सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं । (उत्तरार्ध)
भाग ४
आता महाराजांचे
त्या मागचे हेतू काय होते ते बघू. १) दख्खनमध्या अनागोंदिचा फायदा घेऊन व
दुर्बळ झालेल्या आदिलशाहीच्या राज्यातून, इतर दक्षीणी राज्यांतून शक्य
तितका मुलुख हस्तगत करून स्वराज्याच्या सीमा वाढवणे. २) राज्याभिषेकाच्या
वेळी झालेला खर्च चौथाई, खंडणी याशिवाय मिळालेल्या नव्या मुलुखाच्या
उत्पन्नातून भरुन काढणे व पुढे मिळणारे उत्पन्न वापरुन स्वराज्याची भरभराट
करणे ३) मुघलांचे मोठे आक्रमण झाले व वेळ पडलीच तर माघार घ्यायला नवीन भूमी
निर्माण करणे. ४) कोकण प्रमाणेच दक्षीण समुद्र किनारा ताब्यात आल्यास
भारताच्याच व्यापारी नाड्या स्वत:च्या हातात आणणे. हे महत्वाचे हेतू म्हणता
येतील. आणि हे चारहि हेतू तेव्हा सफल झालेच पण दुसरा व तिसरा मुद्दा हा
राजाराम महाराजांच्या काळात जेव्हा ते रायगड - प्रतापगडवरुन निसटून खाली
जिंजीला गेले तेव्हा साध्य झाले. कारण दुसरा मुद्दा म्हणजे या मुलुखातून जो
पैसा उभा रहात होता त्याच्या जोरावरती महाराष्ट्रातील संग्रामाचा खर्च
मराठे बर्याच
प्रमाणात भागवत होते. आणि जिंजीपर्यंत घेतलेली ’माघार’ ही सामरिक दृष्ट्या
मराठ्यांना फायद्याची होती कारण - दिल्ली ते पुणे हे जवळपास बाराशे किमीचं
अंतर, पुणे ते जिंजी पुन्हा हजार एक कीमीचे अंतर म्हणजे शत्रूला त्याच्या
राजधानी अथवा बलस्थानापासून २ हजार किमी दूर खेचून त्याला दुर्बळ बनवायचे व
त्याची रसद मधल्या मधे मारुन त्याला जेरीला आणायचे उद्योग मराठ्यांनी
राजाराम - ताराराणींच्या काळात केल्याचे दिसून येतील.
थोडक्यात
ही मोहिम यशस्वी ठरल्यास "पांचो उंगलियां घी मे।" म्हणतात तसं काहीसं
होणार होतं. एकंदर रागरंग बघून दूरदृष्टिने महाराजांनी व्यंकोजीराजांना
जागे करण्याचा प्रयत्न केला. परंतू ते आपल्या तंजावरची हद्दितच सुखी होते.
महाराज वास्तविक नुकतेच आजारातून उठत असल्याने ही मोहिम लगेच अंगावरती घेणे
शक्य नव्हते. त्यामुळे परीपूर्ण विचारांतीच हालचाल करावी लागणार होती. आता
त्यांनी कुत्बशहाला पुढे करुन त्याच्या आडून नेतृत्व करता येते का हे
चाचपायला सुरुवात केली. त्यात त्यांना रघुनाथपंतांची व मादण्णांची साथ
मिळणार होतीच. बरोबरच एक सार्वभौम राजा आहोत ह्याची प्रचिती देखिल त्यांना
जगाला द्यायची होती ती या मोहिमेने कशी देता येईल याचाही विचार
स्वराज्याच्या दृष्टिने होणे गरजेचे होते. जर हे सगळे मनासारखे जुळले तर
मुघली सत्तेचा पाया दख्खनमधुन कायमचा उखडून टाकता येईल हे प्रमेय
महाराजांनी मनोमन मांडले होते.
No comments:
Post a Comment