच्या मृत्युनंतर फक्त ४ महिन्यांनी .
या दानपत्रात शिवरायांनी अफझलखानास बिचवा वापरून मारले असे स्पष्ट लिहिले आहे.
* तिसरा संदर्भ - डचांचे पत्र (शिवकालीन पत्रासार संग्रह , क्र. ८१२ , एप्रिल १६६०)
डच म्हणतात "शिवाजीने एका गुप्त हत्याराचे योगे खानाच्या पोटावर वार केला"
* चौथा संदर्भ - शिवरायांचे नातू शाहू छत्रपती यांनी लिहून घेतलेल्या 'प्रतापदुर्गामहात्म्य' ग्रंथाच्या अफझलवध अध्यायात (सोळावा अध्याय श्लोक १६ ते २१ ) नोंद आहे कि शिवरायांनी लपवलेल्या 'असि' ने अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला. येथे असि चा अर्थ early form of sword means dagger म्हणजेच खंजीर / बिचवा असा होतो
* पाचवा संदर्भ - हेन्री रेव्हिन्ग्टन चे पत्र (शिवकालीन पत्रासार संग्रह क्र ७९१ )
“शिवाजीने अंगरख्यात लपून ठेवलेला खंजीर काढून अफजलखानच्या छातीत खुपसला”
* सहावा संदर्भ - मुन्तखब अल लुबाब मध्ये खाफीखान म्हणतो 'सिवाने लपवलेले हत्यार जोराने अफझलखानाच्या पोटात खुपसले'
याव्यतिरिक्त बुत्सीन उस सलातीन, आलमगीरनामा,जेधे शकावली मध्ये अफझलखानास मारल्याचे उल्लेख आहेत परंतु कोणत्या शस्त्राने मारले हे नमूद केलेले नाही.
याव्यतिरिक्त सभासद बखर, ९१ कलमी ,शिवापूर देशपांडे वही यातही उल्लेख आहेत अफझलखान वधाचे परंतु बखरी गृहीत धरल्या नाहीत.
वरील सर्व अस्सल संदर्भ पाहता शिवरायांनी खानाचे पोट फाडले ते बिचवा /पेशकब्ज/खंजीर असे कट्यार सदृश शस्त्र वापरूनच या निष्कर्षावर मी येत आहे.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...