विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 6 October 2023

सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं । (उत्तरार्ध) भाग ५

 


सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं । (उत्तरार्ध)
भाग ५
जुलै १६७६ मध्ये कुत्बशहाने आदिलशाही व महाराज यांच्यात तह घडवून आणला. मुघलांचा शिरकाव टाळाता यावा म्हणून महाराजांनीही याला लगेच होकार दिला. तहानुसार महाराजांकडे कोल्हापुरच्या पुढचा कृष्णगिरीपर्यंतचा मुलुख रहावा व त्या बदल्यात महाराजांनी ३ लक्ष रुपये पेशकश व दरसाल १ लक्ष खंडणी द्यावी असे ठरले. याच दरम्यान पूर्वार्धात सांगितले तसे ऑगस्टमध्ये नळदुर्गाजवळ बहलोल - बहादुरखान एकमेकांना भिडले. व त्यात बहादूरखानाला पराभव पत्करावा लागला. बहलोलखानाचा ओढ दिलेरखान पठाणाकडे असल्याने त्याने महाराजांशी केलेल्या तहाला महत्व दिले नसावे कारण सप्टेंबरमध्ये बेळगाव - बंकापूर जवळील भाग घेण्यासाठी मराठे गेल्यावरती आदिलशाहीकडून तो प्रदेश देण्याची टाळाटाळ झाली. महाराजांनी तो प्रदेश लुटून रायगडि प्रयाण केले. वरुन त्यांनी आता बहादूरखानाशी तह करुन बहलोल विरोधात ४-५ हजारांची कुमकही रवाना केली. अर्थातच पुढे बहलोलने साखरेत घोळवलेली बोलणी केल्यावरती बहादूरखानाने माघार घेतली. हीच अनुकुल वेळ आहे हे जाणून आता महाराजांनी थेट कुत्बशहाला भेटता येईल का हे चाचपायला सुरुवात केली व त्या दृष्टिने कुत्बशाहीतले आपले वकिल प्रल्हाद निराजी यांना हाताशी धरुन कुत्बशहाचे अधिकृत निमंत्रण मिळवण्याची खटपट सुरु झाली. अनेकदा राजकारणात हि निमंत्रणे आपणहून पदरात पाडून घ्यावी लागतात. एकदा का दख्खनमध्ये असा चंचूप्रवेश केला की मग अर्धा डाव जिंकल्यात जमा होता.
कुत्बशहा पहिले साशंक होता - "जैसा अफझलखान बुडविला की शास्ताखान बुडविला, दिल्लीस जाऊन आलमगिर पातशहास पराक्रम दाखविला ऐसा एखादा अनर्थ जाहल्यास काय करावे? भेट मात्र राजियाची न घेऊ, जे मागतिल ते देऊ." यावरुन महाराजांनी केलेल्या अद्भुत कृत्यांनी भारतभर त्यांच्याविषयी किती दरारा पसरला होता हे दिसून येते. मात्र प्रल्हाद निराजीनी आपली बाजू लावून धरली. महाराजांनी किती धूर्त, गोड बोलणारे व वेळ पडल्यास बनेल होणारे चाणाक्ष वकिल नेमले होते हे अफझलखान भेट काय किंवा ही भागानगरची भेट काय यावरुन दिसून येते. प्रल्हाद नीराजींनीही सगळ्या आणा-भाका घेऊन हे निमंत्रण पदरात पाडून घेतले. त्यांनी मादण्णांचा विश्वासही तितकाच संपादन केला. त्याचा परीणाम म्हणून - "हजरत कुतुबशहाने मेहेरबानी करुन ’हुजुर भेटीस येणे’ म्हणून दस्तखत मुबारक व दस्त पंजीयानसी फर्मान सादर केला."

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...